विदेशी कथा परिचय (१०) : समारोप

Submitted by कुमार१ on 22 August, 2021 - 19:42

भाग ९ : https://www.maayboli.com/node/79770

……………..
31 मे 2021 पासून सुरू केलेली लेखमाला आता संपवत आहे. साहित्याच्या अनेक प्रकारांपैकी (लघु)कथा हा एक महत्त्वाचा आणि वाचकांना रिझवणारा प्रकार. जागतिक कथासागर अफाट आहे. या लेखमालेच्या निमित्ताने त्यातील काही निवडक विदेशी कथांचा आस्वाद घेता आला. या लेखमालेची सुरुवात अगदी ठरवून अशी काही झाली नाही. ती कशी झाली ते सांगतो.

गेले तीन-चार वर्षे दरसाल पावसाळ्याचे सुरवातीस एखादे चक्रीवादळ येत असते. त्यावेळेस जोरदार पाऊस पडतो. दरवर्षी असा पाऊस खिडकीतून बघत असताना मला ‘Rain’ या सॉमरसेट मॉम यांच्या कथेची आठवण होई. ती कथा मी छापील पुस्तकात पस्तीस वर्षांपूर्वी वाचली होती. तेव्हापासून तिने मनात घर केले होते. गेल्या तीन वर्षांत दरवर्षी धोधो पाऊस पाहताना मला या कथेवर एखादा लेख लिहावा असे वाटे. पण आळसामुळे तो विचार कृतीत उतरत नसे. यंदा मात्र मी निर्धार केला. त्यासाठी आता ती कथा मुळातून वाचणे आले. ते पुस्तक तर आता माझ्याजवळ नव्हते. मग जालावर शोध घेता ती कथा सहज मिळाली. योगायोगाने यंदा तिची जन्मशताब्दी होती. हा सुंदर योगायोग लक्षात आल्यावर तिच्यावर लिहायचे नक्कीच करून टाकले. तो लेख इथे लिहील्यानंतर वाचकांचे उत्साहवर्धक प्रतिसाद आले. मॉम यांचे बरेच साहित्य मी एकेकाळी वाचले होते. त्यांच्या अन्य काही कथाही मला परीचयासाठी खुणावत होत्या. पण मग जरा वेगळा विचार केला.

मला एकदम माझी काही जुनी टिपणे आठवली. पूर्वी मी एस. डी. इनामदार यांचा ‘दिगंतराचे पक्षी’ हा मराठी अनुवादित कथासंग्रह वाचला होता. त्यातील चेकॉव्ह व मोपासां यांच्या प्रत्येकी एक कथा आवडल्याचे वहीत लिहून ठेवले होते. आता त्या मुळातून वाचावे असे ठरवले. त्याही जालावर सहज उपलब्ध होत्या. त्यातून मग एकच लेखक पकडण्याऐवजी विविध देशांचे लेखक घ्यावेत अशी कल्पना स्फुरली. त्या दोघांवर लेख लिहील्यानंतर वाचकांचे उत्साहवर्धक प्रतिसाद आले. मग या प्रकाराची मला गोडी लागली. त्यानंतर अन्य काही युरोपीय व अमेरिकी लेखकांच्या कथांचा शोध घेऊ लागलो.

एखादी कथा जालावर मोफत उपलब्ध असण्यासाठी ती पुरेशी जुन्या काळातील असणे आवश्यक ठरते. त्यानुसार 75 ते 100 वर्षे जुन्या कथांचा धांडोळा घेतला. त्यातूनच ही लेखमाला साकारली. यासाठी निवडलेले कथालेखक इंग्लंड, आयर्लंड, अमेरिका, न्युझीलंड, रशिया आणि फ्रान्स या देशांमधले होते. जगाच्या पूर्वेकडील वा मध्य आशियातील एखाद-दुसरा लेखक घेण्याची इच्छा होती. परंतु संबंधित भाषेत लिहिलेल्या कथेचे इंग्लिश रूपांतर जालावर सहज उपलब्ध असतेच असे नाही. त्यामुळे तो विचार सोडून दिला.

कथांची निवड ही पूर्ण माझ्या मनाप्रमाणे होणार असल्याने त्याला मर्यादा होती. त्या सर्वच कथा काही मला ‘आवडल्या’ असे नाही. परंतु ज्या मला वैशिष्ट्यपूर्ण वाटल्या त्या मी निवडल्या. तसेच सर्वच वाचकांना सर्व कथा आवडतील असे नाही, याची कल्पना होती. लेखमालेत थोडासा रुचीबदल म्हणून आठव्या भागात बेकेट यांचे तीन मिनिटांचे नाटुकले घेतले.

कथांची लांबी हाही त्यांच्या निवडीचा एक महत्त्वाचा निकष होता. त्या जालावर वाचायच्या असल्यामुळे दीर्घकथा टाळल्या. अपवाद फक्त एकच- रेन ही कथा पीडीएफची तब्बल 51 पानी आहे. प्रत्येक कथा वाचल्यावर त्यासंबंधी काही अभ्यासकांची मते वाचली. तसेच अजून एक मुद्दा त्या अभ्यासादरम्यान लक्षात आला. बऱ्याच गाजलेल्या जागतिक कथांची माध्यम रूपांतरे झालेली असतात. उदाहरणार्थ नाटक, लघुपट, चित्रपट, टीव्ही कार्यक्रम, इत्यादी. कथा निवडताना हाही निकष मला रोचक वाटला. अशी माध्यम-रूपांतरित झालेली कथा वाचकांच्या अधिक आवडीची असते असे अनुभवातून लक्षात आले. जर अशी एखादी कथा आपल्याला आवडली तर तिचे चित्रफीत रूपांतर युट्युबवर बघण्यासाठी सहज उपलब्ध असते हाही एक फायदा.

लेखमालेतील कथांमधून दांपत्यजीवन, विवाहबाह्य स्त्री-पुरुष संबंध, हिंसक प्रवृत्ती, युद्ध, अंधश्रद्धा, मानवी दुःख, संवादाची गरज आणि आयुष्यावरील मूलभूत चिंतन असे विविध विषय हाताळता आले. बऱ्याच वाचकांनी सातत्याने प्रतिसाद दिले आणि ते अभ्यासपूर्ण होते. तर काही वाचकांनी लेख वाचल्यानंतर वेळ काढून आधी मूळ इंग्लिश कथा वाचली आणि मग इथे प्रतिसाद दिले. त्यांचे विशेष कौतुक !

या लेखमालेचा मला अजून एक महत्वाचा फायदा झाला. गेले अनेक वर्षे मी मूळ इंग्लिश साहित्य वाचणे सोडून दिले होते. यामागे कारण होते. माझे व्यावसायिक काम तसेच आरोग्य लेखन करण्यासाठी मी जे वाचन करतो ते सर्व इंग्लिशमध्ये असते. मला जर छंद किंवा विरंगुळा म्हणून अन्य काही करावेसे वाटले तर मग पुन्हा मनात इंग्लिशमय वातावरण नको, असा विचार त्यामागे होता. अधूनमधून काही गाजलेल्या इंग्लिश साहित्याचा मराठी अनुवाद फक्त वाचत होतो. यानिमित्ताने मनावरील वैचारिक धूळ झटकून इंग्लिश साहित्यवाचनाचा पुन्हा एकदा सराव केला आणि त्या भाषेची खुमारी अनुभवता आली. या कथांच्या मूळ लेखकांनी वापरलेली काही सुंदर विशेषणे, कल्पना तसेच वाक्प्रचार हे अप्रतिम आहेत. त्यांचे चपखल मराठी भाषांतर करणे खरंच कठीण आहे. काही ठिकाणी खूप प्रयत्न करून सुद्धा मूळ लेखनाचा आशय तंतोतंत मराठीत सांगण्यास मी कमी पडलो याची जाणीव आहे.

प्रस्तुत लेखमालेत आतापर्यंत लिहिलेल्या सर्व लेखांची सूची खाली देत आहे. त्यात मूळ विदेशी कथेचा आणि त्याच्या लेखकाचा उल्लेख आहे. नव्या वाचकांना तिचा उपयोग होऊ शकेल.

samarop-table.jpg
ही लेखमाला संपवत असताना मनात एक नवी कल्पना आली आहे, ती अशी. भारतातही अनेक भाषा असून त्यांमध्ये नामवंत कथाकार होऊन गेलेले आहेत. निवडक अशा दहा (अमराठी) भारतीय भाषांमधील कथांचा मराठीतून परिचय करून देणे अशी एक लेखमाला होऊ शकते. अर्थात त्यासाठी मी इतका योग्य माणूस नाही. ज्या वाचकांचा विविध भारतीय भाषांशी थोडाफार संबंध येत असेल, अशांपैकी कोणीतरी हा प्रकल्प हाती घेतल्यास ती सुरेख लेखमाला होईल. जरूर विचार करावा.

या लेखमालेचे सर्व वाचक, अभ्यासू प्रतिसादक, संस्थळाचे प्रशासक या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे !
....................................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून चालली असती ही कथा मालिका. इतक्यात नका समारोप करु. रोजच्या वाचनात जागतिक साहित्याचा थोडा तरी स्पर्श तुमच्या या लेखामुळे होत होता.

आपणा सर्वांचे मनापासून आभार !
आतापर्यंतच्या सर्व लेखमालाना मी कमाल दहा भागांचे बंधन ठेवलेले आहे . म्हणून थांबलो आहे
धन्यवाद !

छान झाली लेखमालिका , समारोपही आवडला,
पुढील लेखनास शुभेच्छा !! >> +1

ज्या वाचकांचा विविध भारतीय भाषांशी थोडाफार संबंध येत असेल, अशांपैकी कोणीतरी हा प्रकल्प हाती घेतल्यास ती सुरेख लेखमाला होईल. >>>> कल्पना आवडली.

लेख आवडला.
या मालिकेतील काही लेख अजून वाचले नाही, पण उपक्रम छान होता.

अस्मिता व मानव
सातत्यपूर्ण प्रोत्साहन दिल्याबद्दल आभारी आहे !
त्यामुळेच लेखनाचा हुरूप टिकून राहतो.

सुंदर झाली ही मालिका. अनेक उत्तम, गाजलेल्या कथा/कलाक्रुती या निमित्ताने वाचायला मिळाल्या. काही आधी वाचलेल्या तर काही नविन. लेखातले आणि प्रतिक्रियांमधले दुवे पण आता बघते.

कुमार१,

लिहिण्याचा उत्साह असावा तर तुमच्यासारखा !

नवनवीन कल्पना सुचणे वेगळे आणि हातासरशी अमलात आणणे वेगळे. ही लेखमाला उत्तम कल्पना आणि तिची नेटकी अंमलबजावणी असा सुंदर मिलाफ. ब्राव्हो.

पु. ले. शु.


....अमराठी भारतीय भाषांमधील कथांचा मराठीतून परिचय करून देणे अशी एक लेखमाला होऊ शकते.....

अलबत ! उत्तम कल्पना आहे. मला वाटत असा प्रयोग झालाय इथे माबोवर. अजून असे प्रयोग व्हावेत.

हिंदी/ उर्दू / बंगाली कथांसाठी कोणी केला नसेल तर मी करू शकेन एक प्रयत्न. पण आळस, मूड न लागणे, मराठीत सुयोग्य शब्द न सुचणे, वेळ न होणे, लेखनकंटाळा ह्या पंचरिपुंपासून सुटका झाल्यासच.

रायगड व अनिंद्य, आभार .
......

अनिंद्य
आतापर्यंत तुमच्यासारख्या अभ्यासू वाचकांच्या पाठबळामुळेच काही लेखमाला लिहू शकलो आहे . वर धाग्यात भारतीय भाषांची सूचना करताना खरं तर माझ्या मनात बंगालीसाठी तुम्हीच होतात !

तुमच्या सवडीने जरूर मनावर घ्या. अगदी लेखमालेचे बंधन नकोसे वाटत असेल तरी हरकत नाही. जमेल तेव्हा बंगाली साहित्यातले काही पैलू आम्हाला वाचायला द्या. आनंद होईल.

Quartet
सॉमरसेट मॉम यांच्या Quartet या कथा चतुष्ट्यातील या चार कथा जालावर वाचल्या :

  1. The Facts of Life
  2. The Alien Corn
  3. The Kite
  4. The Colonel's Lady

>

त्या कथांवर आधारित Quartet हा कृष्ण धवलाचित्रपट युट्युबवर आहे :
https://www.youtube.com/watch?v=E23wM2fGcJU

मग एक प्रयोग केला. प्रत्येक कथा वाचली की लगेच त्याचा चित्रपट पाहत जायचे. खूप छान वाटते. दोन्ही माध्यमांची मजा वेगळी असून ती अनुभवता आली. कथा साधारणपणे एकरेषीय आणि कालानुक्रमे आहेत परंतु दोन चित्रपटात फ्लॅशबॅक तंत्राचा वापर केल्याने घटना अधिक परिणामकारक झालेल्या दिसल्या.

पहिल्या तीन कथांचे एक सूत्र आहे. ते म्हणजे, पन्नाशीच्या पालकांचे आपल्या प्रौढ मुलाबरोबर असलेले कौटुंबिक संबंध आणि त्यातून उमगलेल्या काही गोष्टी आणि निर्माण झालेल्या काही समस्या.

The Kite या कथेतल्या तरुणाचे त्याने खपून तयार केलेल्या एका भल्या मोठा पतंगावर निःसीम प्रेम आहे. त्याची चिडलेली बायको जेव्हा त्या पतंगाची नासाडी करून टाकते त्यानंतर त्याने घेतलेला पवित्रा चक्रावून टाकणारा आहे. कथा शोकांत असली तरी चित्रपटात त्यापुढे कल्पना रंगवून तिची सुखात्मिका केली आहे.

चौथ्या कथेत पती-पत्नीचे जून झालेले संबंध आणि पत्नीचा प्रियकर हा विषय आहे. तिच्या कवितांमधून पतीला ते समजते. त्यानंतर तो खूप अस्वस्थ होतो. परंतु अखेरीस वकिलाच्या सल्ल्याने शांत बसणेच पसंत करतो. आपण स्वतःही खऱ्या अर्थाने बायकोशी एकानिष्ठ नसल्याची कबुली त्याला द्यावी लागते. कथा इथे संपते. पण चित्रपटात मात्र पुढचे स्वातंत्र्य घेऊन त्या नवरा बायकोचा संवाद दाखवला आहे. त्यातून या संपूर्ण प्रकरणाला मिळणारी सुखात्मक व अचंबित करणारी कलाटणी अप्रतिम !

1946 ते 50 दरम्यानच्या काळातले इंग्लंडमधील उच्चमध्यमवर्गीयांचे कौटुंबिक वातावरण चारही कथांमधून चांगले चितारले आहे. चित्रपटांत तत्कालीन ब्रिटिश रंगभूमीवरील उत्तम कलाकारांनी भूमिका केलेल्या आहेत. तसेच त्यांचे ब्रिटिश इंग्लिश उच्चार आपल्यालाही समजायला सोपे जातात.