नष्ट झालेल्या आजाराचा निद्रिस्त विषाणू

Submitted by कुमार१ on 16 June, 2021 - 02:14

नुकतेच अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने Brincidofovir या औषधाला देवीरोगावरचा (smallpox) उपचार म्हणून मान्यता दिली (https://www.fda.gov/drugs/drug-safety-and-availability/fda-approves-drug...). हे वाचल्यानंतर सर्वसामान्य माणूस नक्कीच बुचकळ्यात पडेल ! तुम्हीसुद्धा पडले असाल, नाही का ?

देवीच्या आजाराचे तर फार पूर्वीच उच्चाटन झालेले आहे. मग जो आजार आता मानवजातीत अस्तित्वातच नाही, त्याच्यासाठी औषधाला मान्यता देण्याची गरज काय, हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे.

याचे स्पष्टीकरण रोचक असून ते देण्यासाठीच हा लेख लिहीत आहे. पण त्यापूर्वी आपण या एकेकाळच्या जागतिक महासाथीच्या रोगाचा इतिहास थोडक्यात पाहू.

हा आजार Variola या विषाणूमुळे होतो. तो अतिप्राचीन आहे. इजिप्तच्या ममीजमध्ये देखील त्याचे काही पुरावे आढळले आहेत असे संशोधक म्हणतात. साधारणपणे इसवी सनाच्या चौथ्यापासून ते पंधराव्या शतकापर्यंत हा आजार संपूर्ण जगभर फोफावलेला होता. त्यात लोक गंभीर आजारी पडायचे आणि कित्येक लोक मृत्युमुखी पडत होते. त्यानंतर त्याच्या विरोधातील उपचार आणि व्यापक प्रमाणावरचे लसीकरण केल्यानंतर हळूहळू हा आजार आटोक्यात येऊ लागला. अमेरिकेत १९४७ मध्ये शेवटचे १२ रुग्ण सापडले. मात्र तेव्हा विकसनशील देशांमध्ये हा आजार बऱ्यापैकी अस्तित्वात होता. विकसित देशात या रोगाविरुद्धचे लसीकरण १९७२च्या दरम्यान थांबवण्यात आले. त्यानंतर हा आजार मागासलेल्या देशांतमध्येच राहिलेला होता. त्याचा बीमोड करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने खूप मोठी मोहीम हाती घेतली. एकीकडे व्यापक लसीकरण चालू होतेच.

हा आजार फक्त माणसाला होतो आणि या विषाणूचा प्राणिजन्य साठा नाही, ही बाब आपल्या पथ्यावर पडणार होती. त्यामुळे या आजाराचे पूर्ण उच्चाटन होऊ शकेल याची खात्री होती. 1975 च्या दरम्यान WHOने जागतिक स्तरावर याचे रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेतली. अनेक लोक हा आजार होऊनही तो लपवत असायचे. त्यांना शोधून काढणे फार महत्त्वाचे होते. मग यावर एक युक्ती काढली गेली. जो माणूस देवीचा रोगी शोधून काढेल त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर बक्षीस ठेवण्यात आले. हा मोहिमेतला आकर्षक भाग होता. भारतातही त्यादरम्यान “देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा”, ही घोषणा मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक ठिकाणी ठळकपणे लावलेली असे.

अशा तऱ्हेने जागतिक निर्मूलन मोहिमेला यश येत होते. 1977 मध्ये डब्ल्यूएचओने जाहीर केले, की जगातील शेवटचा देवीचा रुग्ण हा सोमालियामध्ये आहे; बाकी इतरत्र या आजाराचे उच्चाटन झालेले आहे. हे जाहीर झाल्यावर एका अमेरिकी विज्ञान वार्ताहराने त्या रुग्णाला भेटायचे ठरवले. हा वार्ताहर देवीरोगावर एक पुस्तक लिहित होता आणि त्याच्या संशोधनाचा भाग म्हणून त्याला ही गोष्ट आवश्यक वाटली. मामला अवघड होता. सोमालियाने तेव्हा सर्व परदेशी पत्रकारांना त्यांच्या देशात येण्यास बंदी घातली होती. आता हे वार्ताहर पेचात पडले. म्हणजे, तिथे काही करून जायचेच तर स्वतः पत्रकार असल्याचे लपवणे भाग होते. पण हे त्या व्यवसायातील नियमाविरुद्ध असते. त्यातून खोटेपणाने तिथे प्रवेश केला आणि पुढे जर उघडकीस आले, तर मग थेट तुरुंगवासच घडला असता. पण हे वार्ताहर मोठे जिद्दीचे. त्यांनी WHOशी संपर्क साधला आणि संघटनेने त्यांना अधिकृत ‘निरीक्षक’ असा दर्जा दिला. त्या प्रमाणपत्रावर आता ते सोमालियाच्या व्हिसासाठी प्रयत्न करू लागले. त्यासाठी ते दिल्लीला आले.

व्हिसा मिळवणे अजिबात सोपे नव्हते. दरम्यान दिल्लीतील हॉटेलमध्ये त्यांना एक शिकाऊ पत्रकार तरुणी भेटली. ती आकर्षक होती. त्यांनी तिला त्यांची अडचण समजावून सांगितली. त्यावर ती विचार करते म्हणाली. संध्याकाळी हॉटेलच्या बारमध्ये त्या तरुणीने कोण कोण आलंय याचा अंदाज घेतला. तर तिथे तिला सोमालियाच्या राजदूताचा पुतण्या भेटला. तिने एकूणच आपल्या सौंदर्याची त्याच्यावर भुरळ टाकली आणि त्याला पटवला ! या वार्ताहराबद्दल काहीतरी गोलमाल सांगितले. अखेरीस चर्चा वगैरे होऊन या गृहस्थांना व्हिसा मिळाला. मग ते प्रवासास निघाले. त्या दरम्यान सोमालिया व इथिओपिया यांचे युद्ध चालू होते. एकंदरीत वातावरण भयभीत करणारे होते. मजल दरमजल करीत हे वार्ताहर अखेर तिथे पोचले. मग देवीचा रुग्ण जिथे होता त्या गावात गेले.

(यापुढील घटनाक्रम त्यांच्या लेखनातून समजला).

देवीचा तो रुग्ण एका रुग्णालयात स्वयंपाकी म्हणून काम करीत होता. त्याचा, देवीचा रोग झालेल्या अन्य एका कुटुंबाशी जेमतेम १५ मिनिटे संपर्क आला होता. त्यानंतर त्याला तीव्र ताप, सांधेदुखी आणि उलट्या हा त्रास सुरू झाला. सुरुवातीस डॉक्टरांनी त्याचे निदान कांजिण्या असे केले. परंतु लवकरच त्याला अंगावर पुरळ उठले आणि आता तो देवीचा रोगी असल्याचे स्पष्ट झाले. मात्र आता त्याने घाबरून आजार लपवायचे ठरवले होते. परंतु सर्वेक्षण करणाऱ्या माणसाने त्याला बरोबर पकडले आणि मग थेट त्याची रवानगी रुग्णालयात झाली.

ज्या रुग्णालयात त्याला आणायचे ठरवले होते तिथले सर्व रुग्ण आधी अन्यत्र हलविण्यात आले. त्या सर्वांचे देवीचे लसीकरण झाल्याची खात्री करण्यात आली. त्या रुग्णालयाकडे येणारे सर्व रस्ते नंतर अडवून ठेवण्यात आले. त्या परिसरातील ५५,००० जणांचे लसीकरण करण्यात आले.
लवकरच तो रुग्ण बरा झाला. नैसर्गिक संसर्गातून देवीचा आजार झालेला हा शेवटचा रुग्ण गणला गेला. पण, पुढे अजून काही विपरीत घडायचे होते......

लंडनच्या एका रुग्णालयात एक स्त्री आजारी पडली. त्या रुग्णालयाच्या प्रयोगशाळेमध्ये देवीच्या विषाणूवर संशोधन चालू होते. तिथून तो कुठल्यातरी मार्गाने बाहेर निसटला आणि त्यातून ही तरुणी आजारी पडली. पुढे 1978 मध्ये बर्मिंगहॅम रुग्णालयातील प्रयोगशाळेतील एक कर्मचारीही देवीने आजारी पडला आणि त्याचा आजार बळावल्याने त्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना होती. त्याचा धसका घेऊन त्या रुग्णालयाच्या संचालकांनी आत्महत्या केली. हे सगळे प्रकरण पाहता इंग्लंडने त्यांच्याकडील विषाणूचे सर्व नमुने नष्ट केले.

अखेर 1980 मध्ये डब्ल्यूएचओने या आजाराचे पूर्ण उच्चाटन (eradication) झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर प्रत्यक्ष कुठल्याही माणसामध्ये हा आजार दिसलेला नाही. आता हा आजार घडविणाऱ्या विषाणूचे नमुने अभ्यास-संदर्भ म्हणून अतिशीतगृहात कडेकोट बंदोबस्तात ठेवावयाचे ठरले. अधिकृतपणे डब्ल्यूएचओची अशी दोनच केंद्रे आहेत. त्यातील एक अमेरिकेतील अटलांटामध्ये तर दुसरे रशियामध्ये आहे. आता पुन्हा एक प्रश्न उपस्थित होतो. तो म्हणजे,
कशासाठी ठेवायचे हे घातक नमुने ?

वैज्ञानिकांना सतत एक भीती वाटत असते. जर का या विषाणूंचे अनधिकृत नमुने कुठून तरी दहशतवाद्यांना मिळाले, तर ते त्याचा जैविक अस्त्र म्हणून वापर करतील. एकदा का असा विषाणू जगात सोडला की मग काय हाहाकार होतो ते आपण सध्या जाणतो. हा धोका कायम असल्याने वैज्ञानिकांनाही या रोगावरील आधुनिक उपचार आणि लसनिर्मितीच्या संशोधनासाठी मूळ विषाणूचे नमुने ठेवणे आवश्यक वाटते. असे अनधिकृत नमुने जगात कुठे ठेवलेले आहेत का, याचा शोध अमेरिकेची सीआयए संघटना सतत घेत असते. त्यांच्या 2002 मधील अंदाजानुसार अन्य ४ देशांमध्ये असे नमुने लपवलेले आहेत !

थोडक्यात, हा विषाणू सध्या गाढ निद्रितावस्थेत शीतगृहात आहे. मात्र अनधिकृत मार्गाने जर त्याचा जैविक अस्त्र म्हणून वापर केला गेला तर अनर्थ माजेल. याच भीतीपोटी त्याच्याशी लढण्यासाठी एखादे चांगले औषध आपल्या भात्यात असणे कायम आवश्यक आहे. या हेतूनेच वर उल्लेखिलेले औषध मान्यताप्राप्त करून तयार ठेवलेले आहे. हे जुनेच औषध असून अन्य काही विषाणूंच्या उपचारांसाठी ते वापरले जाते. देवी विषाणूच्या समजातीय विषाणूंवर काही प्रयोग करून त्याची चाचणी घेण्यात आली. यापूर्वी २०१८मध्ये देवीसाठीच्या अन्य एका औषधालाही अशीच मान्यता दिलेली आहे. देवीविरोधी लस देखील उपलब्ध असून ती 2002 पासून अमेरिकी लष्करातील काही निवडक लोकांना दिली जाते.

विषाणूंचा जैविक अस्त्र म्हणून वापर कधीही न होवो अशीच आपल्या सर्वांची इच्छा आहे. वैज्ञानिकांनी या बाबतीत गाफिल न राहायचे ठरवले असल्यामुळे त्यांनी अशा औषधांची निर्मिती करून ठेवलेली आहे.
...............................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढिल युद्धये ही बायो वेपन नेच लढली जाणारेत, कोरोना हा ट्रेलर होता
याहुन महाभयंकर वायरसेस जगात तयार करणे सुरु आहे.

उत्तम लेख

मस्त लेख आणि रोचक माहिती!
"देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा” हे लहानपणी खूप ठिकाणी वाचलंय!

छान माहिती! धन्यवाद कुमार सर.
अवांतर: 'Bioterrorism' बद्दल अजून माहीती घ्यायला आवडेल.
विषाणूंची संसर्ग क्षमता आणि मानवासाठी तो किती धोकादायक आहे यावर त्यांचे वेगवेगळे गट केले आहेत.
उदाहरणार्थ, 'Ebola' सारखे विषाणू पहिल्या गटात मोडतात.
सहज आठवले, कौतुक शिरोडकर यांची या विषयावर मायबोलीवरच एक सुंदर कथा आहे....बहुतेक... They call me EZ...या नावाची..

बापरे.
वाचून जरा भिती वाटली.
हाऊस एमडी मध्ये असा एक एपिसोड आहे. स्कूबा डायव्हिंग करताना तळाशी असलेल्या बोटीतल्या देवीच्या स्कॅब्स ची बाटली ती मुलगी घेऊन येते आणि बाटली फुटते.

कोणालाही या विषाणूचा वाईट कामासाठी वापर करण्याची बुद्धि न होवो.

खूप रोचक माहिती..

हे वाचून 'रेसिडेंट evil' मधला T Virus रिलीज होतो तो सीन आठवला.

"त्या प्रमाणपत्रावर आता ते सोमालियाच्या व्हिसासाठी प्रयत्न करू लागले. त्यासाठी ते दिल्लीला आले."....
हे नाही समजले...
अमेरिकन वार्ताहराना सोमालिया च्या visa साठी भारतात यावे लागते का?

स्वासु,
धन्यवाद.
ते मलाही नाही समजलेले. मी त्यांचा वृत्तांत वाचूनच लिहीले आहे.
कदाचित तेव्हा खुद्द अमेरिकेतून व्हिसा मिळणे अति कटकटीचे असावे, असा आपला माझा अंदाज.
किंवा ते आधीच आशियाई दौऱ्यावर असतील ?

नक्की माहित नाही....

खूप रोचक माहिती.
माझे वडिल सांगतात की त्यांच्या लहानपणी दोन्ही दंडावर देवीची लस घ्यावी लागत होती. ज्याची खुण अजुनही आहे.
आमचा जन्म होईपर्यंत बंद झाले होते लस देणे.

वरील सर्वांचे आभार !

त्यांच्या लहानपणी दोन्ही दंडावर देवीची लस घ्यावी... >>>

बरोबर. काहींच्या मात्र एकाच दंडावर लस द्यायचे.
आता माझ्या एकाच दंडावर अगदी पुसट खूण शिल्लक आहे.

छान लेख. रोचक माहिती.
माझ्याही दंडावर लसीचा चाराण्याएव्हढा डाग आहे.
या विषाणूचा प्राणिजन्य साठा नाही>>>म्हणजे?

सोनाली,
मानवी संसर्गजन्य आजारांच्या इतिहासात समूळ नाश झालेला एकमेव आजार म्हणजे देवी. तो नष्ट होण्यामागे दोन कारणे होती:

१. माणूस सोडून अन्य प्राण्यांत देवीच्या जंतूंचा साठा (reservoir) नसणे. हा आजार फक्त माणसाला होतो.
२. प्रभावी लसीकरण

mi _anu++११११ वाचून भिती वाटली. ह्याची माहिती दहशतवाद्यांना असणारच, जर आपल्याला ही माहिती मिळू शकतेय तर. फक्त अशा घातक लोकांच्या हातात हा विषाणू कधीही पडू नये हि देवाकडे प्रार्थना.
रच्याकने माझ्या दोन्ही दंडांवर लसीच्या खुणा आहेत.
अनु हाउस एमडि च्या कुठल्या सिझन मध्ये होतं हे?

छान माहिती.
फक्त अशा घातक लोकांच्या हातात हा विषाणू कधीही पडू नये हि देवाकडे प्रार्थना. >>>> अनुमोदन.

>> मस्त लेख आणि रोचक माहिती!
>> "देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा” हे लहानपणी खूप ठिकाणी वाचलंय!

+1
प्राथमिक शाळेच्या भिंतीवर बाहेरच्या बाजूला पांढऱ्या रंगाने लिहिलेली हि अक्षरे अजूनही जशीच्या तशी आठवतात. कित्येक वर्षे ती पुसली गेली नव्हती किंबहूना अजूनही ती तिथे तशीच असतील असे वाटते.

लेख फार रोचक व ज्ञानवर्धक. आहे. घटना फारच नाट्यपूर्ण. हे अमेरिकन पत्रकार फारच पोहोचलेले असतात. उत्तर कोरिया, चीन, अफगाणिस्तान या देशांत विशेषतः अमेरिकेन नागरिकांना बंदी घातलेली होती तरीही हे तिथे पोहोचले होते. तिथे सोमालियाची काय कथा. मला वाटते भारतातून सोमालियन व्हिसा क्रॅक करणे (त्यांचा इथला राजदूत व इतर परिस्थितीचा अभ्यास करून) त्याला कदाचित तुलनेत सोपे वाटले असेल.

खूप छान लेख कुमार सर Happy

अवांतर:
हाऊस एमडी सिझन 7 एपिसोड 7
अ पॉक्स ऑन हाऊस

मस्तच. फारच रोचक माहीती.
म्हणजे रामसेच्या पिक्चरसारखा निद्रीस्त शैतान अजूनही कोणीतरी स्वार्थाने जतन करून ठेवला असेल जो कधीही चुकीच्या हाती जात जिवंत होऊ शकतो.
मग पुढे काय होऊ शकते याची कल्पना करू शकतो. कोरोनाने ती दिली आहे.

अभिप्राय व पूरक माहिती बद्दल वरील सर्वांचे आभार !
या लेखाचा हेतू जागरूकता असावी एवढाच आहे.

* भारतातून सोमालियन व्हिसा क्रॅक करणे (त्यांचा इथला राजदूत व इतर परिस्थितीचा अभ्यास करून)
>> असेच काहीतरी असावे.

माझ्या दोन्ही दंडांवर देवी लसीच्या प्रत्येकी दोन खुणा आणि दोन्ही मनगटावर प्रत्येकी एक खूण आहे. मनगटावरील खुणा पुसट आहेत. ही लस सुईने, स्कॅल्पेल सारख्या चाकूने आणि भिंगरी सारख्या आरीने टोचत असत. ही वेगवेगळी हत्यारे का वापरत लस टोचायला ?

आग्या,
त्या लसीकरणाचे एक विशेष असे तंत्र आहे (scarification). एका विशिष्ट सुईने (bifurcated) त्वचेवर किमान १५ वेळा टोचावे लागते. तेव्हा ती लस शरीरात पोचते.

त्या तंत्राचा अनुभव बिलकुल नाही. निव्वळ वाचूनच लिहीत आहे.

पुलंच्या अपूर्वाई मध्ये देवी टोचून घेतानाचा अनुभव लिहिलाय त्यांनी. "देवी टोचणार्या बाई पूर्वी बहुतेक म्युनिसिपाल्टीत चर खणायचं काम करत होत्या" असं काहीतरी.

जैविक हत्यार जवळ असणे ही काळाची गरज आहे.
अणुबॉम्ब,रोबोट सैनिक,आणि बाकी अत्यंत प्रगत तंत्र ज्ञान समोर जग हतबल होईल.
तेव्हा प्रामाणिक लोकांना जैविक हत्यार च वाचवतील.
सर्व तंत्र,यंत्र , अस्त्र ह्यांच्या पाठी असणाऱ्या क्रूर मानवाला मारण्यासाठी जैविक हत्यार च उपयोगी पडतील.
अतिरेकी च माणसाचे दुश्मन नाहीत त्यांच्या पेक्षा जास्त माणसाचे दुश्मन वर्चस्व वादी देश, माणसाचे महत्व कमी करणारे संशोधक, संपत्ती साठी काही ही करणारे भांडवलदार आहेत.
ह्यांना धडा शिकवायचा असेल तर जैविक हत्यार शिवाय पर्याय नाही.
भवितव्य मध्ये स्व रक्षणासाठी सर्वच देश अशी जैविक रासायनिक हत्यार वापरणार.
सर्व संगणक system नश्ट करणारे ,इंटरनेट चे तीनतेरा वाजवणारे व्हायरस सुद्धा स्व रक्षणासाठी संग्रहात ठेवावेच लागतील.

हाउस एमडि >>>
हे काय आहे ?,,>>> हि अमेरिकन ड्रामा सिरीज आहे. बरेच सीझन झाले 8 कि 9. बऱ्यापैकी फेमस होती.

>>>>हाऊस एमडी सिझन 7 एपिसोड 7
अ पॉक्स ऑन हाऊस>>>>> थॅन्क्स अनु

Pages