मौन

Submitted by कविन on 7 June, 2021 - 00:46

निशब्द सांजशा वेळी
छेडीता तनूची धून,
मौनाशी बोले माझ्या
हे तुझे बोलके मौन

अस्पर्श मनीचा डोह
तो उठला झंकारून,
अन् तरंगातुनी त्याच्या
ही तान घेतसे मौन

सुरावटींचा साज
लेवून येतसे तान
त्या निश्वासांचे अर्थ
बघ कसे सांगते मौन

मिलन गीत हे अपुले
शब्दांचे नुरले भान
श्वासांचा ताल समेवर
मौनात मिसळते मौन

प्रणय असे हा खास
मुक शब्द मिरविती खूण
मिलनोत्सुक दोघांमध्ये
मूक शब्द, बोलके मौन

(एक नोंदवावेसे वाटलेले निरिक्षणः २००९ मधे याच नावाने हि कविता इथे मायबोलीवर पोस्ट केली होती. इतक्या वर्षांनी तिच्यात बदल सुचले, शेवटचं कडवं बदलावे वाटले त्याजागी वेगळीच दोन कडवी सुचली. आत्तापर्यंत कथा अशा एडीट झाल्या आहेत. काही दिवसांनी/ महिन्यांनी अगदी काही वर्षांनी देखील बदल सुचले आहेत, कवितेच्या बाबतीत हे पहिल्यांदाच अनुभवल मी. कोणती चांगली कोणती वाईट वगैरे काही नाही. दोन्ही त्या त्या वेळी जसा सुचल्या तशा उतरवल्या)मौन (२००९ मधले वर्जन)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users