विठ्ठल वारकरी......

Submitted by ASHOK BHEKE on 27 June, 2021 - 11:28

*महेशदादा थोरात...* या गृहस्थाला त्याच्याच हितचिंतकाने बाजारातून एक किलो दु:ख दिले. अर्धांगिनी सविताची पूर्ण ताकीद, काहीपण घरी आणायचं नाही. त्यामुळे गडी विवंचनेत होता. पण पिशवी घेऊन रस्त्याने येताना एकेक हितचिंतक, मित्र भेटत गेला आणि पिशवीतून काही अंश तो मुठ भरून घेऊन गेला. घरी जाईपर्यंत त्याची पिशवी रिकामी झाली होती. तुला कशाला त्रास.... म्हणत सहकारी मित्र त्याच्याकडचा दु;खाचा प्याला ते रिचवितात , आणि सुखाचा प्याला मात्र त्याच्या वाट्याला देतात. ही त्या स्वामी नुनियानंद यांची किमया...! असे अनेक मित्र आहेत. दुसऱ्यांची दु:ख वाटून घेतात. सुखात सहभागी होतात. अशाच व्यक्तीना लोक आपलेसे मानतात. दादा म्हटले की बहुतांशी लोक अलग विचाराने पाहतात. महेश थोरात घरच्या वातावरणात कुटुंबात, चाळीत म्हणजे मुलामुलींमध्ये मोठा म्हणून दादा. अन्यायाविरोधात विठ्ठलाचा बडवा होण्यात पांडुरंग देई बळ, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हे थोरात घराणे म्हणजे धार्मिक वृत्तीचे. सार्वजनिक उत्सवात जगाच्या कोणत्याही कोनाड्यात असले तरी आवर्जून उपस्थिती दर्शविणारच.
सतत लोभस बालभाव बाळगणारा मराठा गडी. विठ्ठलाचा वारकरी. वारी न चुकविणारा. गतवर्षी कोरोना महामारीत वारी चुकली आणि मनात अभद्र विचाराने त्याला नुसते ग्रासून गेले होते. टाळाचा नाद,पखवाजाचा आवाज,भजनाचा गजर कानात गुंजला नाही आणि घोड्याच्या टापाखालची माती कपाळाला लागली नाही. सारेच रुसले. साधे देवाच्या पूजेत जर काही चुकीचे घडले तर देव कोपेल म्हणून बा ईश्वरा मला माफ कर... असं कान पकडून बोलतो. निस्वार्थ सेवा करणारा देवापेक्षा कमी नाही. खंड पडला पण भक्तीचा मळा आटलेला नव्हता. तरुणाईतील विठ्ठलाचा खरा भक्त. शाळा कॉलेजात शिकत असताना अकस्मात महेशच्या शिरावरचा मायेचा हात फिरविणारी आई ईश्वराच्या घरी स्थानापन्न झाली. त्यावेळी देखील अनेक नातलग मित्रांनी ज्येष्ठांनी त्याच्या दु:खाचा भाग उचलला.
महेशदादाच्या आयुष्यात अनेक स्थितंतरे पहावयाला मिळाली. पदवीधर असल्यामुळे सहज नोकरी करू शकत होता. पण मनात समाजकारणाची आवड आणि राजकारण हौशी माणूस. नेहमीच काहीतरी करीत असतो. आता धंद्यात उतरला आहे. सोबत आर्थिक घडी नीट बसविण्यासाठी मित्रांना देखील प्रवृत्त केले आहे. सामाजिक परिस्थितीचा धांडोळा घेताना अगदी परवा पक्याची आई बालाजी रुग्णालयात दाखल असताना अवास्तव बिलामुळे चिडलेल्या महेशने रुग्णालयविरोधात जंग जंग पछाडले. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले. बिल तर कमी झाले, पण यापुढे जर आमच्या रुग्णांवर कधी असा अन्याय केला तर... असा सज्जड दम भरला. पण तो मागे कधी हटला नाही. मराठी भाषेच्या प्रेमापोटी काल कॉटनग्रीन स्टेशनात मराठी बोलण्याचे वावडे असलेल्या तेथील स्टेशन प्रबंधक मराठीतून सूचना करीत नाही, थेट महाव्यवस्थापकाला आमच्या मराठी भाषेला न्याय द्या म्हणून आवाज करून आला. मराठा कर्त्यव्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक जणांना केलेल्या मदतीचा मी साक्षीदार आहे. गरजू लोकांच्या घरात रुग्णांना, नातेवाईकांना मदत करणारा वल्लीचं रुपडं काय वर्णू.. सुबक खाशी, ना अति ठेंगणी आणि त्याची विचारसरणी नेहमीच लोकहितकारी दिसून आली आहेत. मानपानाच्या बसल्या बैठकीत कुणाला न जाणवणारे आळसुलं पळसुलं नेहमीच वाट्याला आलं.
सामाजिक वारीसाठी गळ्यात तुळशीमाळ, हातात टाळ, खांद्यावर पताका कपाळावर टिळा लावून विठ्ठलाच्या शोधार्थ बाहेर पडलेल्या महेशला रस्त्यात दोन मंदिरे लागली. एकात गर्दी होती, तर दुसऱ्या मंदिरात कोणी ढुंकूनही जात नव्हते. याही देवळात देव आहे आणि त्याही देवळात देव आहे. तेथील गुरुजीना विचारले तेव्हा त्यांनी छान विश्लेषण केलेले आहे, या मंदिरातला पुजारी स्वभावाने चांगला आहे. मधुर वाणी असल्यामुळे तो भक्तांना आकर्षित करीत असतो. अशा सुस्वभावी माणसामुळे लोकांना तेथे जायला आवडते. सुख के सब साथी, दुःख में ना कोई.... हा पुजारी बाबा मात्र दु:ख का साथी होत असल्यामुळे लोकांच्या हृदयात त्याने स्थान निर्माण केले आहे. दु:ख विकत घेणारा पुजारी दहा सुखांच्या राशीत लोळणाऱ्या पेक्षा ईश्वराच्या दरबारात भाग्यवंत ठरतो. वारकरी दर्शनाचा भुकेला असल्यामुळे हा देव माझा तो ही देव माझा म्हणून *तो हा विठ्ठल बरवा !! तो हा माधव बरवा !!* महेश मात्र दोन्ही मंदिराच्या बाहेर उभा राहून दर्शन घेत असतो. त्याच्यावर विठ्ठल तर पूर्णतया प्रसन्न आहे. मुखी हरिनामाची सरस्वती जिभेवर आणि लक्ष्मीची खुळखुळ, सदासर्वदा योग तुझा घडावा म्हणजे प्रतिपदेचा चंद्र कलेकलेने वाढत जावा, याप्रमाणे त्याचे आज मस्त चालले आहे.

*अशोक भेके*
*घोडपदेव समूह*

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users