वसंताची वरात

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
1’

काही कामानिमित्त सिंगापूरातल्या लिटल इंडिया भागात गेलो होतो. मार्च-एप्रिलाचे दिवस. कपड्यांपासून, भाज्यांपर्यंत उपखंडातल्या बर्‍याच गोष्टी मिळणार्‍या या भागात, त्या दिवशी एका माळ्याच्या टपरीतून दवणा परिमळत होता. लगोलग एक साखळी-प्रक्रिया मनात सुरू झाली : दवणा - रामनवमी - फुलांचे बहर - बहुरंगी, रसरशीत फळफळावळ - वसंत!
लिटल इंडियातून बाहेर पडलो. दैनंदिन व्यापात कित्येक गोष्टी डोक्यात घोंघावत होत्या. तशा नेहमीच असतात; पण वसंताचा हा भुंगा मात्र डोक्यात कुठेतरी गुंजारव करत राहिला.

*****

वसंत ऋतूतल्या फुलाफळांच्या बहरासारखाच वसंत रागही रसरशीत, जोमदार. रसिक पिंडाचा अन् राजबिंडासा. प्रेम, प्रणय अश्या व्याकुळ-हळव्या भावनांसोबत ऐन भरातील धडाडी अन् साहसी रुबाबदारपणा मिरवणारा. वसंताच्या अशा भावाभिव्यक्तीचं मूर्त स्वरूप साकारणारी - वसंत रागाला अश्वारुढ नवरदेव कल्पून, वर्‍हाडी म्हणून मिरवणार्‍या इतर रागरागिण्यांच्या वरातीचं वर्णन करणारी - हिंदुस्तानी संगीतपद्धतीतली पं. जसराजांनी गायलेली ही बंदिश : 'और राग सब बने बाराती, दूल्हा राग बसंत'

व्हिडिओ लिंक : http://www.youtube.com/watch?v=h4tdn0DlIYo

वसंताची मस्ती रशीद खाँनी गायलेल्या या बंदिशीत :

व्हिडिओ लिंक : http://www.youtube.com/watch?v=NK5M_WNMrJA

वसंत राग प्राचीन काळापासून भारतीय संगीतात प्रचलित असावा. श्री गुरुचरित्रात सहाव्या अध्यायात गोकर्ण महाबळेश्वराच्या कथेत रावणाने शंकराला तोषवण्यासाठी वसंतादी रागरागिण्यांमध्ये सामवेद गायल्याचा उल्लेख आढळतो. श्री गुरुग्रंथसाहिबातही वसंत रागात काही 'शबद' रचना बांधल्या आहेत. त्यातील एक शबद :

व्हिडिओ लिंक : http://www.youtube.com/watch?v=4mOAv9kpstk

कर्नाटक संगीतातला वसंतदेखील हिंदुस्तानी संगीतातल्या वसंताच्याच पिंडाचा. संत पुरंदरदासांनी रचलेली व पी. उन्नीकृष्णन यांनी गायलेली कर्नाटक संगीतपद्धतीतल्या वसंतातील ही रचना : 'रामचन्द्रम् भावयामि रघुकुलतिलकमुपेन्द्रम्'

व्हिडिओ लिंक : http://www.youtube.com/watch?v=rvg1tFCZ7hM

व्हायोलिनावर सुभद्रा विजयकुमार यांनी वाजवलेला कर्नाटक पद्धतीतला वसंत :

व्हिडिओ लिंक : http://www.youtube.com/watch?v=9bfy9lV5YjQ

तमिळ संगीतकार इलय्याराजाने 'राज पार्वई' चित्रपटातील 'अंदी मळै' या गाण्यात कर्नाटक शैलीतला वसंत अतिशय भन्नाट वापरलाय. यात सव्वादोन मिनिटांपासून पुढच्या पंधरा-वीस सेकंदांच्या तुकड्यात कडव्याचा अंतिम चरण असा काही अवरोहत येतो.. अगदी पुनःपुन्हा ऐकण्याजोगा! झकास!

व्हिडिओ लिंक : http://www.youtube.com/watch?v=lynq4hhDEAQ

*****

वसंतातली रात्रीची वेळ. कुठल्याशा झाडाला फुटलेल्या बहराचा सांगावा घेऊन परिमळ उधळणार्‍या सुखद, मंद झुळका. अशा वेळी वसंताचे स्वर डोक्यात चढतात.
महाराष्ट्रातल्या माळा-डोंगरांवर यंदाचा वसंत एव्हाना खेळून-उधळून, वरातीमधून गाजत-मिरवत गेला असणार. मग इतक्या उशिरा, एकहंगामी देशात बसून, या क्लिपा आसुसून मांडण्यात काय औचित्य?! ... असू दे वा नसू दे. असंच आपलं. वरातीमागून घोडं.

प्रकार: 

अरे वा! घरी जाउन दुवे नक्की पाहणार ( तुला घाबरून लिंका असं लिहीणार होते तो शब्द मागे घेतलाय). Proud
बसंतोत्सव छानच. Happy

फारच गोड तरल लिहिलसं. पण अजून लिहायला हवं होतसं-- फक्त वसंतावर!

खूप आठवण येतेय ना आपल्या देशाची, इथल्या डोंगरांची, झाडांची माडांची.. Happy
जननी जन्मभूमिश्च ... हे परक्या देशात गेल्यावर जितकं कळतं तितकं आपल्याच देशात असताना कळत नाही हेच खरं. नाहीतर इथे असूनही इथला वसंत डोळ्यासमोर असूनही इतकं हळवं नाही व्हायला झालं. तू लिहीलेलं वाचल्यावर मनात आलं, की हे सगळं इतकं छान माझ्या सभोवती घडलं आणि बघितलंच नाही की काय मी..?

फ,

धन्यवाद!

पं. जसराजजींच्या मागे बसलेला पण किती तयार आहे आणि ते पण त्याला कार्यक्रमात पण शिकवताहेत..! वा!! पूर्वी पण त्याने ती तान हज्जारदा घोटवली असेल..!

छानच !!

मीनू, खरच ग.

संजीव अभ्यंकर आहे ना?

सहीच रे! दवणा आणि मरवा एकच का?

सहीच दुवे आहेत सगळे. 'दवणा'चे फोटो टाकणार का ?

वाह ! सकाळीच दोन ऐकल्या, पालकांना ऐकवल्या, पुरे खानदान खुश Happy धन्यवाद.
बसंताचे वर्णनही चपखल केले आहेस.

  ***
  Finagle's Third Law : In any collection of data, the figure most obviously correct, beyond all need of checking, is the mistake.

  प्रतिसादांबद्दल धन्यवाद!
  मीनू, अगदी अगदी!
  जाईजुई, रैनेने सांगितलंच आहे - ते जसराजांचे शिष्य संजीव अभ्यंकर आहेत.
  बाकी, मरवा आणि दवणा एकच की वेगवेगळे याबद्दल माझाही गोंधळ आहे. रामनवमीच्या सुमारास मादक गोड वासाची, मंजिर्‍यांसदृश इवलीशी बोंडं असलेली, मळकट/राखी हिरव्या रंगाची वनस्पती दिसते ती दवणा (वाचीव माहितीनुसार, शास्त्रीय नाव 'आर्टिमिजिया पर्सिका' - Artemisia Persica). दवण्याचा फोटो मात्र, आता दिसला की काढून ठेवायला हवा.

  -------------------------------------------
  हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

  विदर्भात दवण्याला डवणा म्हणतात. हा डवणा रामनवमीला का येतो यामागे असेही एक कारण की उन्हाळ्यात ऊन लागले की डवणा पाण्यात भिजवून त्याचा अर्क प्यायल्यास ऊन त्वरीत उतरते. आमच्या घरी डवणा कापडात बांधून तो उन्हात वाळवतात. कारण तो वाळला की त्याचा चुरा होतो. तो उडून जाऊ नये, म्हणून कापडी चुरगुडींत बांधून ठेवला जातो. चवीला मात्र दवणा कडवट लागतो.

  छान आहे वरची लिंक.

  दवणा, मरवा आणि बेल पुजेत गणेशाला वाहतात. तेंव्हा नक्कीच मरवा आणि दवणा निराळ्या वनस्पती.

  गूगल वर 'दवणा' असे टंकीत केले की कितीतरी माहिती मिळेल.

  हा बट दवणा:
  DSC_5871_0.jpg

  Common name: Erect Horseweed • Marathi: बट दवणा Bat dawana • Kannada: Bettada davana Botanical name: Conyza stricta Family: Asteraceae (Sunflower family)

  दवणा आणि मरवा निराळे. मरवा ही अतिशय बुटकी वनस्पती आहे. माझ्या बाबांच्या बागेत आहे. वेळ झाला की फोटो टाकेन.


  वसंताचे वर्णन व सर्व लिन्क्स ...............मस्तच. वसंत रागातलेच एक खूप जुने गाणे मला वाटतं पं. भीमसेन व दुसरे गायक कोण...आठवत नाही पण चीज मस्तच आहे. --
  केतकी गुलाब जुही चंपक बन फूले!


  वसंताचे वर्णन व सर्व लिन्क्स ...............मस्तच. वसंत रागातलेच एक खूप जुने गाणे मला वाटतं पं. भीमसेन व दुसरे गायक कोण...आठवत नाही पण चीज मस्तच आहे. --
  केतकी गुलाब जुही चंपक बन फूले!

  फ मस्तच. Happy लिंक मात्र घरी गेल्यावर चेक करणार.

  दवणा खरच अप्रतिम असतो. काय तो सुगंध. मध्यंतरी असेच लक्षात आले की दवणा, आघाडा दुर्वा फुलं, डब्याला झाकण, मट़की मोडाची, आहे का भंगार सारख्या हाकाट्या सुध्दा वासुदेव, कल्हईवाल्यासारख्याच नामशेष होऊ लागल्या आहेत. कधीतरी सठीसहामाषी जर अशी हाक आली तर फारच नॉस्टालजीक होतो जीव.

  'केतकी गुलाब जुही चंपक बन फूले!' हे गाणं एका पारंपारिक बंदिशीवर आधारित आहे. सिनेमाकरता त्याचं रूपांतर 'जुगल-बंदी' मधे केलंय. आता हिंदी सिनेमांतली 'जुगल-बंदी' म्हणजे त्यांत शेवटी एकाची हार आणि एकाची जीत व्हायलाच हवी. त्याप्रमाणे दरबारांतले राजगायक आणि सिनेमाचा हिरो [भारत-भूषण] ह्या दोघांतली ती जुगल-बंदी आहे आणि ती अर्थातच हिरो जिंकतो. गायकः पं.भीमसेन जोशी आणि मन्ना डे.
  ह्या गाण्याबाबत एका कार्यक्रमांत दस्तुरखुद्द मन्नादांनी सांगीतलेला एक किस्सा:
  "राजगायकासाठी पं. भीमसेन जोशींचा आवाज घ्यायचं नक्की झालं होतं, त्यांचा होकार मिळाला होता. त्या सिनेमांतली हिरोची इतर -सोलो -गाणी मी गाणार होतो. त्यामुळे, जुगलबंदींतही हिरोकरता मीच गावं असं मला सांगण्यांत आलं.
  पं. भीमसेनजींच्या बरोबर गायचं ह्या नुसत्या कल्पनेनेच मला दरदरून घाम फुटला! आणि त्यांतून ही जुगल-बंदी हिरो जिंकणार, म्हणजे पंडीतजींपेक्शा माझं गाणं जास्त सरस झाल्याचा आभास निर्माण करायचा होता. मला हे जमणार नाही याबाबत माझ्या मनांत तीळमात्रही शंका नव्हती. मी खूप सांगून पाहीलं की 'ह्या गाण्यासाठी दुसरा, पंडीतजींच्या तोलामोलाचा, शास्त्रीय संगीत गाणारा गायक घ्या आणि मला ह्या संकटांतून सोडवा' पण संगीत-दिग्दर्शक आणि निर्माते आपला हट्ट काही केल्या सोडेनात.
  शेवटी, मी कुणालाही न कळवता एक महिन्याकरता अचानक मुंबईबाहेर निघून गेलो. पुणे -बंगलोर -म्हैसूर - ऊटी अशी छानपैकी एक ट्रीप मारून आलो.एव्हाना 'त्या' गाण्याचं रेकॉर्डिंग होऊन गेलेलं असणार अशा समजुतींत मी परत मुंबईला उगवलो पण कसचं काय? निर्माते आणि संगीत दिग्दर्शक माझी वाटच पहात होते. मी असा एकाएकी गायब झाल्याबद्दल त्यांनी आधी माझी चांगलीच कान-उघाडणी केली आणि मला गाण्याच्या तालमीकरता पुण्याला पं.भीमसेनजींकडे जाण्याची ऑर्डर सोडली - क्विक मार्च!
  नाईलाजाने मी पंडीतजींच्या कडे गेलो आणि त्यांचे पाय धरून त्यांना म्हणालो, 'मला वाचवा'! मला त्यांनी खूप धीर दिला आणि ते गाणं मन लावून शिकवलं. मला घ्यायला जमतील अशाच ताना, हरकती आणि पलटे त्यांत ठेवले आणि माझ्याकडून ते सगळे प्रकार पक्के घोटून घेतले. रेकॉर्डिंगच्या वेळीही त्यांनी मला खूप आधार दिला आणि म्हणाले, 'कसलंही टेन्शन न घेता, अगदी मोकळा आवाज लावून गा!' पंडीतजींच्या कृपेने आणि शिकवणीमुळेच मी ते गीत गाऊ शकलो!"

  आज इतकी वर्षं झाली पण 'केतकी गुलाब'ची, संगीत-प्रेमींच्या मनावरची मोहिनी अद्याप टिकून आहे! वसंतांतल्या दवण्याइतकाच त्या गाण्याचा सुगंधही अजून ताजा, टवटवीत वाटतो!!
  - बापू करंदीकर

  फ, जसराज आणि रशीद खानांची क्लिप 'ऐकली'! सहीच. बाकीच्याही ऐकणार. हे एका ठिकाणी एकत्र केल्याबद्दल तुला १०० मार्क Happy वसंत ऋतूचं एखादं रेखाटनही तुझ्याकडून चाललं असतं Happy

  छान माहिती बापू. ही त्या गाण्याची लिंक- काय ताना घेतल्यात भीमसेनांनी आणि नंतर मन्ना डेंनीही वा! वा! त्यात डावं-उजवं सिनेमापुरतं बळंच केलंय, नाहीतर कोणीच कमी-जास्त नाही.. उलट हे गाणं असंच चालू रहावं असं वाटतं Happy
  http://www.youtube.com/watch?v=eNvnRgdAqas

  ----------------------------------------------------
  No matter how you feel, get up, dress up and show up.

  वा.वा. फ चा संग्रह आणि मांडणी, गजानननी टाकलेले दवण्याचे दूवे, बीने टाकलेला फोटो, माधूरीताईंनी काढलेली केतकीची आठवण, करंदीकरांनी ऐकवलेला किस्सा आणि पूनमने दिलेला दूवा. अहाहा ! वसंत खरच दारी आला. आभारप्रदर्शनासारखं वाटतय खरं पण पोच दिल्याशिवाय चैन पडत नाहीये.
  तर माझ्यातर्फे सगळ्यांनाच धन्यवाद. खूप छान वाटलं.