वापरा आणि फेकून द्या

Submitted by दिनेशG on 10 June, 2021 - 14:21

तुम्ही नवा मोबाईल विकत घेता तो किती वर्षे वापरता? नवा टीव्ही, गाडी, फ्रिज , लॅपटॉप , फूड प्रोसेसर, वॉशिंग मशिन विकत घेताना पुढे किती वर्षे ती गोष्ट आपण वापरणार आहोत याचा विचार टिपिकल मध्यमवर्गीय माणूस तर नक्कीच करतो. एके काळी, मोठ्या मुलाचे कपडे छोट्याला वापरायचे आणि नंतर त्यालाही तोकडे पडायला लागल्यावर त्याचे पायपुसणे नाहीतर भानशीरे ( या शब्दाची उत्पत्ती कुणास ठावूक असल्यास सांगावी!) बनवायचे आणि तेही पार फाटून वाट लागल्यावर काही नाही तर पाणी तापवण्याच्या चुलीत विस्तव पेटविण्यासाठी त्याचा उपयोग व्हायचा!

थोडे मागे जाऊन विचार केला तर असे आढळून येईल की या साऱ्या गोष्टींचे आयुष्य कमी कमी होत आहे. 'वापरा आणि फेकून द्या' तत्वावरच बनविलेल्या वस्तूंचे प्रस्थ वाढत चालले आहे किंबहुना उत्पादक या गोष्टी एकदा वापरून फेकून देण्यासाठीच असतात अशी विचारसरणी ग्राहकांच्या गळी उतरण्यात यशस्वी झाल्या आहेत.

मागे २०१७ ला एक मोबाईल कंपनी मुद्दामहून अपडेट द्वारे मोबाईल स्लो करण्याचा करतेय हे उघडकीस आले होते. नंतर कंपनीने सारवासारव केली की जुनी बॅटरी पुरेसा करंट देऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांचा फोन पुन्हा पुन्हा अचानक बंद पडून खराब होऊ नये म्हणून त्यांनी हे काम केले होते! या सर्व प्रकारासाठी कंपनीला दंड भरावा लागला होता.

मोबाईल, लॅपटॉप म्हटल्यावर त्यांचे आयुष्य जास्तीत जास्त ३ वर्षांचे असणार हे आपण गृहीत धरतो. ऑपरेटिंग सिस्टिम आणि अपग्रेड होणारे अँप्लिकेशन्स जुने हार्डवेअर सपोर्ट करू शकत नाही हे मान्य आहे, तरीसुद्धा हे प्रॉडक्ट्स डिझाईन करत असताना हार्डवेअर अपग्रेड ची सोय करून देणे करणे शक्य आहे असे एक एम्बेडेड सिस्टीम इंजिनिअर म्हणून मला वाटते. परंतु त्यामुळे त्या कंपनीचे अर्थकारण बिघडेल हा मोठ्ठा प्रॉब्लेम आहे. असे केल्यास दर तीन महिन्यांनी मार्केट मध्ये येणारे नवीन मॉडेल कोण खरेदी करणार हा मोठा प्रश्न असेल.

खरे तर हळू हळू "Use and Throw' ही आपली वृत्तीच बनत चालली आहे. आजकाल दुरुस्त करून एखादी गोष्ट वापरण्याच्या फंदात कुणी पडत नाही आणि कुणी हट्टाने पेटून दुरुस्त करायला गेला तर एवढा भाव सांगितला जातो की त्यापेक्षा ती वस्तू नवीन विकत घेणे सोयीस्कर ठरते. काही वर्षांपूर्वी मी केरळ मध्ये असताना माझ्या गाडीचा वायपर बिघडला. मी गॅरेज मध्ये घेऊन गेल्यावर त्या मेकॅनिक ने वायपरची जी मोटर असेंम्बली असते त्यातील गिअर मोडले आहेत म्हणून सांगितले. हाच प्रॉब्लेम मला मुंबईत आला असता तर पूर्ण असेंम्बली नवीन घालायला लागली असती पण त्या केरळ मधल्या मेकॅनिक ने पूर्ण असेंम्बली खोलून त्यातला गिअर बदलला आणि वायपर दुरुस्त करून दिला! त्यानंतर त्या वायपर ने बरीच वर्षे काही त्रास दिला नाही. प्रश्न नुसत्या पैशाचा नाही पण या 'वापरा आणि फेकून द्या' वृत्ती मुळे कार्बन फुटप्रिंट किती वाढली जातेय याचा विचार उत्पादकांनी जरूर करावा. खरंतर या साऱ्या गोष्टीशी सध्या कुणाला देणे घेणे नाही. प्रत्येक कंपनीची आणि पर्यायी देशाची एकमेकांशी स्पर्धा आहे जास्तीत जास्त मार्केट काबीज करण्याची.

बरे, या सगळ्याचा विचार डोक्यात का आला? माझ्याकडे Wonderchef कंपनीचा जवळ जवळ तीन वर्षे जुना Nutri Blend ब्लेंडर होता. त्यातला एक जार हा एका वर्षात लीक व्हायला लागला तर दुसऱ्या जार चे ब्लेड्स गेल्या महिन्यात तुटले! कंपनी मला माझ्याकडे असलेल्या मॉडेल चे ब्लेड किंवा पूर्ण जार उपलब्ध करून देऊ शकत नाही आहे. याचा अर्थ मी साडेतीन हजाराचा ब्लेंडर त्याची मोटर व्यवस्थित चालू असताना फेकून द्यायचा ते फक्त त्याचे शंभर दोनशे रुपयाचे ब्लेड नाही म्हणून! बरे, मिक्सर सारखे वेगळे करता येणारे ब्लेड असणारे डिझाईन असते तर जसे कुठल्याही इतर घरगुती उपकरणांचे दुसऱ्या कंपनींनी बनवलेले पार्टस उपलब्ध असतात तसे कुठे ना कुठे ते ब्लेड उपलब्ध झाले असते.

त्यामुळे सध्या तरी, या ब्लेंडर मध्ये smoothie वगैरे बनविणे शक्य नसल्याने त्याचा उपयोग कसा करायचा यावर गहन विचार सुरू आहे! जार चा उपयोग कोथींबीर ठेवायला होऊ शकतो असे तूर्तास लक्षात आलेले आहे! मोटर असलेला त्याच्या खालच्या भागाचा उपयोग मी कसा करू शकतो ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा!!

Group content visibility: 
Use group defaults

जोवर रियुज, रिपर्पज आणि रिसायकल ही त्रीसुत्री ईफ्केटिवली काम करत आहे तोवर वापरा आणि फेकून द्या ( रियुज, रिपर्पज आणि रिसायकल साठी) हे तत्व पर्यावरण, संशोधन, ईकॉनॉमी सगळ्यांसाठी चांगले आहे.
वीस वर्षांचा टीवी अजूनही चालतो म्हणून बदलायचा नाही अस सगळ्यांनीच ठरवले तर ४़के, यूएचडी, क्युएलईडी असे नवे संशोधन एलजी, सॅमसंग सारख्या कंपन्या करणार नाहीत.
वापरा आणि फेकून द्या ( रियुज, रिपर्पज आणि रिसायकल साठी) हा आयुष्य अजुनाजुन सुखकर व समृद्ध बनवण्यासाठीचा महामंत्र आहे.

जार चा उपयोग कोथींबीर ठेवायला होऊ शकतो असे तूर्तास लक्षात आलेले आहे! मोटर असलेला त्याच्या खालच्या भागाचा उपयोग मी कसा करू शकतो ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा!! >> रिपेअर वाल्याला सगळी असेंब्ली देऊन टाका त्याबदल्यात त्याच्याकडून नवीन मिक्सरवर सूट किंवा तुमच्या कामाचे ईतर काही कमी किंमतीत घेऊन या. तो ब्लेंडर फिक्स करून दुसर्‍या गरजूला विकेल.

बाय बॅक ऑफर असेल तर जुन्याचे अनेक भाग रिसायकल करून एक्सचेंज प्रॉडक्ट्स मध्ये वापरता येतात.

मी कुठं असं ऐकलं/वाचलं आहे की इकॉनॉमी फोन्स, लॅपटॉप्स मध्ये रिसायकल्ड इलेक्ट्रॉनिक कम्पोनंट वापरतात.

हे खरे असेल आणि युज अँड थ्रो मध्ये थ्रो केलेले असे रिसायकल होत असेल तर इकॉलॉजीकल फूट प्रिंट एवढा वाढणार नाही जेवढा ते पूर्ण स्क्रॅप करून टाकल्यास वाढेल.

फोन्स, लॅपटॉप्स मध्ये रिसायकल्ड इलेक्ट्रॉनिक कम्पोनंट >> हे रिसायकल म्हणजे जुने कंपोनन्टचे भंगारात मेटल बाजुला काढून नव्या कंपोनन्टला वापरणं इतपतंच असेल. जुने कंपोनन्ट काढून ते परत वापरणे लेबर/ लॉजिस्टिक/ असेंब्ली.. अशा अनेक स्तरांवर अशक्य इंटेन्सिव्ह ठरेल. परत ते किती दिवस चालतील याची गॅरेंटी काय?

हार्डवेअर अपग्रेड सामान्य लोकांना शक्य नाही. साध्या ओव्हर द एअर अपग्रेड मध्ये जन्ता इतके गोंधळ घालते की हार्डवेअर अपग्रेड मध्ये काय दिवे लावतील याची कल्पनाही करू शकत नाही. परत लीगल टर्म्सच्या जाळ्यातून सुटका करायला कंपन्या बघतील.

ब्लेंडरला पुर्नवापरात आणायला मार्केटप्लेस छाप ठिकाणी कोणी जार विकतंय का बघा. तुमचा जार खराब झाला तशी कुणाची मोटर खराब झाली असेल. भारतात असाल तर मिक्सर दुरुस्ती दुकानात चक्कर टाकली आहे का? त्यांच्याकडे हुबेहुब फिट होणारी भांडी जादूने मिळतात. भारी लोकं असतात ती. काहीही जुगाड करुन दुरुस्त करुन देतात. कंपन्यांच्या मागे लागण्यात व्यर्थ वेळ जाईल.
लीक कुठे होते आहे ते ठिकाण अ‍ॅक्सेसिबल असेल तर सील करायला तिकडे काही लावुन वापरा. लीक हे जनरली रबरची रिंग/ गास्केट फाटल्याने, निघाल्याने होतं. सो तिकडे लक्ष द्या. थोडं लीक होत असेल तर तसाच वापरा. प्रत्येक वापरा नंतर गळलेलं पुसुन घ्या. आम्ही अमेरिकेत असा मिक्सर अनेक दिवस ढकलत होतो. किंवा अगदी पातळ पेस्ट करायला न वापरता थोडं घट्ट मिश्रण असेल तेव्हा वापरा.
मला वाटतं जार मिळवायच्या मागे लागा. मिळेल.

कुठलीही गोष्ट नवीन घेण्यापूर्वी जुनी वापरलेली मिळते आहे का? ही मनाला सवय लावून घ्या. थ्रिफ्ट शॉप्स, गराज सेल ह्या जगातल्या सगळ्यात भारी जागा आहेत. तिकडे जायची सवय लावा आणि लाजू नका. हे सेकंडहँड आहे हे आवर्जुन सगळ्यांना सांगा. त्याला प्रतिष्ठा मिळण्याचे दिवस आहेत, त्यात तुमचा हातभार लावा.

तुमचे म्हणणे पटले आहे.
जोवर सर्व उत्पादन कंपन्यांना आपल्या मालाची end to end जबाबदारी घ्यायला लागत नाही तोवर हे चित्र बदलणार नाही. आज use and throw design मध्ये तयार होणारा कचरा हा मूळ उत्पादन करणाऱ्या कंपनीची जबाबदारी असत नाही.
जर innovation चा मुद्दा असेल तर यात innovation ला खूप वाव आहे. आपण बनवतो ते product जास्तीत जास्त recyclable कसे करायचे हे innovation कंपन्या करू शकतात.
पण आज Apple सारख्या कंपन्या साधा right to repair द्यायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे.
तुमच्या ब्लेंडरसाठी - कुठे नुसते जेनेरीक जार्स मिळतात का ते बघता येईल. कधी कधी दुसऱ्या कंपनीचे जार बसतात. अमितव म्हणतो तसे सेकंड हँड मार्केट मध्ये तुमच्याच ब्लेंडरचे नुसते जार मिळतात का तेही बघता येईल.

जुने कंपोनन्ट काढून ते परत वापरणे लेबर/ लॉजिस्टिक/ असेंब्ली >> बरोबर आहे. एकेक कम्पोनंट मल्टिलेयर पीसीबीवरून काढणे अशक्यच आहे. मॉड्युलस असतील तर काढुन वापरता येतील, (रॅम, साउंड कार्ड वगैरे, पण सेलफोन मध्ये हे वेगळे मॉड्युलस नसतील.)
जर फोन काम करतोय, बॉडी / स्क्रीन फुटली आहे अशा वेळेस पूर्ण मदरबोर्ड युज्ड एक्सचेंज साठी वापरत असतील.
मेटल, प्लास्टिक व्यतिरिक्त स्क्रीन, मायक्रोफोन, लेन्सेस वगैरे रिसायकल करत असतील.

१) दुसरे कोणतेतरी ब्लेड बसवता आले तर पाहा.
२) क्र्याक भागावर सिलिकोन सीलंट लावून ठेवल्यास नंतर वापरता येईल.

# सिलिकोन सीलंट - कारवाले मोठी ट्युब वापरतात ती नको. Mseal 'gasket maker' "CLEAR RTV - SILICONE SEALANT " 25 GRAMS TUBE मिळते ५०/-रुपयांस.

______________
आमच्या TVS washing machine ,च्या spin चे रबर बुश मिळत नाही. पण काम अडले. जुन्यासच जुगाड करून वापरत आहे.

कुठलीही गोष्ट नवीन घेण्यापूर्वी जुनी वापरलेली मिळते आहे का? ही मनाला सवय लावून घ्या. थ्रिफ्ट शॉप्स, गराज सेल ह्या जगातल्या सगळ्यात भारी जागा आहेत. तिकडे जायची सवय लावा आणि लाजू नका. हे सेकंडहँड आहे हे आवर्जुन सगळ्यांना सांगा. त्याला प्रतिष्ठा मिळण्याचे दिवस आहेत, त्यात तुमचा हातभार लावा.>> +१

आमच्या TVS washing machine ,च्या spin चे रबर बुश मिळत नाही. पण काम अडले. जुन्यासच जुगाड करून वापरत आहे.
नक्कीच २५ वर्षापूर्वीची असेल. खूप छान वॉशिंग मशीन होती. माझ्याकडील मशीनचे सर्किट बोर्ड खराब झाले होते, आता ते मिळत नसल्याने नवीन घेतली.

@जिज्ञासा, End to End जबाबदारी ही संकल्पना आवडली. स्क्रॅप केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणामधील पीसीबी मधून सोने काढण्यावर एक माहितीपट पहिला होता तेव्हा त्या कामगारांची अवस्था आणि पर्यावरणावर होणारा परिणाम पाहून अंगावर काटा उभा राहिला होता.

Sonalisl, व्हिडीओ पाहिला! याआधी oil and gas industry च्या लॉबीने electric cars ना विरोध केल्याचं वाचलं होतं! पण जर प्रत्येक तंत्रज्ञान हे असंच कंपनीच्या नफेखोरीसाठी विकसित केलं जात असेल तर मग आपण चुकीच्याच दिशेने प्रगती केली म्हणायची इतकी वर्षं Sad
दिनेशG, धन्यवाद! ही कल्पना cradle to cradle technology या मूळ कल्पनेतून आली आहे.

उत्पादक कंपन्या end-to-end जबाबदारी कधीच घेणार नाहीत. हे म्हणजे त्यांनी स्वतःचाच धंदा कमी करण्यासारखं होईल. आणि त्याची किंमत वसूल करण्यासाठी त्यांना मूळ मालाची किंमत भलतीच वाढवावी लागेल. त्यामुळे सरकारने अशी काही जबरदस्ती कंपन्यांवर केली तर प्रचंड महागाई वाढू शकते. लोकांचा तात्पुरता का होईना, इतका रोष कुणीच सहन करायला तयार नसतं.

उत्पादक कंपन्यांचा कारभार बरोबर उलटा चालतो. त्यांची innovation टीम ही आपलं उत्पादन बाकी कुणी रिपेअर, रिप्लेस कसं करू शकणार नाही, ह्यावर डोकं लढवते. त्यामुळे ग्राहकांना शक्यतो त्यांच्याकडेच परत यावं लागेल आणि धंदा वाढेल. लोकांना किंवा ह्या कंपन्यांना निःस्वार्थी बनवणं शक्य नाही.

भारतात मोठ्या प्रमाणात गरिबी, कमी क्रयशक्ती, आणि चांगली बुद्धिमत्ता ह्यांचा एक मजेशीर संगम झाल्यामुळे रिपेअर आणि रिप्लेसची मागणी मोठ्या प्रमाणावर आणि ती पुरवण्यासाठी उपयोगी पडणारे जुगाड, छोटे व्यवसाय इत्यादीही मोठ्या प्रमाणावर आहेत. ह्यात लोकांचे स्वार्थ एकात एक गुंतल्यामुळे त्यावर कंपन्या फार काही करू शकत नाहीत. गरजूंनी नक्कीच त्याचा फायदा घ्यावा.

माझ्या मिक्सरचा छोटा चटणी जार बंद पडला. मी सगळं बोचकं घेऊन दुरूस्तीच्या दुकानात गेले. उघडल्यावर समजलं की तो जार पूर्ण कामातून गेलाय, पण कंपनीचाच ओरिजनल मिळतो, तो घेतला. काम संपलं.

नुकतीच मोबाईलची स्क्रीन पडून फुटली. नवीन ओरिजिनल घेण्यापेक्षा फोन परवडला असता, पण तरी एकदम फोन घेण्यापेक्षा काही पर्याय बघायला म्हणून मी बाजारात छोट्या मोबाईल रिपेअरिंग दुकानात गेले. स्क्रीन बदलून मिळेल आणि त्यासाठी फॉर्मॅटिंग/ डाटा बॅकप वगैरेची गरज नाही, तासाभरात मिळेल पण डुप्लिकेट असेल असं समजलं. मग दुकानदाराने नुकतीच दुरूस्त करून फिटींगसाठी रबरबँड लावून घट्ट करून ठेवलेली आयफोनची काच बदललेली दाखवली, काम नीट केलेलं होतं. माझा आयफोन नाही त्यामुळे माझं नुकसानही कमी Wink असा विचार करून मी काच बदलून घेतली. जुगाड तर जुगाड, डुप्लिकेट तर डुप्लिकेट! सध्या तरी छान चालू आहे. जरा मार्केट मस्त उघडलं, वातावरण निवळलं की मनासारखी खरेदी करणार. जरी ऑनलाईन मागवत असलो तरी फोन, लॅपटॉप्स हे प्रत्यक्ष दुकानात जाऊन जमलं तर खरं नाही तर (फोनच्या बाबतीत) निदान डमी असेल तर ते मॉडेल बघून आलं की जरा बरं वाटतं.

पहिलाच प्रतिसाद वाचला अन मऊ भातात दाताखाली खडा आल्यासारखं झालं.

तेव्हा त्याबद्दल थोडे.

जोवर रियुज, रिपर्पज आणि रिसायकल ही त्रीसुत्री ईफ्केटिवली काम करत आहे तोवर वापरा आणि फेकून द्या ( रियुज, रिपर्पज आणि रिसायकल साठी) हे तत्व पर्यावरण, संशोधन, ईकॉनॉमी सगळ्यांसाठी चांगले आहे.
<<
रीयुज म्हन्जे तेच पुन्हा वापरा. आता यात वापरा अन फेकून द्या कसं काय आलं? रिपेयर केलं तर कंपनीचा नफा कमी होतो इतकाच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे रिपेयर करताच येणार नाही अशा प्रकारची प्रॉडक्ट्स बनवण्याचा हलकटपणा अमेरिकन कंपन्या करताहेत, अन तुम्ही त्याची भलावण विचार न करता करताहात. कोणतीही गोष्ट फेकून देणे पर्यावरणासाठी चांगले कसे, ते समजले तर मला फार्फार बरे वाटेल.
*
वीस वर्षांचा टीवी अजूनही चालतो म्हणून बदलायचा नाही अस सगळ्यांनीच ठरवले तर ४़के, यूएचडी, क्युएलईडी असे नवे संशोधन एलजी, सॅमसंग सारख्या कंपन्या करणार नाहीत.
<<
या सगळ्या संशोधनांत तुमचे पैसे खर्च करणे अन तुम्हाला येडे बनवून, एक्स्ट्रा डेटा खर्च करून लय भारी सिनेमा दिसतो असे सांगणे हा प्रकार आहे. मानवी डोळा, "अन एडेड आय" जे रिझोल्युशन, जे रंग, जो फ्रेम रेट ओळखू शकतो त्यापेक्षा जास्त डीटेलचे चित्र त्याच्या समोर ठेवून काडीचाही उपयोग नसतो.

आयफोन्/अ‍ॅपलवाले रेटिना डिस्प्लेच्या नावाखाली जे फडतूस रिझोल्युशन महागात खपवतात, ते जरा नीट समजून घ्या. म्हणजे १० हजार एम्पी, किंवा फोर्के वगैरे जास्त भारी, असल्या कवीकल्पनांतून बाहेर याल.

त्या प्रतिसादातल्या तिसर्‍या भागाला (कोथिंबीर ठेवणे) "रिपर्पज" म्हणतात साहेब.

सगळ्या संशोधनांत तुमचे पैसे खर्च करणे अन तुम्हाला येडे बनवून, एक्स्ट्रा डेटा खर्च करून लय भारी सिनेमा दिसतो असे सांगणे हा प्रकार आहे. मानवी डोळा, "अन एडेड आय" जे रिझोल्युशन, जे रंग, जो फ्रेम रेट ओळखू शकतो त्यापेक्षा जास्त डीटेलचे चित्र त्याच्या समोर ठेवून काडीचाही उपयोग नसतो.>>>>
'डोळे' या विषयावर वैद्यकीय मत मांडावं इतकं मला समजत नाही, पण तांत्रिक गोष्टी खर्या आहेत. त्यामुळे +१.
"लोक टीव्ही समोरून बघतात, आपण तो मागच्या बाजूने उघडून बघायचा आहे" असं ऑडिओ-व्हिडीओ विषयाच्या पहिल्या लेक्चर मध्ये ऐकलेलं ते खूप मनापासून आचरलं. त्यामुळे कोणत्याही टेक्नोलॉजीचा टीव्ही मला भुरळ घालत नाही Proud हौस म्हणून आणि बाजारात आता जुने टीव्ही मिळणं, त्याची गरजेप्रमाणे दुरुस्ती हे कठीण होतंय म्हणून घेणार.

म्हणजे मुद्दाम जाऊन जुना टीव्ही आणणार नाहीये, :डोळा मारणारी बाहुली: बोलण्याच्या ओघात तसं म्हटलं. सध्या घरात तो डबा नाहीच, जेव्हा आणायचं ठरेल तेव्हा बघू.

>> माझ्याकडे Wonderchef कंपनीचा जवळ जवळ तीन वर्षे जुना Nutri Blend ब्लेंडर होता. त्यातला एक जार हा एका वर्षात लीक व्हायला लागला तर दुसऱ्या जार चे ब्लेड्स गेल्या महिन्यात तुटले! कंपनी मला माझ्याकडे असलेल्या मॉडेल चे ब्लेड किंवा पूर्ण जार उपलब्ध करून देऊ शकत नाही आहे.

मी हे प्रोडक्ट वापरलेले नाही पण सहज गुगलले असता त्यांचे जार मिळत आहेत असे दिसते. नक्की मॉडेल व डिटेल माहिती नसल्याने खात्रीने सांगू शकत नाही. पण कदाचित तुम्हाला उपयोगी येतील म्हणून ह्या लिंक्स:

https://www.amazon.in/Wonderchef-Nutri-Blend-Small-White-Base/dp/B08W58GHMC
https://www.amazon.in/Black-Plastic-Bullet-Mixer-Grinder/dp/B08NW3WQBK/
https://www.wonderchef.com/collections/nutri-blend-b
https://www.wonderchef.com/collections/nutri-blend-premier

थोडे अजून गुगलून पहा. OLX वर इत्यादी. नाहीच मिळाले तर जस्ट डायल/अरबन कम्पनी ह्यांच्या सर्विसेस वापरून (एप्स/वेबसाईट) तिथे तुमची हि समस्या नोंदवून ठेवा. पुढच्या काहीच मिनटात जवळपासच्या रिपेअर वाल्यांचे पट्पट मेसेज येतात (स्वानुभव). किंवा लोकल मिक्सर रिपेअर वाल्याकडेसुद्धा चौकशी करा. तुम्ही दिलेल्या माहितीवरून प्रॉडक्त्त फार जुने वाटत नाही. त्यामुळे जार मिळतील असे वाटते. वापरा आणि फेकून द्या हि संस्कृती बोकाळत असली तरी रिपेअर मार्केट अजून पूर्णपणे झोपलेले नाही. निदान माझा तरी मागच्या काही वर्षातला अनुभव असाच आहे. टीव्ही, मायक्रोवेव्ह, फ्रिज, कॉम्पुटर मॉनिटर, पंखा, इलेक्ट्रिक किटली अशी अनेक अनेक उपकरणे मी मागच्या काही वर्षांत कित्येकवेळा दुरुस्त करून घेतली आहेत. एक तर स्थानिक रिपेअर वाल्यांकडून किंवा जस्ट डायल/अरबन कम्पनी ह्यांच्या सर्विसेस वापरून.

अवांतर/ किंवा समहाऊ रिलेटेड.

***

Frugal लाईफस्टाईल हा चॉइस आहे. मजबूरी नाही. अन मला व्यक्तिशः स्वहस्ते रिपेयर/बिल्ड करायला आवडते. I just LOVE DIY. काहीवेळा रिपेयर केलेल्या गोष्टीपेक्षा, त्यासाठी लागणारे अवजार्/हत्यार्/उपकरण जास्त महाग पडते ते अलाहिदा. पण तोही एक शौक आहे. मला तरी आपल्या हाताने बनवलेली वस्तू फारच जास्त आनंद अन समाधान देते.

स्वतः दुरुस्त करून वापरात आणलेल्या वस्तू, किंवा स्वतः दुरुस्त केलेले छोटे मोठे प्लंबिंग, विजेची उपकरणे, कार/बाईक मेंटेनन्स किंवा काय वाट्टेल ते.

सगळ्यात भारी म्हणजे यूट्यूब, अन ती वापरणारे आपल्या देशातले जुगाड कारागीर. इंग्रजी सोडा, हिंदी देखिल भोजपुरी किंवा पंजाबी स्टाइल वगैरे बोली मधे बोलतात. पण त्यांचे काय वाट्टेल ती वस्तू रिप्येर करायचे व्हिडिओ यूट्यूबवर आहेत. एसी मेन्टेनन्स पासून, मायक्रोवेव्ह, मिक्सर, कुकर, हवे ते. ऑथेंटिक, वर्किंग. एक्दम #रिस्पेक्ट!

मी परवाच एक एलईडी ट्यूब रिपेयर केली. फडफड करत होती व सुरू होत नव्हती. ती ट्यूब उघडायची कशी, त्यातले सर्किट कसे आहे, कोणता कॉम्पोनंट खराब झाल्यावर काय होईल हे सगळे यूट्यूबवर पाहून. १२ रुपये किमतीचा एक कन्डेन्सर बदलून काम झाले. (हो, सोल्डरगन पासून मल्टिमीटर पर्यंत इलेक्ट्रॉनिक रिपेयरचेही सर्व सामान मजकडे आहे, अन मला ते वापरताही येते.

दोन-अडीचशे रुपयांची एलीडी ट्यूब फेकून देणे मला परवडत नाही, असा प्रश्न नाही. पण ही वस्तू फेकल्यानंतर, त्याची रिसायकलिंग अत्यंत किचकट ऑल्मोस्ट होणे अशक्य या प्रकारातली आहे. या ट्यूबलाईटमधील एक अत्यंत छोटा अवयव सोडला तर सगळे काही चांगले होते, व नुसते फेकून दिले असते तर पूर्णपणे वायाच गेले असते.

इतर कोणताही "माणूस" जर ती गोष्ट रिपेयर/बिल्ड करू शकत असेल, तर आपणही ते करूच शकतो, फक्त त्यासाठी लागणार्‍या सफाई, व अवजारांची कमतरता असते, असा मला अनुभव आहे.

तेव्हा मित्रहो, जिथे जिथे जमेल तिथे रियुज अन रिपेयर करा.

"रिसायकल" हा भंपकपणा आहे. काय नाय, गोळा करून कचरा डेपोत नेऊन जाळतात किंवा लँडफिल करतात. अनेक घातक गोष्टी गरीब थर्ड वर्ल्ड कंट्रीज मधे नेऊन डंप करतात. तेव्हा घरातच पुन्हा वापरायचा प्रयत्न करा, असे सुचवितो.

रिपर्पज बद्दल वेगळा अँगल.

२८६ काँप्युटर होते तेव्हापासून मी काँप्युटर वापरतो आहे.

दर वेळी प्रोसेसर अपग्रेड झाला की हे लोक पिन डिझाईन बदलायचे. जेणेकरून मदरबोर्डपासून सगळी असेंब्ली फेकावी लागेल.

आजकाल मी शहाणा झालोय. एक्स्पी वाला माझा ऑल इन वन लेनोव्हो आजकालचे ब्राऊजर्स 'पेलू' शकत नाही. त्याला जड जातात. हार्डवेअर अपग्रेडचा उपयोग नाही. फारतर त्या सेलेरॉन प्रोसेसर बरोबर ४ ऐवजी ८ जीबी रॅम टाकेन. पण तो २२ इन्ची स्क्रीनवाला, पूर्णपणे चालू असलेला काँप्युटर फक्त एक्स्पी सपोर्ट गेला, अन ब्राऊजर चालत नाही म्हणून फेकून देऊ?

पैसे इज नॉट द पॉइंट. मशीन पूर्णतः चालू आहे. या लोकांनी तुमची कार नव्या रेल्वे रुळांवर चालवा असा नियम केलाय हाच प्रॉब्लेम आहे.

सो रीपर्पज.

लायनक्ष.

बेस्टेस्ट थिंग आय हॅव एव्हर डन. आता सबकुक्छ चल्ता हय. Wink

@ वंडरशेफ.
**
थोडे अजून गुगलून पहा.
<<
थोडे अजून गुगलून पहा. तो संजीव कपूर काय चीज आहे ते कळेल.
छोटा रामदेव बाबा आहे तो Rofl

एलईडी ट्यूब रिपेयर केली.....
बरोबर.
या गोष्टी केल्या पाहिजेत.
एक जुना रेडिओ आहे मिडिअम आणि शॉर्ट वेवचा. दोन्ही बँड्सचे महत्त्व एफेएम आल्याने, ओनलाईन स्टेशनांमुळे संपले. पण रेडिओ तला दहा वॉटचा स्पिकर वापरतो.

पण रेडिओ तला दहा वॉटचा स्पिकर वापरतो.
<<
७०-८० रुपयांत ब्लुटूथ सर्किट व अ‍ॅम्प्लीफायर मिळेल. त्याचा मस्त ब्लूटूथ स्पीकर बनेल.
IMG-20201209-WA0006.jpg

फोटो मधे जुन्या काँप्युटरचा क्रिएटिव्ह कंपनीचा एक स्पीकर, एक जुन्या ब्लूटूथ स्पीकरचे सर्किट अ‍ॅम्प्लीफायरसह (म्हणून तो इटुकला स्पीकर दिसतोय तिथे), व जुन्या लॅपटॉप बॅटरी मधून हार्वेस्ट केलेला १८६५० नावाचा रिचार्जेबल सेल दिसतो आहे. (हो. लॅपटॉपची बॅटरी "खराब" होते, तेव्हा त्यातून असे सेल निघतात. ६ पैकी १-२ च खराब झालेले असतात, बाकी सगळे उत्तम असतात. योग्य प्रकारे वापरून पॉवर बँक, वगैरे हजार गोष्टी करता येतात.)

हा सेल वापरायचा नसेल, किंवा त्याचे चार्जिंग सर्किट वगैरे टाळायचे असेल, तर जुन्या मोबाईल चार्जर (फास्टचार्ज नसलेला अगदी हातोडा नोकियाचा चार्जर) जोडता येतो. खराब चार्जर केबलही साध्या चार्जरला जोडता येते.

चांगले प्रतिसाद आरारा.
मी ही घरी शक्य ते सगळे स्वतः रिपेअर करतो.
तसेच प्लंबर, फिटरची कामे मीच करतो जिथे फिटिंग मजबूत हवे असते. नाही तर त्यांनी भराभरा लावून दिलेले पडद्यांचे ब्रँकेट्स, टॉवेलचे रॉड तीन चार महिन्यातच निखळुन यायला सुरुवात होतात. मी बसवलेल्या रॉडस ना लोम्बकळली तरी काही होत नाही.
गॅस गिझर खराब झाला होता. इकडे हार्ड वाटर असल्याने आत स्केलिंग झाले होते पाण्याचा प्रवाह कमी झाला होता आणि त्यामुळे इग्नीशन ऑन सूचना देणारा प्रेशर स्विच आपले काम करत नव्हता. ये नही होता साब, नया लेलो इति बोलावलेला मेकॅनिक. त्याला परत पाठवले. विकांताला गिझरच्या पाण्याच्या सर्किटमधले जेवढे पाईप, व्हॉल्वस उघडता येतील तेवढे उघडून सगळे पार्टस एका टब मध्यस टाकले, त्यात पाणी टाकले आणि ऍसिड टाकले हळूहळू तीव्र होऊ नये याचा अंदाज घेत. अर्ध्या तासाने बहुतेक पार्टस बऱ्यापैकी डिस्केल झाले होते. एका व्हॉल्वच्या एंट्रीला मात्र बरंच स्केलिंग होतं अजून. ते स्क्रू ड्रायव्हरने खरवडून ऍसिड बाथ मध्ये, परत खरवडून ऍसिड बाथ मध्ये असे करून काढून घेतले.
सगळे जोडले परतगॅस फीड व्हॉल्व मात्र सुरक्षेच्या दृष्टीने नवा लावला. आणि चालू झाला गिझर मस्त पैकी आधी सारखा.

७०-८० रुपयांत ब्लुटूथ सर्किट व अ‍ॅम्प्लीफायर मिळेल.
कोणते म्हणता?
( फुटपाथवर मोबाईल सामान विकणाऱ्यांकडे मिळणारा 'म्युझिक ' कंपनीचा दोनशे रुपयांचा ब्लुटुथ आहे. त्यास दहावॉटचा फिलिप्सचा स्पिकर जोडल्यावर बिना amplifier दणकून आवाज येतो. )पण ... त्यात सुरुवातीला "blue tooth mode on" घोषणा होते ती नकोशी वाटते.

कोणते म्हणता?
<<
इलेक्ट्रॉनिक स्पेअर्स च्या दुकानात. फोटोमधे दिसतेय तसे सर्किट मिळते.

Pages