चाहूल ( भाग १)

Submitted by द्वादशांगुला on 22 July, 2021 - 19:34

चाहूल

" बस्स झालं आता! मी अजून सहन नाही करु शकत! "

मी वैतागून मोठ्याने म्हणाले आणि पलिकडचा आवाज क्षणभर शांत झाला. घडणार्‍या भयानक घटना आता दुर्लक्ष करण्यापलिकडे गेल्या आहेत, हे मी गेली पंचवीस मिनिटं अनिरुद्धला समजावून सांगत होते. सुरुवातीला चेष्टा वाटलेल्या त्याचा गंभीर झालेला आवाज मला जाणवत होता. पलिकडून तो जमेल तितका मला धीर द्यायचा प्रयत्न करत होता. त्याच्यामते अजून काही हानिकारक झालेलं नसल्यानं मी इथेच रहावं, असं त्याला वाटत होतं. मी मात्र कळवळून 'इथे राहणं सेफ नाहीये' हे त्याला पटवून देताना थकले होते. मला माझ्यापेक्षा जास्त माझ्या चिमुरडीची काळजी वाटत होती. सानू- सान्वी- माझं अवघं पाच वर्षांचं बाळ! बिनधास्त  सगळीकडे बागडणारी, मोठ्ठ्या डोळ्यांनी आजुबाजूचं निरीक्षण करणारी, नाना प्रश्न विचारुन भंडावून सोडणारी माझी सानू आजकाल फारच भेदरुन रहायला लागली होती. तिचा गोरापान चेहरा काळवंडला होता, अन् फार अशक्त झाली होती ती! झोपेतून दचकून उठायची, अचानक कुठेतरी कोपऱ्याकडे बोट दाखवून रडू लागायची. तरी बरं माझ्या जाॅबच्या वेळेत तिच्यासाठी पाळणाघर पाहिलं होतं. घराबाहेर तरतरीत असायची, पण घरात शिरली, की तिचं असं वागणं सुरु व्हायचं.

" बरं बघतो मी काय ते! "

असं तुटक बोलून अनिने फोन ठेवला, तसं मी ठरवलं, आता मलाच काहीतरी करायला हवं. फोन ठेवला, तसं दूखून आलेल्या मांडीची जाणीव झाली. मी सोफ्यावर बसले होते आणि सानू माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती, तिच्या पोटाशी गुडघे ओढून. मी उठू नये की काय म्हणून तिनं डोक्यानं माझी मांडी घट्ट दाबून ठेवली होती. तिचं पार रया गेलेलं अंग पाहून मायेचा बांध अनावर झाला अन् नकळत माझे डोळे जडावले. तिच्या केसांमधून प्रेमळपणे थरथरता हात फिरवत कापऱ्या आवाजात कितीतरी वेळ " मी आहे हं बाळा जवळ..  आहे मी! " पुटपुटत राहिले.

ΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠ

" तनुऽऽऽ , हिची खेळणी भरलीस ना गं? नाहीतर नंतर तिकडे पोहोचल्यावर धिंगाणा घालेल! "

सामानभरले खोके मोजण्याच्या तंद्रीतच मी अनिच्या प्रश्नावर हुंकार भरला. एकाग्रतेने सेलोटेपने बंद केलेले खोके, गच्च भरलेल्या बॅग्स मोजत राहिले.

'दहा...  अकरा...  हा खेळण्यांचा बारावा...  '

" अं? ", खांद्यावर पडलेला अनिचा उबदार हात जाणवला तशी माझी तंद्री भंग झाली. मी हळूच मागे वळले, तसं माझ्या डोळ्यांत त्याचे ओलसर डोळे घालून अनि पुटपुटला,

" तनु साॅरी..."

मी किंचित हसले आणि त्याला बरं वाटावं म्हणून म्हणाले,
" अरे अनि असू दे रे! तुझी काही चूक आहे का? मग? आयत्या वेळी तू मागून घेतलेलं ट्रान्स्फर कॅन्सल झालं, त्याला तू काय करणार रे? मला जावंच लागणार, लवकर तिकडल्या ब्रांचला जाॅईन झालं पाहिजे. आणि तिकडे सानूच्या शाळेचंही बघून ठेवलं आहे ना... तू ये मागाहून! लवकर ट्रान्सफर करून घे. हं? आता हस बघू, तुला असं उदास बघवत नाही नं..  "

यावर तोही कनकुसं हसला. काही मिनिटं स्तब्धतेत गेली. अन् शांतताभंग झाला तो सानूच्या खिदळत येण्याने. ती शेजारच्यांकडे निरोप घ्यायला गेली होती. तिचे लाडके पाठक आजीआजोबा! आम्ही दोघं जाॅबला जायचो तेव्हा तिकडेच तर पडिक असायची लबाड! आताही या पसाऱ्यातल्या धुळीने तिला त्रास होऊ नये म्हणून पाठक आजी मुद्दाम तिला घेऊन गेल्या होत्या. आता ती आली ते हातात एक छोटीशी कुंडी घेऊनच. छान छोटंसं गुलाबाचं रोप होतं त्यात. ती कसलंसं गोड बडबडगीत गात उड्या मारतच आली. पुढे होऊन अनिने तिला उचलून घेतलं. आणि त्या दोघांच्या गप्पा सुरु झाल्या.

" हे छोट्टं रोप कोणी दिलं माझ्या सोनुला?"

" डॅऽऽडू!  र्रोप नाऽही! गुब्बु आहे तो! मला ना आज्जुने दिलं. तुला माहीते, त्याने सोत्ता ते बनवलं..  अं..  कायतरी मलम करुन.. तुला येतं का रे मलम? "

कलमच्या जागी मलम ऐकून आम्ही दोघेही खोखो हसायला लागलो, आणि सानू गोंधळून आमच्याकडे आळीपाळीने बघायला लागली. तसं अनिनं तिचा पापा घेतला आणि दोघं बापलेक गमतीत गमतीत बोलायला लागले, अनि तिला खेळवत राहिला. ते पाहून मी स्मित करून सामानाकडे मोर्चा वळवला.

ΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠ

मी या घरावर परत एकदा शेवटची नजर फिरवली. आमची कार आली होती. मागवलेल्या छोट्या टेम्पोत मजूरांकरवी घरातलं काही फर्निचर, आमचं दोघींचं सामान, काही अवजड सामान भरण्याचं काम जवळपास होत आलं होतं. अनिचे कपडे, त्याच्या वस्तू, त्याच्यापुरतं थोडंच सामान आम्ही इथे ठेवलं होतं. जमेल तितक्या लवकर ट्रान्स्फर करुन घेऊन मागाहून तोही आमच्या इकडे येणार होता. जवळजवळ सात वर्षं चुटकीसरशी निघून गेली इथे! सात वर्षांपूर्वी अनिसोबतचे नवलाईचे दिवस कसे भर्रकन निघून गेले! अनिरुद्ध - अनि, मी - तनिष्का, अन् आम्हा दोघांच्या प्रेमाचं हे इवलंसं प्रतीक- सान्वी, तिच्या 'सान्वी' नावाचं नकळत सोयीने 'सानू' झालं होतं. आमच्या छोट्याशा एकत्र त्रिकोणी कुटुंबांची आता ताटातूट होणार होती. मन अगदी उदास झालं होतं. सानूसाठी आणलेला छोटुकला झोपाळा वाऱ्यावर हिंदोळत जणू मलाच ग़तकाळाच्या आठवणींत झुलवत होता. सुट्टीत ही हौसेनं फुवलवेली बाग, याच किचनमध्ये अनिसाठी आवडीनं केलेले पदार्थ, याच गच्चीत अनि अन् मी तासतासभर मारलेल्या गप्पा, याच घरात लागलेली सानूची चाहूल, अन् तिच्या आगमनासाठीचा उत्साह, मग तिच्या रडण्याच्या, खुदखुदू हसण्याच्या आवाजानं भरुन गेलेलं घर, तिची दुडदूडू धावणारी बालपावलं, अन् छोट्या सानूची, माझी, या घराची, सर्वांची काळजी घेणारा माझा अनि! आज तो दाराच्या उंबरठ्यापुढे उभा होता, आणि डबडबल्या नजरेने माझ्याकडे  पाहत होता.
आता हे घर, ही जागा, हे शहर सोडायची वेळ आली होती. खरंतर माझ्यामुळेच. माझ्या झालेल्या बढतीसोबत हे शहरही सोडावं लागणार होतं. खरंतर सुरळीत चाललेल्या घरासाठी माझा बढती न स्वीकारण्याचा विचार होता, पण मी असं करु नये, यावर अनिच ठाम होता. त्याच्यामते एकतर सानूच्या जन्मावेळी मला करियरमधलं वर्ष - दीडवर्षं गमवावं लागलं होतं आणि आता कुठे करियरची नीट घडी बसल्यावर मी घरासाठी असा त्याग करु नये, असं त्याला वाटत होतं आणि मलाही ते पटत होतं. शिवाय तोही जमेल तशी नव्या शहरात बदली करुन घेईल, असा त्यानं शब्द दिला होता म्हणून मी निर्धास्तपणे बढती स्वीकारली होती. तशी त्याची बदली मंजूरही झाली होती, पण आयत्यावर नेमकी माशी शिंकली अन् त्याची बदली रद्द झाली. मला तर जाणं भाग होतं. आता मे महिना सुरु असल्यानं सानूच्या शाळेचा श्रीगणेशाही तिथेच होणार होता. आम्ही तर शाळेत जाऊन चौकशी, अॅडमिशनही करुन आलो होतो. म्हणून आम्हा दोघी मायलेकींनाच नव्या शहरात जावं लागणार होतं. तसा अनि सारखा म्हणत होता, लवकर बदली करुन घेईन म्हणून, पण तो दिवस कधी उजाडेल याची शाश्वती नव्हती.

"बाईसाहेब, सामान ठेवलं टेम्पोत! "

मजूरांपैकी एकजण माझ्याजवळ येऊन म्हणाला, तशी माझी तंद्री भंग पावली. मनात उगाच एक विचार आला, फारच लवकर भरुन झालं सामान. वेळ स्तब्ध करता आला असता तर किती छान झालं असतं नाही! 

मी अनिला मजूरांची मजुरी द्यायला सांगितली आणि मी सानूला हाका मारत घरात शिरले.

" साऽऽनूऽऽ बाळा च्चल भुर्र जायचंय ना आपल्याला? कुठे आहेस? "

तिचा काही प्रतिसाद येई ना. तिची चाहूलही लागे ना. इतक्यात अनि आत आला अन् मी सानूला शोधत आहे, हे लक्षात येऊन तो म्हणाला,

" पाठक आजीआजोबांकडे गेलीय ती. आजींनी खास तिच्यासाठी पुरणपोळ्या केल्या आहेत, तिला मघाशीच घेऊन गेल्या त्या. "

" अं..  बरं.. " मी उत्तरले.

मी पाठकांकडे जाण्यासाठी दाराकडे वळणार इतक्यात अनि म्हणाला,

" अं तनु ऐक ना.. "

" हं बोल.. "

" ... "

" जाऊ ना? "

" अं..  हं..  जावंच लागेल ना .. आ ज .. ! "

" मलाही जायचं नाहीये..  पण.. "

अनिचा कंठ दाटून आला होता. त्याचे डोळेही भरले होते. माझीसुद्धा काही वेगळी अवस्था नव्हती. काही क्षण स्तबधतेत गेले. नंतर अनिनेच नजर फिरवली आणि तो थोडा वळून घसा खाकरत म्हणाला,

" सानूच्या खाऊन झाल्या असतील पोळ्या, आण तिला. तोपर्यंत मी भरलेलं सामान एकदा पाहून घेतो. मी येत नाहीये हे सांगू नकोस.. मी मागाहून घराला कुलूप लावून येतोय असं सांग. नाहीतर तिची समजूत काढणं मुश्किल आहे. "

मी एक मोठा श्वास घेतला, अन् हुंकार भरला. जड पावलांनी चालू लागले. मी पाठमोरी असतानाही अनिचे माझ्याकडेच पाहत असलेले पाणावले डोळे मला जाणवत होते.

पाठक आजीआजोबांचं घर शेजारीच होतं. मी फाटक उघडलं, काणि काही पावलं चालल्यावरच सानू , आजीआजोबांचं हसणं-खिदळणं ऐकू आलं. मी पाहिलं, आजींचं सानूला पुरणपोळीचा घास भरवणं सुरू होतं आणि आजोबा सानूला गंमतीजंमती सांगून हसवत होते. मला दाराजवळ पाहताच आजोबा म्हणाले,
" अरे वा तनू आलीस!  ये ये!  बघ आमची सानू किती पटापट खाते. उगाच तक्रार करत असतेस. बाळ चल बघू आईला दाखव बरं तू हळूबाई नाहीस ते! "

मी घरात शिरत म्हणाले, " हं खा बघू पटकन, निघायचंय ना आता आपल्याला? "

तशी ती निरागसपणे म्हणाली, " मम्मा आत्ताच निघायचं? "

तिच्या जवळ बसत तिच्या केसांतून हात फिरवत मी म्हणाले, " हो बाळा! "

पाठक आजी म्हणाल्या, " आताच निघताहात का गं? मी काय म्हणते तूही खा बघू एक पुरणपोळी. परत लांबचा प्रवास, उगाच बाहेरचं खाऊन तब्येत कशाला बिघडवून घ्या!"

तसे आजोबाही आजींच्या शब्दात होकार भरत म्हणाले, " हां तनु , तूही घे खाऊन. अनिरुद्धसाठीही ने. उगाच बाहेरचं खाऊन तब्येत कशाला बिघडवून घ्या! हो ना गं सुमे? "

आजींनी हुंकार भरला आणि त्या किचनकडे वळणार इतक्यात मी म्हणाले, " नका राहू द्या हो काकू..  आत्ता लगेच निघायचंय, गाड्या तयार आहेत.. मी हिला घ्यायला आले..  "

आजी माझ्याकडे वळल्या, त्यांनी टेबलावरचा स्टिलचा डबा उचलला आणि म्हणाल्या, " वाटलेलंच तू काही इथे खाणार नाही ते! बरं मग डब्यात देतेय. हं घे डबा. तिकडे पोहोचल्यावर तुम्ही दोघी खा. काही बाहेरचं देऊ नकोस हिला. पाण्याची बाटलीही इथूनच घे हो."

" कशाला हो तुम्ही त्रास घेतलात काकू? बरं औषधं वेळेवर घेत जा दोघंही. मी फोन करत जाईन अधनंमधनं. " मी उठून डबा हातात घेतला आणि आजींचा हात हातात घेत म्हणाले. त्या दोघांच्याही चेहर्‍यावरची कुणीतरी रक्ताच्या नात्याचंच दूर जाणार असल्यासारखी हुरहुर स्पष्ट दिसत होती. इतकी वर्षं शेजारी राहून आमचे छान स्नेहबंध जुळले होते. ते दोघे तर आम्हाला पोटच्या मुलांसारखेच समजत. सानूच्या वेळी हे दोघंही किती काळजी घ्यायचे माझी! जणू त्यांच्या पोटची मुलगीच मी! सानू तर अगदी लाडाची बाहुली बनली होती दोघांची. दिवसभर तिथेच खेळायची, आजोबांच्या सोबत झाडांची निगा राखायची, आजींच्या गोष्टी ऐकत त्यांच्याच मांडीवर डोकं ठेवून झोपी जायची. आजीही निगुतीने तिच्यासाठी खाऊ बनवायच्या. आता या संत माणसांना सोडून जाणं अगदी जिवावर आलं होतं. नात्यांचे बंध कसे चटकन गुंफले जातात ना!

आसवांनी डोळे गच्च भरले होते. मला एक क्षण वाटलं आता ते वाहू लागतायेत की काय! मग मन घट्ट करुनच सानूचा हात धरला, तिला चलायला सांगितलं, आणि कंपनं पावणाऱ्या आवाजानेच म्हणाले, " काका, काकू, चला येते मी..! काळजी घ्या! "

आजोबांनी काहीशा जडपणेच त्यांचा हात हलवला, अन् आजी उद्गारल्या, " हो गं, बाळा! तूही काळजी घे तुझी अन् सानूलीची! येत जा! टाटा सानूले! "

सानूची ' मला इथेच राहू दे! ' अशी कुरबुर चालूच होती. शेवटी तिनेही आजीआजोबांना हात हलवून टाटा केलं, आणि तिचा हात धरुन काहीशा अनिच्छेनेच मी वळले आणि जड पावलांनी  घराबाहेर, नंतर गेटबाहेर पडले. मी वळताच आजींनी डोळ्यांना लावलेला पदर मला जाणवला होता.

आम्ही गेटबाहेर पडलो, अन् सानूने मला थांबवलं. काही लक्षात न आल्याने मीही थांबले, प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहायला लागले, तशी ती म्हणाली, " मम्मा मी आलेच्च! " आणि आपला हात सोडवून घेऊन ती पळतच आजीआजोबांकडे गेली. ही काय करतेय पहायला मीही वळले अन् चार पावलं आत आले.

तिने खिशातून काहीतरी काढलं आणि आजीआजोबांच्या हातात दिलं. देताना म्हणाली, " आज्जु, आज्जुली, हे तुमच्यासाठी वाॅच!  मी सोत्ता बनवलं. दिवसभर हाताला लावत ज्जा. तुम्हाला तुमची अवशदाची वेळ कळेल."

मी नीट निरखून पाहिलं, तर ती दोन कागदी घड्याळं होती. सानूच्या बालिशपणाचं मला क्षणभर हसूच आलं. पण तिचं फार कौतुक वाटलं मला त्या क्षणी. एवढीशी असूनही आजीआजोबांच्या औषधांचा विचार करते! आजीआजोबांच्या चेहऱ्यांवरही कौतुक ओसंडून वाहत होतं. आजींनी कौतुकानं तिच्या कानशिलावरुन बोटं कडाकड मोडली, तर आजोबा तिला गमतीत म्हणाले, " अगं ठमे! यातले काटे कुठं फिरतायेत..  आम्हाला वेळ कसा कळणार बरं? "
तशी सानू लगेच म्हणाली, " सेल घाला की त्यात! माझा डॅडू भिंतीवरच्या मिकी माऊस वाॅचमध्ये घालतो तसे.. पण छोटेच घाला हां, नाहीतर काटे फॅनसारखे सुर्र फिरतील.. " तसे आम्ही सगळेच हसायला लागलो.

आम्ही हसत होतो इतक्यात अनि आला. मला म्हणाला, " तनु किती उशीर! ड्रायवर कधीचा उभाय. निघताय ना? "

तशी मी भानावर आले. लगबगीने सानूला घेतलं आणि घरातून पर्स घेऊन तिच्यासोबत कारजवळ आले. अनिही मागनं येत होता. कोणी काहीच बोलत नव्हतं. सानूही काहीशी हिरमुसलेली वाटत होती. अनिला नजरेनेच 'काळजी घे' असं सुचवलं. त्याने पापण्या क्षणभर मिटल्या. आम्ही दोघी गाडीत बसलो, दारं लावली. अनि सानूशेजारच्या खिडकीत वाकून तिला टाटा करायला पुढे झाला, तशी ती दोघांच्या चेहऱ्याकडे पाहत निरागसपणे म्हणाली, " मम्मा...  डॅडू?  तो पण येतोय ना? ये डॅडू बस ना माझ्या बाजूला! तुला विन्डोसीट देईन... " 

आम्हाला वाटलेलंच की सानू असा प्रश्न विचारणार, पण तरीही तिच्या प्रश्नाने आम्ही दोघेही क्षणभर गडबडलो. मी तिच्या डोक्यावर हात फिरवत काही म्हणणार, इतक्यात अनिच गडबडीत म्हणाला, " अगं पिल्लू, मला आपल्या या घराचं लाॅक लावायचंय, तुझ्या मम्मीच्या आवडत्या झाडांना कायम पुरेल, इतकं पाणी घालायचंय, आणि गंमत सांगू, तुझ्यासाठी छान मोठ्ठं गिफ्टही आणायचंय! म्हणून मी मागे थांबतोय. अस्सा आलोच बघ मी तुमच्या मागोमाग. तू पुढे जाणार ना? गूड गर्ल ना तू? "

कसंबसं सानूला आम्ही दोघांनी समजावलं, आणि गाडी नव्या शहराच्या दिशेनं भरधाव निघाली. अनिला सोडून मी पहिल्यांदाच कुठे जात होते. डोळ्यांच्या कडा अश्रूंमुळे ओल्या होत असल्याचं लपवायला मुद्दाम खिडकीची काच खाली ठेवली होती, सानूने ओले डोळे पाहिलेच असते तर 'डोळ्यांत धूळ गेली', असं सांगता आलं असतं. सानूच्या ताब्यात फोन दिला होता, ती काहीतरी गेम खेळत बसेल आणि मला सतवणार नाही यासाठी. तरी मध्येच ती काहीतरी आठवल्यासारखं करुन गाडीतून मागे रस्त्यावर पाहत होती. तिनं असं चारपाचदा पाहिलं, अन् मी तिला विचारलं,
" सानू, काय बघतेस मागे? "
" मम्मा, डॅडु? तो मागूनच येणार होता ना?"

यावर मी समजावणीच्या सूरात म्हणाले, " बाळा येईल गं तो, तुझ्यासाठी मस्त गिफ्ट शोधत असेल तो, बघ! "

तशी ती खुशीत मान डोलावून परत गेम खेळायला लागली. हिला असं किती दिवस उत्तर द्यायला लागेल, हे मनातलं कोडं अजून सुटलं नव्हतं. थोड्यावेळाने सानूला फोनचा कंटाळा आला, आणि माझ्या मांडीवर येऊन झोपली. काल रात्रभर ती नवीन शहर, नवं घर यांच्या उत्सुकतेने झोपलीच नव्हती. तिला आता झोपलेलं पाहून मला हायसं वाटलं. तिच्या निरागस प्रश्नांची सरबत्ती थांबली होती ना!

ΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠ

तळटीप- इथपर्यंत वाचलं असेल तर धन्यवाद. माबोवर बर्याच युगांनी येतीये. सर्व जुन्या मंडळींना नमस्कार!
वर खरडलेलं आवडलं असेल\ बिलकूल आवडलं नसेल तर कृपया कमेंटीमधून सांगा. मी पाठ थोपटून घेईन ( यासाठी नेहमीच तयार असते Rofl ) अथवा चूक समजून घेईन .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Welcome back जुई Happy
कथा पूर्ण झाल्यावरच वाचणार आहे Wink
संघर्ष च्या प्रतीक्षेत असणारी भावली Proud