गाडी बुला रही है़

Submitted by नीलिमा क्षत्रिय on 23 August, 2021 - 05:51

संगम दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख..
गाडी बुला रही है.....
ही साधारणपणे अठरा वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. घरात मारूती 800 आल्या दिवसा पासूनच गाडी शिकण्याची अनावर इच्छा माझ्या मनात उसळ्या मारत होती. नव-याला माझा मनसुबा सांगितल्यावर , "मग चालवायची ना, त्यात काय विशेष आहे, स्कूटरला दोन चाकं, तशी ह्या गाडीला चार चाकं. बाकी काय वेगळं असतं!!"
"अरे वा, म्हटलं सोप्पच आहे अन काय मग!
मग येता जाता गाडी शिकायला जायचं टुमणं सुरू केलं. कधी तो गाडी शिकण्याचा क्षण येतो, अन कधी मी स्टिअरींग हातात घेते असं मला होऊन गेलं होतं. पण नव-याने तो क्षण शिताफीने पुढे ढकलायला सुरूवात केली. मग एके दिवशी 'चूल बंद आंदोलन' ची धमकी दिल्यावर पोर्चमधे उभ्या असलेल्या गाडीत ड्रायव्हींग सिट वर मी स्थानापन्न झाले.
लगेच गाडी रस्त्यावर घेण्यापेक्षा नव-याने आधी मला ABC शिकवलं. एक्सिलेटर, ब्रेक, क्लच.. गाडी न्युट्रल वर ठेवायची, सेल मारायचा, गाडी स्टार्ट झाली की क्लच दाबून गाडी फर्स्टला टाकायची. मग हळूहळू क्लच सोडायचा आणि एक्सिलेटर वाढवायचा. त्याप्रमाणे पुढचं नंतर करावं. आधी न्युट्रल टाकून गाडी स्टार्ट करायला शिकायचं असं ठरलं. त्याप्रमाणे मी न्युट्रल टाकला आणि सेल मारला. तोच गाडीने ढूप्पकन बेडूकउडी मारली, आणि बंद पडली. न्यूट्रल पडलाच नव्हता. गाडी गिअर मधेच होती. गाडीला बसलेल्या गचक्यासरशी नव-याचा जीव कंठाशी आलेला मला दिसला. मग तो दिवस नुसतं गिअर, फर्स्ट, सेकंड, थर्ड, टॉप रिव्हर्स अशी पाच मिनिटे प्रँक्टीस घेऊन, नव-याने मला गाडी बाहेर काढले. गाडी घाईघाईने लॉक करून चावी खिशात टाकली. पुन्हा दुस-या -तिस-या दिवशी तेच, फर्स्ट.. सेकंड..थर्ड..मला कंटाळा येऊन गेला. पण आधी गाडी चालवणं म्हणजे काही विशेष नाही म्हणणारा नवरा आता, "गाडी चालवणं म्हणजे काय तोंडच्या गप्पा आहेत का , कोणाला ठोकलं बिकलं तर नसती आफत" वर येऊन पोहोचला.
शेवटी म्हटलं हे काही जमायचं नाही. माझ्या एका मैत्रिणीला गाडी चांगली चालवता येत होती, तिच्याकडूनच शिकावी असा बेत केला. तो बेत ऐकल्यावर घरात एकच गहजब झाला. त्या मैत्रिणीच्या ड्राइव्हिंग विषयी बरीच टिका टिपण्णी झाली.. पण मी माझ्या निर्णयावर ठाम बघून उगीच दोघी मैत्रिणी मिळून गाडीचा बट्ट्याबोळ नको म्हणून नव-याने दुपारच्या वेळी जीवावर आल्यासारखी हळूच गाडी बाहेर काढली. गावाबाहेरचा एक रस्ता, गाडी शिकण्यासाठी माझ्या दोन्ही मुलींनी व त्यांच्या वडिलांनी मिळून ठरवला. तिथे गेल्यावर स्टिअरींग माझ्या हातात देण्यात आलं. मला आता आनंदाबरोबरच जरा टेंशन पण आलं. तसं आजुबाजूला शेतं, शेतवस्त्या, गोठे, त्याच्यात बांधलेली गुरे ढोर होतीे.. रस्त्यावर मात्र चिटपाखरू पण नाही, नवख्या ड्रायव्हरसाठी अगदी स्वप्नवत, आनंदी दृष्य होतं ते...
ट्रेनिंग सुरू झालं, पहिला धडा - गाडी स्टार्ट करणे.
'क्लच दाब,न्युट्रल टाक, सेल मार'..
मारला...... गाडीने ढुप्पकन बेडूक उडी मारली. नव-याच्या घशात आवंढा गटांगळ्या खाऊ लागलेला मला न बघताही दिसला! आता स्वत:च एकदा न्युट्रल पडल्याची खात्री करून घेऊन मला सेल मारायला सांगितला. गाडी सुरू झाली, आणि जागीच फुरफुरत उभी ठाकली. आता ABC..अॅक्सिलेटर, ब्रेक, क्लच..गिअर टाकण्याआधी पुन्हा जोरदार सुचना.."ब्रेक वर लक्ष ठेवायचं,. रस्तावर कोणी नाही म्हणून जोरात घेशील, कुत्र बित्र आडवं आलं तर पंचाईत होईल"....मी नंदीबैलासारखी मान डोलावली. आता गाडी शिकायचीच आहे म्हटल्यावर नवरा सांगेल ते ऐकणं भाग होतं. पण तशी ऐकून घ्यायची सवय नसल्याने जरा जड जात होतं.
'हं, क्लच दाब, फर्स्ट टाक.'
टाकला..
'आता क्लच सोड हळूहळू , आणि अॅक्सिलेटर दे.'.दिला.
गाडी एक आचका देऊन धुडूप्पकन पुन्हा बंद...क्लच सोडून त्याच स्पीडने अॅक्सिलेटर देणे ह्या दोन्ही क्रिया एकाचवेळी जमणे , म्हणजे नव्या नवरीला लग्नाच्या दुस-याच दिवशी सासूला दीड तारी पाक करून दाखवावा लागावा, इतकं अवघड प्रकरण वाटलं मला. दोन्ही क्रिया एकाचवेळी करणं काही केल्या जमेना.
गाडीच्या अजून दोनचार बेडूक उड्या झाल्यावर मात्र गाडी नीट हळू हळू रस्त्यावर चालू लागली. पण मला गाडीत सगळंच खूपच अनकंफर्टेबल वाटत होतं. बॉनेटचा फारच अडथळा वाटत होता त्याच्यामुळे रस्तापण धड दिसत नव्हता. गिअर खरं म्हणजे डोळ्यासमोर पाहिजे होते असं वाटत होतं. रस्त्यावर नजर ठेऊन खाली न बघता गिअर टाकणं फारच बोरींग प्रकार वाटत होता. सिट पण फारच खाली आहे असं वाटत होतं. उशीवर बसुनही मला रस्ता समाधानकारकपणे दिसत नव्हता. सिट मागे पुढे करायची सोय असते तशी वर खाली पण करायची सोय असायला पाहिजे होती. रस्त्यावरचे लोक जादूने अदृष्य करता यायला पाहिजे होते...असे भयंकर इनोव्हेटीव्ह विचार माझ्या मनात दाटी करत होते. एखादा मिनिट भर गाडी चालली असेल तोच समोरून एक मोटरसायकलस्वार येताना दिसला.. मी मनात म्हटलं .. 'आत्तापर्यंत कुत्रंही नव्हतं रस्त्यावर, आणि आत्ताच हा मुडदा कुठून उगवला'..... मनातला सात्विक संताप शब्दांचं हिंस्त्र रूप घेऊन मनातल्या मनात नाचून गेला. त्याला पाहील्याबरोबर माझी गाडी रस्ता सोडून साईडला जायला लागली. नवरा म्हणे, "एवढा मोठा रस्ता सोडून तिकडं कुठं खड्डयात चाललीस?" म्हटलं "तो येतोय ना समोरून"...
"येऊ दे ना, त्याला डोळे आहेत ना, आणि गाडीला ब्रेक पण आहे." इती नवरा..
मी मनातल्या मनात.. ब्रेक.. ब्रेक ..ब्रेक..
आता मोटरसायकलवाला बराच पुढे आला होता. मला ड्रायव्हिंग सीट वर बघून, माझ्यापेक्षाही सावधगिरीने माझ्याकडे बघत बघत जीव वाचवत पसार झाला. आता रस्त्यात कोणीच नव्हतं...गाडी पण छान संथ गतीने रमत गमत चालली होती... रस्ताभर झाडांनी छान गार सावली अंथरली होती, हवेत पिकांवरचा गंध दरवळत होता,* सगळ्या आसमंतात माझ्या नावासारखीच नीलिमा दाटलेली होती. मला निवांत वाटत होतं..... तोच शेजारून अरसिक सूचना आली, "सेकंड टाक".
मला जीवावर आलं. म्हटलं, चांगली चालतीये ना गाडी ...मग कशाला आता मोसम तोडायचा? पण मग नाईलाजाने 'सेकंड' टाकला, तो सेकंड न पडता डायरेक्ट थर्ड पडला. परत भयंकर झटापट करून सेकंड टाकला. तोच समोरून सायकल वर मागे घास बांधून एक सायकलस्वार येताना दिसला. त्याचा घास अर्धा रस्ता अडवून चालला होता.माझ्या सेकंड थर्डच्या घोटाळ्यातच तो जवळून जाऊ लागला. आणि माझ्या गाडीच्या समोरच्या काचेवर मला अचानक हिरवागार घास पसरलेला दिसला....आणि दुस-याच क्षणी तो घासवाला रस्त्यावर धारातिर्थी पडलेला दिसला. तोपर्यंत गाडी वीस पंचवीस फूट पुढे गेली होती. पण तरी 'माता -भगिनी' वरून त्याने केलेलेे मंत्रोच्चार मला स्पष्ट ऐकू आले. इकडे नव-याच्या कानशिलावर घर्मबिंदू गोळा झालेले.
तेवढ्यात माझा मागचा कारनामा बघून घाबरलेला, दाढीला डोक्याला लाल मेंदी लावलेला, सायकलला दोन्हीकडे पावाच्या मोठाल्या पिशव्या लटकावलेला, एक मुसलमान पाववाला, नको भलत्या घोळात अडकायला, म्हणून घाईघाईने मला ओव्हरटेक करून जायला लागला, पण त्यालाही कसा काय माहीत, पण जरासा धक्का लागलाच, तसा तो पण कोलमडला, नशिब गाडीच्या पुढे नाही आला. रस्त्याच्या कडेच्या घळीत तो गेला. मी आपली व्रतस्थपणे गाडी पुढे नेली. मागून त्याच्या मोठमोठ्याने बडबडण्याचा आवाज आला. मी म्हटलं," काय म्हणतोय तो?"
नवरा- "काही नाही, सलाम आलेकुम म्हणतोय तुला".
असे रस्त्याने कोणाला पाडत, कोणाला वाचवत मी गाडी बरीच दूर नेली...पण तोपर्यंत मला अगदी मानसिक थकवा आला, नव-याचे पण पेशन्स संपत आले होते(जेआधीच कमी असतात)मग जास्त अंत न बघता मी साईडला गाडी थांबवली आणि अगदी साळसूदपणे नव-याला गाडी सोपवली...
दुस-या दिवशी पुन्हा त्याच वेळी त्याच स्थळी गाडी घेऊन आम्ही हजर! मी स्टेअरींगवर स्थानापन्न. पुन्हा क्लच, ब्रेक, अॅक्सिलेटर. ट्रेनिंग सुरू. निघाली गाडी कडेकडेनी. कालचं ट्रेनिंग पाहिलेली आजुबाजूच्या वस्तीवरची लहान लहान मुलं, आजही काहीतरी एक्सायटींग बघायला मिळण्याच्या आशेने रस्त्याच्या कडेला सुरक्षित अंतरावर दबा धरून बसलेली. काही रिकामटेकडी टाळकी कामात असल्याचा आव आणत एक डोळा रस्त्यावर देऊन असलेली. मी सगळ्याकडे पूर्ण दूर्लक्ष करून माझ्या ध्येयाप्रती लक्ष केंद्रीत करून गाडी चालवू लागले.
आज तर कोणीच मधेपण आलं नाही. चांगली पाच मिनिटे गाडी निर्धोक चालली...तोच एक गॅस सिलिंडरचा डिलीव्हरी बॉय रस्त्याच्या कडेकडेने रमत गमत जाताना दिसला. म्हणून मी गाडी जरा रस्त्याच्या मधून घेतली. तोच उजवीकडून शेजारच्या आडव्या रस्त्यावरून एक दुधाच्या किटल्या दोन्ही बाजूला लावलेला मोटारसायकलस्वार, मुक्त आकाशात भरा-या मारणा-या वैमानिकासारखा रस्त्यावर अगदी माझ्या गाडी समोर अवतीर्ण झाला. नव-याचं सारखं 'ब्रेक ब्रेक ' चालूच होतं. त्यामुळे मी अॅक्सिलेटर वरून पाय उचलल्यावर ब्रेक नाही सापडला तर काय घ्या, म्हणून क्लच वरचा पाय आधीच ब्रेक वर अल्लाद ठेवलेला होता. वैमानिक समोर दिसल्याबरोबर जोरात ब्रेकची आद्न्या झाली. तसा मी कच्चकन ब्रेक दाबला. क्लच न दाबता नुसताच ब्रेक दाबल्याने गाडीला एकदम थुडथुडी भरली. तेव्हा आधीपेक्षाही जोरात ऑर्डर सुटली, क्लच.. क्लच दाब पटकन.. तसा मी अॅक्सिलेटर वरचा उजवा पाय डावीकडे क्लचवर टाकला. आणि अशा रितीने माझ्या पायांचा क्रॉस झाला. पण एवढी धडपड करूनही मी डावीकडचा सिलिंडरवाला डिलीव्हरी बाँय आणि उजवीकडचा दुधवाला वैमानिक अचूक टिपले होते.
घटने नंतरचे द्रुष्य साधारणपणे असं होतं...सिलिंडरवाल्याला मागून हळूच धक्का बसल्याने तो जोरात पुढे ढकलल्या गेला आणि रस्त्याकडेच्या उतारात दोन्ही पाय आणि टाक्या जमिनीला टेकलेल्या अवस्थेत सायकलवरच त्रिकोनासनात पुतळ्यासारखा पाठमोरा उभा...वैमानिक दुधाच्या किटल्यांसह गवतात तोंड घालून पालथ्या शवासनात पडलेला. आणि मी स्टेअरींगच्या पलीकडे खाली पायांचा क्रॉस करून बधीरासनात बसलेली. शेवटी समस्त नवरा जातीच्या प्राण्याचा जो ठेवणीतला वसकण्याचा स्वर असतो तो स्वर लावून नव-याने मला त्या अवस्थेतून बाहेर काढले. माझ्या टिपलेल्या दोन्ही सावजांनी भानावर येण्याच्या आत आम्हाला तिथून अंतर्धान पावणे भाग होते. त्यामुळे परत क्लच ब्रेक अॅक्सिलेटर करून गाडी स्टार्ट करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मी झटकन स्टेअरींगचा मोह सोडून , दार उघडून , गाडीला वळसा घालून दुस-या दाराशी गेले. नवरोजींनी आतल्या आत सरकून स्टेअरींग ताब्यात घेतले. आणि झटक्यात गाडी दोन्ही सावजांच्या नजरेच्या टप्प्याबाहेर काढली.
घरी आल्यावर मी शांतपणे आत्मनिरीक्षण केलं. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ड्रायव्हींग काही फारसं अवघड काम नाहीये. तरीही आपल्याकडून एवढा धांदरटपणा का झाला असेल बरं? दोन दिवसांचा घटनाक्रम मी पुन्हा नजरेपुढे प्ले केला. आणि 'युरेका युरेका'च झालं मला एकदम! मी ड्रायव्हींगला बसले की शेजारच्या सीटवरून एकेफोर्टीसेव्हन मधून गोळ्या सुटाव्यात तशा सूचना सुटत होत्या. इतक्या गोळ्या झाडल्यावर तर मायकेल शूमाकर पण स्टीअरींग व्हील सोडून पळाला असता. 'नवरा बरोबर असताना बायकोने गाडी चालवण्याचा प्रयत्न करू नये' हा मोठा धडा मी शिकले. आणि सरळ ड्रायव्हींग स्कूल जाॉईन केली. तिथे शिकवायला नेमका माझ्या पार्लर मधे येणा-या एका क्लाएंट कम मैत्रीणीचा मुलगाच होता. त्याने सकाळी सातची बॅच मला दिली. मी आपली पहाटेच उठून, स्नानादी कर्मे उरकून, देवाला दिवा बिवा लावून मनोभावे नमस्कार केला आणि रणांगनावर जावं त्या आवेशात ड्रायव्हींग स्कूलवर पोहोचले. माझ्यासारखेच काही नवखे लढवय्ये तिथे होते. त्यातला एक लढवय्या आणि एक लढवय्यी गाडीत मागे बसले. मला त्या शिकवणा-या मुलाने हातानेच खूण करत स्टेअरींग वर बसायला सांगितलं आणि तो पुढे माझ्या शेजारी येऊन बसला..
ट्रेनिंग परत सुरू झालं.. परत ABC. म्हटलं, "ते माहीतआहे , पुढे बोल." म्हणे "गिअर्स टाकून दाखवा". दाखवले. "करा गाडी स्टार्ट". केली. विशेष म्हणजे एकही बेडूक उडी नाही. "टाका फर्स्ट...सेकंड...चला कडेकडेनी." गाडी डायरेक्ट हायवेवर. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर रहदारी जवळजवळ नव्हतीच. शिकवणारा मुलगा शांतपणे बसलेला. बरंच पुढे गेल्यावर तो मला म्हणाला ,"काकू, चांगली जमते गाडी तुम्हाला, गिअर्स पण टपाटप टाकता. कशाला पैसे वाया घालवता. घरच्याच गाडीवर रोज प्रॅक्टीस करा, सकाळी गर्दी नसताना". मी तर भलतीच खूष झाले ना बा..पण तरी मी त्याला आधीचं दोन दिवसाचं रामायण सांगितलं. तो म्हणाला, "एकटीनेच काढा गाडी हळूहळू. सूचनांचा ओव्हरडोस होतोय तुम्हाला." त्याचं बोलणं मला शंभर टक्के पटलं.
मग दुस-या दिवशी सकाळी सहालाच गाडी काढली. माझी धाकटी कन्या मोटारसायकल चांगली चालवायची, तिला आधार म्हणून सोबतीला घेतलं. रमत गमत कॉलन्यांमधल्या रस्त्यांमधून फर्स्ट -सेकंड करत करत एक चक्कर मारली. काँन्फिडंस पन्नास टक्क्यांनी वाढला!! दुस-या दिवशी सातला, तिस-या दिवशी आठला, अशी हळूहळू अकरा-बाराच्या गर्दीतून पण गाडी जमायला लागली. नुसती गाडी काढून चक्कर मारायची, आणि गाडी पोर्चमधे लावून टाकायची, ह्याच्यात पटाईत झाले होते मी, पण एखाद्या कार्यक्रमाला , किंवा कोणाच्या घरी गाडी न्यायची म्हटलं की मला पार्कींगचं जाम टेंशन चढायचं. 'कोणी मागेच गाडी लावून ठेवली तर? कोणी पुढेच लावून ठेवली तर? गाडी नीट काढता येईल का ', ह्या सगळ्या काळजीनं पोटात गोळा यायचा. कार्यक्रमात किंवा कोणाशी बोलण्यात मनच लागायतं नाही, सगळं लक्ष गाडीकडे लागून रहायचं.
रात्री झोपेत पण गाडी कुठेतरी बंदच पडली आहे, कुठेतरी रिव्हर्स घेताना मागच्या नालीत एक चाकच फसलंय, कोणीतरी गाडीखालीच आलंय , अशी स्वप्नं पडायची. आणि घाम फुटायचा.. गाडी काढायची म्हटलं की मला बरंच अवसान गोळा करावं लागायचं.
एकदा असंच एका संध्याकाळी मला गाडी काढायला लावायची म्हणून मुलींनी माझ्या बर्थडे पार्टीची टूम काढली. धाकट्या मुलीची एक अमराठी मैत्रीण पण त्यांच्यात नाचू लागायला. 'चलो चलो'..करायला. मी आपलं आवरून निघाले. मला वाटलं दोन स्कुटींवर चौघींनी जायचं असेल. पण मुली म्हणाल्या, "अहं, असं नाही, आज तू आम्हाला आधी लाँग ड्राईव्ह ला नेणार मग हाॉटेलमधे पार्टी "..माझ्या घशात आवंढाच आला. लाँग ड्राईव्ह तर ठीक होतं, पण हॉटेलमधे गाडी पार्क केल्यावर नीट काढता नाही आली तर? तिथे इतक्या लोकांसमोर फजिती व्हायची. पण मुली काय ऐकतात का ? काढायलाच लावली गाडी. आता गाडी चालवता येत होती तरी गाडी चालवण्यात आनंदापेक्षा दडपणच जास्त असायचं. आधी अर्धा तास बराच धीर एकवटावा लागायचा मला.
आवरण्याच्या नावाखाली बराच टाईमपास करून, शेवटी गाडी काढली..गेलो घाटाच्या पायथ्यापर्यंत. सप्टेंबर महिना होता तो. हवा जरा ढगाळच होती. घाटात तर काळ्या काळ्या ढगांच्या दांडग्या पिल्लांचा शिवाशिवीचा खेळ रंगला होता. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर पावसाची बूरबूर सुरू झाली. काचेवर पडलेल्या पाण्याच्या तुषारांमुळे पुढचं काही दिसेना. मी शेजारी बसलेल्या धाकटीला म्हटलं,"अग, काही दिसेना ना मला पुढचं". ती म्हणाली "वायपर चालू कर ना". म्हटलं मला कुठं माहीत आहे ते कसं चालू करायचं ते". ती म्हणे "शोध मग". मुली आणि मुलीची ती अमराठी मैत्रीण माझी फजिती बघून हसत सुटल्या. तीची मैत्रीण मराठीचा मर्डर करत म्हणाली, "धुंडा म्हणजे छपडेल"!! मी वैतागून मुलीला म्हटलं हिला नक्की काय म्हणायचंय? मुलगी म्हणाली "अग, 'शोधा म्हणजे सापडेल' अशा अर्थी म्हणतेय ती. ते ऐकून त्या टेंशनमधेही मला फस्सकन हसायला आलं. मग रस्त्याच्या कडेला गाडी घेऊन खटपट सुरू केली.. रस्त्याने जाणा-या गाड्या आम्हाला बघून स्लो व्हायच्या. काही आगंतुक समाजसेवक तर गाडी साईडला घेऊन मदतीसाठी लगेच पुढे सरसावायचे.. मुली त्यांना जोरदार हातवारे करून पुढे काढून द्यायच्या. बरीच खटपट केल्यावर ते वायपर चालू झाले. तोपर्यंत पाऊस हूल देऊन पसार झालेला.
मग गाडी वळवून आम्ही परत निघालो. रस्त्याने बरीच हॉटेल्स होती. मुलींचं चाललं होतं अमकं हॉटेल चांगलं, तमकं हॉटेल चांगलं. इथं हे छान मिळतं, तिथं ते छान मिळतं! कुठं जायचं त्यावरून त्यांचं गोंधळ घालणं चालू होतं. मी त्यांना मोठ्याने ओरडून थांबवलं, आणि म्हटलं ,"ज्या हॉटेलच्या पार्कींग मधून गाडी काढणं सोपं जाईल, त्या हॉटेल मधे जायचं". मग बराच उहापोह केल्यावर 'पार्कींग' आणि 'टेस्ट' ह्यांचं चांगलं काँम्बिनेशन असलेलं एक हॉटेल आम्ही निवडलं. मोठ्या झोकात गाडी गेट मधून आत घातली. गाडी हॉटेलच्या आवारात शिरल्याबरोबर वॉचमन सलाम करत पुढे आला. त्याला मी घाईघाईनं सांगितलं, " रिव्हर्स का प्रॉब्लेम है, अच्छी जगह बताना". त्याबरोबर त्याने एखादी सिरिअस ईमर्जंसी केस हाताळणा-या डॉक्टरसारखा चेहरा केला आजूबाजूला रिकाम्या जागांचा जायजा घेतला.आणि एक सुरक्षीत जागा माझ्यासाठी मुकर्रर केली. मला जमेल तेवढी चांगल्या प्रकारे मी गाडी पार्क केली. आणि निघालो.. गाडीकडे मागे वळून वळून पहात पहात... तोच वॉचमन मॅडम मॅडम करत मागे आला.. 'वो हेडलाईट चालू हैै ना'.. असं म्हटल्यावर मी धावत जाऊन ते बंद करून आले. आता वॉचमन सह आजूबाजूला बसलेले खाद्योपासक माझ्याकडे साशंक नजरेनं पाहू लागले. माझं अवसान दोरी सैल होऊन फुगा सैल पडावा तसं झालं.. गेलो हॉटेलच्या वरच्या मजल्यावर जेवायला. मुलींचं अजूनही वायपर वरून खिदळणं चालूच होतं. मग त्यांनी निवांत चर्चा करून जेवण मागवलं. माझ्या डोक्यात पार्कींग, रिव्हर्स , फजिती... कुठं खाण्यात मन लागतंय. जेवण झाल्यावर मुलींनी आईस्क्रीमची ऑर्डर दिली. आईस्क्रीम येईपर्यंत मी हॉटेलच्या काचेच्या भिंतीतून पार्कींग कडे नजर टाकली, तर माझ्या गाडीच्या मागेपुढे, आजूबाजूला गाड्याच गाड्या. शिक्षकांची कसलीतरी वार्षिक मिटींग होती म्हणे. माझे तर पायच सटपटले. मुली म्हणाल्या ".अग, तो आहे ना वॉचमन, काढायला लावेल तो गाड्या सगळ्यांना. बैस तू. आईस्क्रीम खा." मला मनातल्या मनात ते आईस्क्रीम पोरींच्या डोक्यावरच थापावंसं वाटत होतं. माझा टेन्स चेहरा बघून थोरली मला म्हणाली, " कूल मम्मा, मनातल्या भितीवरच तर तुला मात करायची आहे. म्हणूनच आपण आज हा प्लॅन केलाय ना! डरके आगे जीत है"!! म्हटलं कसली डोंबलाची जीत है ! गाडीके आगे मोटरसायकल है!! पुन्हा सगळ्या जोरजोरात हसत सुटल्या.
हॉटेल मधून बाहेर पडल्या बरोबर मी तरातरा जाऊन आधी त्या वाँचमनला गाठलं. आणि म्हटलं, "तुमको बोल्या था ना, रिव्हर्सका प्राँब्लेम है, आजूबाजूमे गाडी मत लगने देना." मी जोरजोरात बोलत असताना बाहेरच्या टेबलांवर बसलेले बरेच कान टवकारले गेले. वॉचमन म्हणाला "मॅडम आप निकालो गाडी, मै सब गाडीया बाजूमे करता हूँ!" मी गाडी काढायला सुरूवात केली. माझा जसजसा टर्न बसेल तसतसा तो गाड्या सरकवत होता. मुली पण हातवारे करून त्याला कोणती गाडी काढायची ते हेरून हेरून सांगत होत्या. मघाशी टवकारलेले कान पण आपापल्या गाड्यांच्या काळजीपोटी खाणं सोडून धावत पळत आले आणि वॉचमनला मदत करू लागले. फक्त एक हँडललॉक केलेली मोटरसायकल जराशी नडण्याची शक्यता वाटत होती. मग ती मोटरसायकल त्या वॉचमनने जीवाच्या आकांताने मागून ऊचलून धरली. आणि एखाद्या ट्रकने फूल्ल टर्न मारावा तसा टर्न मारून मी गाडी गेटच्या बाहेर काढली. गेटपाशी गेल्यावर मागून वॉचमन पळत आला आणि म्हणाला , "मॅडम वो रिव्हर्स गिअर का काम करके लेना जलदी!!"
त्याने असं म्हटल्यावर तर गाडीत हास्याचा ठसकाच उठला. तसंच हसता हसता मी गाडी हायवेवर घेतली . तोच मुलीची मैत्रीण, पार्कींगची कामगिरी फत्ते झाल्याच्या आनंदात, आणि माझा उत्साह आणखी वाढवण्यासाठी परत मराठीचा डबल मर्डर करत ओरडली, "चला काकू,घ्या सदानंदाचा एक घोट". धाकटी तातडीने तीला दुरूस्त करत मला म्हणाली, 'सदानंदाचा येळकोट' म्हणायचंय बहुतेक तिला!
गाडी शिकण्याच्या आणि नंतर गाडी चालवताना काही विशेष अनुभव मनावर कोरले गेले ते म्हणजे, बाईचं गाडी चालवणं हा ब-याचदा चेष्टेचा विषय असतो. गाडी चालवण्याकरिता बाईला सहसा कोणीच प्रोत्साहन देत नाही. प्रोत्साहन पेक्षा विश्वासच देत नाही की तुला नक्की गाडी जमेल. तरीही एखादी जिद्दीने शिकलीच , ती कितीही व्यवस्थीत गाडी चालवत असली, तरी शेजारी बसलेल्या पुरूषाला, ह्यात साधारणपणे भाऊ किंवा नवरा असतो, 'कधी हिची हौस भागते, आणि एकदाचा मी गाडी इच्छीत स्थळी पोहोचवतो,' असं होऊन जातं. रस्त्याने जाणारे पण, बाई गाडी चालवतेय म्हटलं की त्यांचा पुरूषी अहंकार डिवचला गेल्यासारखे वागतात. त्यांच्या चेहे-यावर एकतर खूप सावधगिरीचा भाव येतो, किंवा कुत्सितपणाचा भाव येतो. पुढे चाललेली गाडी, बाई चालवते आहे असं लक्षात आलं की मागून खूप हाँर्न देऊन गडबडून सोडणार, खूप भस्सकन ओव्हरटेक करणार, ओव्हरटेक करताना पण काहीतरी काँमेंट पास करणार, शेजारी बसवेल्या पुरूषाला पण मग टेंशन येणार, ते टेंशन मग नविनच गाडी चालवणा-या बाईकडे तो पास करणार. मग तिने मागच्या आणि शेजारच्या अशा दोन दोन पुरूषांचे दडपण घेऊन गाडी चालवायची. हेच जर पुरूष नुकताच गाडी शिकलेला असेल तर बायको- पोरं, सगळे त्याच्यावर विश्वास टाकून गाडीत चिडीचूप्प बसून रहातात. त्याच्या हातून काय चूका होत नाहीत का? होतातच. पण त्याला कोण जाब विचारणार, उलट 'तुला काय कळतं' असं म्हणून तो बायकोेला गप्प बसवू शकतो. गाडीला कुठे डेंट जरी आला तरी तो पण माफ असतो. बाईच्या हातून चूक झाली, गाडीला कुठे खरचटलं तरी ती बिचारी परत गाडी हातात घेत नाही. बाईला एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी आधी तिच्या 'बाई' पणाशी लढावं लागतं ,मग परिस्थितीशी. म्हणजे तिच्या आखिव परिघाबाहेरची कुठलीही गोष्ट साध्य करायला तिला दुप्पट ताकद लावावी लागते. बाईचं जगणं सोपं नसतं. जसजस जगणं वेगवान होतं आहे, बदलती आव्हाने पण तिच्यापुढे त्याच वेगाने येत आहेत.

® ✍नीलिमा क्षत्रिय. मो. 8149559091

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लेख आहे....आवडला.
आणि शेवटी मनावर कोरलेले अनुभव म्हणून जे चिंतन आहे ते पटलं.

मी म्हटलं," काय म्हणतोय तो?"
नवरा- "काही नाही, सलाम आलेकुम म्हणतोय तुला".

.
सुपर्ब.
एकूणच लिखाण आणि तात्पर्य सुपर्ब.

माझ्यापेक्षाही सावधगिरीने माझ्याकडे बघत बघत जीव वाचवत पसार झाला>>>> फुटले.हसणे पाहून घरातले वैतागले.

शेवटचा पॅरा पटलाच.>>>+१.

किती छान लिहिता तुम्ही. एक नव्या मंगला गोडबोले च आपल्याला ह्यांच्या रुपाने मिळाल्या आहेत नाही का सख्यांनो.

लेख व चिंतन आवडलं
नवरा बरोबर असताना बायकोने गाडी चालवण्याचा प्रयत्न करू नये' >>>>>>>+ 1111111111111111

गाडी चालवत नाही त्यामुळे बारकावे समजले नाहीत. एकूण विनोदी प्रकरण असावं.
एक बाई गाडी चालवताना हात गाडीबाहेर ठेवून होती. मागच्या वाहनाने शेवटी पुढे येऊन विचारले
"हात बाहेर ठेवलाय पण वळत नाही ये. का?"
" नेल पॉलिश वाळवते आहे. जा ना पुढे."

आवडला लेख.
हसुन मुरकुंडी वळली. सदानंदाचा घोट ला तर केवढ्याने हसले Lol
शेवटचा पॅरा पटलाच.>> +११११

खूपच धमाल लेखन....
वैमानिक दुधाच्या किटल्यांसह गवतात तोंड घालून पालथ्या शवासनात पडलेला. आणि मी स्टेअरींगच्या पलीकडे खाली पायांचा क्रॉस करून बधीरासनात बसलेली.>>>>>> हा प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा राहिला. Proud
कार नाही, पण दुचाकी शिकण्याचा अनुभव नवऱ्याकडून घेतला आहे. त्याने बरेच महिने प्रयत्न करुनही, जे जमलं नाही, ते क्लास लावल्यावर १३ दिवसांत शक्य झालं. त्यामुळे, <<< नवरा बरोबर असताना बायकोने गाडी चालवण्याचा प्रयत्न करू नये' >>>> हे पटलंच.
शेवटच्या ओळीही छानच.

छान विनोदी लिहिले आहे. पण काही गोष्टी खतकल्या, जसे की तुमच्यामुळे जे घास वाला, पाव वाला, दूधवाला रस्त्याच्या बाजूला जाऊन पडले त्यांची साधी विचारपूस न करता, काही नुकसान झाले आहे का न विचारता किंवा साधे सॉरी न म्हणता तेथून तसेच निघून जाणे योग्य वाटले नाही. बाकी तुम्हाला दुखावण्याचा हेतू नाही.

छान लिहीले आहे. माझे जुने दिवस आठवले.... गाडी चालवायला लागुन बरेच दिवस झाले तरी मी सिंगल रोड टाळायचे. एके दिवशी चुकीचे वळण घेऊन भरगच्च रहदारीच्या अरुंद रस्त्यावर गाडी मला घेऊन गेली तेव्हाची धडकी अजुनही आठवणीत आहे. नंतर कित्येकदा तिथुन आरामात गेले पण ती पहिली वेळ भयंकर... Happy

शेवटचा परिचछेद भारी..

विनोदी लेख आहे. त्यात सगळं जसेच्या तसेच सांगितले असेल असे नाही. थोडं मीठ, मसाला, बटर, वरून कसुरी मेथी वगैरे येईल की, त्याने अजुन खुसखुशी वाढते.

लेख खुसखुशीत आहे.

माझे ड्रायव्हिंग चे सुरुवातीचे दिवस आठवले
चढावर गाडी थांबवून परत पुढे जाणे अचाट कोटीतली गोष्ट वाटत असे
त्यामुळे अशी वेळ टाळण्याकडे प्रयत्न, काही सिग्नल विशेषतः नळ स्टॉप चा चढावर असल्याने तो लागणार असे वाटल की मी लै मागेच, सरळ रस्त्यावर असताना गाडी थांबवत असे. लोकं हॉर्न देऊन, विचित्र नजरा टाकत जात पण मी ढिम्म बसून राहत असे Happy

काय भारी लेख आहे!!!
Rofl
पायांचा cross झाला ते imagine करून एकटीच खिसकरून हसले.

धमाल लेख आहे.परत वाचून तितकीच मजा आली.नवीन ड्रायव्हिंग करत असताना साधारण 100 मीटरवर एक माणूस रस्ता ओलांडत असेल तरी 'जाऊदे हा बापडा, आपण थांबुया आणि तो गेल्यावर नीट गिअर टाकून मोसम घेऊया' होतं.
ड्रायव्हिंग येतं का पेक्षा ते कोणत्या रस्त्यावर येतं हा मूळ मुद्दा.पिंपरी मार्केट, बाजीराव रोड, करिष्मा चौक अश्या ठिकाणी एकंदर सर्व गात्र चालू असलेला डायव्हर पण श्वास रोखून असतो.
मला एका ऑफिसातल्या मुलीने 'त्यात काय, इतकं कठीण नसतं, मी हायवेवर 50 किलोमीटर चालवली परवा.फक्त गिअर बदलायला भाऊ शेजारी बसवला होता.' सांगितलं.मनात म्हटले ताई आपण धन्य आहात.

Pages