ख्रिस्तियानो रोनाल्डोने १२ सेकंदात आणि दोन शब्दात दिला कोकाकोलाला ३० हजार कोटींचा फटका!

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 June, 2021 - 17:42

ख्रिस्तियानो रोनाल्डोने १२ सेकंदात आणि दोन शब्दात दिला कोकाकोलाला ३० हजार कोटींचा फटका!

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू आणि पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो आज सामना संपल्यावर पत्रकार परिषदेसाठी आला. तेव्हा त्याच्यासमोरच्या टेबलावर कोकाकोलाच्या दोन बाटल्या ठेवल्या होत्या. कारण कोकाकोला त्या स्पर्धेचे प्रायोजक आहेत. त्याने त्या कोल्ड्रिंकच्या बाटल्या बाजूला सारल्या. पाण्याची जवळ घेतली आणि दोनच शब्द उच्चारले,

पाण्याची बॉटल हातात ऊंचावत म्हणाला, वॉटर !
आणि त्यानंतर उपहासाने म्हणाला, कोकाकोला ...
गेम ओवर !

त्याच्या या साध्याश्या कृतीने कोकाकोला वा तत्सम फसफसणारी शीतपेये कशी आरोग्याला हानीकारक आहे असा जगभरात संदेश गेला आणि कोका कोला कंपनीचे शेअर्स १.६ टक्क्यांनी खाली घसरले . कोका कोला कंपनीला ४ बिलिअन डॉलर्सचं म्हणजेच जवळपास ३० हजार कोटींचे नुकसान झाले.

सविस्तर बातमी ईथे वाचू शकता - https://www.bbc.com/marathi/international-57499305
विडिओ ईथे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=KQVuV0l8TZ8

मला या त्याच्या कृतीचा ईतका आनंद का झाला जे धागा काढून साजरा करावा?

कारण एकेकाळी मी स्वत: रोज पाण्यासारखी अशी फसफसणारी पेय प्यायचो. त्याचे परीणामही भोगले. त्यानंतर आज गेले कित्येक वर्षे एक घोटही घेतला नाहीये. घरच्यांनाही हे टाळायला सांगतो. आणि मुलांनाही हि वाह्यात पेय असतात असेच सांगतो. घरचे माझे ऐकून क्वचितच पितात. पण तरीही पितात. मुलांना अजून दूरच ठेवले आहे. पण मोठी झाल्यावर कदाचित ते आता वडिलांचे काय ऐकायचे म्हणत याबाबत आपला स्वतःचा (आणि चुकीचा) निर्णय घेऊन मित्रांसोबत ही शीतपेये पिण्याची शक्यता आहेच. आणि हे चित्र माझ्याच नाही तर बरेच घरात असेल जिथली मुले वडिलांचे न ऐकता अश्या शीतपेयांच्या नादी लागली असतील. त्या सर्व बापांना आज छान वाटले असेल, कारण त्यांच्या मुलांना आज जाणवले असेल की आपले वडीलच येडे नाहीयेत जे या पेयाला विरोध करतात. एक अजून आहे. आणि तो सुद्धा एक जगभरातला लोकप्रिय आणि आदर्श खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे.

प्रायोजक कंपनीचे प्रॉडक्ट असे बाजूला सारायला नक्कीच फार हिंमत लागत असेल. अशी हिंमत तत्वे पाळणारा एखादा सच्चा माणूसच दाखवू शकतो. जे सेलेब्रेटी पैश्यासाठी मद्य, सिगार, शीतपेये यांच्या जाहीराती करत असतील त्यांना दोष द्यायचा बिलकुल हेतू नाही. कारण हे धाडसाचे काम आहे, सर्वांना जमायलाच हवे अशी अपेक्षा नाही करू शकत. कदाचित त्या जागी मलाही हे नाही जमणार. पण जे हे धाडस दाखवू शकतात, दाखवतात त्यांचे कौतुक करायलाच हवे. कारण तुम्ही तुमच्या या कृतीतून आमच्यासमोर तर आदर्श ठेवतातच, पण आमच्या मुलांवरही योग्य संस्कार करायला हातभार लावता.

धन्यवाद मित्रा ! ❤️

- ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद पारंबीचा आत्मा
जास्तीत जास्त लोकांपर्यंत अश्या बातम्या पोहोचणे गरजेचे.
केवळ फॅड म्हणून प्राशन केली जाणारे अशी घातक पेये आहेत हे सर्वांना समजणे गरजेचे.
मग निर्णय ज्याचा त्याचा

मी ही कोकाकोला आणी इतर कोल्डड्रिंक्स पिणे कधीच बन्द केले.
माझा एक भाचा दररोज thumbs up पितो. त्याला किती सांगितले आम्ही तरी एकत नाही. तो एकही फुटबॉल मैच चुकवत नाही.रोनाल्डो चा फैन आहे. आता त्यांने सांगितले म्हणजे thumbs up पिणे बंद केले तर चांगले होईल.

तुम्ही काय परिणाम भोगलेत ? ते कळले तर सगळ्यांना हे का पिऊ नये ते समजेल.

बाकी रोनाल्डोने हे मुद्दामहून केले असे वाटत नाही. सहज म्हणून केले. पण खरोखर मुद्दामहून केले असेल तर या मागे कोकाकोलाच्या स्पर्धकांचा नक्कीच हात असू शकतो.

@ अमुपरी, सोडणे अवघड नाहीये. मी सुद्धा काही वर्षांपूर्वी रोज प्यायचो. ते ही दोनदा. रोज संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर एकदा आणि रोज रात्री शेव-फरसाण सोबत मैहफिल जमवत दुसर्‍यांदा. पुढे त्रास होऊ लागला आणि तो त्याच्यामुळे होतोय हे लक्षात आले तेव्हा घाबरूनच सुटले त्यामुळे सोडायला सोपे गेले असावे. अर्थात त्यानंतरही मोह होत राहायचा. त्यामुळे ओकेजनली पार्टी वगैरेंना सर्वांसोबत म्हणून पिणे पुढचे वर्ष दोन वर्षे चालू होते. पण नंतर मनाचा निग्रह ईतका झाला की मोहाचा क्षण यायचा आणि जायचा. मी एक घोटही घ्यायचो नाही. आणि आता तर मुलांनाच हे वाईट आहे सांगत असल्याने स्वतः घ्यायचा प्रश्नच उदभवत नाही. मोह सुद्धा होत नाही.

या एकूण काळात स्वतःच्या अनुभवावरून आणि उदाहरणावरून शक्य तितके जे माझे ऐकू शकतात अश्या लोकांना हे सोडायचे वा प्रमाण कमी करायचे आवाहन सातत्याने केले आहे.
तुमच्या भावाचीही सवय लवकर सुटावी अशी सदिच्छा Happy

असे अजून कुणीतरी बियरबाबत देखील केले आहे ना?
>>>>>
हेच पाहून रोनाल्डोला फॉलो करत का? वरच्या विडिओत आहे ते म्हणत आहात का? की दुसरे प्रकरण आहे?

@ योगी,
मला त्रास म्हणजे किडनीस्टोन सारखे त्या जागी दुखणे, तसेच युरिन पास करताना जळजळ होणे हे फार व्हायचे.
माझ्या माहितीप्रमाणे हि पेये पाण्यासारखी तहान भागवू शकत नाहीत, उलट शरीराची पाण्याची गरज वाढवतात त्यामुळेही एक त्रास होतो.
मला Crohn's Disease म्हणून एक आजार आहे. तो यामुळे झाला असे नाही, पण तो झाल्यावर यामुळे फारच त्रास होऊ लागला आणि वरची लक्षणे खूप दिसू लागली. ईतर निरोगी लोकांना अशी ईन्स्टंट लक्षणे दिसणार नाहीत, मलाही एकेकाळी कुठे दिसलेली, पण तरी हे पेय घातक आहे आणि आतून डॅमेज करत आहे हे तरी यातून नक्की कळाले.

असे अजून कुणीतरी बियरबाबत देखील केले आहे ना? >>>>. हो ManU च्या पॉल पोगबोने हायनकेनची बॉटल उचलुन ठेवली. (नतद्रष्ट कुठला Proud )

तुमच्या भावाचीही सवय लवकर सुटावी अशी सदिच्छा Happy >>>> भाऊ नाही भाचा. धन्यवाद खरोखर त्याची सवय लवकर सुटावी.
तुम्ही पण त्रास झल्यावर च सोडला ना. कॉलेज ला जाणारी मुले जोपर्यंत स्वतला अनुभव येत नाही तोपर्यंत एकत नाहित कुणाचे.

नक्की माहीती नाही पण अमिताभ बच्चन ने पण पेप्सी ची जाहिरात करणे बंद केले ना.

UK मध्ये असताना Thorpe amusements पार्क मध्ये गेले होते. तिथे एक कोक बाटली विकत घेतली की दिवसभर त्या बाटलीत कोक रिफील करुन द्यायचे तेही फुकटात. पाणी मात्र विकत घ्यावे लागत होते हा विरोधाभास.

सियोना ते बहुतेक कोकाकोला पिण्याची सवय लावत असतिल.
कारण कोल्डड्रिंक एकदा घेतले की सारखे घ्यावेसे वाटते.
मार्केटिंग strategy असेल.

बाकी रोनाल्डोने हे मुद्दामहून केले असे वाटत नाही. सहज म्हणून केले. पण खरोखर मुद्दामहून केले असेल तर या मागे कोकाकोलाच्या स्पर्धकांचा नक्कीच हात असू शकतो.
>>>>>>>

रोनाल्डो शीतपेये आणि मद्य दोघांच्या विरोधात आहे. त्याची याबाबतची मते पाहता हे सहजच घडले असावे हे मी माझ्या स्वतःवरून सांगू शकतो. म्हणजे कधीतरी अश्या आपल्या तत्वात न बसणार्‍या गोष्टी आपल्या समोर मांडलेल्या बघून चीड येऊ शकतेच.
आणि स्पर्धक म्हणाल तर ते कोण हा प्रश्न आहेच. कारण ते स्पर्धक सुद्धा अशीच शीतपेये बनवत असतील तर यात त्यांचेही नुकसानच आहे. फार तर कोकाकोलाची बॉटल असल्याने त्यांना थेट जास्त नुकसान आणि ईतर शीतपेयांना तुलनेत कमी नुकसान ..

कारण कोल्डड्रिंक एकदा घेतले की सारखे घ्यावेसे वाटते >> +७८६ आणि हिच मला याबाबतची धोक्याची पहिली घंटा वाटते, कुठलाही खाद्यपदार्थ जर खाल्यावर जीभेला चटक लावत असेल आणि व्यसनागत पुन्हा पुन्हा खावाप्यावासा वाटत असेल तर सावधान.

राहिला प्रश्न फुकट द्यायचा तर माझ्या माहितीप्रमाणे याची प्रॉडक्शन कॉस्ट जास्त नसते. एखाद्या पार्कमध्ये ते फुकट वाटत असतील, आणि त्या पार्कची एंट्री वा विकतचे पाणी यात ते वसूल करत असतील तर अश्या मार्केटींगमध्येही ओवरऑल फायदाच होत असेल.

कोकाकोला भंगार च आहे, पेप्सी पण
ओल्ड मंक मध्ये घालायला thumpsup च बेस्ट
नैतर रोनाल्डो म्हणाला तसे पाणी बेस्ट
थंडी असेल तर कोमट पाणी पण छान

>>>>सिगारेट,तंबाखुप्रमाणे शीतपेयांच्या जाहिरातींवरही बंदी आली पाहिजे.
सिगारेट, तंबाखुच्या जाहीरातींवरती बंदी नक्की आहे का?
शीतपेय विकत घ्यायची कोणी सक्ती केलेली नाही. तेव्हा बंदी घालण्यात का हशील आहे? उद्या कोणाला प्लास्टिकच्या प्रदुषणाविरुद्ध प्लास्टिकवर बंदी घालाविशी वाटेल. वैयक्तिक प्रेफरन्सेसना मग मर्यादाच नाही.

सिगारेट, तंबाखुच्या जाहीरातींवरती बंदी नक्की आहे का?>>The Cigarettes and Other Tobacco Products (Prohibition of Advertisement and Regulation of Trade and Commerce, Production, Supply and Distribution) Act, 2003 or COTPA, 2003 या कायद्याने भारतात सिगारेट आणि तंबाखुजन्य पदार्थांच्या जाहिरातींना बंदी आहे.
<<शीतपेय विकत घ्यायची कोणी सक्ती केलेली नाही. तेव्हा बंदी घालण्यात का हशील आहे?>> कोणत्याही वस्तुचे उत्पादक आमची वस्तु घ्याच अशी सक्ती करु शकत नाही. पण आकर्षक जाहिरातींद्वारे त्या वस्तुविषयी भुरळ पाडु शकतात. त्यांच्या डोळ्यासमोर एक वयोगट तर नक्कीच असतो ज्याला या जाहिरातीचा भुरळ पडू शकते. सध्या हा वयोगट ८-१० वर्षापासुनच सुरु होत असावा.
<<उद्या कोणाला प्लास्टिकच्या प्रदुषणाविरुद्ध प्लास्टिकवर बंदी घालाविशी वाटेल.>> या ठिकाणी हे उदाहरण अप्रस्तुत वाटते.

मॅगीमध्ये सुद्धा काहीतरी कमी जास्त होते आणि ते अपायकारक होते म्हणून बंदी आलेली ना?
असली शीतपेयांवर सुद्धा काहीतरी कंट्रोल हवा. पण हे फार मोठे मार्केट आहे. याला धक्का देणे परवडणार नाही कोणाला..

एक शंका, मी गूगल करतो, पण कोणाला काही माहीती असेल तर द्या,
कोकाकोला कधीकाळी बॅन होते का आपल्या देशात?

इथे uk मध्ये खूप लोक पाहिले जे पाण्याऐवजी/ पाण्यासारखा पेप्सी/ कोक च पितात.. .. विचारल्यावर पाणीच तर आहे or diet कोक ओर झिरो शुगर तर आहे असा explanation असतं.. कठीण आहे एकंदर..

कोकाकोला भंगार च आहे, पेप्सी पण
ओल्ड मंक मध्ये घालायला thumpsup च बेस्ट
नैतर रोनाल्डो म्हणाला तसे पाणी बेस्ट
थंडी असेल तर कोमट पाणी पण छान

>>>>> Lol मी पण थम्स अप प्रेमी Happy

थम्प्स अम, पेप्सी व कोकाकोला यातील फरक कळत नाही Sad
>>>
थम्प्स अप मध्ये ढेकर जास्त येतात. लहानपणी जेव्हा तसे ढेकर येणे आवडायचे तेव्हा मी सुद्धा थम्स अप प्यायचो.

थम्प्स अप मध्ये ढेकर जास्त येतात. लहानपणी जेव्हा तसे ढेकर येणे आवडायचे>> धाग्याचा उद्देश शीतपेयांचे वाईट परिणाम दाखवुन देणे हा असावा असा माझा गैरसमज झाला होता. पण दुर झाला. धन्यवाद.

धाग्याचा उद्देश शीतपेयांचे वाईट परिणाम दाखवुन देणे हा बिलकुल नाहीये.
दारू आणि शीतपेये हे घातक आहेत हे दुसरीतल्या मुलांनाही ठाऊक आहे.
धाग्याचा उद्देश फक्त याचा कोणाला विसर पडला असल्यास आठवण करून देणे हा आहे.

रोनाल्डोने कोक बाजूला सारल्यावर ते वाईट असतात हे कोणाला नव्याने कळले नाही, माहीत होतेच, पण डोक्यात नव्याने टॅप झाले.
रोनाल्डोच्या कृतीने ते जगभरात केले. तेच हा धागा मायबोलीवर एक्स्टेंड करत आहे.

काही लोकं दारूचे समर्थन करायला येतात. त्याचे फायदे सांगायचा प्रयत्न करतात. त्यांच्याशी फायदे फसवे आणि तोटेच खरे हा वाद घालत बसण्यात खरे तर अर्थ नाही. कारण ते त्यांनाही माहीत आहे. पण तरीही यावर वेळोवेळी चर्चा व्हावी असे मला वाटते कारण मग आपल्याला उत्तर देताना त्यांना स्वतःलाच जाणवते की आपण दारूचे समर्थन करायला जे म्हणतोय ते प्रामाणिक नाहीये. हा विचार त्यांना वेळोवेळी भानावर ठेवायचे काम करतो. त्याने ते दारू लगेच सोडतील असे नाही, पण हा विचार डोक्यात आल्याने काळजी घेत प्रमाण कमी केले तरी उद्देश साध्य झाला.

Pages