वेडा (गूढकथा)

Submitted by वैभव@देशमुख on 31 May, 2021 - 12:14

वेडा (गूढकथा)

शहराचा तो मध्यवर्ती भाग नेहमी गजबजलेला असे. महत्वाची कार्यालये, शाळा, बँका याच भागात असल्याने, हा सगळा परिसर गर्दीचा बनला होता. या गजबजलेल्या भागाच्या बरोबर मधून डांबरी रोड गेल्यामुळे, या भागाचे दोन विभाग पडले होते. एक दक्षिणेकडचा आणि दुसरा उत्तरेकडचा. उत्तरेकडच्या भागात एक मोठी खासगी शाळा होती. तिच्याच शेजारी एक राष्ट्रीयीकृत बँक होती. शाळा आणि बँक असल्याने तो भाग नेहमी वर्दळीने भरलेला असे. मोठी वाहने, जीप, रिक्षा, सायकली, हातरिक्षा, पादचारी यांच्या गजबजाटीने हा भाग नेहमी व्यस्त असे.
शाळेच्या शेजारी एक मोठे वडाचे झाड होते. त्या झाडाखाली छोटे छोटे चहाचे, फास्ट फूडचे गाडे थाट मांडून उभे होते. रोडवरील वाहनांचा गजबजाट, वाहनांच्या भोंग्यांचा मोठा आवाज, दुपारच्या वेळी शाळेच्या पटांगणावर येणाऱ्या शाळकरी मुलांचा कलकलाट, हातगाड्यावाल्या दुकानदारांच्या चायsss चायssss अशा जोरजोरात आरोळ्या, रस्त्यावरून जाणार्‍या पादचार्‍यांच्या गप्पांचा किलबिलाट, आजूबाजूचा इतर गोंधळ, या सगळ्या लहानमोठ्या आवाजांनी तो परिसर दिवसभर व्यस्त असायचा. शाळे शेजारच्या त्या वडाच्या झाडाखाली एक दगडी कट्टा होता. त्या कट्ट्यावर तो बसलेला असायचा. तो वेडा! विक्षिप्त वेडा! अंगावर मळलेले कपडे. तेही दोन तीन जागेवर फाटलेले. कमरेखाली ढगळ आणि सैल विजार. तीही नाडी लाऊन कमरेला कशीतरी घट्ट बसवलेली .पायात पुढच्या भागात फाटलेले बूट. डोक्यावरचे, दाढीचे केस वेडेवाकडे वाढलेले. कदाचित त्यावरून कित्येक महिन्यांनपासून, कंगवा न फिरवल्याने ते वेडेवाकडे झालेले असावेत. दात काळे आणि किडलेले. कदाचित तो व्यसनी असावा. त्याचा परिणाम होऊन ते काळे झाले असावेत.
एवढा सगळा अवतार कमी होता की काय? म्हणून त्याच्या विक्षिप्त हावभावांनी त्यात भर टाकली होती.
त्याची नजर दूर कुठेतरी आकाशाकडे असायची. स्वतःशीच स्वगत केल्यासारखे तो मनाशीच बोलायचा. एखादा योगी तोंडातल्या तोंडात मंत्र पुटपुटावा. तसा तोंडातल्या तोंडात, तो सतत काहीतरी पुटपुटत असायचा. ते पुटपुटत असताना तो विचित्र हातवारे, हावभाव करायचा. ते हातवारे पाहून, आकाशातील पक्षांना तो आपल्याकडे बोलावत आहे असे वाटायचे. नजर सतत त्या खुल्या आकाशाकडे रोखून असायची. ऐकून त्याचे सगळे व्यक्तिमत्व काहीसे घाणेरडे, काहीसे बीभत्स वाटायचे. तो वेडा आहे हे त्याच्याकडे पाहताक्षणीच कळायचे. डोक्यावर फार मोठा परिणाम झाला असावा, असे त्याच्याकडे पाहिले की वाटायचे. एकंदरीत विक्षिप्त वागणारा तो ठार वेडा होता.
पण एक गोष्ट थोडीशी चमत्कारीक होती. त्याचा सगळा अवतार, पेहराव घाणेरडा असला तरी, त्याच्या चेहर्‍यावर एक नजर टाकली की, त्याच्या चेहऱ्यावर एक अनामिक तेज दिसायचे. निर्विकार चेहर्‍यावर एक जादूई छटा दिसायची. का कोण जाणे, पण मला त्याच्या त्या चेहऱ्याचे अप्रूप वाटायचे. बर्‍याच वेळा काही गोष्टी अशा घडतात की, चांगली चांगली माणसे जीवनातून उन्मळून पडतात. काहीतरी एखादी दुर्दैवी घटना त्यांना वेड्याचा सदमा देऊन जाते. मग चांगली उच्चशिक्षित, बुद्धिवादी, विचारवंत, संस्कृत घरातील मंडळी सुद्धा अशा सदम्याखाली येऊन ठार वेडे होतात. हा सुद्धा याच कुठल्यातरी प्रकारातील असावा. त्यामुळेच त्याच्या चेहर्‍यावर बुद्धिमत्तेची एक झालर दिसायची. त्याचा चेहरा मला आकर्षित करायचा. त्याच्याकडे जाण्याची एक ओढ लागायची.
दोन तीन दिवस त्याला मी सारखा बघायचो. एके दिवशी न राहून, मी त्याच्याकडे गेलो. त्याला बोलण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडे पाहून एक विश्वासक हास्य केले. त्यानेही माझ्याकडे पाहून एक हास्य केले. तो थोडा थोडा माझ्याशी जुळवुन घेत होता. पण त्याच्याशी बोलताना पाहून, आजूबाजूचे लोक मला हसू लागले. जणूकाही मी पण वेडाच आहे, असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटू लागले. कोणीतरी जोरात म्हणाले पण,
"अरे तू वेडा आहेस की काय? काय वेड्यासारखं वागत आहेस. बहुतेक डोक्यावर परिणाम झाला आहे तुझ्या." आणि ते माझ्याकडे पाहून जोरजोरात हसू लागले.
पण माझ्यावर त्यांच्या बोलण्याचा, हसण्याचा काहीच परिणाम झाला नाही. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्याच्याशी बोलू लागलो. त्याला बोलून मला समाधान वाटले. त्याला दोन-तीन मिनिटे बोलून मी तिथून निघालो. पण हळूहळू त्याच्याशी माझा संवाद वाढला.
तासन् तास मी त्याच्याशी गप्पा मारायचो. बोलायचो. आमच्या दोघांचे संभाषण बराच वेळ चालायचे. पण आजूबाजूचे लोक त्याला बोलताना पाहून, मला नेहमीच हसायचे. मी वेडा आहे असे म्हणायचे. पण मी नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचो. तोही सगळीकडे दुर्लक्ष करून माझ्याशी बोलायचा. त्याची आणि माझी चांगलीच गट्टी जमली होती.

मी विनायक देशमुख. एका खाजगी कंपनीत एक मामुली हेल्पर होतो. हो होतो! आता नाही! अचानक कंपनीचे दिवाळी निघाल्याने, आता बेकार होतो. दुसरीकडे काम पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु इतक्या लवकर काम मिळेल ही आशा नव्हती. मागच्या कामातून साचलेली थोडीफार बचत जवळ होती. त्यातून कसातरी उदरनिर्वाह चालायचा. एक तरी बरे होते. मी एकटाच होतो. लग्न झाले नव्हते. त्यामुळे खूप मोठी जबाबदारी खांद्यावर अशी नव्हतीच. त्यामुळे मी थोडा निर्धास्त होतो. मग काय दिवसभर मोकळाच असल्याने, सायंकाळच्या सुमारास शाळेकडे फेरफटका मारायला जायचो. आणि त्याच वेळेस तो वेडा, माझा मित्र झाला होता.

आज जरा उठायला उशीरच झाला. आता दुपारी झोपणे नित्याचेच झाले होते. आता रात्रीपेक्षा दुपारीच चांगली झोप लागत असे. काही कामच नव्हते, म्हणून निर्धास्त झोपायचो. आजही दुपारी चांगली झोप लागली होती. म्हणून थोडा उशीराच उठलो. पाच सहाच सुमार झाला असेल. फिरत फिरत शाळेजवळ आलो. शाळा चारलाच सुटली असल्याने, मुलांचा गजबजाट नव्हता. थोडी शांतता भासत होती. पण नेहमी असणारी वाहनांची गर्दी तेवढीच जोमात होती. वाहने वेगाने येत, त्याच वेगाने जात. मी झाडाच्या कट्ट्यावर नजर टाकली, कट्टा रिकामा होता. तो वेडा कुठेच दिसत नव्हता. नेहमी तर तो इथेच असतो. मग आज कुठे गेला? गेला असेल कुठेतरी. असा विचार करून मी चहा घेण्यासाठी टपरीवर गेलो.
तेवढ्यात अचानक, एका मोठ्या ट्रकचा जोरात ब्रेक मारल्याचा आवाज आला. तो आवाज माझ्या कानात एवढ्या वेगाने शिरला की, हातात असणारा चहाचा कप खाली जमिनीवर पडला. खळ्ळकन त्याचे तुकडे झाले. शरीर थरथरत होते. ह्रदयाची धडधड वेगाने होत होती. मी पाठीमागे वळुन पाहीले. रस्त्यावर अपघात झाला होता.
रस्त्यावर काही वेळातच गर्दी जमली होती. एक ट्रक रोडच्या अगदी मध्यभागी थांबलेला होता. त्याच ट्रकने कदाचित अपघात झाला असावा. मला आता वेगळीच शंका आली. तो वेडा जाग्यावर नव्हता. इतर कुठेही दिसला नाही. कदाचित ट्रकखाली तो तर आला नाही? मी वेगाने त्या गर्दीत घुसलो.  समोरचे दृष्य भयंकर होते. वीस पंचवीस वर्षाचा एक तरुण, ट्रकसमोर रक्तबंबाळ होऊन पडला होता. त्या ट्रकच्या तोंडाने त्या तरुणाला जोराची धडक दिली होती. तो तरुण तडफडत होता. कदाचित थोडा जीव शिल्लक असेल. ती त्याची शेवटची धडपड होती. कारण आजूबाजूला एवढे रक्त सांडले होते की, जगण्याची आशाच नव्हती. माझ्या मनाला एक आसुरी आनंद स्पर्शून गेला. कारण समोर पडलेला तो व्यक्ती माझा मित्र, तो वेडा नव्हता. सगळी गर्दी हळहळ व्यक्त करत होती. काहीजण बडबड करत होते. त्यातील एक जण चिंतेच्या स्वरात सांगू लागला,
"हा काहीतरी अपशकुन आहे. हे जे काही चालले आहे ते योगायोगाने घडले नाही. या पाठीमागे काहीतरी वेगळेच असावे. एकाच महिन्यातला हा चौथा अपघात आहे. पुन्हा याच एका जागेवर अपघात होत आहेत. वरून पुन्हा नेहमी एखाद्या ट्रक खालीच माणसे सापडत आहेत. ही जागाच कदाचित शापित असावी. काहीतरी भूतबाधा किंवा मग काळीजादू या जागेवर पडली असावी. त्यामुळे तर हे सारे अपघात होत आहेत."
त्यांची ती बडबड बराच वेळ चालत होती. त्यांची ती बडबड ऐकून मला आश्चर्य वाटले. एकाच महिन्यात चार अपघात! तेही एकाच जागेवर आणि ट्रकच्याच धडकेने!
अपघात तर झाले आहेत. पण असल्या भूतबाधा, काळीजादू,अंधश्रद्धा यांच्यावर विश्वास ठेवणार मी नव्हतो. या विज्ञानाच्या जगात अशा गोष्टीवर कोण विश्वास ठेवेल. समाज असल्या गोष्टीवर विश्वास ठेवायची परवानगी कसा देईल. पण ते काहीही असो, अपघात तर झाले होते. तेही एकाच जाग्यावर. त्याच्या पाठीमागे काहीतरी कारणमिमांसा असलीच पाहिजे. त्या रोडच्या एकूण क्षेत्राकडे पाहिले की, ते अपघाती क्षेत्र दिसत होते. अपघात स्थळाच्या काही मीटरवरच एक यू आकाराचे वळण होते. वळणाच्या दुसर्‍या बाजूचे काहीच दिसत नसल्यामुळे, पलीकडून येणारे वाहणे, व्यक्ती एकदम समोर येईपर्यंत दिसायचे नाही. त्यामुळेही अपघात होत असावेत. तसेच या रस्त्यावर रहदारी एवढी होती की, रोड ओलांडुन जाताना येताना इकडेतिकडे पाहिले तरी, कधी एखादे वाहन जवळ येऊन धडक देईल हे कळत नसे. तसेच काही वेळा सायंकाळच्या संधीप्रकाशात बराच वेळा वाहनांचा अंदाज येत नव्हता, वाहनांचे पुढचे दिवे जवळ आहेत की लांब हेच कळत नसे, त्यामुळे ते दुर आहेत असा समज करून, रोड ओलांडायला गेले की अपघात होत असे. हेच कारणे या रोडवर असावेत. म्हणून अपघात वाढले असावेत.
थोड्याच वेळात मोठा भोंगा वाजवत रुग्णवाहिका आली. तो तरुण तोपर्यंत मृत झालेला होता. त्याची सर्व हालचाल थांबली होती.तो निपचित पडला होता. रुग्णवाहिका जशी वेगाने आली, तशीच तो मृतदेह घेऊन जोरात गेली. हळूहळू गर्दीही पांगली. सगळा रोड आता पूर्णपणे मोकळा झाला. बराच वेळ खोळंबलेली वाहतूकही सुरळीत सुरू झाली.
अचानक माझी नजर रोडच्या पलीकडील एका झोपडीकडे गेली. रोड पासून शंभर एक मीटरच्या अंतरावर ती असेल. त्या झोपडीच्या दाराजवळ उभा होता तो. तो चक्क माझ्याकडेच बघत होता. तोच तो! वेडा! माझा मित्र ! त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले की, एवढ्या लांबूनही दिसत होते की, तो घाबरलेला होता. कदाचित या अपघाताने तो घाबरलेला असेल. त्यामुळेच आपल्या झोपडीत जाऊन बसला असेल. आणि आता सगळी गर्दी पांगल्यामुळे, झोपडीबाहेर आला असेल. त्याची झोपडी जरा विचित्रच वाटली. रोडच्या एका बाजूला शाळा, तो ज्या कट्ट्यावर बसतो ते झाड आणि रोडच्या दुसऱ्या बाजूला याची झोपडी. म्हणजे हा दिवसभर या झाडाखाली बसत असेल, आणि मग दिवस मावळला की, रस्ता ओलांडून त्या बाजूच्या त्याच्या झोपडीत जात असेल. म्हणजे हा रोड ओलांडुन तो जात असेल. हा रोड ओलांडुन! तेही सायंकाळी! मला धक्काच बसला. रोड ओलांडताना कधी याला अपघात झाला तर? एकतर हा वेडा. त्यात त्याचे ते विक्षिप्त हावभाव. कदाचित याचाही कधीतरी अपघात व्हायचा. आधीच चार अपघात झालेले आहेत.
मनात असे विचार चालू होते की, अचानक त्या वेड्याने मला आवाज दिला. आणि हात दाखवून मला अभिवादन केले. मीही हसत त्याला हात दाखवून अभिवादन केले. अंधार होत चालला होता. तो त्याच्या झोपडीत निघून गेला. मीही माझ्या खोलीकडे निघालो.
रात्री झोपण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु झोपच येत नव्हती. सायंकाळी पाहिलेला अपघात सारखा डोळ्यापुढे येत होता. त्या व्यक्तीचा तो रक्तबंबाळ मृतदेह, आजूबाजूला सांडलेले ते रक्त डोळ्यापुढे गडदपणे येत होते. पण त्या अपघातापेक्षाही एका गोष्टीची चिंता जास्त वाटत होती. माझ्या त्या नवीन मित्राची. त्या वेड्याची! कसाही असला तरी तो आता चांगला ओळखीचा झाला होता. मी गरिबीत वाढलो असल्याने, या लोकांविषयी मला आपलेपण वाटते. यांच्याबद्दल एक चांगली जाणीव वाटते. म्हणून तर इतर सगळे हसत असताना, मी त्याला अगदी निर्धास्तपणे बोलायचो.अगदी तास दोन तास बोलायचो. तोही मला चांगला प्रतिसाद देत होता.
आणि त्यात हे असे अपघात सुरू झाले आहेत. हे क्षेत्रच अपघाती असावे. म्हणून तर महिन्याला चार अपघात झालेत. याआधीही झाले असतील. कारण सगळे जुने अपघात आपल्याला थोडीच माहीत असतील. पण या अपघाताच्या पार्श्वभूमीवर ,त्या वेड्याला जपावे लागेल. त्याला समजून सांगावे लागेल.
'रोड ओलांडताना काळजी घेत जा. इकडे तिकडे बघत जा.' तो कितीही वेडा असला तरी, त्यालाही स्वतःच्या जिवाची काळजी असणारच ना! त्याला समजून सांगावे लागेल. तो ऐकेल आपले. काहीही होऊ, उद्या भेटून या चार गोष्टी त्याला समजून सांगाव्या लागतील.
देव न करो उद्या त्याचाही अपघात होऊ शकतो. त्यामुळे काहीही होवो, त्याला उद्या भेटुन या गोष्टी समजून सांगू.  विचारांची ही मालिका, अशीच किती वेळ सुरू राहिली हे सांगणे कठीण झाले असते. पण त्या विचारात कधी झोप लागून गेली ते कळलेच नाही.
दुसरा दिवस उजाडला. दुपारची चांगली झोप काढून, पाच सहाच्या सुमारास मी चहासाठी निघालो. रमत-गमत शाळेजवळ आलो. परिसरात नेहमीसारखीच  वर्दळ होती. मी झाडाखालच्या कट्ट्यावर नजर टाकली. मला हायसं वाटलं. तो तेथेच बसला होता. तो वेडा. वर आकाशाकडे बघत, त्याचे चित्र विचित्र हातवारे, मंत्र पुटपुटणे नेहमीसारखे सुरू होते. मी मंद हसलो. चहाच्या टपरीवर आलो .दोन चहा घेतले. एक माझ्यासाठी आणि दुसरा त्याच्यासाठी. मी चहाचे ग्लास हातात घेत, त्याच्याकडे निघालो. चहा टपरीवाला मी त्याच्या कडे जात असताना, काहीतरी पुटपुटला. त्याचे ते शब्द माझ्या कानापर्यंत आले.
"चेहऱ्यावरून माणूस चांगला दिसतोय. पण असा वेड्यासारखा का वागतोय काय माहित?"
त्या वेड्याबरोबर मलाही लोकं आता, वेडा म्हणू लागले. मी हसत त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मी त्या झाडाच्या कट्ट्यावर पोहोचलो. चहाचा ग्लास त्याच्या जवळ ठेवला. तो अजूनही आकाशाकडे बघत होता. मी त्याला हाताने हलवून ताळ्यावर आणले. त्याच्या हातात चहाचा ग्लास दिला. त्याने विचित्र हासत, तो ग्लास हातात घेतला. तो सतत बडबड करत होता.
त्याने कसातरी तो चहा संपवला. मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागलो. त्याला बोलते करू लागलो. तो हळूहळू बोलू लागला.
"काल येथे अपघात झाला. तेव्हा कुठे होतास तू?"
मी अपघातस्थळाकडे हात करत त्याला विचारले.
"झोपडीत"
त्याने रोड पलीकडील त्याच्या झोपडीकडे हात दाखवत मला सांगितले.
"आता जरा नीट ऐक. या महिन्यात येथे चार अपघात झाले आहेत. तू झोपडीकडे जाताना रोड ओलांडतोस. तेव्हा रोड ओलांडताना काळजी घे. इकडे तिकडे बघुन रोड ओलांडत जा. येथे खूप अपघात घडत आहेत. काळजी घे!घेशील ना? "
मी काकुळतीने त्याला म्हणालो.
तो आपल्या बोबड्या शब्दात हो म्हणाला.
तो आणि मी बराच वेळ बोलत होतो. नेहमीप्रमाणे आजूबाजूचे लोक आमच्याकडे पाहून हसत होते. कदाचित वेड्यासोबत वेडाच बसला आहे, अशी त्यांची भावना होत असावी. माझ्याकडे बघण्याचा या सगळ्या लोकांचा दृष्टिकोन आता, पूर्ण वेड्यासारखाच बनला होता. त्यांच्या दृष्टीने मीही पूर्णपणे वेडा झालो होतो. तसही बेकार लोक असेच वेडे असतात. असो लोक काहीही म्हणोत. आपण आपलं काम केलेले बरं. आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. वेळ पुढे सरकू लागली. हळूहळू वातावरणात अंधार दाटू लागला. थोडासा संधिप्रकाश अजूनही शिल्लक होता. थोडीशी थंडी अवतीभवती पसरू लागली. रस्त्यावरची वाहनांची रहदारी, रोडच्या कडेला चालणार्‍या पादचारी माणसांची वर्दळ हळूहळू वाढत होती. लोक सायंकाळी फेरफटका मारायला घराबाहेर पडत होते.
मी जागेवरून उठलो. त्यालाही उठवले. तो उठत नव्हता परंतु त्याला बळजबरीने उठवले.
"तुला तुझ्या झोपडीपर्यंत सोडतो. रोड ओलांडुन कसे जायचे, हे सांगतो. म्हणजे पुढच्या वेळी तुला रोड ओलांडायचे कळेल."
असे म्हणत, त्याला हाताला धरून उठवले. त्याला घेऊन झोपडीकडे निघालो. आजूबाजूचे लोक माझ्याकडे जरा विचित्र नजरेने बघू लागले. ते नेहमीच बघतात. पण आज त्यांच्या बघण्यात काहीतरी वेगळेच होते. आश्चर्य, भीती, उत्सुकता, जिज्ञासा अशा सगळ्या जाणीव त्यांच्या चेहर्‍यावर दिसू लागल्या. त्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या शंका दिसू लागल्या. काहीतरी खुणा त्यांच्या डोळ्यातून उमटू लागल्या. पण त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून आम्ही चालू लागलो. तो आणि मी. दोघेही रोडच्या कडेला आलो.
रोडवरची रहदारी आज जरा जास्तच जाणवत होती. वाहनांचा वेगही काहीसा वेगवान भासत होता. लहान-मोठे सर्व वाहने, हवेच्या गतीने जात होते.
वाहनांचा वेगाने निघून जाताना येणारा भर्रकन असा आवाज, तसेच वर्दळ हाटावी म्हणून मोठमोठ्याने  वाहनांच्या भोंग्याचा कर्णकश आवाज, रस्त्यावरचा इतर निनाद, पादचाऱ्यांचा गोंधळ, ज्याचा हात धरला होता त्या वेड्याची सारखी चालणारी चुळबूळ, या सगळ्या गोंधळानी माझ्या आजूबाजूचा परिसर अशांत बनला होता. या आजूबाजूच्या कर्कश गोंधळाने माझ्या मनात चीड उत्पन्न केली. मनाची चलबिचल वाढत होती. उगाच संताप वर उफाळून येत होता. हे सर्व झिडकारून खोलीकडे पळत जावे अशी इच्छा होत होती. पण कसेतरी स्वतःला सावरून, मी शांत राहण्याचा प्रयत्न केला. मला रोड ओलांडुन त्याला त्याच्या झोपडीपर्यंत पोहोवचायचे होते.
पण रोडवर वाहनांची सलग रांग लागली होती. रोड ओलांडून जाण्याची उसंतच मिळत नव्हती. रोड ओलांडावा तरी कसा? पुन्हा त्यात हा वेडा सोबत. तो हळू हळू चालणार. त्यामुळे तर रोड ओलांडायचे अजूनच अवघड होऊन बसले होते. रोड थोडा मोकळा होण्याची वाट बघत, आम्ही तसेच रोडच्या कडेला थांबलो.

अचानक मी ज्या हाताने त्या वेड्याला धरले होते. तो हात क्षीण होत आहेत अशी जाणीव मेंदुपर्यंत गेली. कदाचित तो भास असावा असे प्रथम वाटले. परंतु तो हात खरंच क्षीण होत चालला होता. त्या हातातील शक्ती कोणीतरी शोषून घेत आहे, असे मला स्पष्ट जाणवत होते. हळूहळू ही क्षीणता सर्व शरीरभर पोहोचत चालली होती. धमन्यांतून, शीरातूंन वेगाने धावणारे रक्त हळूहळू मंद गतीने धावत आहे, शरीराची हालचाल मंद होत आहे अशी जाणीव क्षणाक्षणाला वाढू लागली. शरीरावर स्वतःचे नियंत्रण राहिले नव्हते. एखाद्या निर्जीव बाहुलीसारखे शरीर बनले होते. हळूहळू सगळे शरीर साथ सोडत होते. पण एक तरी बरे होते. मेंदूवर अजून थोडे  नियंत्रण होते. त्याच मेंदूच्या जोरावर, शरीराला स्वतःच्या काबूत ठेवण्याचा प्रयत्न करू लागलो. पण आता शरीर आवाक्याबाहेर गेले होते. शरीर पूर्णपणे अनियंत्रित झाले होते. आता ते कोणाच्या तरी नियंत्रणात गेले होते. कोणीतरी मला नियंत्रित करीत होते.
अचानक कानावर एक मोठा आवाज आला.
" एsssss तो ट्रक येत आहे. बाजूला सरकssss"
ते शब्द मलाच उच्चारून असावेत. कारण त्यांचा निर्देश माझ्याकडेच होता. म्हणजे मी रोडच्या अगदी मधोमध उभा होतो. ज्याने मला नियंत्रित केले होते, त्याने मला इथपर्यंत आणले होते. त्या आवाजाचे शब्द बाणासारखे माझ्या कानात घुसले. कानातून मेंदूपर्यंत गेले. काहीतरी संकट आले आहे, याची जाणीव झाली. ते संकट जवळ आले आहे असे वाटत होते. काही फुटांच्या अंतरावर एका ट्रकचे नाकाड आलेले दिसले. अवघ्या पास सहा फुटांवर. डोळ्यांच्या कपारीतून ते ट्रकचे भले मोठे नाकाड वेगाने माझ्याकडे येत आहे, एवढेच दिसले. तेवढे अंतर पार करून त्या ट्रकची जोरात धडक मला बसली. मला ती चांगलीच जाणवली. त्याच्या हातावरची माझी पकड ढिली झाली. जवळजवळ ती सुटलीच. हवेत चेंडू उसळावा, तसा मी हवेत उसळलो. लांब जाऊन, मी रोडच्या दुसर्‍या कडेला रक्तबंबाळ होऊन पडलो. शरीरातील सगळया हाडांचा चुरा झाला होता. वेदनांचा डंख मेंदूपर्यंत पोहोचत होता. डोळ्यापुढे हळूहळू अंधाराचे जाळे पसरू लागले. माझा मृत्यू जवळ आहे, ही जाणीव मला झाली.
आता रोडवरचे चित्र सुन्न करणारे होते. रोडवरची सगळी रहदारी जागेवरच थांबली होती. वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. रोडच्या अगदी मधोमध तो ट्रक थांबलेला होता. ट्रकपासून थोड्या अंतरावर माणसांची मोठी गर्दी जमली होती. त्या गर्दीसमोर पडलेला मी. रक्तबंबाळ अवस्थेत होतो.  शेवटचे क्षण मोजत होतो. माझी शेवटची धडपड चालली होती. पण त्याही अवस्थेत मला माझ्या मित्राची आठवण झाली. त्या वेड्याची! त्या विक्षिप्त वेड्याची! मला त्या क्षीण आणि रक्तबंबाळ अवस्थेतही, माझ्या मित्राची चिंता लागली होती. तोही माझ्यासोबत होता. मी त्याचा हात धरलेला होता. ट्रकच्या धडकेत तो कुठे पडला असेल. तोही रक्तबंबाळ अवस्थेत असेल का? या सगळ्या प्रश्नांनी माझ्या मनात चिंता निर्माण केली. मी कसेतरी धडपडत, त्या गर्दीला उद्देशून प्रश्न केला.
"तो कुठे आहे? तो वेडा! माझा मित्र वेडा! कुठे आहे तो?"
उत्तराच्या अपेक्षेने मी त्या सगळ्या गर्दीकडे बघू लागलो. मला असह्य वेदना होत होत्या.
" कोण वेडा? कोण तुझा मित्र? तू तर एक एकटाच रोड ओलांडत होतास. रोडच्या मध्यभागी येऊन तू जागेवरच थांबलास."
कोणीतरी गर्दीतून माझ्याकडे पाहून उत्तरले.
" काय?"
मला आश्चर्याचा धक्काच बसला.
"पण तो तर माझ्यासोबतच होता. मी त्याचा हात धरुन त्याला त्या झोपडीपर्यंत नेत होतो. तो त्या झोपडीत राहतो."
मी हाताने त्या झोपडीकडे निर्देशित करत म्हटले.
" कोणती झोपडी?" कोण वेडा? तिथे तर कोणतीच झोपडी  नाही."
गर्दीतला तो माणूस माझ्याकडे बघत म्हणाला.
मला आश्चर्याचा दुसरा धक्का बसला. मी रोडच्या पलीकडे त्या झोपडीकडे पाहण्याचा प्रयत्न केला. आणि माझ्या अंगावर सरसरून काटा आला. त्या रोडच्या कडेला कुठली झोपडी अस्तित्वात नव्हती.
" पण पणssतो तेथेच राहायचा. दिवसभर त्या झाडाच्या खाली बसायचा. मी तिथेच त्याला तासन् तास बोलायचो. दोघेही सायंकाळी तिथे चहा घ्यायचो."
मी माझ्या प्रचंड वेदना आवरून म्हणालो.
आता मात्र त्या गर्दीतले सगळेजण माझ्याकडे डोळे विस्फारून बघु लागले.
"त्या झाडाखाली कोणताच वेडा नव्हता.तूच एकटा त्या झाडाखाली बसून स्वतःचशीच बोलायचा. एकटाच हसायचा. चहाचे दोन ग्लास घेऊन जायचा. एक स्वतः प्यायचा आणि दुसरा ग्लास हवेत धरून चहा घे.. चहा घे... अस म्हण्याचा. जसं काही हवेत कोणीतरी अदृश्य आहे, त्यालाच चहा देत आहेस. असा भास व्हायचा. तेथे फक्त तू एकटाच, तास दोन तास स्वतःशीच बडबड करत बसायचास. त्यामुळे आम्ही तुला वेडा म्हणायचो.तुझे सगळे वर्तन वेड्यासारखे होते."
त्या चहाच्या टपरीवाला माझ्या अगदी समोर येऊन म्हणाला. मला धक्क्यावर धक्के बसत होते.तो वेडा ज्याच्याशी मी प्रत्यक्षात बोलायचो. तो अस्तित्वातच नाही असे कळाल्यावर काय अवस्था झाली असेल माझी? मी मरण्याच्या अवस्थेत होतो, आणि त्यात हे असे धक्के मला पचनी पडत नव्हते.
एका एका गोष्टीचा मला आता उलगडा होऊ लागला. तो वेडा मलाच का दिसायचा? कधी त्याला कोणाशी बोलताना आपण पाहिले का नाही? लोक माझ्याकडे बघून का हसायचे? मला वेडा का समजायचे? तो वेडा नव्हताच! मुळात तो अस्तित्वातच नव्हता! त्यात मानवी असे काही नव्हतेच. तो अमानवी होता. रोडच्या मध्यभागी मी स्वतःहून गेलोच नव्हतो .मला नियंत्रित त्यानेच केले होते. माझा अपघात त्यानेच घडवुन आणला. हो! हो! त्यानेच .माझ्या मित्राने. त्या वेड्याने! त्या विक्षिप्त वेड्याने!
म्हणजे! म्हणजे !झालेले चार अपघातही  त्यानेच घडवून आणले. आता माझा अपघातही त्यानेच घडवला. आणि आता येथून पुढेही तो अपघात घडवेल.अपघाताचे हे सूत्र असेच सुरू राहणार. असाच तो कोणाला कोणाला दिसत जाणार. काही दिवसांनी त्याचा अपघात होणार. हे चक्र असेच सुरू राहणार. मला एक प्रचंड धक्का बसला. माझी शक्ती क्षीण होत चालली होती. माझा शेवट जवळ आला होता.
माझ्या डोक्यातून ओघळणारे रक्त रोडवरून खाली एका घळई जवळ जात होते .त्या घळईच्या कडेला तो बसला होता. तो माझा मित्र. तो वेडा. तो विक्षिप्त वेडा. एकदा माझ्या त्या लालभडक रक्ताकडे बघत आणि एकदा माझ्याकडे बघत, तो फिदीफिदी हसत होता. विक्षिप्तपणे हातवारे करत होता. ओठातल्या ओठात काहीतरी मंत्र पुटपुटत होता. वर आकाशाकडे बघत होता .काहीतरी विचित्रपणे हावभाव करत होता. कदाचित आता माझ्यानंतर कोणाला तरी स्वतःच्या पाशात ओढायची तयारी करत होता.  माझ्या अंगावर एक सरसरुन काटा आला. शरीरात होते तेवढे त्राण आणून, त्या गर्दीला तो वेडा दाखवत होतो. पण त्याचा काही फायदा झाला नसता. कारण मला माहित होते. तो कोणाला दिसणार नाही. तो केवळ मलाच दिसतो. नाही! नाही! केवळ मला नाही.माझ्या अगोदर त्या चार जणांना, त्यानंतर मला आणि उद्या कदाचित पुन्हा कोणाला तरी तो दिसणार. तो आता असाच कोणाकोणाला दिसणार. आणि दिसतच राहणार. मग पुन्हा येथे अपघात होणार. या एकाच जागी आणि केवळ ट्रकच्याच धडकेने .
आता शेवटची घटका जवळ आली होती. डोळे मिटताना, मला ते शेवटचे दृश्य दिसत होते. कोणीतरी एक वीस पंचवीस वर्षाचा तरुण, त्या वेड्याला त्याच्या झोपडीकडे पोहोचवत होता. त्याच्या झोपडीपर्यंत! माझ्या चेहऱ्यावर एक हलकेच स्मित उमटले. त्याला बळीचा बकरा भेटला होता...

*समाप्त
वैभव देशमुख.

Group content visibility: 
Use group defaults

बन्याजी,
कथेत अस टाकाव लागत.
एका वाक्यात शेवट नाही करता येत.
तसा केला तर कथा बेचव होते. मागचे संदर्भ कळत नाहीत. मृत्युशय्येवरच्या माणसाने अख्खी कादंबरी सांगितलेली आहे. ही तर कथा आहे.

उत्तम,खिळवून ठेवणाऱ्या कथा असतात आपल्या वैभवजी!
आपल्याला नैराश्य आलं तर अवतीभवती भास होतो एखादा व्यक्ती किंवा कल्पनेतलं जग समोर असल्याचं!
तुम्ही तर रहस्यकथा expert झालात!

पुलेशु

चंद्रमाजी,
thank you very much.
खूप छान वाटत असा प्रामाणिक अभिप्राय आल्यावर.
असाच लोभ कायम असू द्यात.