कुडू आणि बाभळी

Submitted by ऋतुराज. on 7 August, 2021 - 05:01

ही घटना आहे दक्षिण आफ्रिकेतील लिम्पोपो सॅव्हानातील. लिम्पोपो हा दक्षिण आफ्रिकेतील उत्तरेकडील प्रांत. १९८० च्या उत्तरार्धात या लिम्पोपो सॅव्हानात एक रहस्यमयी मृत्यूतांडव घडलं. त्या काळी भयंकर दुष्काळ पडला होता, जंगलात काहीच हिरवळ शिल्लक राहिली नव्हती. पाण्याचे सगळे स्रोत देखील पार आटून गेले होते. फक्त बाभळी त्या दुष्काळात तग धरून होत्या. कुडू जातीच्या हरणांसाठी ही एक संजीवनीच होती. हे कुडू त्या बाभळीची कोवळी पाने त्याच्या काट्यांची पर्वा न करता आरामात खाऊ शकत होते. त्यामुळे कुडू हरणांना आता या दुष्काळाची काहीच भीती नव्हती.

1280px-Male_greater_kudu.jpg
फोटो: आंतरजालावरून साभार

पण काही दिवसातच एक विचित्र घटना घडू लागली, धडधाकट असणारी कुडू हरणे एक एक करून अचानकपणे मृत्युमुखी पडू लागली. हे मृत्युसत्र काही महिने चालू राहिले. लिम्पोपो सॅव्हाना सफारीतील कुडू हरणे ही पर्यटकांच्या दृष्टीने मुख्य आकर्षण असल्याने, त्यांच्या मृत्यूची गंभीरतेने दखल घेतली जाऊ लागली. पशुवैद्यक, वन खाते, अभ्यासक यांना सुद्धा खूप प्रयत्नांती या मृत्यूचे गूढ उमजत नव्हते. शेवटी प्राध्यापक वॅन होवेन वाउटर (Van Hoven Wouter) यांना या रहस्यमयी मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी पाचारण करण्यात आले. वाउटर हे संवर्धन जैवशास्त्रज्ञ असून आफ्रिकेतील गवताळ प्रदेशातील प्राण्यांवर त्यांनी विशेष अभ्यास केला आहे.

सुरुवातीला त्यांनी संपूर्ण भागाचा आणि कुडू हरणांचा सगळा प्राथमिक अभ्यास केला व त्यावरून काही निष्कर्ष काढले. वाउटर यांच्या मते, संपूर्ण प्रदेशातील काही गवताळ पट्ट्यात कुडू हरणांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते तर काही भागात कमी. जिथे जास्त कुडू मृत्युमुखी पडले तिथे त्यांचे मोठे कळप होते. म्हणजे, जेवढा मोठा कळप तेवढे जास्त कुडू मरण्याचा संभव अधिक. कुडू हे कोणत्याही हिंस्त्र प्राणांमुळे मरत नव्हते कारण त्यांच्या शरीरावर तश्या काही खुणा दिसल्या नाहीत किंवा तसे काही पुरावे मिळाले नाहीत, त्यामुळे हे मृत्यू नक्की कशामुळे होतात हे गूढ आता अधिकच वाढत चालले होते.

Photo2-Acacia-tree-in-a-dry-savanna-in-South-Africa-that-receives-500mm-mean-annual.png
फोटो: आंतरजालावरून साभार

वाउटर यांनी हे कोडे सोडवण्यासाठी आता एक प्रयोगशाळा असलेली मोबाईल व्हॅन व त्यांच्या काही विद्यार्थ्यांना मदतीसाठी बोलावून घेतले. आता ते मृत्युमुखी पडलेल्या कुडूंची शवचिकित्सा करणार होते. कुडूंचे मृत्यू हे कोणत्या आजाराने होत असावेत का ? अशी एक शंका येऊ लागली. परंतु, सुरुवातीच्या शवविच्छेदनात यासंदर्भात कोणत्याही विषाणूजन्य किंवा तत्सम रोगाची कोणतीच लक्षणे अथवा त्यासंबंधीचा कोणताही पुरावा मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी कुडूंच्या आतड्यातील घटक तपासायचे ठरवले. चारा,गवत खाणाऱ्या सामान्य पशूंप्रमाणेच यांच्याही आतड्यातील घटक होते, त्यात विशेष असे काही नव्हते. चारा/ गवत यासारख्या वनस्पतीजन्य पदार्थांचे किण्वन (fermentation) होऊन त्यांचे विघटन होते. पण या तपासात काहीतरी वेगळे हाताला लागले. मरणाऱ्या कुडूमधे किण्वनाचा वेग हा फार कमी होता असे आढळून आले. असे काहीतरी होते की, जे किण्वनाचा वेग कमी करत होते. जसजसा हा तपास पुढे जात होता तसतशी नवीन नवीन माहिती हाती लागत होती. त्यातलीच एक महत्वाची बातमी म्हणजे मरणाऱ्या कुडूंमध्ये टॅनिनचे प्रमाण खूपच वाढलेले आढळले. टॅनिन हे काही वनस्पतींच्या रासायनिक संरक्षण यंत्रणेचा एक भाग असतात, याद्वारे ते पानांवरील परजीवी व पाने खाणाऱ्या प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करतात. परंतु, कुडूंच्या शरीरात सापडलेली टॅनिनची मात्र ही खूपच जास्त होती, यामुळे अन्नाच्या किण्वनाची प्रक्रिया खूप संथ होत होती त्यामुळे अन्नपचन नीट होत नव्हते व ते प्राणघातक ठरत होते. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात हे टॅनिन शरीरात आले कुठून? वनस्पतीतून आले असल्यास नक्की कोणत्या? व एवढ्या मोठ्या मात्रेत टॅनिन निर्माण करणाऱ्या वनस्पतींमध्ये त्याचे नक्की प्रयोजन काय? असे अनेक प्रश्न वाउटर यांना पडले. आता वाउटर यांच्याकडे २ महत्वाचे सुगावे होते १) कुडू हरणांच्या मोठ्या कळपातच मुख्यत्वे जास्त मृत्यू होत होते. २) टॅनिन हेच मृत्यूचे मुख्य कारण होते आणि ते कोणत्यातरी वनस्पती स्रोतातून येत होते.
आता वाउटर यांनी त्या सर्व भागातील बाभळीच्या झाडांच्या पानांचे नमुने घेऊन त्यातील टॅनिनची मात्रा तपासली आणि उलगडा झाला. ज्या भागात जास्त कुडू हरणे चरत होती त्या भागातील बाभळीच्या पानांत टॅनिनचे प्रमाण हे चौपटीने अधिक आढळून आले. वनस्पतीचींनी अंमलात आणलेली हि एक संरक्षण प्रणाली होती कारण त्यांना त्यांची सर्व पाने नष्ट व्हायला नको होती. त्यामुळे भयंकर दुष्काळात ज्या बाभळीचा आधार कुडू हरणांना होता तीच झाडे त्यांच्या मृत्यूचे कारण ठरली होती.

परंतु हे गूढ इथेच संपलं नाही. जी झाडे कुडूंनी खाल्ली नव्हती त्यांच्या पानांत देखील टॅनिनचे प्रमाण अधिक आढळून आले. आता हे कसे होते हे समजण्यासाठी एक अनोखा प्रयोग करण्यात आला. आधी झाडांची पाने खुडून मग त्या फांदीला एक प्लॅस्टिकची पिशवी बांधण्यात आली. मग, एक तासाने ती पिशवी अलगद काढून त्यातील हवेचे परीक्षण करण्यात आले.....आणि एक महत्वाची माहिती समोर आली. जसजसे कुडू जास्त पाने खात तसतशी झाडे इथिलिन वायू सोडत असत. इथिलिन हा वायू हलका असल्याने तो वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर लगेच आजूबाजूला पसरत असे. परंतु या पसरत असलेल्या इथिलिन वायूचा जेव्हा इतर बाभळीच्या झाडांच्या पानांशी संपर्क येत असे तेव्हा त्यांच्या तंतूकणिकेला (mitochondria) तो प्रभावित करत असे व नंतर या तंतूकणिका टॅनिन तयार करणाऱ्या विकरांच्या (enzyme) निर्माणासाठी उत्प्रेरित होऊन अधिकाधिक टॅनिन निर्माण करत असे.म्हणजे कुडू हरणे एका झाडाकडून दुसऱ्या झाडाकडे जाण्याआधीच, दुसऱ्या झाडांनी आपली सरंक्षणप्रणाली रासायनिक संवादाद्वारे कार्यान्वित केली होती.

मृत्यूचे गूढ उकलले गेले. बाभळीच्या झाडांनी जास्त संख्येने चरत असणाऱ्या कुडूंना फक्त ओळखलेच नाही, तर त्याची नोंद इतर झाडांना आपल्या रासायनिक संदेशाद्वारे कळवली व स्वतःचा बचाव केला.

वनस्पतीचे संदेशवहन हा नेहमीच एक रंजक व गूढ विषय राहिला आहे.

If you want to manage wildlife, look at the lessons nature teaches you and manage according to that. - Van Hoven Wouter

संदर्भ:
https://youtu.be/QLR6JpSt-Xo

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!! छान आहे लेख. झाडे कम्युनिकेट करतात. आपसात संदेशवहन होते - हे माहीत होते. वाचलेले होते. मात्र ते पुस्तक (the hidden life of trees by peter wohlleben) अ‍ॅमेझॉनवरती अव्हेलेबल नव्हते त्यामुळे घेता आले नाही.

छान आहे लेख.
मी हा किस्सा लक्ष्मण लोंढे यांच्या ' लक्ष्मणझुला' पुस्तकात पूर्वी वाचला होता

मेघना
देवकी
एस
हर्पेन
BLACKCAT
मीरा
साधना
mrunali. samad
स्वान्तसुखाय
वर्षा
बन्या
अस्मिता
वीरु
स्वप्ना_राज
निरु
जाई
चंद्रा
सर्वांचे खूप धन्यवाद...

मी सध्या याच विषयावरचं Suzzane Simard यांचं Finding the mother tree हे पुस्तक वाचत आहे.>>>>>> वावे, माहितीसाठी धन्यवाद, नोंद घेतली, वाचेन

मात्र ते पुस्तक (the hidden life of trees by peter wohlleben) अ‍ॅमेझॉनवरती अव्हेलेबल नव्हते त्यामुळे घेता आले नाही.>>>> धन्यवाद सामो, यातही बरीच रंजक माहिती आहे

मी हा किस्सा लक्ष्मण लोंढे यांच्या ' लक्ष्मणझुला' पुस्तकात पूर्वी वाचला होता>>>>> कुमार१, हे खूप आधी वाच होतं, पण आता आठवत नाही. माहितीसाठी धन्यवाद, पुन्हा वाचेन.

बायदवे् चहात पण टॅनिन असते ना ते कितपत घातक असते>>>> हो, त्याचे चांगले वाईट परिणाम आहेत, चहा किती, कसा पितो यावर अवलंबून असावे.