हे सिक्रेट कुणालाच सांगू नका!

Submitted by सखा on 8 August, 2021 - 09:49

नीरज चोप्रा कुठल्या जातीचा आहे यावर अख्ख्या भारतात मूलभूत चर्चा चालू आहे. त्यामुळे मला ही गोष्ट तुम्हाला सांगणे अत्यंत गरजेचं वाटतं. कृपया मनःपूर्वक आणि शांतपणे वाचाच. एक उत्कृष्ट सीक्रेट तुम्हाला कळाल्याचा हर्ष नक्कीच होईल.
ही गोष्ट भारतातील ग्रामीण भागातली जरी असली तरी अर्थातच माणसानी चंद्रावर पाऊल ठेवायच्या किती तरी वर्ष आधीची आहे. आपणास कदाचित ऐकून माहीत असलेल्या बोकलवाडी जवळील सुप्रसिद्ध झोल बुद्रुक गावाचं नाव हे तिथे राहणाऱ्या लोकांच्या वृत्ती मुळे पडलं याची इतिहासात नोंद आहे.
झोल गावातील गणिताचे अगडबंब मारकुटे प्राथमिक शिक्षक हे दंगल सिनेमातील हिरो प्रमाणे पैलवान तर होतेच पण जोर मारण्याची त्यांना अत्यंत सवय असल्याने, त्यांचे दंड देखील अत्यंत बलदंड होते. सिनेमातल्या ट्विस्ट प्रमाणे त्यांना एका झटक्यात जुळी मुलं झाली आणि त्यांनी मुलांची नावे मोठ्या प्रेमाने नळ आणि नील अशी ठेवली. या दोन्ही नावांना एक अर्थ आणि महत्त्व होतं ते असं की, चिरंजीव निल याने एखाद्या फॉरेनर प्रमाणे गोरा रंग व निळे डोळे घेतले होते तर चिरंजीव नळ याचे नाव गावात अनेक वर्षांनी पहिल्यांदाच नळकनेक्शन आल्यामुळे ठेवले गेले. देवाची करणी बघा नळ मात्र दिसायला पूर्णपणे भारतीय होता आणि हो आणखीन एक वैज्ञानिक सत्य सांगायलाच हवे ते म्हणजे दोन्ही मुलांचे दंड मात्र आपल्या वडिलांप्रमाणेच जन्मताच अरनॉल्ड श्वार्जनेगर प्रमाणे होते, त्यातल्या त्यात नीलचे जरा अधिकच असो पण तो मुद्दा नाहीये इंटरेस्टिंग गोष्ट अशी की एकदा मास्तर आणि त्यांची फॅमिली जत्रेत गेले असताना अचानक मोठे वादळ आले आणि कुटुंबाची ताटातूट झाली आणि त्यात लहानगा नील भरकटून मुंबईला गेला आणि नंतर एका कार्गो जहाजात बसून डायरेक्ट अमेरिकेला पोहोचला .
या ताटातुटी च्या धक्क्यामुळे नीलच्या मनावर परिणाम होऊन त्याची मेमरी गेली फक्त आपले कसेबसे नील हे नाव त्याला सांगता आले. अमेरिकेतील इम्मिग्रेशन ऑफिसरने लहानग्या नीलच्या सॉलिड दंडा कडे बघून त्याचे आडनाव कौतुकाने आर्मस्ट्रॉंग ठेवून दिले.
हाच निल पुढे चालून चंद्रावर पाऊल वगैरे ठेवून इतिहासात स्वतःची नोंद करून आला पण ते महत्त्वाचं नाही महत्त्वाचं हे आहे ही तो मुळचा कुठला होता? तो आहे आपल्या झोल बुद्रुकचा
याला म्हणतात इतिहास आणि हरवलेली माणके.
बोलो इंटरेस्टिंग कथा है कि नहीं? आपको सच्ची बात सुनाई कि नहीं? बोलो अपने नील आर्मस्ट्रांग भाई झोल बुद्रुक के है कि नहीं?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान....

मोदीजींचा भला मोठा फोटो आणि कुठेतरी एका कोपर्‍यात आर्मस्ट्रॉंग यांचा छोटासा फोटो हवा होता. येथे सिक्रेट शेअर करु दिल्याबद्दल मोदी यांचे आभार. Thank you modiji.