तुला काय मिळाले रे भाऊ..

Submitted by ASHOK BHEKE on 13 June, 2021 - 12:16

मान सदोदीत खाली, कुणाशीही नजर न भिडविणारा मितभाषी सहादू एकदा घाम आणि चष्मा दोन्ही एकाच वेळी पुसत घरी आला होता. त्यांनी तीन रंगाचे मास्क एकावर एक लावले होते. तिरंगा आपल्या मुखावर दिसत होता. त्यांना चहा विचारला. मानेनेच नकार देत त्यांनी एकेक मास्क उतरवला. संघर्ष, कष्ट, धावपळ ही जीवनगाथा आपल्या सहादूची. मनात एक आणि जनात एक असा कधीही डाव न टाकणारा माणूस. तोंडावर ग्वाड आणि आतून द्वाड असा कधीच दिसला नाही. वादळात बरेच काही पाण्यात गेल्याने सहादू निराश होता. पण काही मदत मिळते का.. धावपळ करण्यात त्यांनी सायास केले होते. पायाला भिंगरी लावून फिरला होता. हे मला ठाऊक होते. पण मी त्याला सहज विचारले....!
तुला काय मिळाले रे भाऊ......
मला काहीच मिळाले नाही रे भाऊ....! ( नव्वद अंशात मान फिरविलेली बघण्यासारखी होती.)
कुणाला मिळाले रे भाऊ...!
ज्याला मिळाले त्याच्या घरी अजून लक्ष्मीने पाणी भरावे....!
त्याच्या घरी कधी कसली वाणवा नसावा भाऊ...!
सहादूची शब्दरचना म्हणजे ओंजळीतले शब्दाचे मोती ऐकून त्यांच्या मनातला अंतरीचे भाव ओळखावेत. गड्याच्या आम्ही तर त्यांच्या शब्दावर फिदा. लाजून हसायचे आणि म्हणायचे जादू रे गड्या तुझ्या शब्दाची. पण आम्ही सद्गदित झालो. कंठ रुध्द झाला. कसे बसे नाक शिंकरून पुन्हा सहादुच्या समोर येऊन बसलो. तब्येत कशी आहे रे.... त्यानेच विचारले.
‘ब..ब...बरी आहे’ मी कसेबसे उत्तर दिले. त्यांनी आमच्याच प्रकृतीचे कुशलक्षेम विचारुन ‘तब्बेतीची काळजी घ्या, इकडे तिकडे फार हिंडू नका,’ असे सांगितले.
सरकार तसं चांगले आहे. पण घोषणा करायच्या मंत्र्यांच्या हातात तर त्या अंमलात कशा आणायच्या हे त्या अधिकाऱ्यांच्या हातात असते. तेरा पत्रे उडून गेले. घर पडले एका बाजूने ते वेगळेच. नुकसान तर भरपूर झाले. पण सरकार देणाराला देते. कार्यकर्त्यांच्या घरात त्यांना स्फूर्ती यावी या अनुषंगाने काय काय जाते....! ज्याच्या घरी लक्ष्मी वास करते, त्यांच्यासाठी सरकार. सरकारला का दोष द्यायचा...! अधले मधले सारे चोर असतात. देणारा देत असतो निर्मळ मनाने. निर्मळ साबणासारखे, हात धुऊन कसे स्वच्छ होतात. तसे अगदी, फक्त साबण तपासून वापरावा. मदत कुणाला द्यायची आणि कुणाला नाही द्यायचे हे अधल्या मधल्या दलालांना पुरते ठाऊक असते.सरकार बरंच काही देतं. छ....छ.
जाऊ दे रे सहादू.... या जगाचा स्वार्थ उगाळत बसायचे नाही. आजच्या पेपरात काय आले आहे माहिती आहे का...!
*मन चंगा चंगा....*
*रामाच्या राज्यात....*
*शववाहिनी झाली गंगा..*

जेथे मेलेल्या माणसाला किमंत नाही, तेथे जिवंत माणासाने मदतीची अपेक्षा करूच नये.
मदत मिळविण्याच्या धडपडीतच अपेक्षाभंगाचे इतके झटके बसतात की, हे झटके खरे तर अविस्मरणीय. कुणी कुणाचा नाही. आपमतलबी भवं.....!

*अशोक भेके*

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users