पुस्तकयोग-२

Submitted by पाचपाटील on 30 June, 2021 - 05:56

तर बऱ्याचदा होतं असं की वाचता वाचता त्यातूनच आणखी काही पुस्तकांचा माग लागत जातो.. किंवा एखाद्या लेखकाचं एखादं गचांडी पकडणारं पुस्तक वाचता वाचता डोळे
खवळतात.. भेळ खातेवेळी तोंड खवळतं आणि अजूनच खा खा सुटते ह्याची तुम्हाला थोडीफार कल्पना असेलच, तसंच हे..!
आता ह्यावर लगेच 'पुस्तकांना भेळेच्या मापात कसं काय तोलू शकता तुम्ही? ह्याला काय अर्थ है !' वगैरे म्हणत
कपाळावर आठ्या उत्पन्न व्हायच्या आधीच हे स्पष्ट करतो की मला काय म्हणायचंय ते तुमच्या लक्षात आलंच असेल ना? मग ठीक आहे की..

तर असाच आतल्या आत खवळलेला, डहुळलेला असताना, शुक्रवारी संध्याकाळी काही पुस्तकांच्या शोधमोहीमेवर
निघालो... 'अक्षरधारा'त काही मिळाली मकरंद साठे, अवधूत डोंगरे आणि किरण गुरवांची.
उरलेल्यांसाठी डेक्कनच्या 'इंटरनॅशनल'ला.. तिथंही काही मिळाली उदाहरणार्थ पठारेंची आणि वर्जेश सोळंकीची.

पण इंटरनॅशनल वाले बोलले की 'लाईफ ॲंड टाईम्स ऑफ मायकेल के' ची एकच कॉपी दिसतेय आणि ती ही दुसरीकडे स्टॉकमध्ये आहे, जाऊन आणायला थोडा वेळ लागेल.. मग एफ सी रोडवर जरा निरूद्देश रेंगाळत राहिलो...
आता हे काही अगदीच निरूद्देश वगैरे म्हणता येणार नाही.. उद्देश असतातच..
त्यापैकी एक म्हणजे एफसी रोडवर संध्याकाळी बऱ्यापैकी हिरवळ असते.. ओह.. माफ करा, पण हिरवळ ह्या शब्दानं
तुमचा माफक अधिक्षेप होण्याची शक्यता निर्माण झालीय का? तसं असेल तर माझा त्याबाबतीत अगदीच नाईलाज आहे...
म्हणजे सहज जाता जाता जरा चांगलं सुंदर काही नजरेच्या टप्प्यात येत असेल... तर मग एखादा निरूपद्रवी कटाक्ष
गुपचूप टाकून आतल्या आत थोडंसं घायाळ होण्याची
आपसूक मिळणारी संधी का बरे सोडावी आणि ह्यातून
आपल्या सौंदर्यविषयक जाणीवांचा थोडासा विस्तार
झाल्यासारखं वाटत असलं तरीही, हे सगळं आता आपल्या
'कक्षेबाहेर' निघून गेल्याची थोडीशी हुरहूर म्हणा किंवा अचूक शब्द वापरायचा झाला तर हळहळ म्हणा, ती व्यक्त करत करत आत्ममग्न मी पुन्हा त्या दुकानात पोहचलो तर ते बोलले की तुम्ही सोमवारी या, आणून ठेवतो,
कारण शनिवार रविवार सगळं बंद आहे..

एकच कॉपी राहिलीय आणि आपण फुटक्या नशीबाचे आहोत, हे आधीच बॅकमाइंडमध्ये असल्यामुळे,
ते हाती लागतेय की नाही ह्या विचारात वीकेंड गेला आणि शेवटी सोमवारी दुपारी ते सॅकमध्ये टाकून चेन लावल्यावरच जरा बरं वाटलं.
तर हे असं होतं..!

आता तुम्ही म्हणाल की एवढं करण्यापेक्षा ऑनलाईन का
मागवत नाहीस..
तर त्याला खास असं काही कारण नाहीये...
पण एखादं पुस्तक हातात घेऊन पारखून बघितल्याशिवाय, त्याची ओळख पटल्याशिवाय, ते खास आपल्यासाठीच
लिहिलं गेलंय ह्याची खात्री झाल्याशिवाय, त्याला माझ्याकडे रहायला बोलावणं, हे मला फारच संकोचाचं वाटतं..
आणि ऑनलाईनमध्ये ह्या सगळ्या 'मधल्या' भानगडी खलासच होऊन जातात.. अर्थात त्याचेही काही फायदे आहेत, हे मान्यच आहे.. हळूहळू बघायला पाहिजे ते ही.. असो.

शिवाय ह्याबद्दल अजून सांगायचं म्हणजे मी ज्या ज्या लायब्रऱ्यांचा मेंबर राहिलेलो आहे, तिथल्या कोणत्याही वेळी आळसावून सुस्त बसलेल्या लोकांचा पिच्छा पुरवायलाही मला बऱ्यापैकी जमायला लागलंय...
सुरूवातीला त्यांना संशय यायला लागतो की माझा एक आटा ढिला वगैरे झालेला आहे की काय, पण नंतर नंतर हळूहळू ते परिस्थितीला शरण जातात...
एकदा हे झालं की मग काहीच अडचण राहत नाही...
मग आपण दणादण क्लेम वर क्लेम टाकत रहायचे, जरा हे शोधून द्या, ते जागेवर सापडत नाहीये बघता का जरा.. मला हे पण हवंय आणि ते पण हवंय आणि हे चौथं मिळालं तर
पाहिजेच आहे... ही स्टार केलेली पुस्तकं जरा आधी बघा आणि नंतर ह्यातलं एखादं बघा...
अरेच्चा हे तर वेगळंच आणलं तुम्ही.. अहो खानोलकर
वेगळे.. ह्या कुणीतरी खानविलकर आहेत.. त्यांचं काय करू मी..! थांबा मीच आत जाऊन बघून येतो...
तीन महिन्यांपूर्वी हे पुस्तक वाचायला गेलंय बाहेर.. अजून मिळत नाहीये..
बघा जरा विचारून, वाचतायत की पाठांतर वगैरे करत
बसलेयत तिकडे..!
हे असले संवाद... !

पण एक बरं असतं की दुर्मिळातली दुर्मिळ आणि आऊट ऑफ प्रिंट पुस्तकंही गोडीगुलाबीनं, दोन दिवसांच्या
परतबोलीवर पदरात पाडून घेता येतात..

तर इतक्यात वाचलेल्या पुस्तकांपैकी..

मार्गारेट ॲटवुडचं- द ब्लाइंड असॅसिन
ख्वान मॅन्युएल मार्कोसचं- गुंटेरचा हिवाळा
मकरंद साठेंचं- गार्डन ऑफ ईडन उर्फ साई सोसायटी
सुधीर देवरेंचं- मी गोष्टीत मावत नाही
किरण गुरवचं- क्षुधाशांती भुवन
अवधूत डोंगरेंचं- एका लेखकाचे तीन संदर्भ
वर्जेश सोळंकींचं-हुसेनभाय और गणपतभाय व्हाया अमेरिका

ह्या पुस्तकांनी डोळ्यांना ताजं रक्त लागलेलं आहे..
अचूक डंख मारणारं, जखडणारं काही आहे त्यात..
आणि जीवाला घोर लावणारंही काही..
तर आता ह्यांना काही सोडत नसतो मी...

पण कळविण्यास अत्यंत खेद होतो की..
'ईश्वर मृतात्म्यास शांती देवो'
हे बहुदा पठारेंचं माझं शेवटचंच वाचन..!
एवढ्या साधारण कथा पठारेंनी लिहिल्यात ह्यावर विश्वास बसत नव्हता म्हणून पुन्हा एकदा कव्हरवरचं नाव चेक करून बघितलं.. आणि मग अत्यंत जड अंतःकरणानं ते बंद करून ठेवून दिलं...
पण हे असं होतंच असतं ना म्हणजे.. म्हणजे कधी ना कधी अशी वेळ येतेच की फार वर्षांचा जिव्हाळा असलेला
लेखकही आपल्याला जे हवं ते, जसं हवं तशा पद्धतीचं देऊ शकत नाही... आज ती वेळ असावी बहुदा.
अर्थात एखाद्या लेखकाबद्दल हे असं वाटण्याची, ही काही पहिलीच वेळ नाहीये.. आणि शेवटचीही नसावी, हे ही आहेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोर आहात...
छान लिहिलयं.... बघूया, यातले कधी काही वाचायला जमते का?

खरं सांगू? मला हेवा वाटतोय की तुम्ही इतकी इतकी इतकी पुस्तके वाचता, लायब्ररीत जाता आणि त्यावर इतके मनस्वी लिहीता याबद्दल. .

प्रतिसादांबद्दल आभारी आहे.. भरत, विवेक, जिज्ञासा,हीरा, आणि अस्मिता... _/\_ Happy

धनवन्ती,
तुमच्या चांगल्या शब्दांबद्दल मनापासून धन्यवाद.. _/\_
प्रत्येकाला काही ना काही नाद असतात, तसा आमचा हा नाद आहे.. एवढंच. Happy
बाकी तसा मी अधूनमधून पुस्तकांना सोडायची धमकी देत असतो पण पुस्तकं काही ती धमकी सिरीयसली घेत नाहीत.. आता सवयीचाच भाग झालाय हा सगळा आणि तसं बरं जमतं आमचं एकमेकांशी..!
त्यामुळे तुम्हाला हे लिहिलेलं आवडलं असेल तर त्याचं क्रेडिट त्या सगळ्या पुस्तकांकडेच जातं, हे मी अधोरेखित करू इच्छितो.. Happy

मायकल के साठी मी देखील असेच जंग जंग पछाडले होते. पुण्याऐवजी स्थळ हैद्राबाद. तिथे वाल्डन नावाचे एक भारी पुस्तकाचे दुकान होते त्याने मला ते आणून दिले शेवटी. तेव्हा कोएट्झीचे गारुड होते. डिस्ग्रेस, वेटिंग फॉर द बार्बेरिअन्स, डायरी ऑफ अ बॅड इयर वगैरे ओळीने वाचली होती. खड्यात पडलेल्या मायकल के प्रमाणे ते पुस्तकही आता मिरजेतल्या घरी कपाटात मागे पडले असेल Sad

किरण गुरवने गारुड केले आहे. काय लिहितो राव हा माणूस.

आम्हाला कोएत्झी थोडा उशिराच माहिती झाला.. Happy
त्यामुळे अजून बराच काळ सोबत करेल असं दिसतंय..
_/\_

किरण गुरवने गारुड केले आहे. काय लिहितो राव हा माणूस. >> +१
त्याला कळलंय बरोबर..!