पारले-जी

Submitted by shabdamitra on 12 July, 2021 - 21:42

माझ्या कमावत्या काळात सगळ्यांत जास्त संबंध दोनच गोष्टींशी आला. एसटीची तांबडी बस आणि ग्लुकोजची बिस्किटे. नुसती ग्लुकोजची म्हटले तरी ती पारलेचीच हे सर्वांना माहित आहे. कारण ग्लुकोजची बिस्किटे म्हणजेच पारले व पारले म्हटलेकी ग्लुकोजची बिस्किटे ही समीकरणे लोकांच्या डोक्यांतच नव्हे तर मनांतही ठसली आहेत. ग्लुकोजची बिस्किटे जगात पारलेशिवाय कुणालाही करता येत नाहीत ह्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. संपूर्ण देशात ह्या एकाच गोष्टीवर मतभेद नाहीत.

१९५६ सालची गोष्ट असेल. दादर किंवा चर्चगेटहून मालाडला यायला निघालो की पेंगुळलेल्या डोळ्यांना जाग यावी किंवा मुंबईचा वास नाहीसा होऊन खऱ्या अर्थाने मधुर चवीचा वास येऊ लागला की डब्यातली सर्व गर्दीही ताजीतवानी व्हायची. पारले स्टेशन आले ह्याची खात्री पटायची. विलेपारलेच्या पूर्वेला राहणारे प्रवासीही घरी जाताना पारलेच्या ग्लुकोज बिस्किटाच्या फॅक्टरी कडे आत्मीयतेने पाहात, दिवसभराचे श्रम विसरून,ताज्या ताज्या ग्लुकोज बिस्किटांचा मधुर चवीचा वास पोट भरून घरी न्यायचे.आम्ही पुढे जाणारेही तो चविष्ट सुगंध एकदोन स्टेशने जाईपर्यंत साठवत असू.पार्ले बिस्किटांची ही प्रत्यक्ष ओळख अशी झाली.

फिरतीची नोकरी. जिल्ह्याच्या गावी आणि,तालुक्या तालुक्यातूनच नव्हे तर लहान मोठ्या गावांनाही जावे लागे. एसटीतून उतरल्यावर लगेच लहान मोठ्या थांब्यावरच्या कॅंटीन उर्फ काहीही म्हणता येईल अशा हाॅटेलात जायचे. गरम वडे किंवा भजी तळून परातीत पडत असत. शेजारी पातेल्यात तेलात वाफवलेल्या अख्ख्या मिरच्या असत. मालक किंवा पोऱ्या वर्तमानपत्राच्या कागदात एक पासून चार चार वडे किंवा भजी आणि मिरच्यांचे तुळशीपत्र टाकून पटापट गिऱ्हाईकी करत असायचे. गरमागरम भज्या वड्यांचा मोह टाळता येत नसे. तो खाल्ला की गरम व मसालेदार वड्यांनी हुळहुळलेल्या जिभेचे आणखी लाड करण्यासाठी एक हाप किंवा कट किंवा तसले प्रकार नसलेल्या गाडीवर एक चहा आणि पारले जी चा दोन रुपयाचा पुडा घेऊन त्या केवळ पोटभरू नव्हे तर कुरकुरीत व खुसखुशीत गोड बिस्किटांची मजा लुटायला सुरवात करायची!

भले पारले जी पोटभरू असतील. पण त्याहीपेक्षा आणखी काहीतरी नक्कीच होती. चविष्ट गोड असायची. दोन खाऊन कुणालाच समाधान होत नसे. तो लहानसा पुडा चहाबरोबर कधी संपला ते ग्लुकोज बिस्किटांच्या तल्लीनतेत समजत नसे.

मला पारले-जीची ओळख व्हायला पंचावन्न -छपन्न साल का उजाडावे लागले? त्या आधी बिस्किटे खाणे हे सर्रास नव्हते. बरे मिळत होती ती हंट्ले पामरची मोठी चौकोनी तळहाताएव्हढी. पापुद्रे असायचे पण मुंबईच्या बेकरीतील खाऱ्या बिस्किटांसारखे अंगावर पडायचे नाहीत. फक्त जाणीव होत असे खातांना. पण साहेबी थाटाची, चहा बरोबर तुकडा तोंडात मोडून खायची. त्यामुळे ती उच्चभ्रू वर्गासाठीच असावीत असा गैरसमज होता. पण खरे कारण म्हणजे ‘पाव बटेर’ पुढे बिस्किटांची गरजही भासत नसे. बरे बेकरीत तयार होणारी नानकटाई लोकांच्या आवडीची होती.

बेकरीची गोल, चौकोनी बिस्किटेही खपत होती. पण तीही रोज कोणी आणत नसे. शिवाय बिस्किटे हा मधल्या वेळच्या खाण्याचा किंवा येता जाता तोंडात टाकायचा रोजचा पदार्थ झाला नव्हता. बिस्किटे चहाबरोबरच खायची अशी पद्धत होती. खाण्याचे पदार्थ म्हणजे शेव,भजी, चिवडा, भाजलेले किंवा खारे दाणे, फुटाणे आणि डाळे चुरमुर. हे ब्लाॅक बस्टर होते.

डाळे चुरमुऱ्यांचीही गंमत आहे. आगरकरांनी रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला हे प्रसिद्ध झाल्यापासून त्यांच्या बरोबरीचे व नंतरची मोठी झालेली माणसेही रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करत होतो हे लिहू लागले. रस्त्यावरच्या दिव्याप्रमाणे माधुकरी मागून शिक्षण केले हा गरीबीतून कसे वर आलो सांगण्याचा प्रघात होऊ लागला. पण सर्वांना, गरीबांना तर होताच होता, गरीबी सांगण्यासाठी ‘“ कित्येक दिवस तर नुसत्या डाळंचुरमुऱ्यांवर काढले” असे म्हणणे प्रचलित होते. सांगायची गोष्ट अशी की डाळे चुरमुरेही सर्वप्रिय होते. येव्हढ्या गर्दीत बिस्किटांचा सहज प्रवेश होणे सोपे नव्हते.

खाल्लीच बिस्किटे तर लोक बेकरीत मिळणारी खात असत. त्यातही मध्यंतरी आणखी एक पद्धत प्रचलित झाली होती. आपण बेकरीला रवा पीठ तूप साखर द्यायची व बेकरी तुम्हाला बिस्किटे बनवून देत.त्यासाठी ते करणावळही अर्थातच घेत. तरीही ही बिस्किटे स्वस्त पडत. ह्याचे कारण ती भरपूर वाटत. गरम बिस्किटांचा आपलाच पत्र्याचा डबा घरी घेऊन जाताना फार उत्साह असे. आणि ‘ इऽऽऽतकीऽऽऽ बिस्किटे’ खायला मिळाणार ह्या आनंदाचा बोनसही मिळे!
त्या व नंतरचा काही काळ साठे बिस्किट कं.जोरात होती. त्यांची श्र्युजबेरी बिस्किटे प्रसिद्ध होती. पण पारले बिस्किट कंपनी आली आणि चित्र बदलले. स्वातंत्र्य मिळाले होते. त्या अगोदरच पारले कं.सुरु झाली होती. पण इंग्लिश कंपन्यांपुढे अजून तिचा जम बसत नव्हता. पण विक्रीची जोरदार मोहिम, विक्रेत्यांचे जाळे वाढवत नेणे आणि जाहिरातींचा मारा व स्वस्त किंमत ह्यामुळे नंतर नंतर पारलेने जम बसवला.

पारलेला प्रतिस्पर्धी पुष्कळ निर्माण झाले. त्यातला सर्वात मोठा म्हणजे ब्रिटानिया. त्यांनी पारले ग्लुकोजला तोड म्हणून टायगर ब्रॅन्ड आणला पण पारले जी पुढे त्या वाघाची शेळी झाली. स्पर्धेला तोंड देताना पारलेने व्यापारी क्लृप्त्याही वापरल्या. महागाईतही कमी किंमत कायम ठेवण्यासाठी पुड्यांतील बिस्किटांचे वजन कमी करणे,बिस्किटांचा आकार लहान करणे हे केलेच. त्यामुळे आजही दोन रुपये,पाच व दहा रुपयांची पाकीटे मिळतात. परवडतात. पूर्वी पारलेच्या बिस्किटांचा आयताकारी चौकोन मोठा होता. आता बराच लहान केला आहे.तरीही आजही ग्लुकोज म्हणजे पारले-जी च ! काही असो पारलेजी! तुम्ही लोकांसाठी आहात , लोकांचेच राहा.

पारलेने,पाकीटबंद बिस्किटे ही उच्चवर्गीयांसाठीच असतात ही कल्पना लोकांच्या मनातून काढून टाकली! कोणीही बिस्किट खाऊ शकतो हे पारलेने दाखवले.. त्यामुळे कमी किंमतीची लहान पाकीटे पारलेनेच आणली. दोन रुपयाचे पारले-जीचे बिस्किटांचे पाकीट गरीबही घेऊ लागला. चहा बरोबर बिस्किट खाऊ लागला! ‘चहा साखर पोहे ’ या बरोबरच पारले-जी चा पुडाही किराण्याच्या यादीत येऊन बसला. तर ‘धेले की चायपत्ती धेले की शक्कर’बरोबरच गोरगरीब मजूरही पारले-जी का पाकेट’ मागू लागले. दुकान किराण्याचे,दूध पाव अंड्यांचे असो,की पानपट्टीचे, जनरल स्टोअर किंवा स्टेशनरीचे असो पारले ग्लुकोजची बिस्कीटे तिथे दिसतीलच.तसेच हाॅटेल उडप्याचे असो की कुणाचे, कॅन्टीन,हातगाडी,टपरी काहीही असो जिथे चहा तिथे पारले-जी असलेच पाहिजे.

पॅकींगवर कंपनीने ग्लुको लिहिले असले तरी सगळेजण बिस्किटाला ग्लुकोजच म्हणतात! सर्व देशात प्रचंड प्रमाणात आवडीने खाल्ला जाणारा एकच पदार्थ आहे पारले-जी. मग भले अमूल आपले’ दूध इंडिया पिता है’म्हणो की ‘इंडियाज टेस्ट’ असे स्वत:चे वर्णन करो; देशातल्या जनतेची एकमेव पसंती पारले- जी ची ग्लुकोज बिस्किटे! गरीबालाही श्रीमंती देणारी ही बिस्किटे आहेत.

चहाचा दोस्त आणि भुकेला आधार असे डबल डेकर पारले ग्लुकोज बिस्किट आहे. म्हणूनच मी तीस चौतीस वर्षाच्या नोकरीच्या काळात एसटीतून उतरलो की चहा आणि पारलेचा एक पुडा संपवायचो. एक पुडा कामाच्या बॅगेत टाकायचो. दिवस मस्त जायचा. अपवाद फक्त उन्हाळ्याचा. उन्हाळ्यात ,”लोकहो विचार करा चहापेक्षा रस बरा” ह्या सुभाषिताचे मी एकनिष्ठेने पालन करायचो. तरीही पारलेची ग्लुकोज सोडली नाहीत. ती नुसती खाण्यातही मजा आहे!

आजही मुले माझ्यासाठी, बाजारातून येताना आठवणीने पारले- जी ग्लुकोज बिस्किटे आणतात. ह्या पेक्षा दुसरा आनंद कोणता असेल!

You can read this blog and additional blogs at: https://sadashiv.kamatkar.com/blog/

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त आहे हा लेख, पारले G आणि poppins च्या गोळ्या म्हणजे शाळकरी वयातील गोड आठवण. अजूनही पारले G अनेकांचा भुकेला आधार आहे. मुळात सगळीकडे ही बिस्किटे मिळतात भारतात, अजूनही त्यामुळे अजूनही तितकीच लोकप्रिय आहेत. Lockdown मध्ये, पंढरपूरच्या वारीतही ही बिस्किटे खूप वाटली जातात

मस्त लेख आहे, भूतकाळात नेलेत. पार्ल्यातच आमची शाळा, कॉलेज सर्व झाले. दुपारी एका ठरावीक वेळी तो गोडसर वास यायचा.

छान लेख. मी राहिलो आहे पार्ले ईस्टला 7/8 महिने, अगदीच पाच सात मिनिट ह्या फेक्ट्री पासून. तो वास हळूहळू सवयीचा होऊन जातो. सर्वात वाईट म्हणजे रात्री होणारा विमानांचा आवाज, झोपेचं खोबरं एकदम. कधीतरी स्थानिक लोकांचे मोर्चे वैगेरे निघत ह्या आवाजा विरोधात. पावसाळ्यात स्टेशन बाहेर तळं साचायचं. मग रिक्षावाला शान सिनेमापाशी किंवा खूपच पाऊस असेल तर पार्ले टिळक पाशी सोडायचा, तिथून तंगडतोड.

पुण्यात पार्ले बरोबर साठे बिस्कीट खूप पॉप्युलर होती. टिंबर मार्केट जवळ कारखाना होता..अगदी हुबेहूब तश्शीच असायची बिस्किटे.

आणि हो. पार्ले बिस्किटे कंपनीला सप्लाय करणारे छोटे मोठे व्हेंडर आहेत.. पैकी ऐक आमच्या माहितीतलेच आहेत.

Not a Parle G fan, पण लेख आवडला. ज़बरदस्त reach असलेले प्रोडक्ट आहे ते. आपण सामान्य लोकं तर खातोच भरपूर, मी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका केंद्रीय मंत्र्यांना (मोठे उद्योजक आहेत) चहासोबत स्वत:च्या खिश्यातून ग्लूको बिस्किट काढून खातांना पाहिलेय. विचारल्यावर ‘गुल्को न मिले तो चाय नहीं पी सकता, सदा साथ रखता हूँ’ असे मजेदार उत्तर दिले Happy

बिस्किट खाणे पॉपुलर करण्यासाठी ५०-६० च्या दशकात खूप जाहिरात करण्यात येत. असे.

हे कात्रण खास तुमच्यासाठी :-

29CAD907-B642-4DD9-8925-F3DF86630C42.jpeg

ingredients मध्ये citric ऍसिड वाचून खाण्यातील इंटरेस्ट गेला विशेषतः चहात टाकून घेण्याचा ...

लेख आवडला. अनिंद्य यांची जाहिरात मस्तच आहे. अशी जुनी चित्र फार वेधक वाटतात. 'अद्वितीय पौष्टिकता' लिहिले आहे. Wink

अरे काय मस्त लेख. प्रत्येकाला रिलेट होणारा. लहानपणापासून दरवर्षी एकदा अंधेरीला काकांकडे जाताना हा बिस्कीटांचा वास आठवणीने घेऊणच पुढे जायचो.
मला स्वतःला लहानपणी कधी पारले जी ची बिस्कीटे आवडली नव्हती. मी गुड्डे फॅन होतो. पण कॉलेजात गेलो तसे या बिस्कीटांना पर्याय नव्हता. स्टडीनाईटला रोज सकाळी चहासोबत परवडायची म्हणून खायचो तर आवडायलाही लागली. पण मग कॉलेज सुटले. जॉबला लागलो तसे पुन्हा खायचे बंद. होईनात का. पण कॉलेजजीवनाच्या बेस्ट आठवणी जोडल्या गेल्यात या बिस्कीटांशी हे ही नसे थोडके Happy

अनिंद्य, सुंदर पोस्ट. अशा जुन्या दस्त ऐवजांमधून त्या काळचे जीवन आणि चालीरीतीसुद्धा दिसतात.
कल्पक आहे जाहिरात.

छान... वर्णन आवडले.

त्याकाळी पण आवडायचे आणि आजही... चहा सोबत खाताना ते कपात किती काळ बुडवायचे याचे पण एक प्रमाण आहे (हे प्रमाण बिस्कीट बेक कशी झाली आणि चहाचे तापमान यावर अवलंबून आहे). कसरत आहे, पण कधी कधी टायमिंग चुकते आणि बिस्कीट कपाच्या तळाला विराजमान होते तेव्हा मनाला खूप हळहळ होते. अगदी आजही... मग चहाच्या टेबलवरुन थेट स्वयंपाकघराकडे चमच्यासाठी धाव...

मस्त लिहिलंय.
मी पार्ले-जी बिस्किटांची लहानपणापासून फॅन. दोन बिस्किटं पाठीला पाठ लावून एकावेळी चहा/कॉफीच्या कपात बुडवून खायची. मज्जा!
आता क्वचित खाते. कारण एकूणच बिस्किटं खाणं कमी केलंय.

फॅन वगैरे न्हवते मी कधीच पण एके काळी फक्त दोन तीनच बिस्किटे खायचे. पण त्या वयात ठिक वाटायचे.
पण मी काही लोकं अगदी चार पाच पुडे टिचभर( कटींग) चहात संपवत टपरीवर आडोशाला उभं राहून. किंवा ऑफीसमधील बॅचलर लोकांचा नाश्ता असायचा भारतात आणि अमेरीकेत सुद्धा. मला एकदम आश्चर्य वाटायचे की क्से काय खाववतं ती गोड मिट्टं इतके पूडे.

मी कॉलेजला जायला लागल्यावर, सकाळी लवकर उठल्याने म्हणा का काय, ती गोड बिस्किटे खावून अ‍ॅसिडीटी चढायची एकदम. मग बंदच केली ती आजवर कायमच....
मग त्यातले जिन्नस कळले, मुंबईतील एका मित्राचे वडिल तिथे फूड लायसन्स का म्हणून जात की काम करत (आता आठवत नाही) पण ते एकून न्कोसेच झाले.
मूळात, ग्लुको म्हणजे शक्ती अशी जी धारणा होती/आहे आणि तोच तसा प्रसार केला गेलेला, त्यात ती गोड मिट्ट चव त्या रासायनिक पद्धतीने केलेल्या सिरपची चव असायची( जसे आता फ्रक्टोज सिरप करतात तसेच) मग त्यात ती दूधाची भुकटी, साखर पण... आणि मैदा....

त्यातल्या त्यात, फार पुर्वी मारी बरी वाटायची. नंतर जरा ती पुठठा टाईपच झाली. आता तर बिस्किट खातच नाही पण इतकी खास नसावीच मारी सुद्धा बहुधा( बघूनच वाटते).

वि मु,

हो, आमच्या ब्लड बँक मधल्या टेक्निशियन पार्ले बिस्कीट चा केक बनवायच्या, त्यांच्यामुळे मला समजले की बिस्कीट पासून पण केक बनतो.

बालपणीच्या स्मृती ताज्या करणारा लेख आवडला. ही बिस्किटं चौकोनी आकाराच्या पत्र्याच्या मोठ्या डब्यात घाऊक किमतीला मिळत असत असंही आठवतंय. माझे बाबा आणायचे.

तो पत्र्याचा डबा नंतर गहू, तांदूळ वगैरे ठेवायला वापरला जात असे. ( हे वाचून जिज्ञासाजींना आनंद होईल)

यावरून एक मजेदार गोष्ट वाचलेली आठवली. अमेरिकेत ( जगभरच ) ग्रेट डिप्रेशन नावाची मंदी आली होती. त्यावेळी बर्‍याच महिला पीठाच्या पिशव्या वापरून ड्रेस वगैरे नवात असत. पीठ बनवणार्‍या कपंपन्यांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी पीठाच्या पिशव्यांवर फुलाफुलांची डिझाईन छापायला सुरुवात केली. शिवाय कंपनीचे नाव वगैरे कच्च्या रंगात असे, त्यामुळे एका धुण्यात ते निघून जाई.

लहानपणी खाल्ली आहेत, पण अतिशय आवडली अथवा अ‍ॅडिक्डेड कॅटेगोरीतली अजिबात नाहित. माझेतरी ऋणानुबंध वगैरे काहि नाहित, पार्ले जी बाबतीत. इथे इंडियन ग्रोसरीमधे $१ ला १०/२० वगैरे असतात, मी तरी ढुंकुनहि पहात नाहि. आणि हार्डकोर मुंबईकर या नात्याने सेंट्रल्/वेस्टर्न लाइन्सचे सगळे विज्युअल्स, ओडर्स अजुनहि स्मरणात आहेत. Wink

जाताजाता, माझ्या अमेरिकेतल्या बांधवांकरता एक रेकमंडेशन - डेल्टाच्या इन्फ्लाइट सर्विसमधे ते कुकिज सर्व करतात - बिस्कॉफ. जमल्यास ट्राय करा, कॉस्टकोत सापडतात कधीतरी. आय फाइंट देम वेरी अ‍ॅडिक्टिंग... Happy

हार्डकोर मुंबईकर! बरं वाटलं वाचून. भारतीय वंशाच्या परदेशस्थ (मराठी) लोकांमध्ये कोणीतरी मुंबईकर आणि तोही हार्डकोर आहे! इथे मायबोलीवर असे स्वतः ला अभिमानाने हार्डकोर मुंबईकर म्हणवणारे लोक दुर्मीळ आहेत. किंवा असतील तर हिरीरीने व्यक्त होत नसतील! ते क्षेत्र (हिरीरीने व्यक्त होण्याचं वगैरे) त्यांनी अस्सल मुंबईकरांच्या उदारतेने इतर शहरवासीयांना देऊन टाकलं असेल! Happy
"गर्व से कहो, हम हार्डकोर् मुंबईकर हैं" Happy

Pages