जन्मपत्रिका - मानो या ना मानो :-)

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 August, 2021 - 16:38

माझ्या जन्म झाला तेव्हा माझी जन्मपत्रिका काढली गेली. ती जन्म झाल्यावर लगेच काढली की दोनचार वर्षांनी ते आता आईला विचारावे लागेल. ती कुठली पद्धत वापरून काढली, कोणी काढली याची मला कल्पना नाही. पण जेव्हा जेव्हा घर आवरताना ती आईला सापडली तेव्हा तेव्हा मी ती कौतुकाने जरूर वाचली. प्रत्येकवेळी हेच लक्षात आले की त्यात जे जे लिहिले होते तेच जवळपास माझ्या आयुष्यात घडलेय.

उदाहरणार्थ, भावंडांचे फार सुख नाही.
आणि हो, खरेच की! मी एकुलता एक आहे Happy

पुढे प्रॉपर्टी वादात चुलत भाऊबहिणींच्या सुखालाही मुकलो ते कायमचेच Sad

मला स्वतःला किमान दोन अपत्ये होतील असे पत्रिकेत लिहिलेले. आतापर्यंत दोन तरी झाली आहेत. कन्यारत्नाचे सुख लिहिलेले. पहिली मुलगीच झाली. दोन्ही मुलांत जास्त लाडकी तीच आहे हे विशेष.

सरकारी नोकरी आणि सरकारी गाडीतून फिरण्याचा योग आहे असे लिहिलेले. खरे तर त्या काळात हे साधारण असावे, पण माझे शिक्षण होईस्तोवर काळ बदलला होता आणि मी त्याला अनुसरून ईंजिनिअरींग केल्यावर खाजगी नोकरीच करणार होतो, किंबहुना करतही होतो. पण अपघातानेच म्हणा, त्या खाजगी कंपनीत कामाला असताना तिथे माझा एक खास मित्र झाला. जसे दोन खास मित्र टॉयलेटला सुद्धा एकत्र जातात तसे तो एमपीएससी परीक्षेचा फॉर्म भरायला जात असताना निव्वळ त्याला सोबत म्हणून मी गेलो होतो आणि हीच सोबत कायम ठेवायला म्हणून अचानक मी सुद्धा परीक्षा द्यायचे ठरवले. तिथेच फॉर्म घेतला आणि दोन दिवसांनी मी सुद्धा भरला. पण नंतर सिलॅबस बघून मात्र कॉलेज सुटल्यावर पुन्हा अभ्यास करायच्या कल्पनेनेच जाऊ दे म्हटले.

पुढे परीक्षेच्या वीसेक दिवस आधी आठवडाभर आजारी पडल्याने तीच सुट्टी दोनेक आठवडे वाढवून आयत्या वेळी पुस्तकांची जमवाजमव करून जे विषय माझे चांगले होते त्याचीच रिवीजन करत परीक्षेला बसलो आणि शॉर्टलिस्ट झालो. ईंटरव्यू सुद्धा चांगला गेला. मधल्या काळात पत्रिकेत लिहिलेले मित्राला सांगितले. तो बिचारा नव्हता शॉर्टलिस्ट झाला. पण तो रोज मला म्हणायचा, "तुझे सिलेक्शन तर होणारच रे, तुझ्या पत्रिकेतच लिहीले आहे" .... आणि अखेर तसेच झाले. गडचिरोलीला का होईना आठेक महिन्यांची सरकारी नोकरी झाली. सरकारी गाडीत फिरायचाही योग जुळून आला.

करीअरबाबत अजून एक लिहिले होते ते म्हणजे मुलगा हुशार निघेल. वृत्तपत्रात फोटो झळकेल. शालेय जीवनातच चौथी आणि सातवीत स्कॉलरशिप परीक्षांच्या निमित्ताने वृत्तपत्रात फोटो झळकत ते देखील सत्य ठरले. आमच्या बिल्डींगमध्ये वा आमच्या घराण्यात असे होणारा मी पहिलाच मुलगा असल्याने ही देखील नक्कीच छोटी गोष्ट नव्हती जे तुक्का लागला असे म्हणू शकतो. जसे की विमानप्रवासाचा योग आहे असेही पत्रिकेत लिहिले होते, पण ते मात्र आजच्या काळात फार साधारण झाले आहे.

सध्या जो मला Crohn's Disease नामक आजार झाला आहे जो बरा होत नाही, फक्त कंट्रोल करू शकतो. त्याचाही पत्रिकेत उल्लेख आजाराचे नाव न घेता आयुष्यभराचा सोबती म्हणून अगदी समर्पक केलाय. तसेच शरीराचा नाजूक भाग म्हणून पोटाचा त्रास कायम सतावणार असेही लिहीले आहे, ते देखील खरेच ठरले आहे. कारण आजवर विविध आजारात माझ्या पोटानेच बरेच काही सहन केले आहे. याऊपर अजूनही ऊतार वयात अमुकतमुक काहीबाही चूटूरपुटूर वा प्राणघातक होईल असे नमूद केले आहे, पण ते कुठल्या स्वरुपाचे आजार असतील यावर भाष्य न करता केवळ वयाच्या कोणकोणत्या वर्षी होणार ईतकेच दिले आहे. त्यातून बचावलात तर सत्तरेक वर्षांचे आयुष्य जगाल असेही लिहिले आहे. पुन्हा पत्रिका शोधून चेक करायला हवे. पण नकोच ते आता. उगाच ती वयवर्षे आता लक्षात राहतील, आणि त्या काळात त्या भितीत जगणे होईल.

अरे हो, महत्वाचे तर राहिले. पत्रिकेत प्रेमविवाहही लिहिलेला. लहानपणी हे वाचून फार गुदगुल्या व्हायच्या. पण नंतर कॉलेज उरकल्यावर असे वाटले की प्रेमप्रकरणांच्या ऐवजी प्रेमविवाह असे चुकून छापले गेलेले की काय...
पण अखेरीस प्रेमविवाहच झाला. तो देखील बदलत्या काळाला अनुसरून ऑर्कुटच्या माध्यमातून झाला. विशेष म्हणजे जेव्हा आम्ही नवरा-बायको दोघेही अरेंज मॅरेजच्या तयारीला लागलेलो त्या वयात झाला. जेव्हा आमची ओळख झाली तेव्हा बायकोची काही स्थळेही बघून झालेली, त्या स्टेजला येऊन झाला. जणू काही जोड्या आकाशातूनच ठरवून येतात आणि त्या एकमेकांच्या जन्मपत्रिकेत लिहिल्या जातात Happy

पण जन्मपत्रिकेत लिहिलेली जोडी लग्नपत्रिकेत पोहोचायचा प्रवास सोपा नव्हता. आणि हे देखील माझ्या जन्मपत्रिकेतच लिहिले होते. प्रेमविवाहात अडचणी येतील असे स्पष्ट शब्दात लिहिले होते. आता आपल्याकडे प्रेमविवाह कधीच सुखासुखी होत नाहीत. पण तरीही पत्रिकेत मुद्दाम नमूद केलेले त्याचा मान राखत जरा जास्तच अडचणी आल्या. सोशलसाईटवरची ओळख आणि आंतरजातीय विवाह असल्याने घरच्यांच्या विरोधात जात रजिस्टर विवाह करावा लागला. पण त्यानंतरही घरचे तयार झाल्यावर दोघांची पत्रिका जुळवताच त्यात मृत्युयोग आला Happy

याऊपर माझ्या जन्मपत्रिकेत स्वभावावरही भाष्य केले होते. आता त्यात स्वभावातील चांगले गुण सोडून देऊया. कारण ते कुठल्याही नाक्यावरच्या ज्योतिषाने सांगितले तरी आपल्याला पटतातच. जसे की भाऊ तुम्ही फार स्वाभिमानी आहात बघा, कोणाचे दोन पैश्यांचे फुकटचे खाणार असा तुमचा स्वभाव नाही भाऊ.. तर आता कुठला भाऊ हे नाकारणार बोला Happy

पण पत्रिकेत लिहिलेले स्वभावातील दुर्गुणही पटण्यासारखे होते. जसे की शीघ्रकोपी. चटकन राग येणे आणि चटकन निवळणे. स्वभावातील हा दोष मी मान्यही करतो आणि नेहमी यावर कसा कंट्रोल राहील या प्रयत्नातही असतो. याऊपर अजून एक म्हणजे आरामाची आवड. हे बहुधा तुपात घोळवून लिहिले असावे. स्पष्ट भाषेत आळशी म्हणायचे टाळले असावे. पण काहीही लिहिले तरी आहे ते खरेच. माझे घरचे नावही "साळशीचा आळशी" असे आहे (साळशी आमचे मूळ गाव). तसेच शाळाकॉलेजच्या जमान्यापासून आजही मी ज्या ज्या ठिकाणी काम केले तिथे ऑफिसमधील सर्वात आरामप्रिय व्यक्ती म्हणून मीच ओळखला जातो.

शेवटचे मी पत्रिका पाहिलेली वा वाचलेली त्याला आता पाचसहा वर्षे झाली असावीत. घर बदलल्यापासून मी ईथे नवी मुंबईला आलो तर पत्रिका जुन्या मुंबईतच राहिली. अन्यथा नेमके शब्द, नेमकी वाक्ये लेखात टाकता आली असती. पण आज अचानक हे लिहावेसे वाटले कारण एका व्हॉटसपग्रूपवरच्या चर्चेत विषय निघाला तेव्हा माझ्या पत्रिकेतील हे मुद्दे तिथे लिहिणे झाले. त्यांनाच एकत्र करत मग हा लेख लिहिला.

गंमतीचा भाग म्हणजे हे असे असूनही माझा आजही पत्रिका वा भविष्य अश्या कुठल्याही प्रकारावर विश्वास नाही. मी देवधर्म काही मानत नाही. कुठला सणवार पाळत नाही. चालीरीती, कुळाचार, प्रथा-परंपरा वगैरे काही काही नाही.
पण तरीही माझ्या पत्रिकेत जे लिहिलेय ते बहुतांश माझ्या आयुष्यात घडलेय आणि म्हणूनच स्वत:ची पत्रिका वाचणे मला नेहमीच रोचक वाटत आलेय हे प्रामाणिकपणे कबूल करण्यात मला कसलाही संकोच वाटत नाही.

कुठलीही श्रद्धा अंधश्रद्धा पसरवायचा हेतू नाही. पण जे माझ्याबाबत आहे ते असे आहे. अब तुम लोग मानो, या ना मानो Happy

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हीच गंमत हा शब्द वापरला म्हणून काय गंमत वाटली असे विचारले. आता अप्रस्तुत म्हणत आहात तर तसे का हे सांगा.

बाकी मी ते लिहिण्यामागचा हेतू सांगितलाच आहे.
तुमच्या मताचाही आदर आहे. पटले तर आचरणात आणेल. नाही पटले तर सोडून देईल. पण यामागचा तुमचा विचार कळणे गरजेचे असे वाटते.

दहा ओळखीच्या लोकांच्या पत्रिका घ्याव्यात. त्यांतील प्रत्येक पत्रिकेतील ग्रहस्थिती, ज्योतिष भाकीत आपले स्वतःचेच आहे असे समजून मन लावून वाचून काढाव्यात. पैकी चार तरी तंतोतंत स्वतःला लागू पडतील Wink

आमच्याकडे दोन जण आले होते. त्यातला एक खरोखरच भूतकाळ सांगत होता त्याने माहिती न्हवती काढली. कारण असे भरपूर पॉईंट्स त्याने सांगितले जे माहिती काढून त्याला मिळणे अशक्य होते. तो आला तेव्हा बाजूचे काका कोल्हापूरला गेले होते. दुसऱ्या दिवशी काकांनी त्याला फोन लावला तर काका काहीच न बोलता त्याने लगेच ओळखलं कोण बोलतंय आणि हे पण सांगितलं की तुम्ही काल कोल्हापूरला गेला होता. त्याच्यासोबत दुसरा होता तो भंपक होता. तुम्ही घर बघताय,ऑफिसमध्ये खुप मेहनत करता, जवळच्या व्यक्तीने करणी केले, तुमचा अपघात होणार होता पण त्यातून वाचलात. असले भंपक पॉइंट्स सांगत होता. पण शेवटी दोघांचाही कल पैसे खेचण्याकडेच होता. याने त्याने करणी केले, बंधन घातलंय सांगून त्यावर उपाय सांगणार आणि पैसे घेणार.

तुम्हीच गंमत हा शब्द वापरला म्हणून काय गंमत वाटली असे विचारले. आता अप्रस्तुत म्हणत आहात तर तसे का हे सांगा.>> आता तुमची सारवासारव सुरु आहे.

काय पोस्ट होती?
वर विधवा शब्दासंबंधित होती का?
आता तर या शब्दाने आणि त्यावरच्या आक्षेपाने कुतूहल फारच चाळवलेय..

वीरू, तुमचा आक्षेप कशावर आहे ते कळत नाही. नंदीबैलवाला शेजारची आजुबाजुची खबर काढुन बनवेगिरी करायचा प्रयत्न करत होता एवढा अर्थ निघाला त्या पोस्टमधुन.
त्यात गंमत तर आजिबात नाहीच पण अप्रस्तुत पण काही वाटलं नाही. तुम्हाला काय वाटलं ते सांगा.
विधवा शब्द खटकण्याचं काय कारण असेल.
अमांची 2-3 आयडींच्या मते बरोबर लिहिलेली पोस्ट आम्हालाही वाचायची होती. आता फक्त डोमा

अवांतर - विधवा शब्द तरी एक वेळ जरा बरा आहे पण ग्रामीण भागात ज्यांच्या पतीचे निधन झाले किंवा तो सोडून गेला अशा स्त्रियांना फार खराब शब्द वापरला जातो असे निरीक्षण आहे. पुण्या-मुंबईत बोलताना असे शब्द वापरले तर पब्लिक चोप देईल. भले गावाकडच्या लोकांचा त्या स्त्रीचा उल्लेख करताना वाईट हेतू नसेल पण असे चुकीचे प्रचलीत शब्द ऐकताना खराब वाटते फार Angry
(वरील माहिती देताना माझा कोणाला दुखावण्याचा हेतु नाही)

वीरू, तुमचा आक्षेप कशावर आहे ते कळत नाही.>>

धागाकर्ता यांचा हा प्रतिसाद :
<आमच्या घरच्यांनीही त्याला घरी बोलावलेले. आम्हाला त्याने सांगितले की विधवेची नजर लागली आहे. आमच्या शेजारची बाई विधवा होती हि माहिती बहुधा त्याने काढलेली.>
हे उदाहरण देण्यामागचे प्रयोजन फक्त नंदीवाल्याची बनवेगिरी सांगणे इतकेच होते? असेलही कदाचित.
पण लिहिण्याच्या नादात आपण काय लिहितो याचे तारतम्य नको बाळगायला?
काय तर म्हणे विधवेची नजर लागली. शेजारी विधवा रहाते याची माहिती काढली बहुदा. म्हणजे ठोस नाही तर 'बहुतेक' म्हणजे एक शक्यता.
कोणत्या जगात वावरतो आपण?

आता माझा प्रतिसाद:
<माफ करा, पण गंमतीत का असेना पण सोशल मीडियावर अशी विधाने करण्यात काय पॉईन्ट आहे.>
वरचा प्रतिसाद लिहिण्यामागचे कारण हेच की धागाकर्ता यांचेकडुन गंमतीत असे विधान निघाले असावे कारण सिरियस मोडमध्ये कुठलीही सुजान व्यक्ती जाणीवपुर्वक "त्याने सांगितले विधवेची नजर लागली. शेजारी विधवा होती ही माहिती बहुदा त्याने काढली" असे विधान करणार नाही.
विधवा या शब्दाला आक्षेप नाही. वर जिद्दु यांनी म्हटल्याप्रमाणे ग्रामीण भागात अनेक पर्यायी शब्द आहेत. पण कोणी केवळ उदाहऱण म्हणुन का असेना, धागाकर्ता यांनी नंदीवाल्याची लबाडी सांगण्यासाठी केला तसा उल्लेख करत असेल तर माझा विरोधच राहिल.

आता पुन्हा कनफ्यूज झालो

१) आक्षेप विधवा शब्दावर आहे का? हा शब्द चुकीचा आहे का? आमच्याकडे तरी हाच शब्द वापरला जातो.

२) आक्षेप नंदीबैलवाल्याची लबाडी पुराव्याशिवाय बहुतेक असे म्हणत दाखवली यावर आहे का? मुळात विधवेची नजर लागते हाच एक वाह्यात विचार नाही का?

३) नंदीबैलाच्या भविष्याला लबाडी बोलल्याने कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या का?

आता पुन्हा कनफ्यूज झालो > +१ (पुन्हा शब्द वगळून.)

वीरू तुम्हाला नक्की काय म्हणायचंय कळलं नाही.
कुणी असं विधान केलं "आमच्या शेजारी विधवा रहाते." तर आक्षेप समजू शकतो. कुणाची अशी ओळख करून देणे अप्रस्तुत आहे.
नंदीवाला तसं म्हणाला त्या संदर्भात शेजारची बाई विधवा आहे असं म्हटलंय. दोन्ही सारखे होत नाही.

मला वाटले 'विधवेची नजर लागते' या बद्दल तुम्हाला आक्षेप आहे, आणि ऋन्मेष किस्सा गमतीने (काल्पनिक) लिहितो आहे असे समजून तुम्ही आक्षेप नोंदवत आहात.

@मानव मलाही त्या वाक्यात काही आक्षेपार्ह वाटले नाही कारण तो किस्सा काल्पनिक नसून खरा आहे. चूक असेल तर ती त्या वासुदेवाची आहे. पण त्याची बुद्धीही यथातथाच असावी ज्याअर्थी तो हे असे बादरायण संबंध जोडत होता.

Pages