रायगड जिल्ह्यातील पारंपारिक गोकूळ अष्टमी साठी नैवेद्याचे कुट्याचे लाडू/घरगुती कुरमू-याचे लाडू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 August, 2021 - 03:26

|| जय श्री कृष्ण ||

गोकूळ अष्टमीला महाराष्ट्रात घरोघरी बालगोपाळाला गोडाचे नैवेद्य दाखविले जाते. रायगड जिल्ह्यात तांदळाची शेती केली जाते त्यामुळे घरगुती तांदळापासून बहुतांशी घरात कुरमुरे तयार करुन ते भरडून, गूळ व इतर जिन्नसे खल-बत्यात कुटून त्यापासून लाडू करून तो नैवेद्या दाखविण्याची परंपरा आहे. खलबत्यात कुटल्याने भरड पीठ व गुळ एकजीव होते. कुटतात म्हणून याला कुट्याचे लाडू असेही म्हणतात.
बरं हे कुरमुरे म्हणजे भेळवाल्याकडे मिळणा-या कुरमु-याप्रमाणे नसून पाण्यात अर्धा दिवस भिजवून तव्यावर अथवा कढईत खमंग भाजून मस्त कुरकुरीत केलेले तांदूळ असतात. गृहलक्ष्मीचे मनापासून केलेले कष्ट, भक्तीभाव, प्रेम या लाडूत उतरल्याने हे अत्यंत खमंग व रुचकर लागतात. अनेक शेतकरी घरात तसेच या लाडूची प्रथा पाळणा-या घरात ५-१० किलोच्या प्रमाणात कुरमु-याचे पीठ दळून आणले जाते. केलेले लाडू व पीठ आप्तांना भेट दिली जाते. हे पीठही खूप खमंग असते. अर्ध्या पिठाचे लाडू करून अर्धे चहातून व दूधातून खाण्यासाठी ठेवले जाते. हा एक प्रकारचा नाश्ताच होऊन जातो. याच्या खमंगपणामुळे मुलेही हे लाडू व भिजवलेले पीठ आनंदाने खातात. सगळ्यांनाच मोठ्या प्रमाणात हे लाडू वा पीठ करणे शक्य नसते म्हणून खालील व्हिडिओत पाव किलोच्या प्रमाणात लाडू तयार केले आहेत व चहातून आणि दूधातुन पीठ भिजवल्याचे प्रात्यक्षिकही दाखविले आहे.
https://youtu.be/eNj7UiKlMAs
साहित्य
पाव किलो घरगुती तांदूळ किंवा जाडसर तांदूळ
मीठ (तांदुळ भिजवत ठेवताना टाकण्यासाठी)
१ छोटी वाटी गूळ
२ चमचे किसलेले सुके खोबरे हलके भाजून
२ चमचे चिरलेला सुका मेवा
चिमुटभर जायफळ पावडर
पाव चमचा वेलची पावडर
२ चमचे तूप

कृती
तांदूळ स्वच्छ धुवून घ्या व ते बुडतील त्यापेक्षा जास्त पाणी घालून त्यात अर्धा चमचा मीठ घाला. ते ढवळून घ्या व झाकण ठेवून साधारण ७-८ तास भिजू द्या
रात्री ठेवले असतील तर सकाळी तांदूळ चाळणीत निथळा व पूर्ण पाणी निथळले की मध्यम आचेवर ढवळत सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. खमंग वास सुटेल. हे तांदूळ थंड करा व मिक्सरमध्ये भरड पीठ साधारण बारीक रव्यासारखे पीठ करा.
खलबत्ता असेल तर खलबत्यात नाहीतर मिक्सरमध्ये हे पीठ घेवून त्यात वरील प्रमाणानुसार.गुळ, सुका मेवा, सुके खोबरे, वेलची पूड, जायफळ पूड व तूप घालून कुटून घ्या. गुळ व पीठ एकजीव झाले की एका भांड्यात हे मिश्रण काढून लाडू वळा.

(फोटो अपलोड होत नाहीये खुप ट्राय केल)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा जागुकाकी. मस्तच. करायला सोपे आणि पौष्टिक असे हे लाडु मी पहिल्यांदाच ऐकले. नक्की बनवून खाणार अन खाऊ घालणार.

अहाहा काय आठवण करून दिली जागु ताई...
गावी आजी असेपर्यंत दर वर्षी हे तांदळाचं पीठ दूध / चाहतून खायचो..
आता कोणी च बनवत नाही हे पीठ... मध्यंतरी मी प्रयत्न केला घरात बनवायचा पण ती चव आली नाही... त्यामुळे ती मजा ही आली नाही...

अमुपरी, डिजे, किशोर, वावे, अनिष्का धन्यवाद.
हे लाडू आणि पीठ गोड पेक्षा खमंग म्हणुन खायला छान लागतात.

खूप मस्त लागतात हे लाडू. जागू छान लिहलय.पाकृ वाचताना मला तर लाडवाच खमंग वास पण आला. आजोळी गेल्यावर आज्जी नेहमी बनवायची आमच्यासाठी. आजीच्या जुन्या घरात जमिनीत एक खड्डा/ खळ होता त्यात ती कुटून बनवित असे. तिची मेहनत आता समजते आहे. प्रचंड आवडतात हे लाडू त्यामुळे आज्जी आम्ही गावी गेल्यावर नेहमी बनवायची आणि घरी परत येतानाही डब्बा भरून पाठवायची. आज्जी गेली आणि हे लाडू खाणे बंद झाले. आज्जीच्या हातची चव पुन्हा काही मिळाली नाही. फक्त तांदूळ आणि गुळापासून ती लाडू बनवे पण ते अप्रतिम असतं. सकाळी चहात पीठ पण कम्पल्सरी खायला देई ती. ते फुगून एव्हढ होई की मला कधीच संपत नसे.
अरे बापरे खूपच लिहले ना पण nostalgic झाले आणि आज्जीची खूप आठवण आली.

कृष्णा, स्वाती, निल्सन, माऊमैया धन्यवाद.
निल्सन खरच पुर्वीच्या स्त्रीयांच्या कष्टाला सलाम आहे. पुर्वी दर जात्यावर दळायचे घरोघरी हे पीठ.

माऊमैया सासूबाईंना नमस्कार सांगा. खुप छान दिसतायत लाडू.

मलासुद्धा चालतील हे लाडू, बरं का जागू आणि तुम्हा समस्त पाककला प्रेमींच्या घरी वसलेल्या अन्नपूर्णा देवीला काही काळासाठी आमच्या देवलोकातसुद्धा पाठवा. पाक कृती स्पर्धेत तुमचा सर्वांचा सहभाग नक्कीच असेल. मी येतोय तुमच्या भेटीला, लवकरच ...
***** मायबोली गणेशोत्सव २०२१ *****

Mi yetoy-1- with logo-final-latest.jpg

>>>>>मलासुद्धा चालतील हे लाडू, बरं का जागू आणि तुम्हा समस्त पाककला प्रेमींच्या घरी वसलेल्या अन्नपूर्णा देवीला काही काळासाठी आमच्या देवलोकातसुद्धा पाठवा.

हाहाहा! बप्पा आपल्याशी बोलल्याने, काय मस्त वातावरण निर्मीती होतेय.

एक वाटी तांदूळा चे लाडु करुन बघितले. मस्त झालेत. फक्त जरा तांदुळ ची मध्ये मध्ये कचकच लागत होती. नेक्स्ट टाईम जास्त बारीक करेन किंवा चाळुन घेईन. धन्यवाद जागूताई रेसिपी बद्दल. Happy
20210902_142132.jpg

तेच

नागपंचमी कणकेचे लाडू म्हणजे तंबीट लाडू असावेत,

पण नेटवर तांदूळ , डाळ व गूळ घालून तंबीट लाडू करतात असे दिले आहे

जुन्या कथेत तहान लाडू , भूक लाडू असायचे, ते कसले?