गो गोचीड गो- भाग-२

Submitted by Dr. Satilal Patil on 19 June, 2021 - 23:46

मागच्या लेखात आपण गोचीड कुटुंबाचा इतिहास आणि वंशावळीबाबत माहिती घेतली. या लेखात आपण गोचीडा बद्दलचे गैरसमज आणि नियंत्रणाबद्दल जाणून घेऊया. लोकांमध्ये या कुप्रसिद्ध किड्याबद्दल बरेच गोचीडसमज आहेत. त्यातील तथ्ये जरा जाणून घेऊयात.

पहिला गैरसमज म्हणजे, गोचीड हा, आसमान से गिरा… या उक्तीप्रमाणे झाडावरून खाली पडतो. पण खरं सांगायचं तर गोचीड उंच झाडावर चढू शकत नाही. तो लहान झुडूपं आणि गवतावर चढून गिऱ्हाईकांची वाट पाहत बसलेला असतो. म्हणून जास्तकरून पायांना गोचीड चिकटतो. पण त्यानंतर मात्र तो आपल्या आठ पायांची अष्टपायपीट करत, शरीरावरील इतर अडचणीच्या जागी पोहोचतो. प्राण्याने जर गवतावर लोटांगणंच घातलं असेल, तर मात्र सर्वांगावर मुक्त संचार करायची आयती संधी त्याला मिळते.

दुसरा गैरसमज म्हणजे गोचीड हिवाळ्यात मरतात. पण हे देखील खरं नाहीये. हिवाळ्यात ते सुप्तावस्थेत जातात. शून्य अंशाखालील तापमानात, बर्फाळ प्रदेशातदेखील ते शरीराच्या चयापचय क्रिया नियंत्रित करून, चांगल्या दिवसांची वाट पाहत जमिनीखाली, पाल्यापाचोळ्यात पडून राहतात.

काहींच्या मते, गोचीडाचा प्रादुर्भाव तसा लवकर लक्षात येतो, कारण इतर किड्यांच्या मानाने त्यांचा आकार मोठा असल्याने, त्या डोळ्यांना सहज दिसून येतात. पण यातही काही तथ्य नाहीये. लहान गोचीड बाळ अगदीच मिलीमीटर आकाराचं असत. आणि प्राण्याच्या केसाच्या गंजीत, ही चिमुकली गोचीडसुई शोधणं म्हणजे फार जिकिरीचं काम.

काहीजण गोचीडाला चटका देऊन, अल्कोहोल लावून, साबणाचं पाणी लावून, मारण्याचे अघोरी उपाय सुचवतात. पण बऱ्याचदा यामुळे मेलेला गोचीड कातडीला चिकटून राहतो. दोन बोटांच्या चिमटीत पकडून उपटण्याचा सल्लाही काहीजण देतात. गोचिडीचं एक तत्व आहे. पोट भरल्याशिवाय तो प्राण्याला सोडत नाही. तिला उपटून काढण्यासाठी गोचिडीसाठीचा बनवलेला खास चिमटा वापरावा लागतो. या चिमट्याने तिच्या तोंडाजवळ, जनावराच्या कातडीच्या जास्तीत जास्त जवळ पकडून, जरासा दाब देऊन हळुवार ओढावी. बोटाने चिमटीत पकडून ओढणे टाळावे. पकड व्यवस्थित नसल्यास किंवा जास्त दाब दिल्यास प्लॅस्टिकच्या बुडबुड्यासारखी गोचीड फुटते आणि तोंडाचा भाग तुटून कातडीत अडकून राहतो.

हे तुटलेलं तोंड जर कातडीत अडकून राहिलं, तर त्यामुळे गोचीडरोग होतो असा अजून एक (गैर) समज लोकांमध्ये आहे. पण हा समज देखील फोल आहे. पायात अडकून राहिलेल्या काट्याप्रमाणे ते तोंडाचे अवशेष, जनावराच्या कातडीत अडकून राहतात खरे. कधीकधी त्यांत जिवाणूंचं संसर्ग होऊन छोटीशी जखमसुद्धा होऊ शकते. पण कालांतराने प्राण्याचं शरीर या परदेशी काट्याला बाहेत टाकते.

अजून एक भारी गैरसमज म्हणजे, गोचिडीच तोंड तुटून, कातडीत अडकून राहिल्यास, रावणाच्या आपोआप उगवणाऱ्या तोंडासारखं, गोचिडीच्या तोंडाच्या अवशेषांवर संपूर्ण नवीन शरीर तयार होतं. पण अशी धारणा असणारे, एकतर कार्टून फिल्म जास्त बघत असतील, अघोरी, काळ्या जादूवर विश्वास ठेवणारे असतील किंवा एक जानेवारीला जगबुडी होईल या बातमीवर विश्वास ठेवणारे असतील, यात शंका नाही.

आता एवढे भारी समजगैरसमज असणाऱ्या गोचीडापासून स्वतःला आणि पाळीव प्राण्याला वाचवणं आवश्यक आहेच. यासाठी जगभरात कोणकोणते उपाय योजले जातात ते पाहूया.

सगळ्यात पहिला उपाय म्हणजे गोचिडांना लांब पळवणे. जर गोचिडांचा प्रादुर्भाव रोखायचा असेल आणि गोचीडहत्तेचं पाप आपल्या माथी मारून घ्यायचं नसेल तर, त्यासाठी गोचीडाला पळवणारे रिपेलंट रसायनं वापरतात. या औषधाच्या वासाने गोचीड दूर पळतात. या औषधाला, प्राण्याच्या संपूर्ण शरीरावर चोळतात किंवा एकदोन ठिकाणी काही थेंब लावतात. काहीजण हे पळवं रसायनं लावलेले पट्टे प्राण्यांच्या गळ्याभोवती बांधतात. या वासाड्या पट्ट्यामुळे गोचीड, पाळीव प्राण्यांपासून, सुरक्षित सामाजिक अंतर राखत, लांबूनच सूंबाल्या करतो. प्राणी किंवा माणसांनी व्हिटॅमिन बी-१ जास्त खाल्लं तर गोचीडचावा टाळता येतो असाही एक गोचीडसमज आहे. पण याला भक्कम शास्त्रीय पुरावा सापडला नाही.

पण तुम्ही जर का जहाल मतवादी असाल आणि गोचीडाला पळवण्यात तुम्हाला रस नसेल तर सरळ गोचीडहत्तेच्या उपायांवर बोलूयात. रासायनिक कीटकनाशके हा यावर पहिला जहाल उपाय. रासायनिक पायरेथ्रॉईड या कामासाठी वापरले जातात. डेल्टामेथ्रीन हे याच प्रकारचं जुनं आणि लोकप्रिय रसायन. पण दर आठवडे पंधरा दिवसांनी डेल्टामेथ्रीनचा फवारा मारल्यामुळे गोचिडीला ते पचवायची ताकद आली. मग डोस वाढला. त्यानंतर ऍमीट्राझ ची एंट्री झाली. पण शेवटी तेही रसायनच. या फवाऱ्याने भागत नसल्यास, ऍव्हेरमेक्टीनचं इंजेक्शन मारायचं. हे आंतरप्रवाही रसायन, इंजेक्शनने सरळ प्राण्याच्या रक्तात जातं. आणि रक्तामार्फत गोचिडीच्या पोटात. म्हणजे गोचिडीला मारण्यासाठी गाईम्हशींचं रक्त दूषित करायचं. हेच विषारी रक्त, दूध बनण्याच्या प्रक्रियेत वापरलं जातं. हेच विषारी दूध गाय आणि माय आपल्या बाळाला प्रेमाने पाजतात. काही ठिकाणी इंजेक्शन ऐवजी टॅबलेटचा वापर केला जातो. एकदा का रक्तातील कीटकनाशकाचं प्रमाण कमी झालं, की गोचीडकाका परत आक्रमणाला तय्यार. मग पुन्हा रसायनाचा वापर सुरु. असं हे विषारी चक्र सुरु राहतं.

जगभरात गोचीडाचं नियंत्रण करण्यासाठी जैविक पर्यायही वापरले जातात. वेगवेगळ्या औषधी वनस्पतींच्या अर्कावर आधारित उत्पादने उपलब्ध आहेत. गोचिडीच नियंत्रण सूक्ष्मजीवांचा उपयोग करूनही शक्य आहे. बॅसिलस जातीच्या बॅक्टरीयासारखे वेगवेगळे जिवाणू, मेटारेझिम आणि बिव्हेरिया सारख्या बुरश्या आणि इपीएन सारख्या सूत्रकृमींवर आधारित उत्पादने, गोचिडाच्या नायनाटासाठी पाश्चिमात्य देशात वापरले जातात.

पूर्वी गावात जसं ठमीच्या केसातील उवा काढायला शेजारच्या काकू उत्साहाने मदत करायच्या, त्याच पद्धतीने, शत्रूचा शत्रू मित्र, या न्यायाने वेगवेगळे पक्षी, गांधीलमाश्या, मुंग्या आणि भुंग्यांचा, गोचीड नियंत्रणात फायदा होतो. प्राणी मोकळ्यावर चरायला फिरत असतील तर नैसर्गिकरित्या गोचीडसंख्या या मित्रांच्या मदतीमुळे फुकटातच नियंत्रित होते. पण सध्या काकू, सासूसुनांच्या सिरीयल मध्ये बिझी झाल्या आहेत, ठकीला उनियंत्रक रासायनिक शाम्पू मिळालाय. गाईम्हशीं मोकळ्यावर चरण्याऐवजी, गोठ्यात बंदिस्त झाल्या आहेत. त्यांनादेखील रासायनिक कीटकनाशकांचे इंजेक्शन आणि फवारे मिळालेत. आणि पक्षी, गांधीलमाश्या, मुंग्या आणि भुंगे, गाईम्हशीं गोठ्याबाहेर येण्याची वाट पाहताहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुर्लक्षित किटकाला एकदम प्रकाशझोतात आणलेत तुम्ही!

डिस्कवरी चॅनल वरती मालिका पाहत असल्यासारखं वाटलं.. खूप छान माहिती!

लहान असताना गायी, म्हैसि चरायला घेवून जात आसे .
हिरव्यागार कुरणात गायी ,म्हैस मनसोक्त चारत असताना .विविध पक्षी गोचीड खाण्याचे काम प्रामाणिक पने करत असत.
दृश्य अजुन डोळ्यासमोर आहे.
जास्त गोचीड झाल्या की हाताने काढून पाणी भरून ठेवलेल्या बादलीत टाकायच्या हा उद्योग केला आहे.
आणि म्हैस भाद रून टाकायची
.

https://www.maayboli.com/node/48074>>>>>> डॉ पाटील हे वाचले आहे का तुम्ही, नसेल तर नक्कीच वाचा. तुमचा हा गोचीड भाऊंवरील लेख वाचुन ये मेरेकु आठव्या.