नियतीचे वर आणि माणसाची निवड (कथा परिचय : ९)

Submitted by कुमार१ on 16 August, 2021 - 00:21

विदेशी कथा परिचयमालेतील याआधीचे लेख:

१ कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी !
२. एका आईचा सूडाग्नी
३. कुणास सांगू ?

४. ‘भेट’ तिची त्याची
५. नकोसा पांढरा हत्ती
६. ती सुंदर? मीही सुंदर !

७. गावची लॉटरी जत्रा (https://www.maayboli.com/node/79684)
८. तीन मिनिटांची ये-जा (https://www.maayboli.com/node/79719)
...................................

आपणा सर्वांचे लेखमालेच्या नवव्या भागात स्वागत !

इथे एका बोधकथेचा परिचय करून देतोय आणि त्याचे लेखक आहेत मार्क ट्वेन.

हे लेखक १९ व्या शतकातील एक नामवंत अमेरिकी साहित्यिक होते. सदर नाव हे त्यांचे टोपण नाव असून त्यांचे खरे नाव S.L. Clemens असे होते. 'The Adventures of Tom Sawyer' आणि 'The Adventures of Huckleberry Finn' या त्यांच्या कादंबऱ्या साहित्यातील श्रेष्ठ कलाकृती मानल्या जातात.

या हरहुन्नरी व्यक्तीने आपल्या कारकिर्दीत लेखक, प्रकाशक, उत्तम वक्ता, विनोदवीर आणि उद्योजक अशा विविध भूमिका निभावल्या. त्यांनी लेखनावर उत्तम धन कमवून नंतर मोठ्या उद्योगात गुंतवणूक केली. परंतु तिथे त्यांना घोर अपयश आले व त्यांचे दिवाळे वाजले. त्या धक्क्याने डगमगून न जाता त्यांनी उतारवयात जगभ्रमंती करीत त्यांच्या व्याख्यानांचे दौरे केले. त्यातून मिळालेल्या मानधनातून त्यांनी डोक्यावर असलेले सर्व कर्ज फेडले. या भ्रमंती दरम्यान त्यांचे भारतात तीन महिने वास्तव्य होते. तेव्हा त्यांचे मुंबईत झालेले एकपात्री प्रयोगासम व्याख्यान खूप गाजले होते. अन्य जगाशी तुलना करता भारतातील माणसे ‘भली’ आहेत असा अभिप्राय त्यांनी दिला होता ! प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या अवलियाचे १९१० मध्ये निधन झाले. अमेरिकी साहित्याचे पितामह असा त्यांचा गौरव करण्यात येतो. त्यांच्या विपुल साहित्यातून निवडलेल्या एका मार्मिक लघुकथेचा परिचय या लेखात करून देत आहे.

कथेचे नाव आहे The Five Boons Of Life .
परीकथेतून बोधकथा अशा वळणाने ती जाते.

Fairy_Magic.jpg

एका माणसाच्या तारुण्यात एक परी त्याच्या पुढ्यात घेऊन ठेपते. तिच्याकडे एक जादुई पोतडी आहे. त्याकडे बोट दाखवून ती त्याला म्हणते,
“यामध्ये एकूण पाच ‘वर’ आहेत. पण त्यातला एकच खरा मौल्यवान आहे. तेव्हा तू तो विचारपूर्वक निवड !”.
ते पाच वर असे असतात:

कीर्ती, प्रेम, गडगंज श्रीमंती, मौजमजा आणि मृत्यू !

त्यावर तो तरुण उतावीळपणे म्हणतो, “विचार करण्याची काहीच आवश्यकता नाही. मला मौजमजाच हवी !”
परी म्हणते, “तथास्तु !”
तो वर प्राप्त झाल्यावर हा तरुण आयुष्यातील मौज लुटू लागतो, अगदी मजेत डुंबून घेतो. कालांतराने त्याच्या लक्षात येते, की जे काही सुख आपण उपभोगले ते सर्व अल्पजीवी होते. हळूहळू एकेक सुख आपल्याला वाकुल्या दाखवीत आपल्यापासून दूर निघून गेलेले आहे. शेवटी हताशपणे तो म्हणतो, “आयुष्यातली इतकी वर्ष मी वाया घालवली. माझी वर-निवड चुकलीच की !”

आता परी पुन्हा अवतरते आणि म्हणते, “बघ, आता पोतडीत चार वर शिल्लक आहेत आणि त्यातला एकच मौल्यवान आहे ! आता वेळ थोडाच राहिलाय. तेव्हा योग्य तो वर निवड”.
आता तरुण खूप विचारपूर्वक प्रेम निवडतो. पण ते करीत असताना परीच्या डोळ्यातील अश्रूबिंदू काही त्याला दिसत नाहीत.
... या घटनेला आता खूप वर्षे लोटलीत. आता तो माणूस भकास घरामध्ये एक शवपेटीजवळ बसून आहे. आता तो दुःखवेगाने म्हणतो,
“एक एक करत माझे सर्व प्रियजन मला सोडून गेले. सर्वात प्रिय व्यक्ती तर आता इथे शवपेटीत आहे. आता आयुष्यात फक्त विषण्णता भरून राहिली आहे. मग ‘प्रेमा’ने मला नक्की काय दिले ? जितके सुख मला मिळाले, त्याच्या हजारपट दुःखही मी उपभोगले आहे. छे ! वर निवडताना माझी पुन्हा चूकच झाली खरी”.
…..

परीची तिसरी खेप.
ती म्हणते, “आता एव्हाना तुला वयानुरूप शहाणपण आले असेलच. आता पोतडीत तीन वर शिल्लक आहेत आणि एक त्यातला एकच मौल्यवान आहे. काळजीपूर्वक निवड”
आता तो कीर्ती निवडतो. परी सुस्कारा टाकून निघून जाते !
त्यावर काही वर्षे गेली. परी पुन्हा आली आणि त्याच्या मागे उभी राहिली. तो एकटाच खिन्नपणे विचार करत बसला होता. परीने त्याच्या मनातील विचार वाचले. ते असे :
“किती नामवंत होतो मी ! माझी कीर्ती जगाच्या दशदिशांना पोचली होती. माझे नाव लोकांच्या अगदी ओठावर असायचे. पण ते काही काळच टिकले. मग अनुभवला मत्सर. त्यातून पुढे खच्चीकरण, बदनामी, पुढे तिरस्कार शेवटी आणि टिंगल. हे सगळे पाहून मी पश्चात्ताप पावलोय. अखेर लोकांनी माझी कीर्ती पार गाडून टाकलीय !”
………

परीची चौथी फेरी.
“आता दोनच वर शिल्लक आहेत पण निराश होऊ नकोस. सुरुवातीपासूनच जो वर अमूल्य होता तो अजूनही या दोघांमध्ये आहे !” आता तरुणाला एकदम साक्षात्कार होतो.

“अरे, मूर्खच होतो की मी. गडगंज संपत्ती म्हणजेच खरी ताकद हे मला कळलेच नाही ! आता चूक नाही करायची. माझ्या हातात भरपूर पैसे आले की मी कसा मस्तीत जगेन. मग माझा मत्सर करणारे हे सगळे कसे भुईसपाट होतील माझ्यासमोर. माझ्या पैशाने मी जगातील काय वाटेल ते विकत घेईन- लोकांना अगदी माझे भक्त सुद्धा बनवेन ! आता पूर्वीच्या चुका विसरून योग्य निर्णय हाच ठरलाय माझा”.
झालं मग. संपत्ती मिळाली. ती त्याने मुक्तहस्ते उधळली. तीनच वर्षांनी काय स्थिती झाली होती ते पाहू.
आता तो पार निस्तेज दिसत होता. अगदी भुकेकंगाल माणसासारखा. अंगावर फाटके कपडे. दयनीय अवस्था. आता तो पुटपुटला,
“खड्ड्यात जावोत हे चारही वर ! ते सर्व मिथ्या होते. मी परीकडे जे काही मागितले ते वर नसून फक्त उसन्या मिळालेल्या गोष्टी होत्या. मौजमजा, प्रेम, कीर्ती आणि संपत्ती या सर्व खरे तर तात्पुरत्या वेषांतर केलेल्या गोष्टी आहेत. त्यांची खरी स्वरूपे म्हणजे, अनुक्रमे वेदना, दुःख, नामुष्की आणि गरिबी ही आहेत आणि तीच चिरंतन आहेत.

परीचे म्हणणे अगदी खरे होते. तिच्या पोतडीत खरे तर एकच वर अमूल्य होता ! बाकीचे चारही किती सवंग होते ते मला आता कळले. तो पाचवा ‘वर’च खरा प्रिय आणि दयाळू आहे. तो तुम्हाला स्वप्नविरहित चिरनिद्रा देतो. तो तुमची वेदना, दुःख, नामुष्की या सर्वांपासून मुक्तता करतो. म्हणून मला आता तोच हवा आहे !! तो मिळाल्यावरच मी शांत होईन”.
......

परी पुन्हा अवतरली. आता तिने पुन्हा तेच चारही वर बरोबर आणले होते. पण आपला माणूस तर मृत्यू हवा म्हणून अडून बसला होता !

ती म्हणाली, “अरे इतक्या वेळेस मी तुझ्याकडे आले, तेव्हा तो वर काही तू कधीच मागितला नाहीस. मग कालच मी तो एका निरागस पिल्लास देऊन टाकला. ते बिचारे निष्पाप होते पण त्याने माझ्यावर विश्वास टाकला. मी निवडलेला वर त्याने स्वीकारला. मग काय करू ?” पश्चात्तापदग्ध झालेला तो म्हणतो,
“आता माझं काही खरं नाही. मग मला द्यायला आता तुझ्याजवळ राहिलय तरी काय ?”
परी उत्तरली,
“खरंतर तुझी लायकी सुद्धा नसलेली एकच गोष्ट राहिली आहे. ती म्हणजे : निरर्थक शापित म्हातारपण !
...................................
विवेचन
कथा आयुष्याविषयी बरेच काही बोलते. या प्रकारच्या बोधकथा जगातील बहुतेक सर्व संस्कृतीत व भाषांमध्ये आहेत. सर्व काही मिथ्या आहे या सूत्राभोवती ही कथा फिरते. लेखकाला जे काही त्यातून सांगायचे आहे, ते आपल्याला कळतंय पण वळत नाही अशी स्थिती आहे. कथेतील माणूस म्हणजे आपल्यापैकी कोणीही - थोडक्यात मनुष्यप्राणी.

या कथेकडे दोन भिन्न दृष्टिकोनांतून पाहता येईल - निराशावादी आणि आशावादी.
जगात सर्वत्र दुःखच भरलेले आहे हा झाला निराशावाद. मग या दुःखातून मुक्त होण्याचा एकमात्र पर्याय म्हणजे मृत्यू. माणसांची उच्चनीचता, वर्गवारी, भेदाभेद हे सर्व काही मृत्यूमुळे संपुष्टात येते. किंबहुना सर्व माणसांना समान पातळीवर आणणारी ही एकमेव घटना. इथे कविवर्य सुरेश भट यांची आठवण येणे अपरिहार्य आहे :

मरणाने केली सुटका
जगण्याने छळले होते

जगणे कितीही निरर्थक वाटले तरीही माणसाची जगत राहण्याची इच्छा प्रबळ असते.
कथेकडे वेगळ्या नजरेनेही बघता येईल. आयुष्य हे उपभोगण्यासाठीच आहे. मग ते छानपैकी उपभोगायला मौज, संपत्ती, कीर्ती आणि प्रेम हे तर पाहिजेच की ! मौज व संपत्ती एकमेकांशी निगडित आहेत. जसे आपण त्यांचा उपभोग घेऊ लागतो तशी त्यांची गरज वाढतीच राहते. आधी हौस, मग हाव आणि पुढे व्यसनात त्यांचे रूपांतर होते. माणसाची वखवख संपतच नाही. कुठे तरी थांबले पाहिजे हे समजते पण मन ते मानायला तयार होत नाही.

कीर्तीचा प्रवास जरा वेगळा आहे. जर ती धीमेपणाने मिळाली तर ती कमी अधिक प्रमाणात टिकू शकते. पण जर का ती अतिवेगात मिळाली तर त्याच वेगात ती कोसळते. कीर्ती आणि प्रसिद्धी अल्पजीवी असतात याचे भान वेळीच आले तर ते उत्तम.

आता राहिले प्रेम. मुळात निस्वार्थी प्रेम असं काही अस्तित्वात असते का ? याचे उत्तर आपल्याला माहितीच आहे. तरी आपण प्रेमाच्या भुलभुलय्यात पडतोच. गरज आणि सोयीनुसार प्रेमाचे अर्थ बदलत राहतात हे खरे. कितीही जवळिकीचे नाते असो, त्यात कधी ना कधी दुरावा हा येतोच.
कथेच्या सुरुवातीलाच तिच्या आशयाचा अंदाज येतो. आपण जसे पुढे वाचत जातो तसे अपेक्षेप्रमाणेच ती वळण घेते. आपल्याला चिंतन करायला लावणे हेच तिचे सामर्थ्य आहे. तिच्यावर अधिक मल्लीनाथी करून तिची गंमत घालवण्यात अर्थ नाही !
......................................

१. मूळ कथा इथे : http://www.eastoftheweb.com/short-stories/UBooks/FiveBoon.shtml

२. चित्र विकीवरुन साभार !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परी ची तिसरी खेप फार विनोदी वाटले.

खरंतर तुझी लायकी सुद्धा नसलेली एकच गोष्ट राहिली आहे. ती म्हणजे : निरर्थक शापित म्हातारपण !>> आजकाल अशी सोयीची टूम आहे की म्हातारे निरुद्योगी व निरर्थक उपयुकतता संपल्यावर त्यांनी मुकाट मरून जावे. पन दुसृया बाजूने बघितले तर त्याने
तरुण पणी मज्जा. मग प्रेम कीर्ती संपत्ती सर्व अनुभवले आहे व एक् प्रकारचे समृद्ध जीवन जगला आहे. ह्यानंतर समाधान नावाची पण एक चीज भेटू शकते कोणत्याही वरदाना शिवाय.

हे परीला कळ णार नाही कारण ती ह्युमन नाही.

शीर्षक वाचून धागा वीरांच्या मुलीचे स्वयंवर आहे कि काय असा प्रश्न पडतो आहे. पण त्याला अजून अवकाश असावा.

वरील सर्व नियमित वाचकांचे आभार !

ह्यानंतर समाधान नावाची पण एक चीज भेटू शकते कोणत्याही वरदाना शिवाय.
>> +११

कुठे तरी थांबले पाहिजे हे समजते पण मन ते मानायला तयार होत नाही.>>>> अगदी अगदी!

छान कथा.अंतर्मुख करून जाते.

कुठे तरी थांबले पाहिजे हे समजते पण मन ते मानायला तयार होत नाही.>>>>>थांबला तो संपला हे कारण असावे

ब्लॅक कॅट
माहितीबद्दल धन्यवाद
त्याचा जालावरील दुवा आहे काय ?

काही काही गोष्टी अगदीच निगेटिव असतात! त्यातलीच ही दिसतेय. आता तरुण माणसाने पहिलेच वरदान काय मृत्यूचे मागायला हवे होते का?! तसे केले असते तर उलट तो एक डिप्रेस्ड जीव होता असं म्हणावे लागले असते. उलट त्याने केलेले चॉइसेस साहजिक असेच आहेत Happy

मैत्रेयी, सहमत !
.......
काही अभ्यासकांची मते वाचल्यावर मला या कथेचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केलेला जाणवला.

१. ‘boon’ याचा आधुनिक अर्थ वरदान आहे. परंतु जुन्या काळातील अर्थ उपकार/ मेहरबानी असा होता.
२. त्या माणसाने नियतीने देऊ केलेले वर स्वतः न निवडता ते तिच्यावरच सोपवावे असे सूचित असावे.

३. पाच पैकी पहिले चार वर हे तात्पुरते किंवा आभासी आहेत. परंतु पाचवा वर (मृत्यू) हीच एकमेव खात्रीशीर गोष्ट आहे.

४. पहिल्या चारही वेळेस तो मृत्यूच्या भीतीपोटी इतर ऐहिक गोष्टी मागत जातो. जर माणसाने मृत्यूची भीती मनातून काढून टाकली तर त्याला उमगेल, की मृत्यू हा आयुष्यातील एक अटळ टप्पा आहे. म्हणून त्याचा सहज स्वीकार करावा. इतर सर्व गोष्टींमधून वैफल्य आले म्हणून आता मृत्यु हवा, असे असू नये.

कथा पूर्ण निराशावादी दृष्टिकोनातून लिहिली नसावी. परंतु लेखकाला नक्की त्यातला गर्भितार्थ काय सुचवायचा आहे हे आपल्याला समजून घेणे तसे अवघड जाते.

सवाशे-दीडशे वर्षापूर्वी समाजाची एकंदर आर्थिक/कौटुंबिक परिस्थिती, जीवनमान, नितीमुल्ये आजपेक्षा वेगळी असण्याचीच शक्यता आहे. भोगवादी विचारसरणीचा प्रसार औद्योगिक क्रांतीशी जोडला तर मार्क ट्वेनचा काळ पहिली औद्योगिक क्रांती संपून दुसरी सुरू होण्याच्या दरम्यानचा आहे. कीर्ती, प्रेम, गडगंज श्रीमंती, मौजमजा ह्या आयुष्याच्या पैलुंना सर्वसाधारण समाज तेव्हा तसाही पारखा होता. त्यांच्यासाठी मृत्यू आणि तोवरचे ह्या चार-पाच डिझायरेबल गोष्टींशिवाय घालवायचे समाधानी आयुष्य हीच एक अटळ बाब होती. त्याच आयुष्याची भलामण ह्या कथेत केली आहे असे वाटले.

आणि गोष्ट लिहिणारा मार्क ट्वेन स्वतः अमेरिकन सरकारी नोकरी करून , लगीन , 4 मुले काढुन , 74 वर्षे थेरडयागत जगून मग त्या मरणपरीकडे उलथला आहे.

मृणाली व सस्मित, धन्यवाद.
......
वरील कथेतील लेखकाचे विचार जरा बाजूला ठेवूयात.
'वय' या मुद्द्यासंबंधी त्यांचेच एक वेगळ्या धर्तीवरचे अवतरण असून ते माझे खूप आवडते आहे.
ते जसेच्या तसे लिहून या चर्चेचा समारोप करतो :

“Age is an issue of mind over matter. If you don’t mind, it doesn’t matter."

रच्याकने,
मार्क ट्वेन या टोपणनावासंबंधी २ कथा वाचनात आल्या.

१. ते स्वतः उत्तम नावाडी होते. बोट सुरक्षित चालवण्यासाठी पाणी किती खोल असावे याचे काही आडाखे असतात. त्यापैकी
two fathoms = 12 feet
याचा अर्थ ' मार्क टू ' असा होतो. ( मार्क वन म्हणजे ६ फूट).
टू शब्दाचे प्राचीन रूप म्हणजे ट्वेन.

२. मार्क ट्वेन मद्यालयात बसले असताना ते वेटरला नेहमी एका वेळेस दोन पेगची ऑर्डर देत असत. ती देताना ते हाताची दोन बोटे उंचावून दाखवत. त्यातून त्यांचे नाव पडले 'मार्क टू' ! टू चे पुढे झाले ट्वेन.

माणूस सतत असमाधानी असतो हेच खरं....
या लेखमालेत फक्त कथाच नाहीत तर त्यावर सुंदर विवेचन केलेत...लेखक अल्पपरिचय दिलात... त्यामुळे दुधात साखर पडली...
वरचे प्रतिसादही विचार करायला लावणारे आहेत...
धन्यवाद...

द सा
धन्यवाद

लेखक अल्पपरिचय दिलात. >>

लेखकाची पार्श्वभूमी आणि जडणघडण ही त्याच्या लेखनाच्या दृष्टीने महत्त्वाची असते.
म्हणून असा परिचय दिला

कथेपेक्षा त्यावरचे विवेचन अधिक सुंदर आहे. लेखकाचा अल्पपरिचय छान करून दिलात.
मला तरी वाटत होतं, मिळालेला वर हा कायम स्वरूपी असतो.( म्हणजे वर मिळालेला माणूस जीवंत असेपर्यंत.)
प्रत्येकाच्या गरजा त्याच्या आत्ता पर्यंतच्या अनुभवावर आधारित वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे माणसाचं मागणं चुकीचं वाटत नाही.

कथेपेक्षा त्यावरचे विवेचन अधिक सुंदर आहे. लेखकाचा अल्पपरिचय छान करून दिलात.
मला तरी वाटत होतं, मिळालेला वर हा कायम स्वरूपी असतो.( म्हणजे वर मिळालेला माणूस जीवंत असेपर्यंत.)
प्रत्येकाच्या गरजा त्याच्या आत्ता पर्यंतच्या अनुभवावर आधारित वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे माणसाचं मागणं चुकीचं वाटत नाही.

Pages