चाणक्य भाग -2 चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्यांची भेट

Submitted by संयोग on 7 June, 2021 - 07:49

आपण माझ्या पहिल्या लेखाला जो प्रतिसाद दिलात, तो पाहून माझा लिहिण्याचा हुरूप अजूनच वाढला. मला खात्री आहे, दूसरा भागही आपण पसंद कराल. या लेखात मी चाणक्यांचा उल्लेख काही ठिकाणी 'आचार्य' म्हणून केला आहे.
चाणक्य भाग -1 चाणक्यांचा जन्म आणि राजकारणात प्रवेश - https://www.maayboli.com/node/79173

दुसर्‍या भागाची सुरुवात .......................

धनानंदला शह देणं हे काही तेवढं सोपं नव्हतं, कारण धनानंद जरी अत्यंत लुच्चा व क्रूर राजा होता, तरीही भारतामध्ये त्याचे मगध साम्राज्य सगळ्यात मोठे होते. देवगुप्त आणि कातेयनसारखे कूटनीतिज्ञ त्याचे खास मंत्री होते. त्याकाळी भारतामध्ये कोणत्याही राजाची टाप नव्हती धनानंद राजाला मात देण्याची. त्याच्याकडे अफाट सैन्यबळ होते. जवळजवळ दोन लक्ष पायदळ, वीस हजार घोडदळ, दोन हजार रथ आणि तीन हजार हत्तींची महासेना होती. धनानंदला शह देण्यासाठी आचार्य चाणक्यांना गरज होती ती एका वीर योध्याची, शक्तीशाली सैन्याची आणि प्रजेच्या पाठिंब्याची.

आचार्य जरी युद्धशास्त्र, राजनीति, कूटनीती आणि सर्व नीतिशास्त्रां मध्ये पारंगत होते, तरीही ते एक ब्राम्हण असल्यामुळे त्यांनी राजा होणे हे त्यावेळच्या परंपरेनुसार योग्य नव्हते आणि ते जरी क्षत्रिय असते तरीही त्यांनी राजा होण्यापेक्षा Kingmaker होणंच पसंद केलं असतं, कारण King पेक्षा kingmaker चीच भूमिका जास्त महत्वाची असते, आणि राज्याचे बरेचसे अधिकार हे Kingmaker कडेच असतात, हे आचार्य पुरते ओळखून होते. पण king बनवावा तो कुणाला? भारतामध्ये इतरही छोटेमोठे अनेक राजे होते, ज्यांना एकत्र आणून धनानंदवर आक्रमण करणे आणि त्याची सत्ता उलथवून लावणे आचार्यांना सहज शक्य होते. परंतु आचार्यांना फक्त साम्राज्यासाठी राज्य नको हवे होते. त्यांना राज्य हवे होते ते सुशासनासाठी, जनतेच्या कल्याणासाठी आणि आचार्यांचे बंड जरी राजाविरुद्ध होते, तरीही त्यांना फितुरी मान्य नव्हती. आचार्यांना मगध साम्राज्यासाठी नवीन सम्राट हवा होता, पण तोही मगधेतलाच.

त्यामुळे चाणक्य राज्यातीलच एका तरुण रक्ताच्या शोधात होते, कारण एकतर तरुण रक्ताला मूळापासून घडवणं जास्त सोयीस्कर होतं आणि जर उद्या मगध राज्यावर त्याची सत्ता आली तर सत्तेवर चाणक्यांचाच वचक राहणार होता. यावरूनच आपल्याला लक्षात येईल चाणक्यांच्या कामाची पद्धत. 'एखाद्या समस्येचे तात्काळ निवारण करण्यापेक्षा ती समस्या समजून घेणे आणि त्यावर सर्वात उत्तम उपाय करणे, जेणेकरून ती समस्या सोडवण्याच्या नादात इतर समस्या उद्भवू नये',आणि त्यासाठी लागणारा वेळ देण्याची आणि मेहनत करण्याचीही त्यांची तयारी होती.

चाणक्य त्वरित त्यासाठी कामाला लागले. आचार्यांना असा योद्धा हवा होता जो बुद्धिमान असेल, शक्तिशाली असेल आणि ज्याला धनानंद राजाबद्दल प्रचंड चीड असेल. कारण धनानंद हा त्यांचा सर्वात प्रथम शत्रू होता आणि चाणक्यनीतीप्रमाणेच शत्रूचा शत्रू हा आपला मित्र समजावा.

त्यावेळी चाणक्य हे तक्षशिला विद्यापीठात मुख्य आचार्य म्हणून काम पाहत होते. शिवाय ते मगध राज्याच्या भावी सम्राटाच्याही शोधात होते. त्यासाठी ते सर्वत्र भटकत होते. असेच एका जंगलातून जात असताना त्यांना काही 14-15 वर्षांची मुले राजा प्रजेचा खेळ खेळताना दिसले. तिथूनच हाकेच्या अंतरावर काही बकर्‍या, गायी चरताना दिसत होत्या. तेव्हा तिथे अचानकच 'न भूतो न भविष्यति' प्रकार घडला. पलीकडून एक जंगली श्वापद आपली शिकार हेरण्याच्या उद्देशाने सुसाट धावत आले. ते श्वापद होतं तरी कोण? तर तो एक वाघ होता. सर्व मुले आणि जनावरं जिवाच्या भीतीने सैरावैरा धावू लागले. सर्वजण आपला जीव कसा वाचेल यासाठी आडोसा बघू लागले. गायी, बकर्‍या भयभीत झाल्या, माझ्या वासराला, माझ्या कोकराला काही होणार तर नाही ना? शेवटी ती एक आईच होती ना!

सर्व मुले आणि जनावरं झाडींमध्ये पळाले लपण्यासाठी. पण एक घात झालाच, दुर्दैवाने एक नवजात वासरू मागेच राहिलं. बिचारं वासरू! त्याच्या आईने मागे वळून पहिलं, आणि तिच्या काळजात धस्स झालं. माझं बाळ. काय होणार माझ्या बाळाचं? अरेरे! आत्ताच कुठे या जगात आलंय ते, अजून त्यानी पुरती दुधाची चवही जाणली नाही आणि त्याच्याच बाबतीत असं का व्हावं. दैव पण असे निर्दयी, क्रूर खेळ का खेळतं हे त्यालाच माहीत. ती माऊली तरी काय करू शकणार होती, तिचं बाळ मृत्युच्या दाढेत फसलं होतं. क्षणाचाही विलंब न करता ती मागे वळाली आणि आपल्या वासराला झाडीत खेचून आणण्यासाठी धावली. पण आत्ता खूपच उशीर झाला होता. वासरु आणि वाघ यांच्यात आता केवळ दहा वितभरच अंतर होतं. वाघ तिच्या वासराचा फडशा पाडणारच होता. सर्वजण श्वास रोखून पाहत होते, आता त्या वासराचं काय होणार? अगदी चाणक्यांच्याही हृदयाची धडधड वाढली होती.

आणि त्याच वेळी 'न भूतो न भविष्यती' प्रकार घडला. कुठूनतरी पाच अत्यंत आणकुचीदार बाण आले, आणि वाघाच्या सर्वांगात घुसले, अगदी बाणाची टोके त्याच्या दुसर्‍या अंगातून बाहेर आली. वाघाला असंख्य वेदना झाल्या, तो कळवळला आणि तिथेच धाडकन कोसळला. बघणार्‍यांच्या 'डोळ्याचे पाते लवते न लवते' तोच हा प्रकार घडला होता. जणू काही एका माऊलीची हाकच दैवानी ऐकली होती. ती सुखावली होती, आज तिचं बाळ मृत्युच्या दाढेतून परत आलं होतं. पण हे बाण कोणी मारलं होते? चाणक्यांसह सर्वांचेच डोळे धनुष्याचा व त्या वीराचा शोध घेऊ लागले आणि अखेर तो वीर सापडला. पलीकडच्या झाडींमध्ये केवळ १४-१५ वर्षांचा एक कोवळा तरुण धनुष्य रोखून उभा असलेला दिसला. त्याच्या डोक्यावर सुकलेले गवत गुंफून बनवलेले मुकुट होते. एका राजाच्या हातात जसे सोन्याचे कडे असते, त्याप्रमाणेच त्याच्या हातातही सुकलेले गवत गुंफून बनवलेले कडे होते. मुलांच्या राजा प्रजेच्या खेळामध्ये हाच मुलगा राजा झाला होता. अगदी एका देखण्या राजपूत्राला शोभेल, असेच काहीसे त्याचे रुप होते. त्याच्या क्षत्रिय कुळाला साजेल, अशीच त्याच्या डोळ्यात एक चमक होती. भविष्यामध्ये धनांनंदला सळो की पळो करून सोडणारा हाच तो मुलगा होता, त्याचे नाव होते चंद्रगुप्त मौर्य!

आचार्यांना त्याच्या पराक्रमाची खात्री तर पटली होती, पण त्यांना खात्री करायची होती ती त्याच्या बुद्धिमत्तेची. त्यासाठी चाणक्य चंद्रगुप्ताच्या जवळ गेले आणि विचारु लागले,”हे आर्यपुत्रा, तु फारच नीडर व पराक्रमी दिसतोस, तुझ्या पराक्रमाचे रहस्य तरी काय?”, चंद्रगुप्त म्हणाला, "हे गुरुवर, आम्ही मुलं राजा-प्रजेचा खेळ खेळत होतो, त्यात मी एक राजा झालो होतो, आणि राजाचे प्रथम कर्तव्य असते, आपल्या प्रजेचे संरक्षण करणे, आणि मी फक्त माझं कर्तव्य केलं. आणि मला घाबरून कसं चालेल? मला उद्या धनांनंदलाही मात द्यायची आहे.", चाणक्यांनी विचारले, "धनांनंदशी तुझं काय वैर आहे?", "त्या क्रूराने माझ्या आईला भर दरबारात अपमानित केले होते, आणि भर रात्रीच्या वेळी तिला राजभवनातून धक्के मारून बाहेर काढले होते. जोपर्यंत मी धनांनंदला त्याच्या दुष्कृत्याबद्दल अद्दल घडवत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसू शकणार नाही. " चंद्रगुप्ताचे हे उत्तर ऐकून आचार्य खूप प्रसन्न झाले. आचार्यांना अपेक्षित असे सर्व गुण चंद्रगुप्तामध्ये होते ते म्हणजे बुद्धिमत्ता, शौर्य व धनांनंदबद्दल असलेली प्रचंड घृणा. आचार्यांना अपेक्षित असा मगध साम्राज्याचा भावी सम्राट मिळाला होता. चाणक्यांचा शोध संपला होता.

आचार्यांनी चंद्रगुप्ताला विचारले, "हे आर्यपुत्रा, तुझा गुरु कोण?", आर्यपुत्र उत्तरला, "कोणीच नाही, मीही गुरूंच्या शोधात आहे.", आचार्य त्यावर म्हणाले, "ज्याप्रमाणे धनांनंदने तुझ्या आईचा अपमान केला, त्याप्रमाणेच त्याने माझाही अपमान केला आहे, आणि जोपर्यंत अशा क्रूर, उद्दाम व भोगविलासात बुडालेल्या राजाला जन्माची अद्दल घडवत नाही, तोपर्यंत मीही शांत बसू शकणार नाही. आपल्या दोघांचे मार्ग एकच आहेत, जर आपण दोघांनी मिळून प्रयत्न केले, तर आपल्यासाठी त्या क्रूराला संपूर्ण नेस्तनाबूत करणे शक्य होईल." चंद्रगुप्तालाही हेच हवे होते. "होय गुरुवर, मी आपले शिष्यत्व स्वीकारण्यासाठी आतुरआहे, माझ्या या लढ्यात मला आपले मार्गदर्शन लाभले, तर माझ्यासाठीही मार्ग सुकरच होणार आहे.", चंद्रगुप्ताने आचार्यांना वाकून नमस्कार केला. आचार्यांनी तत्काळ मौर्याच्या मस्तकावर हात ठेऊन त्याला आशीर्वाद दिला. मौर्याने आचार्यांचे शिष्यत्व पत्करले होते आणि आचार्यांनीही त्याला शिष्य म्हणून मार्गदर्शन करण्याची स्वीकृती दिली होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण माझ्या पहिल्या लेखाला जो प्रतिसाद दिलात, तो पाहून माझा लिहिण्याचा हुरूप अजूनच वाढला. मला खात्री आहे, दूसरा भागही आपल्याला पसंद येईल. या लेखात मी चाणक्यांचा उल्लेख आचार्य म्हणून केला आहे.
चाणक्य भाग -1 चाणक्यांचा जन्म आणि राजकारणात प्रवेश : https://www.maayboli.com/node/79173

माझ्या सर्व वाचकांना आणि वाचक रसिकांना, मनःपूर्वक धन्यवाद.

रूपाली विशे - पाटील, मनिम्याऊ, सोनाली ०४, शोधक >>आपल्या दिलखुलास प्रतिक्रियेमुळेच मला चांगलं लिहिण्याची नवीन उमेद येते. चाणक्य भाग-३ मी लवकरच आपल्या भेटीला घेऊन येईन, तोपर्यंत लोभ असावा.