शेरनी (२०२१) - वाघांच्या संवर्धनाचा पट मांडणारा अनुबोधपट

Submitted by mandarrp on 24 June, 2021 - 21:57

अमित मसूरकरचा मी पाहिलेला हा दूसरा चित्रपट. त्याच्या “न्यूटन” या सिनेमापासूनच या दिग्दर्शकाविषयी एक विशेष जिज्ञासा जागृत झाली होती. सिनेमा सुखान्त बिंदूवर संपावा अशी सामान्य सिनेमा-रसिकाची साधीशी इच्छा असते. दु:खान्त बिंदूवर सिनेमा संपणार असेल तर किमान तो शेवट भव्यदिव्य असावा असेही सामान्य सिनेमा-रसिकाला वाटत असते. अमित मसूरकरचा न्यूटन कोणताही नाट्यमय प्रसंग न घडता अगदी साध्यासुध्या प्रकारे संपतो. तोच प्रकार “शेरनी” या सिनेमात वापरला आहे. एक शेरनी (वाघीण) मरते, तर दुसरी (नायिका) हरते, आणि सिनेमा संपतो. गावकरी वाघिणीच्या पिल्लांना खायला घालतात, जगविण्याचा प्रयत्न करतात, ते केवळ सांत्वन, मात्र नायिकेची बदली जंगलातून पेंढा भरून ठेवलेल्या प्राण्यांच्या संग्रहालयात केली जाते, हाच खरा शेवट.

वाघांच्या संवर्धनाचा पट – आणि तसं म्हटलं तर एकुणच निसर्ग आणि मानवाची आधुनिक जगाची जीवन-आकांक्षा यांच्यातील संघर्षाचा हा पट आहे. राष्ट्रीय अभयारण्यातील क्षेत्राच्या आजूबाजूला वसलेली गावं. वाघ नेहमीच ही गावं ओलांडून जंगलाच्या एका भागातून दूसऱ्या भागात जातात. या गावातील लोकांचं जंगलासोबत राहणं ही पटाची एक बाजू. या लोकांच्या मतांसाठी यांच्या भावना उद्दीपित करणारे, आणि विरोधी नेत्यांवर सतत कुरघोडी करु पाहणारे उथळ नेते ही दुसरी बाजू. आपल्या पगाराशी इमान राखून दिवस ढकलणारे, आपल्या उच्चपदाचा रुबाब सर्वांवर झाडणारे वरीष्ठ अधिकारी ही आणखी एक बाजू. वाघाची शिकार करण्यात एकप्रकारची जीवनसार्थकता शोधणारे शिकारी ही आणखी एक बाजू. काहीही करुन लोकांच्या भावना पेटवून त्यावर स्वत:च्या टीआरपीची पोळी भाजणारी माध्यमे – यांच्या उथळपणावर तर भाष्यही करू नये. स्वत:च्या घरात सुरक्षित राहून चहाच्या घोटांसोबत वाघ-माणसांची ष्टोरी चवीने चघळून, जमलं तर त्यावर सोशल मिडीयावर लाईक मिळवू पाहणारी शहरी जनता – अशा पटाच्या सहा बाजू आणि त्यात अडकलेल्या दोन शेरनी – एक टी-12 आणि दुसरी वनअधिकारी विद्या विन्सेंट.

टी-12 ही वाघीण दोन लोकांचा बळी घेते. गावकरी भयभित आहेत, शिकारी शिकारीसाठी आसुसलले आहेत, नेते त्यावर राजकीय पोळी भाजून घेत आहेत, वरीष्ठ वनअधिकारी जबाबदारी झटकून टाकायच्या आणि अंगाला तोशीस कशी लागणार नाही हे पाहण्यात मग्न आहेत. वाघिणीला मारण्यात विद्या विन्सेंट या वनाधिकारी, आणि हसन नुरानी हे झुलॉजीचे प्राध्यापक सोडले तर कुणालाच वावगं वाटत नाही. आणि शेवटही तसाच होतो. शिकाऱ्याची शिकार सुफळ होते, वरीष्ठ वनाधिकारी सुटकेचा श्वास सोडतात, राजकारणी श्रेय लाटू पहातात आणि विद्या विन्सेंटची बदली जंगलातून पेंढा भरून ठेवलेल्या प्राण्यांच्या संग्रहालयात केली जाते. पेंढा भरलेले प्राणी हे आधुनिक जीवनाला सोकावलेल्या माणसांच्या निसर्गस्नेहाचे उत्तम प्रतिक आणि नकोशी वनाधिकारी तिथे नेऊन सोडणे म्हणजे एकप्रकारे तिच्यातही पेंढा भरून तिला तिथे मांडून ठेवणं.

सहा बाजुंनी मांडलेला हा पट आणि त्यावर राज्य घेऊन फिरणाऱ्या सोंगट्या म्हणजे या वाघिणी. या पटाची विधायक पुनर्रचना पटावरील सोंगट्या होऊन करता येणे अशक्य आहे. त्यासाठी पटाबाहेर येऊन त्या पटाकडे पहायला हवे. म्हणजे मग पटाच्या बाजूंमधील आंतरक्रिया समजून घेता येतील.

नरभक्षक वाघिण मारली जाणं भयभित गावकरी, राजकारणी, वनविभागातील कामचुकार अधिकारी, शिकारी सर्वांच्या दृष्टीने सोयीचं आहे. माध्यमांना टीआरपी वाढविणाऱ्या बातमीत केवळ रस आहे, आणि शहरी लोकांना हळहळण्याचं सुख तेव्हढं हवं आहे.

“वाघ राहिला तर जंगल राहिल, जंगल राहिलं तर पाऊस येईल, पाऊस आला तर पाणी मिळेल, आणि पाणी असलं तरच माणूस राहिलं” – या वाक्याला चमकदारपणा जरूर आहे, मात्र त्यातील अपरिहार्यता जाणवण्याइतपत संवेदनशीलता माणसांत शिल्लक आहे का हा खरा प्रश्न आहे. वनविभाग हा इंग्रजांची देणगी आहे, आणि भारतीय वनसंपत्ती लुटण्यासाठी निर्माण केलेली ती व्यवस्था आहे हे आधी समजून घ्यायला लागेल. इंग्रज येण्यापूर्वी जंगल आणि माणूस यांचा परस्परसंवाद कसा होता ते ही समजून घ्यायला लागेल. देवराया काय होत्या, प्राण्यांना देवाचा दर्जा देऊन उभारलेल्या देवस्थांनाचा या सर्व व्यवस्थेत काय सहभाग होता ते ही समजून घ्यायला लागेल. त्याच वेळी जंगली प्राण्यांकडून माणसे मारली जाऊ नयेत यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याचाही विचार करायला लागेल.

अमित मसुरकरचा “शेरनी” चित्रपट या साऱ्या विचारप्रवाहांना जागृत करून संपतो. अनुबोधपटाचा ऐवज असूनही चित्रपट अजिबात कंटाळवाणा होऊ न देण्याचे दिग्दर्शकाचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. आणि विद्या बालनबद्दल काय लिहावे? ती “लेडी अमिताभ” आहे वैगेरे स्तुती फार थोटकी आहे, ती विद्या बालन आहे, इतकेच पुरे. सिनेमात कुठेही हिरॉईन न वाटण्याची रिस्क तिने उत्तम निभावली आहे. “विद्या विन्सेंट” खरीखुरी साकारली आहे. ग्लॅमरस लुकचा एखादा कवडसादेखील या व्यक्तीरेखेचा तोल ढळवू शकत होता. तो उत्तम सांभाळला गेला आहे.

हा अनुबोधपट आहे. निसर्गसंवर्धनाच्या पटाचे विधायक पुनर्निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील एक सकस दुवा यानिमित्ताने आपल्याला मिळाला आहे. चित्रपट सुखांत असता तर आपण आनंदी होऊन सुखाने झोपी गेलो असतो. त्यातील करुण दु:खान्‍त कदाचित आपल्याला जागं करेल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपट आवडला,
परीक्षण छान लिहीलंय...
चित्रपट मनात रेंगाळत राहतो....

नीरज काबी, विद्या बालन, विजय राज, ब्रिजेंद्र काला आणि दिग्दर्शक अमित मसुरकर ही नावं वाचून बघितला हा मूव्ही… पण माफ करा फारसा भिडला नाही... म्हणजे एवढे गुणी कलाकार असूनही दिग्दर्शकाला त्यांचा उपयोग करून घेता आलेला नाहीये, असं वाटलं मला तरी.. ह्या इश्श्यूमध्ये कमी वेळात वेगवेगळे ॲंगल्स दाखवण्याच्या नादात सगळ्याच मुद्द्यांना फक्त वरवरचा स्पर्श करून सोडून देणं होत गेलंय असं वाटलं.. त्यापेक्षा एक-दोन गोष्टींवर फोकस करून त्यातच खोलवर जाता आलं असतं, तर बरं झालं असतं.. पण तरीही ह्या अतिशय महत्वाच्या मुद्द्याला हात घातला गेलाय ह्या मूव्हीच्या निमित्ताने आणि त्यामुळे ढीम्म सिस्टीम थोडी-फार हलली तर चांगलंच आहे..
दोन अडीच वर्षांपूर्वी पांढरकवड्यात 'अवनी' वाघिणीची शिकार करायला कुणीतरी नवाब म्हणून शिकारी बोलावला होता, आणि ते सगळं प्रकरण चांगलंच गाजलं होतं, हे एक आठवलं..

आणि 'न्यूटन' फारच अप्रतिम होता..! _/\_

ह्या इश्श्यूमध्ये कमी वेळात वेगवेगळे ॲंगल्स दाखवण्याच्या नादात सगळ्याच मुद्द्यांना फक्त वरवरचा स्पर्श करून सोडून देणं होत गेलंय असं वाटलं>>>>

'न्यूटन' फारच अप्रतिम होता>>>>

+१

दिग्दर्शकाने विस्तृत पट मांडण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र, परिस्थितीच्या सम्यक आकलनासाठी ते आवश्यक होते.

सन्माननीय सदस्यांच्या मतांचे स्वागतच आहे.

mala pan faaar awadala!
ecology chya abhyasat hee vividh dushtachakra hatat hat ghalun kashi asatat he pahile ahe .
so there is no other go!

चांगले लिहिले आहे चित्रपट परिक्षण.
सिनेमा पाहिला ....आवडला. विद्या बालन, नीरज काबी, विजय राज सगळ्यांचे काम आवडले.

ह्या इश्श्यूमध्ये कमी वेळात वेगवेगळे ॲंगल्स दाखवण्याच्या नादात सगळ्याच मुद्द्यांना फक्त वरवरचा स्पर्श करून सोडून देणं होत गेलंय असं वाटलं>>>>

'न्यूटन' फारच अप्रतिम होता>>>>

+१
ना धड documentary ना धड नाट्य

विद्या बालन ह्या लाजवाब अभिनेत्री आहेत
ह्या विषयी वाद च नाही.
पण वाघ वाचतील ह्याची काही खात्री नाही.
माणसाचे वर्तन खूप विचित्र आहे ,स्वार्थी आहे.
माणसं मुळे पृथ्वी वरील अनेक प्राणी नष्ट झाले वाघ पण नष्ट होईल.
आणि ह्या पृथ्वी वरून मानव नष्ट होवून Circle पुर्ण हे होईल
हे मात्र त्रिवार सत्य आहे.

विद्या बालन ह्या लाजवाब अभिनेत्री आहेत
ह्या विषयी वाद च नाही.
पण वाघ वाचतील ह्याची काही खात्री नाही.
माणसाचे वर्तन खूप विचित्र आहे ,स्वार्थी आहे.
माणसं मुळे पृथ्वी वरील अनेक प्राणी नष्ट झाले वाघ पण नष्ट होईल.
आणि ह्या पृथ्वी वरून मानव नष्ट होवून Circle पुर्ण हे होईल
हे मात्र त्रिवार सत्य आहे.

सिनेमा पाहिला. अतिशय बंडल आहे.
विद्या बालन शेरनी होऊन व्याघ्रसंवर्धनाच्या राजकिय अनास्थेवर हल्लाबोल करेल किंवा गनिमी काव्याने बाजी पलटवेल असं वाटलं होतं, पण तसं काहीही होत नाही.
वाघ पाहायचा म्हणून जंगल सफारी घ्यायची, पण बदकं बघून परत येणं नशिबात असं झालं.

मला आवडला. चांगला चित्रपट आहे. न्यूटन शी तुलना होतेच. तेथे पंकज त्रिपाठी आणि राजकुमार राव यांनी आपल्याला जितके खिळवून ठेवले तितके इथे होत नाही पण तरीही बघण्यासारखा आहे.

जंगल व वाघांच्या बाबतीत - वन खाते, राजकारणी आणि जनता या तिघांच्या आपसातील संबंधांवर जास्त भर आहे. मूळ प्रश्न, वन खात्याने तो सोडवण्याबद्दल केलेले प्रयत्न, त्यात राजकारणी लोकांनी केलेली लुडबूड व त्यांची फसवणूक किंवा त्यांचा गेम जनतेला लक्षात न येणे हा सगळा भाग जमला आहे. बाकी मीडिया बद्दल जे काही दाखवायचे होते ते अगदीच वरवर व भोज्याला शिवल्यासारखे झाले आहे.

न्यूट्नच्या तुलनेत हा चित्रपट कमी पडतो कारण न्यूटन बघताना सरकारी प्रोसीजर आणि एकूणच मतदानाच्या दिवशी चालणारे प्रकार विश्वासार्ह वाटले होते. इथे वन खाते व आदिवासी यांच्यातील संवाद कृत्रिम आहेत. वन खाते तेथे पिढ्यानपिढ्या राहणार्‍या लोकांना माकड व पक्ष्यांच्या आवाजावरून वाघ जवळ आहे हे कसे ओळखायचे हे सांगते. पुलंच्या बटाट्याची चाळ मधे कोचरेकर गुरूजी बोरीबंदर स्टेशनवरच्या हमालांना "थर्ड क्लास म्हणजे अशा तीन उभ्या रेघा असतात" म्हणतात तसे ते वाटले ऐकताना. वाघाच्या बाबतीत असला स्ट्रीट स्मार्टनेस हा स्थानिक लोकांनाच जास्त असेल कोणत्याही सरकारी खात्यापेक्षा. असे काही सीन्स सोडले तर न्यूटनप्रमाणेच लोकांच्या सहज वागण्यांमधून होणारे विनोद इथेही आहेत.

बाकी वाघाचा उल्लेख स्थानिक भाषेत न करता सगळेच कायम "टायगर" का करतात माहीत नाही. बिबट्याबद्दल तेंदुआ हा शब्द एक दोनदा येतो. एकूणच बिबट्या बद्दल पब्लिक एकदम उदासीन दिसते या कथेत. बिबट्याही जंगलात आहे हे दिसत असताना त्याच्यापासून का धोका नाही याचा उल्लेख कोठे येत नाही.

कामे सर्वांचीच चांगली आहेत. विद्या बालन, विजय राज, शरत सक्सेना, नीरज काबी व ब्रिजेंद्र काला. तसेच आदिवासी, वन खात्यातील लोक, एक तो विरोधी पक्षातील माजी आमदार हे सगळे अस्सल वाटतात.

एक त्या दोन बोके व माकडाच्या कथेवर बेतलेले गाणेही चांगले वाटले. त्याते लिरिक्स शोधायला हवेत.

@पाचपाटील
नोव्हेंबर २०१८ मध्ये टी-१ वाघिणीला (अवनी) गोळी घालून ठार केलं. त्यात बरेच प्रश्न उपस्थित झाले. प्रकरणं न्यायालयात गेली. अजूनही सुरुच आहे. या घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. त्यामुळं ज्यांना मूळ घटना माहित आहे, अशा व्यक्तींना चित्रपट पाहताना नक्कीच वेगळा अनुभव येऊ शकतो असं वाटतं.

परीक्षण छान लिहिलं आहे. पण एक गोष्ट खटकली.
'वनविभाग हा इंग्रजांची देणगी आहे, आणि भारतीय वनसंपत्ती लुटण्यासाठी निर्माण केलेली ती व्यवस्था आहे हे आधी समजून घ्यायला लागेल. इंग्रज येण्यापूर्वी जंगल आणि माणूस यांचा परस्परसंवाद कसा होता ते ही समजून घ्यायला लागेल.'

इथं खरंच हे समजून घेणं आवश्यक आहे.
वन कायदे हे विशेष कायदे आहेत. आपल्या दैनंदिन जीवनातले कायदे आणि हे विशेष वनकायदे पाहिले तर फरक जाणवतो.
वनांचा इतिहास आणि वर्तमान पाहिलं तर जाणवतं की या कायद्यांनीच वनं वाचवलीत. अनेक संस्थांशी काही ना काही कारणानं संबंध येतो. चर्चा होत राहते. सध्याचं चित्र असं आहे की ब्रिटीशांनी केलेल्या कायद्यामुळं वनं सुरक्षित आहेत. वनांची तोड, वनजमिनीचं वाटप यांना अडचण निर्माण होत आहे. म्हणून या कायद्यांत बदल करणं आणि कायदे कमकुवत करणं सुरु आहे. कायद्यातून पळवाटा काढणं आणि विनाशकारी नवीन कायदे आणणं सुरु आहे.

विषय खूप मोठा आहे. एवढंच म्हणेन की जी दृष्टी आणि कळकळ ब्रिटीशांना होती ती त्यांच्याबरोबरच गेली. भविष्य कठीण आहे.