सतार होता येईल का मला ?

Submitted by डी मृणालिनी on 6 July, 2021 - 09:49

एकदा माझ्या मनात
सहज एक , विचार आला
सप्तसुरांसह खेळणारी
सतार होता येईल का मला ?

माझ्या नाजूक ,सुंदर देहाला
अलगद कुणी कुशीत घेईल
उजवा दंड , तुंब्यावर माझ्या
कसा छान मला आधार देईल !

रिषभ - धैवत कोमल गाऊन
गंभीर रस मी आणेन
संथ गतीच्या आलापाने
भैरव ला मी सजवेन

यमन सुंदर आळवीता मी
"क्या बात है " दाद मिळेल
चारुकेशी चे गुण गाता मग
नेत्र अश्रूंनी भरून निघेल

मिया मल्हार नि मेघ मध्येही
सळसळती अशी तान निघेल
पण खरंच का हो ,धर्तीवरती
तेव्हा पाऊस पडेल !?

तबला माझ्या जोडीला
सुरेख अशी संगत करील
जोडी आम्हा दोघांची
सर्वांना दंग करील

बोटांची धावपळ , तंतूंवर माझ्या
गाठेल उच्चांक वेगाचा
सर्वांच्या मनी मग निश्चय होईल
माझ्यासारखी सतार होण्याचा

कडकडाट टाळ्या , उत्स्फूर्त दाद
वातावरण किती भरून जाईल !
कुशीवरून मी अलगद उठता
भूमीचा मला स्पर्श होईल

संगीताच्या या अफाट सागरात
पोहून पोहून थकेन मी
गिग बॅगेत मग शाल पांघरुनी
गाढ झोपी जाईन मी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृणाल, छान लिहिलं आहेस. तू तबला शिकते आहेस असं तू पूर्वी इथे लिहिल्याचं आठवतं. आता रुद्रवीणा म्हणजे पवित्र आणि कठीण वाद्य. कोणाकडे शिकते आहेस? फार वैयक्तिक होत असेल तर नको लिहूस. रुद्रवीणा कशी पेलत असशील तू? वज्रासनात वाजवतेस का? स्त्रिया सहसा नाही वाजवत वज्रासनात. ग्रेट आहेस. सर्वशक्तिमान ईश्वर - तुझा प्रेरणास्रोत, तुझी अशीच प्रगती घडवत राहो--तुझं व्यक्तिमत्त्व फुलवत राहो.

धन्यवाद @हिरा , हो मी तबला गायन दोन्ही शिकते. आणि रुद्रवीणा मी पंडिता ज्योती हेगडे यांच्याकडे शिकते. खरंच ! खूप कठीण वाद्य आहे. मी वज्रासनातच वाजवते. माझ्या गुरु या पहिल्या महिला रुद्रवीणा वादक आहेत. स्त्रियांना हे वाद्य वर्ज्य म्हणून सांगितले आहे. ( कदाचित वज्रासनात वाजवावे लागते म्हणून असेल ) याबाबत अजून काही संशोधन झाले नाही. पण शास्त्रात असं लिहिलंय कि हे वाद्य घेतल्याने स्त्रिया गर्भधारणा करू शकत नाहीत. पण माझ्या गुरुंच्याबाबतीत हे काही घडलं नाही. त्यांना आता एक नातूसुद्धा आहे Happy पण आता वयाने जमत नसल्याने त्या सुखासनात वाजवतात. रुद्रवीणा पेलवायलाच मला एक महिना गेला, आता भूप राग सुरु आहे. चारच महिने झालेत. beginner आहे. पण क्षणोक्षणी जाणवतं कि जितकं कठीण तितकं सुंदर आणि दिव्य वाद्य आहे.

हो. मला वाटलंच होतं की ज्योतीताई असतील. खूप ज्ञानी गुरु लाभल्या तुला. तिकडेच राहावं लागतं असेल ना? तू इथे मागे एकदा लिहिल्याप्रमाणे आणि मला आठवतंय त्याप्रमाणे तबला धारवाडला शिकलीस. त्यामुळे आता कर्नाटकी वातावरणाची सवय झालेली असणार तुला. खूप शुभेच्छा.

@हिरा , हो त्या बोलवतात तसे जावं लागतं. भरपूर concerts चालू असतात त्यांचे. मग त्यांना वेळ मिळाला की शिष्यांना बोलवतात आणि आम्ही मग त्यांच्याच घरी १५ दिवस कधी महिनाभर असं राहतो.....
धन्यवाद @हरचंद पालव @मनिम्याऊ