आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त एका दैनिकाच्या आंतरजालीय आवृत्तीत प्रकाशित झालेला "योगाची बाजारपेठ Yoga Inc." हा माझा लेख इथे देत आहे.
इतरत्र प्रकाशित झालेले साहित्य इथे देणे मायबोलीच्या नियमांत बसत नसेल तर हा लेख उडवावा अशी संपादकांना विनंती.
टीप : लेखाबरोबर प्रकाशित केलेली सर्व प्रकाशचित्रे त्या दैनिकाने लेखाला जोडली आहेत. मी केवळ लेख पाठवला होता.
"योगा" ची बाजारपेठ (Yoga Inc. $ € ¥ £ ₹)
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत भारतीयांच्या संस्कृतीची, वेदांत तत्वज्ञानाची अमेरिकेला ओळख करून दिली आणि तेव्हा तेथील समाजाला पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या "योगा" ने अमेरीकेच्या व एकंदरीतच पाश्चात्यांच्या समाज जीवनामध्ये चंचुप्रवेश केला.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला काही योगाचार्य योगा शिकविण्यासाठी अमेरिकेत गेले. योगा ह्या संकल्पनेची ओळख झाल्यावर आणि योगा करायला सुरुवात केल्यावर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योगाची उपयुक्तता अमेरिकेतील लोकांच्या लक्षात आली. मात्र १९२५ च्या सुमारास अमेरिकेने भारतीयांच्या स्थलांतरावर बंदी घातली त्यामुळे भारतीय योगाचार्यांना अमेरिकेत जाणे दुरापास्त झाले परंतु योग शिक्षणाच्या तीव्र लालसेपायी पुढील काही दशके अमेरीकन्स भारतात येऊन योगा शिकत होते. त्यातील काहींनी योगा शिकून अमेरिकेत परत आल्यावर वेगळेच व्यक्तिमत्व आणि नाव धारण केले व फक्त वैयक्तिकरित्या योगाभ्यास न करता इतरांना योगा शिकवायला सुरवात केली. काही तुरळक ठिकाणी योगा-स्टुडिओ चालू झाले. पुढे जाऊन सद्यकाळातील अब्जावधी डॉलर्सच्या व्यवसायाची ती मुहूर्तमेढ होती. शारीरिक आणि मानसिक फायद्याबरोबरीने होणारा आर्थिक फायदा लक्षात आल्यावर चाणाक्ष लोकांनी अगदी व्यावसायिक पद्धतीने योगा शिक्षण व त्याला अनुषंगिक इतर बाबींचे व्यवस्थापन सुरू केले. साठीच्या दशकात योगाला टेलिव्हिजनवर स्थान मिळाले ज्यामुळे योगा जनसामान्यांपर्यंत जाऊन पोहोचला आणि सत्तरीच्या दशकात खऱ्या अर्थाने योगा व्यवसायाची घोडदौड अमेरिकेत सुरू झाली.
मध्यंतरीच्या काळात भारतातील योगाचार्यांनी भारतात आपापले योगा पंथ (Yoga brand) सुरू केले आणि त्याचे लोण अमेरिकेत व इतर युरोपमधील देशांमध्ये येऊन पोहोचले. त्याबरोबरीने योगा संबंधीत विविध पुस्तके प्रकाशित करण्यात आली. तेव्हा योगाची 'कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे पश्चिमेकडे' अशी स्थिती होती व अमेरिकेत योगा हा व्यवसाय सुस्थापित झाला होता. उत्तर अमेरिका खंडा नंतर दक्षिण अमेरिका खंड, युरोप, आफ्रिका, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि पूर्वेकडील देशांमध्ये देखील योगा जाऊन पोहोचला. इतकेच नव्हे तर एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकात अगदी सौदी अरेबिया पासून ते पाकिस्तान पर्यंत योगाभ्यास चालू झाला. म्हणजे योगा केवळ पाश्चिमात्य देशातच नाही तर इतरत्र देखील पोहोचला होता. योगा ने पाश्चिमात्य देशातील गौरवर्णीय लोकांबरोबर कृष्णवर्णीय आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील इतर लोकांना देखील कवेत घेऊन 'वाढता वाढता वाढे व्यापिले भूमंडळा' केले त्यामुळे आता योगा व्यवसायाची व्याप्ती अब्जावधी डॉलर्सची झाली आहे आणि त्यावर योगाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या संबंधित असलेल्या असंख्य लोकांची उपजीविका अवलंबून आहे.
सुरवातीला घरगुती आणि वैयक्तिक स्वरूपात किंवा फारतर एखाद्या संस्थेच्या सार्वजनिक सभागृहात योगाचे वर्ग चालू करण्यात आले. कालांतराने जसा योगवर्गांसाठी मिळणारा प्रतिसाद वाढला तसे योगा स्टुडिओ उघडले गेले. तेव्हा भारतातून गेलेल्या योगाचार्यांनी योग शिक्षणात पुढाकार घेतला. त्यातील काहींना चांगलीच प्रसिद्धी आणि यश मिळाले. योगातील वेगवेगळ्या पंथानुसार स्टुडिओ चालू झाले. योग शिक्षणासाठी शिक्षकांची गरज भासू लागली त्यासाठी योग शिक्षक (योगी आणि योगिनी) प्रशिक्षण वर्ग चालू झाले. योगा स्टुडिओच्या व्यवसायाचा सर्वसाधारण आराखडा (business template) ठरवण्यात आला. प्रत्येक स्टुडिओसाठी लागणाऱ्या मोक्याची जागा (रिअल इस्टेट), अंतर्गत सजावट, वीज, पाणी, प्रशासन आणि देखभाल ह्या सारख्या गोष्टींची अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यावसायिकांची मागणी वाढली.
काही योगाचार्यांनी तर चक्क योगा स्टुडिओचे विशेष हक्क (franchise) देणे सुरू केले. भारतात जाऊन शिकून आलेल्या व त्या बरोबरीने अमेरीकेतील भारतीय योगाचार्यांकडून शिक्षण घेतलेल्या गोऱ्या मंडळींनी देखील योगा शिकविणे चालू केले. तद्नंतर त्यामागचे अर्थकारण लक्षात आल्यावर योगा स्टुडिओजचे अक्षरशः पेव फुटले. योगासनांमध्ये प्राविण्य मिळवल्यावर पाश्चिमात्यांनी त्यांच्या चिकित्सक तैलबुद्धीला अनुसरून योगाचे विविध प्रकार शोधले. प्रसूतीपूर्व गरोदरपणातील प्री-नेटल योगा, प्रसूती नंतर आईचा लहानग्या बाळा समवेत योगा, मुलांचा किड्स योगा, प्रौढांसाठी बिगीनर्स ते ऍडव्हान्स असा विविध पातळीवरचा योगा, पॉवर योगा, हॉट योगा, चेअर योगा, ऑफिस योगा, फिट योगा, फ्लो योगा, वृद्धांसाठीचा जेंटल योगा अशा विविध प्रकारांमुळे योगा सर्वसमावेशक झाला त्यामुळे एखाद्या फास्ट फूड रेस्तराँ चेन प्रमाणे योगा स्टुडिओ जागोजागी दिसू लागले. त्याला पुढे मॅक-योगा (McYoga) अशी संज्ञा मिळाली.
योगामुळे मिळणाऱ्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा डॉक्टर मंडळींना अनुभव आल्याने नेहमीच्या वैद्यकीय सेवेला पूरक पर्याय म्हणून योगा वापरता येईल असा विचार पुढे आला आणि त्यातून विविध आजारांसाठी योगोपचार (Yoga therapy) ही नवीन शाखा सुरू झाली. उच्च रक्तदाब, पाठदुखी (upper and lower back pain), दमा, संधिवात, हृदया संबंधित आजार इत्यादींसाठी योगोपचार उपयोगी आहेत हे लक्षात आले आणि त्यासंबंधित व्यवसायाला प्रेरणा मिळाली. निद्रानाश समस्येने ग्रस्त असलेल्यांसाठी निद्रा योगा व chronic pain साठी pain management Yoga सुरू झाले. योगा शिकवण्यासाठी योगा शिक्षकांची गरज होती त्या जोडीने आता योगा थेरपिस्ट मंडळींची गरज भासू लागली आणि शिक्षकांबरोबर थेरपिस्ट साठी देखील प्रशिक्षण वर्ग चालू झाले. जे वैद्यकीय क्षेत्राशी निगडित होते आणि ज्यांचा आधीपासूनच योगाभ्यास होता असे लोक योगा थेरपिस्ट झाले.
संपन्न समाजातील तयार आणि प्रक्रिया केलेल्या चविष्ट परंतु सर्वांगीण पोषणासाठी निकृष्ट अन्नाची (junk food) मुबलक उपलब्धता, शारीरिक कष्टाचा अभाव, अतिरिक्त फास्ट फूड व मांसाहार आणि त्याबरोबरीने फसफसणाऱ्या शर्करावगुंठित पेय्यांचे सेवन ह्यामुळे स्थूलतेचे प्रमाण वाढत असताना Yoga for weight loss, Yoga tone, Fat free Yoga अशा नवीन शाखेचा उदय झाला. समाजातील स्थूल वर्ग योगा कडे आकर्षित झाला. हे बघता व्यायामशाळांनी पूरक व्यवसाय म्हणून जिम मध्ये योगाचे वर्ग सुरू केले. त्या साठी जिम मध्ये योगा शिकवण्यासाठी योगा इन्स्ट्रक्टरची नवीन जमात तयार झाली.
एखादा आजार, इजा किंवा दुखापत झाल्यानंतर उपचारासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी योगोपचार (Rehabilitative and restorative Yoga) सुरू झाले. प्राणायाम केल्याने रक्तातील प्राणवायूचे प्रमाण वाढून स्टॅमिना वाढतो असा समज झाल्याने खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे लक्ष योगाकडे गेले. खेळामध्ये एकाग्रता वाढावी आणि लवचिकता यावी या साठी खेळाडूंना योगाची शिफारस केली गेली. खेळातील दुखापती कमी करण्यासाठी योगाXस्पोर्ट्स असे क्रॉस ट्रेनिंग सुरू झाले. विविध संस्थांमध्ये योगा वर केल्या गेलेल्या संशोधनातून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर योगामुळे कसा सुपरिणाम होतो ह्या बद्दल शास्त्रीय माहिती मिळाली. डॉक्टरांकडून उत्तम, निरामय आरोग्यासाठी समांतर पूरक उपचार पद्धती म्हणून योगाची शिफारस चालू झाली. अशा रीतीने मॅक-योगा (McYoga) पासून सुरवात झालेला हा प्रवास आता RxYoga (Yoga Chikitsa) पर्यंत येऊन पोहोचला.
योगाचा प्रसार होत असताना त्याच्या विविध पैलूंची माहिती देणारी असंख्य पुस्तके प्रकाशित झाली आणि आज देखील त्यात नवनवीन पुस्तकांची भर पडते आहे. योगा संदर्भात विविध मासिके आणि नियतकालिके नियमितपणे प्रकाशित व्हायला लागली. पुढे तांत्रिक प्रगती बरोबर योगासनांची प्रात्यक्षिके असणाऱ्या डीव्हीडी, सिडी बाजारात आल्या. Y2K नंतर एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला माहिती तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या विस्फोटामुळे आंतरजालावरील योगा व्यवसायाला चालना मिळाली. अगणित वेब साईट्स सुरू झाल्या. योगासने आणि प्राणायाम कसा करावा ह्याचे मार्गदर्शन करणाऱ्या सशुल्क वेब साईट्स सुरू झाल्या. गेल्या काही वर्षात ज्याच्या त्याच्या हाती चतुर भ्रमणध्वनी दिसू लागले तेव्हा वेगवेगळे Yoga-Apps बाजारात आले. ज्यांना योगा बद्दल उत्सुकता होती परंतु योग वर्गात जाऊन इतरांबरोबर सामुदायिक योगा करायचा नव्हता अशा लोकांची सशुल्क योगा वेब साईट्स आणि Yoga-Apps मुळे मोठी सोय झाली. त्यातून Yoga e-learning चा व्यवसाय फोफावला.
योगा प्रसिद्ध होऊन जनसामान्यांपर्यंत पोहोचल्यावर योगासने करताना सहाय्यभूत ठरणारी साधने आणि उपकरणे (Yoga accessories and props) ह्यांचा व्यवसाय प्रचंड प्रमाणात वाढला. योगा शिकताना लागणाऱ्या योगा-मॅटस् आणि त्याच्या पिशव्या (मॅट बॅग्ज आणि स्लिंग्ज), मॅट क्लिनर्स, सॅनिटायझर्स, हेडबँडस् आणि हेअर टाईज्, टॉवेल्स, ब्लॅंकेट्स, पट्टे, ध्यानासाठी लागणारे बस्कर (मेडिटेशन कुशन्स), वेगवेगळ्या आकाराचे ठोकळे, पाण्याच्या बाटल्या, योगा कुकी कटर, योगा जपमाळ यापासून ते योगा ज्वेलरी इथं पर्यंत हा व्यवसाय वाढला. Yoga apparel च्या व्यवसायाने मूळ धरले. योगासने करताना लागणारे स्त्री आणि पुरुषांचे आरामदायी व विविध शारीरिक हालचालींना सहाय्यभूत ठरणारे, घाम शोषून घेणारे कपडे इत्यादी गोष्टी बाजारात उपलब्ध झाल्या इतकेच नव्हे तर सध्याच्या कोविड जागतिक साथीच्या पार्श्वभूमीवर योगा साठी खास मुख-लंगोट (Yoga mask) बाजारात आला. आंतरजालावर ह्या व्यवसायाची उलाढाल खूप मोठी आहे.
योगाची लोकप्रियता बघता योगा-पर्यटन (Yoga travel - ऑल इन्क्ल्युझिव्ह डेस्टिनेशन योगा) ही नवीन कल्पना पुढे आली. हॉलिडे रिसॉर्टस, हॉटेल्स, टूर अँड ट्रॅव्हल्स, वेगवेगळ्या अध्यात्मिक गुरूंचे जगभर पसरलेले आश्रम यांनी योगा रिट्रीट सेंटर्स सुरू केली. निसर्गरम्य ठिकाणी दररोजच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर, निसर्ग सानिध्यात पर्यटनाच्या मजेबरोबर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य, निसर्गोपचार व इतर आयुर्वेदिक उपचार आणि सात्विक शाकाहार अशी समग्र पॅकेजेस् (योगा-रंजन Yogatainment) उपलब्ध झाली.
ह्या वरील सर्व गोष्टींमुळे होणारी आर्थिक उलाढाल डोळे दिपवणारी आहे. आता "योगा" हा केवळ स्वास्थ्यासाठी करायचा एक व्यायाम प्रकार न राहता Industry झाला आहे. ‘योग: कर्मसु कौशलम्’ चा नवीन अर्थ 'योग: कर तू व्यवसायम्' असा झाला आहे आणि त्याला Yoga Inc. असे सार्थ नाव मिळाले आहे.
नियमितपणे योगासनांचा सराव केल्याचा एक अतिरिक्त सुपरिणाम म्हणजे कित्येकांनी मांसाहाराचा त्याग करून सात्विक, शाकाहार (योगा-आहार Yoga-diet) चालू केला. सध्या व्हीगन डाएटचे फॅड जोरात असल्याने जे योगा करणारे अगोदर पासून व्हीगन डाएट पाळत होते त्यांनी whole-food plant-based diet (WFPB) ही पुढची पायरी गाठली. सध्या योगा ब्रँडेड पॅकेज फूड उपलब्ध नसले तरी हि एक मोठी व्यवसाय संधी दिसते आहे आणि लवकरच असे Yoga branded सात्विक तयार अन्न (ready to eat) उपलब्ध झाले तर आश्चर्य वाटायला नको.
"योगा" ही भारताने जगाला मोफत दिलेली Open Source Bio-Technology आहे. सध्या जगातील कोट्यावधि लोकं योगा करत आहेत आणि त्यात दररोज भर पडते आहे. ही संख्या वृद्धिंगत होवो व योगामुळे लोकांना स्वास्थ्यपूर्ण आणि आरोग्यदायी जीवन लाभो हीच योग महर्षी पतंजलींच्या चरणी प्रार्थना.
सर्वे सन्तु निरामयः ।
ह्म्म्म!! व्यावसायीक किंवा
ह्म्म्म!! व्यावसायीक किंवा धंदेवाइक रुप आले आहे खरे. पण जर उत्तम दर्जाची सेवा आणि प्रशिक्षण देत असतील तर हे क्लासेस ट्राय करण्यात काय प्रत्यवाय आहे? उत्तम कला,कौशल्य, साधने यांचा प्रसार अनिवार्यच आहे.
उत्तम लेख. माझ्या मते योग
उत्तम लेख. माझ्या मते योग/योगा हे pseudoscience आहे. अंगात लवचिकता येते याव्यतिरिक्त योगाचा काय फायदा आहे, याबद्दल माझ्या मनात शंका आहेत. योगा करण्यात वेळ वाया घालवण्याऐवजी मी पोहायला जाणे किंवा पळायला जाणे, अधिक सुयोग्य समजतो.
एकदम पटलं.
एकदम पटलं.
यात अजुन एक प्रकाराची जाहिरात
यात अजुन एक प्रकाराची जाहिरात आज पाहिली. वाईन आणि योगा https://www.wein-moment.de/de/events/stuttgart/Yoga-Wine.html
Creativity has no limits
Goat yoga
Goat yoga
'Goat Yoga' a hit on New Hampshire farm
https://youtu.be/gvj6voiH5S0
In Ridgefield, goat yoga offers 'a joyous brain vacation'
https://www.theridgefieldpress.com/news/article/In-Ridgefield-goat-yoga-...
लेख आवडला.
लेख आवडला.
नवीन माहिती मिळाली. लेखकाने हे चांगले की वाईट हे मत ना थोपावता, हे असं आहे, चांगली की वाईट हा तुमचा दृष्टिकोन अशा थाटात लिहिल्याने biased नाही वाटला.
--x--
हममम् >> +१
--x--
Goat योगा भन्नाट.
आता ह्यानंतर हलाल योगा नाही निघाला म्हणजे मिळवलं
सामो - योग वर्गात जाऊन योग
सामो - योग वर्गात जाऊन योग शिकण्यास काहीही हरकत नाही. लेखाचा उद्देश योगाचे कसे व्यावसायिकरण होत गेले आहे हे दाखवण्याचा आहे.
उपाशी बोका - योग हे छद्मविज्ञान आहे कि नाही कल्पनां नाही परंतु केवळ लवचिकतेसाठीच नाही तर मानसिक स्वास्थ्यासाठी आणि नैराश्यावर मात करण्यासाठी देखील उपयोगी आहे असे निदर्शनास आले आहे.
mi_anu - नीटसं कळलं नाही. लेख पटला कि योग छद्मविज्ञान आहे हे पटले?
अनघा दातार - वाईन योगा सारखा बिअर योगा देखील बघितला आहे. योगाचे बाजारूपण ते हेच.
जिद्दु - Animal-assisted therapy (AAT) चे चांगले परिणाम दिसून आले आहेत त्याला योगाची सांगड घातली आहे. चान्गला उपक्रम.
फलक से जुदा - योगाची वाढती लोकप्रियता बघता इतर धर्मियांनी योगामध्ये बदल करून आपापल्या उपासना पद्धती नुसार योगामध्ये बदल केले आहेत (योगा पायरसी). त्यामुळे तुम्ही म्हणता तसे काही नजीकच्या भविष्यात दिसले तर आश्चर्य वाटायला नको.
छान लेख !
छान लेख !
लेख पटला.
लेख पटला.
योगा आणि त्याच्या आजूबाजूला फिरणारे सर्व मर्चंडाईझ ही मोठी बाजारपेठ आहे.
योगाचे अंतिम उद्दिष्ट मनाला
योगाचे अंतिम उद्दिष्ट मनाला लवचिक, खंबीर, कणखर, हळुवार, आनंदी, जागरूक, अष्टावधानी, समतोल, स्थिर असे एकसमयावच्छेदेकरून बनवणे हे आहे. शरीरस्वास्थ्य ही पहिली किंवा प्राथमिक पायरी अथवा टप्पा.
योगाचे बाजारीकरण झाले आहे हे
योगाचे बाजारीकरण झाले आहे हे खरे आहे परन्तु खरी शोकान्तिका म्हणजे योग म्हणजे 'योगासने' एवढाच सिमित लावलेला अर्थ. आपल्या षडदर्शनात योग हे एक दर्शन सांगितले आहे ज्यात पतंजली योगसुत्राला मोठे महत्व दिले गेले आहे आणि पतंजली यांनी जो अष्टांग मार्ग सांगितला त्यात आसनाचा उल्लेख फक्त स्थिर सुखम आसनम एवढाच केलाय. आजचे जे योगा नावाने जे सर्वत्र प्रस्थ पसरले आहे त्याला योगसुत्रात किंवा एकुणच योगदर्शनात नगण्य स्थान आहे.
आज पश्चिमेकडे योगाच्या बाबतीत अष्टांग हे नाव अगदी सर्रास घेतले जाते पण त्याचा पतंजली योगसूत्रातील अष्टांग योग याच्याशी सुतरामही संबंध नाही. अष्टांग नावाखाली फक्त योगासने शिकवली जातात. योगाची आठ अंगे सोडा केवळ अष्टांग शब्दाचा अर्थ सांगा म्हणले तरी त्यांना काही कळत नाही .
त्यात तोकडे कपडे घालून beach योगा, hot योगा नावाखाली विकृत प्रकारपण सुरु आहेत. आणि बाजारपेठेचा परिणाम म्हणून की काय तर भारतीयांना सुद्धा योग म्हणजे फक्त योगासने असेच वाटू लागले आहे.
कोसो, सहमत
कोसो, सहमत
यम,नियम एवढेच प्रामाणिक पणे (दांभिकपणा भरलेला दिसतो) समजून घेऊन आचरणात आणावे पण तेच कोणी समजावून सांगत नाही.