कळा ज्या लागल्या जिवा !...

Submitted by Sujata Siddha on 31 May, 2021 - 05:41

कळा ज्या लागल्या जिवा !...

“चिनू ssss आवरलं का गं ? आटप लवकर , आठ ला पाच कमी आहेत ,आत्ता येतील बघ रिक्षावाले काका “ सुप्रियाने ने आवाज दिला, तशी
छोटी चिनू बाथरूम मधून अंघोळ आटपून बाहेर आली आणि रूम मध्ये पळाली .. पाच वर्षांच्या चिनू ला सुप्रियाने मुद्दामच स्वतः;ची अंघोळ स्वतः: करायला शिकवली होती . शक्यतो सगळी कामे तिने स्वतः:ची स्वतः: करावीत कोणावरही अवलंबून राहू नये याची सुप्रिया ‘कटाक्षाने काळजी घ्यायची . कारण ती स्वतः: तशीच स्वावलंबी आणि स्वाभिमानी होती . लहानगी चिनू स्वतःचं पटापट आवरून , टेबलाशी येऊन बसली , तोपर्यंत दूध गरम झालेलंच होतं त्यात तिच्या आवडीचं बोर्नव्हिटा टाकून , सुप्रियाने तिच्यापुढे ग्लास ठेवला , “आज डब्यात सॉल्टेड पोळी आणि ‘नारळाच्या वड्या ‘आहेत बच्चा “, तिच्या गोबऱ्या गालाची पप्पी घेत सुप्रियाने तिचा टिफिन पॅक करून तिच्या हातात दिला . लोणचं लावलेल्या पोळी ला ‘सॉल्टेड पोळी’ हे चिनून केलेलं नामकरण . आंबटगोड आणि थोडंसं खारट लोणचं लावलेली पोळी तिला आवडायची .आपली छोटीशी टिफिन बॅग हातात घेऊन चिनू खुशीत बाहेर आली , शूज , सॉक्स सगळं घालूंन इवलेसे पाय हलवत सोफ्यावर बसून ती रिक्षेवाल्या काकांची वाट पहात राहिली .पाचच मिनिटात रोहन , केतकी, अवनी, अमेय यांनी नेहेमीसारखा खालून आवाज दिला “ आर्या sssssss, आर्या sssss आर्या ssssss आर्या ssssss “
“आले ssssss “ सोफ्यावर बसलेली चिनू टुणकन उडी मारून उतरली आणि खाली पळत गेली,जाता जाता तिने सुप्रियाला आवाज दिला, “आई मी चालले गं SSSSSS “ सुप्रिया पळत दाराशी येईपर्यंत ती खाली गेली देखील होती ,मग खिडकीतूनच तिला बाय बाय करून , सुप्रिया परत आत आली ,घरातला पसारा आवरला , स्वतः:चं आवरलं , बेडरूम मध्ये लोळत पडलेल्या ‘अमोघ ‘ला हाका मारून उठवायचा एक असफल प्रयत्न केला ,हल्ली त्याचं पिणं खूप वाढलं होतं , त्याला जोरजोरात हलवूनही तो ढिम्म जागचा हलला नाही तेव्हा ती चिडली आणि त्याला उठवायचा नाद सोडून देऊन पुन्हा स्वयंपाक घराकडे वळली , आतलं सगळं आवरून त्याचा नाश्ता टेबलवर काढून ठेऊन ती ऑफिसला निघून गेली .
दुपारी १२ वाजता शाळा सुटली की चिनू ची रिक्षा परस्पर आजी कडे म्हणजे सुप्रियाच्या आईच्या घरी जात असे , मग संध्याकाळी ऑफिसमधून ‘सुप्रिया ‘आईकडे जाई आणि चिनू ला घेऊन घरी जाई . आजही चिनू रोजच्याप्रमाणे आजीकडे गेली , पण आजी घरी नव्हती , पेन्शन घेण्यासाठी बँकेत गेली होती , चिनुने बेल वाजवली तशी दार उघडायला मामी आली ,आणि दार अडवून उभी रहात म्हणाली “अहं यायचं नाही आत आज पाळणाघर बंद आहे sssss तुमची आजी आज बाहेर गेलीये “ मामीचा टोमणा लहानग्या चिनू ला कळला नाही , आपले छोटे दुधाचे दात दाखवत ती तोंडभरून हसली ,आणि मामीच्या हाताखालून आत शिरली , ,पाठीवरची टेडी बेअर ची सॅक काढून खुर्चीवर ठेवत ती बाथरूम मध्ये पळाली.
“ऐकतेय का कार्टी , लाडावून ठेवलीये नुसती तिला “ स्वतः:शीच बोलत मामी आत स्वयंपाक घराकडे गेली , ती वरण भात वाढतेय तोवर कपडे बदलून , चिनुने टिफिन घासायला टाकला , वॉटर बॉटल मधलं राहिलेलं पाणी सिंक मध्ये ओतून न देता छोटया पेल्यात जेवताना प्यायला घेतलं , ह्या सगळ्या सवयी सुप्रियाने तिला लावल्या होत्या , मामीने जेवायला वाढलं खरं पण गार गार भात आणि वरण चिनूला अजिबात आवडलं नाही , कसेबसे दोन-तीन घास चिवडून ती उठली , आणि हात धुवून खेळायला बाहेर पळाली ”अगं तो भात खा ना , उष्टा टाकून पळाली कार्टी , ए sssss चिनू “ मामी रागारागाने हाका मारत तिच्या मागे गेली पण चिनू तोपर्यंत पसार झाली होती .
संध्याकाळी सुप्रिया येताना दिसली तशी बाहेर खेळत असलेली चिनू पळत तिच्याजवळ आली , सुप्रियाने तिला वर उचलून कडेवर घेतलं ,कपाळावर आलेले तिचे कुरळे केस वात्सल्याने मागे सारत , तिला विचारलं “मन्या आज चेहेरा का एवढा बारीक झालाय ? दिवसभर उन्हात खेळलं का माझं पिलू ?” त्यावर डोळे चोळत चिनू तिच्या खांद्यावर डोकं टेकवून पडून राहिली . पेंगुळलेल्या तिला तशीच आत घेऊन येता येता सुप्रियाने आवाज दिला , “ आई ssss अगं आज मी येईपर्यंत चिनू बाहेर खेळत होती , तिला दुपारी झोपवलं नाहीस का ?”
“आई नाहीयेत .. आज बँकेत पेन्शन घ्यायला गेल्या आहेत त्या आणि तशाच पुढे सुमा मावशींकडे जाणार होत्या .” वहिनीने पाणी देता देता सुप्रियाला सांगितलं
“ओह , मला बोलली नाही काही , दुपारी फोन केला होता तेव्हा नुसती रिंग वाजत होती , तू पण नव्हतीस का घरात ?“
“ मला जाऊन कसं चालेल वन्स ? मग चिनूची ड्युटी कोण करणार ? आणि आज चिनुने भात उष्टा टाकला बरं का वन्स , हाका मारत होते तर पळून गेली बाहेर “
“ अगं तिला गरम लागतो वरण -भात त्या शिवाय खात नाही ती आणि ड्युटी काय म्हणतेस गं ? घरच्या माणसांची कसली आलीये ड्युटी ? तुम्हाला बाहेर जायचं असतं तेव्हा सांगताच की मला, मी करते ना तेव्हा अड्जस्ट आणि पैसे ही घेताच की तिला सांभाळायचे “ सुप्रिया त्रासिकपणे म्हणाली .
“ अहो गम्मत करत होते तर लगेच पैशांवर काय येता ,कमाल आहे बाई किती फट्कन बोलता “
“हं “ फट्कन बोलायला सुरवात कोणी केली ? असं सुप्रियाला म्हणावंसं वाटलं पण ती उघड काही बोलली नाही तिला पुढे बोलायचा कंटाळा आला .
“चहा टाकायचा का ?”
“नाही नको असू दे , मी आता घरी जाऊनच घेईन “ खांद्यावरच झोपलेल्या चिनू ला सांभाळत सुप्रिया म्हणाली . पिल्लू माझं आज उपाशीच आहे म्हणजे , सुप्रियाच्या गळ्याशी आवंढा आला , झोपलेल्या चिनूच्या गालाची एक हळुवार पापी घेऊन तिने तिला अलगद मागे स्कुटी वर बसवलं , पेंगत असलेल्या तिला ओढणीने आपल्या पोटाशी बांधून ती घरी निघाली .
घरी आली तर ‘अमोघ ‘आलेलाच नव्हता , आता रात्री नेहेमीसारखा ढोसून येईल , तोल सावरता येत नसला तरी कुठेही न धडपडता बरोब्बर घरी येईल ,चालताना झोकांड्या खात असूनही आजवर एकाही दारुड्याचा अक्सिडेंट झालेला तिने पाहिला नव्हता . याच्या बाईकचा ही कधी बॅलन्स गेलेला तिला आठवत नव्हता , आता येईल ,आयतं गिळेल आणि आडवा पडेल . मुलगी बायको जेवली का वैगेरे गोष्टींची त्याला काही फिकीर नाही ,विचारांनीच सुप्रियाचा तडफडाट झाला , चिनूला बेड वर झोपवून ती हात पाय धुवायला बाथरूम मध्ये गेली तितक्यात धाडदिशी दार उघडून अमोघ आत आला , आजही चिक्कार प्यायला होता . त्याला बघून तिचं मस्तक भणाणून गेलं ,खाड्कन एक मुस्काटात ठेऊन द्यावी असं वाटून गेलं , तरातरा त्याच्यापुढे जात ती म्हणाली , “या ssssss आजही बेधुंद झालेत साहेब . एवढ्या धुंदीत घर कसं बरोब्बर सापडतं नाही? “
“सॉsssssरी सॉरी ..” धडपडत आत येता येता तिला बाजूला सारून बेडरूम कडे जाताना अडखळत त्याने बोलायचा प्रयत्न केला , ‘
“ लाज वाटते का ? ‘सॉरी’ म्हणून या तुझ्या असल्या वागण्यावर पांघरूण घालता येतं का ? पैसे कुठून आणतोस रे ? “ यावर तिच्याकडे लक्ष न देता तो पुढे जायला लागला , पण त्याला रस्ता सुधारत नव्हता , तसं त्याला मागे ओढून तिने त्याची कॉलर पकडली ,आणि दात ओठ खात विचारलं , “सांग ना डुकरा अरे sss ?” पैसे कुठून आणतोस ? ईथे सगळं भागवता भागवता माझ्या नाकी नऊ येतात आणि तु मात्र आपल्याच मस्तीत , बोल ना कुत्र्या .. ..” यावर अमोघने जडावलेली नजर वर करून तिच्याकडे रागाने पाहिले , तिने अपशब्द उच्चरलेले त्याला आवडले नाही , मग त्याने बेडरूम मध्ये झोपलेल्या चिनू कडे पाहिले , तिच्यासमोर सुप्रिया त्याचा उद्धार करते याचाही त्याला राग यायचा , त्याला बोलायचं होतं पण जीभ वळत नव्हती , सुप्रिया पुन्हा चवताळून काही बोलणार तोच तिचं समोर लक्ष गेलं ,चिनू उठून बसली होती आणि भेदरून त्या दोघांकडे बघत होती . त्याबरोबर ‘अमोघ’ ला ओलांडून सुप्रिया पळत बेडरूम मध्ये आली आणि चिनूला जवळ घेऊन म्हणाली , “चिनू ए शोना , झोपू नको राजा , थांब लगेच कुकर लावते , जेवून मग झोप “ यावर झोपेतच मान डोलावून ती सुप्रियाला बिलगून परत झोपी गेली. तोपर्यंत अमोघ हॉल मधल्याच सोफ्यावर पालथा पडला आणि घोरायला देखील लागला . त्याच्या दारूचा आंबूस घाणेरडा वास सगळ्या घरभर पसरला होता ,एका क्षणात घर निपचित शांत झालं , सुप्रिया सुन्न होऊन बसून राहिली ., संताप , तिरस्कार, कीव , हतबलता , नैराश्य सर्व भावनांनी तिच्यावर एकाच वेळी आक्रमण केलं आणि मग ती स्फुंदून स्फुंदून रडायला लागली , तिच्या जवळ झोपलेली चिनूची झोप त्या आवाजाने चाळवली आणि आपल्या एवढ्याशा हाताने झोपेतच ती तिचे डोळे पुसू लागली , “मम्मा ..नको रडूस .. “ असं काहीसं पुटपुटत राहिली . तिला बिलगून सुप्रिया कितीतरी वेळ रडत राहिली .आणि मग चिनुजवळच तशीच मुटकुळं करून झोपून गेली.

पहाट व्हायच्या आधीच पुन्हा सुप्रियाला जाग आली , उठल्याबरोबर तिला रात्रींचा प्रसंग आठवला आणि मन खिन्न झालं . शेजारी झोपलेल्या चिनूच्या निरागस चेहेऱ्याकडे बघून तिचे डोळे डबडबले . का या निष्पाप जीवाला या जगात आणलं मी ? हिचं नीट पालन पोषण करण्याची , जबाबदारी घेण्याची कुवत नसताना ?,अजून हिचं आख्ख आयुष्य जायचं आहे , हिचं शिक्षण कसं करू ? हिच्या कोवळ्या मनावरचे आघात कसे पुसू ? ती जन्माला यायच्या आधी कसं सगळं नीट होतं ,अमोघचा ऍडर्व्हटाईझिंगचा बिझिनेसही बरा चालला होता , चिनू चा पहिला वाढदिवस किती थाटात केला होता आपण , सगळे त्याला म्हणत होते की आई आणि मुलगी आजच्या दिवसाचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे . यांनाच घेऊन एक जाहिरात कर ,पण चिनू जेमतेम दीड वर्षाची झाली आणि ‘अमोघ’ ला बिझिनेस मध्ये खूप मोठा फटका बसला त्यातून तो सावरलाच नाही , एवढ्या तेव्हढ्या फटक्यांनी पुरूष लगेच कोसळून कसे जातात ? आणि आता मी काय करायचं अशा परिस्थितीत ? रोज हे असेच तमाशे सहन करायचे आणि चिनूचंही बालपण ह्याच्यात करपवून टाकायचं का ? तिच्या बालपणातले आनंदी कोवळे क्षण हिरावून घेऊन त्या जागी असे करपलेले , उदास क्षण तिच्या वाट्याला आणायचा अधिकार मला कोणी दिला ? पुन्हा डोळे पाझरायला लागले . तितक्यात तिला चाहूल लागली तसं डबडबलेल्या डोळ्यांनी तिने मान वर केली , अमोघ सोफ्यावरून उठून आत आला होता , तिने अतिशय असहाय्य चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिलं ,
“कधी संपणार हे सगळं ? नको करूस तु काही काम पण निदान दारू पिऊन त्रास तरी देऊ नकोस रे , मी पाया पडते तुझ्या “
“झालं का तुझं सुरू ? काय त्रास देतो गं मी ? तुझ्याकडे पैसे मागतो का दारू साठी ? ? का तुला मारहाण करतो ,का तुझे पैसे चोरतो ? बघावं तेव्हा चिनू समोर मला झापडत असते , आणि काल डुक्कर म्हणालीस चिनू समोर , लहान मुलांसमोर अशी भाषा वापरतात का , बाप म्हणून माझी काय किंमत ठेवेल ती मोठेपणी ? रागाच्या भरात तू काय बोलतेस याचं भान असतं का तुला ? डुक्कर काय ,कुत्रा काय ? च्यायला झोपडपट्टीत आल्या सारखं वाटतं . हेच संस्कार शिकवले का तुझ्या आई वडिलांनी ? “
“ हे जे काय समोर तुझं ध्यान उभं आहे ना , त्यावरून तुला किती संस्कार आहेत , मला आता त्यावर बोलायला लावू नकोस , आणि माझ्या आई -वडिलांनी संस्कार दिले म्हणून तुझा संसार चालू आहे हे लक्षात ठेव ,चार वर्ष होत आली तुझं हे रोजचं नाटक झेलते आहे “
“ नको झेलूस मग , कुणी अडवलंय तुला , सतत आपली तलवार बाजी सुरू , आणि झेलते म्हणजे तुझ्याकड़े ऑप्शन नाही ना म्हणून गप्प बसलीयेस , नाहीतर गेली असतीस केव्हाच निघून समजलीस ? “
यावर चवताळून पुन्हा सुप्रिया काही बोलणार तोच चिनू ने झोपेत हालचाल केली . त्याबरोबर तिला आठवलं काल रात्री चिनू उपाशीच झोपली , मग अमोघ चा नाद सोडून ती पट्कन उठली . सकाळचे सहा वाजत आले होते , तिने भराभर स्वतः:चं उरकलं , चिनूला उठवलं आवरलं , अमोघने तणतणत स्वतः:चा चहा करून घेतला आणि तो मॉर्निग वॉक ला निघून गेला , तिला त्याच्या या स्वभावाने नेहेमीच थक्क व्हायला व्हायचं . कमावत नव्हता तरी त्याचं सगळं तब्येतीत चालायचं , मॉर्निग वॉक , मग ब्रेकफास्ट, मग अंघोळ ,देवपूजा आणि मग आवरून कुठेतरी बाहेर जायचा , दुपारी जेवायला आणि झोपायला घरी यायचा , मग चार वाजता चहा घेऊन पुन्हा बाहेर जायचा ते थेट रात्रीच दारू पिऊन घरी यायचा मग सुप्रियाच्या मागे लागायचा , तुझ्यासारख्या घमेंडी बाई च्या जीवावर मला जगावं लागतंय याचा मला खूप त्रास होतो म्हणून मी दारू पितो . मग तिचं त्यावर उत्तर ठरलेलं असायचं लाज वाटते तर काम धंदे करा नाहीतर घर सोडून चालते व्हा , पुढे पुढे दिवसाही दारू सुरू झाली .तिला वाटे हे असंच बिनबोभाट चालू द्यायचं नाही , रादर याला कुठेतरी आळा बसलाच पाहिजे , एकदा घरातून बाहेर हाकलूनही दिलं होतं , मग रात्रभर तो कुठेतरी भटकत राहिला ,सकाळी दारात पुन्हा हजर .अशावेळी लहानग्या चिनूला तो पुढे करत असे , अमोघ ची दारू सुटावी म्हणून तिने हरतऱ्हेचे प्रयत्न केले होतेच की , काउन्सेलर झाले, होमिओपॅथ झाले , A.A. च्या मीटिन्ज अटेंड करायलाही अमोघला तिने भाग पाडलं , जोपर्यंत तो मीटिंग्ज अटेंड करत होता तोवर ठीक होता , मग मध्येच त्याने सगळं बंद केलं आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न , या सगळ्यात चिनू चं बालपण मात्र कुठेतरी हरवून गेलं . चिनू कडे म्हणावं तसं लक्ष द्यायला सुप्रियाला जमलं नाही . तिचं खाणं पिणं , शाळा अभ्यास यात तिने काही कमतरता पडू दिली नाही पण तिच्या मानसिक घडामोडीं कडे तिचं दुर्लक्ष झालं ,जशी ती मोठी होत गेली तशी तिला आई- बाबांच्या सहवासाची खूप गरज वाटू लागली , अमोघ तर स्वतः:च शुद्धीत नसायचा आणि सुप्रियाचा त्याला सुधारण्याच्या मागे लागता लागता , प्रपंचातली ओढाताण सांभाळता सांभाळता येणारा ताण ,बऱ्याचदा चिनूवर खेकसण्यात आणि मारण्यात निघू लागला ,
एकदा असंच कधीतरी संध्याकाळी सोफ्यावर बसलेली असताना सुप्रियाला भिंतीवर क्रेयॉन पेन्सिल ने लिहिलेली एक बारीकशी ओळ दिसली ‘‘सुप्रिया ,अमोघ प्लिज स्टॉप …’‘, तोडक्या मोडक्या अक्षरात लिहिलेल्या त्या वाक्यात आई-वडिलांच्या भांडणाचा आलेला तिटकारा सुप्रियाला स्पष्ट दिसला , आपण तिच्यासमोर भांडत असताना तिला सहन न होऊन , तिने हे लिहिलं असावं , आई-बाबा ही लिहावंसं वाटलं नाही ईतका राग आला असेल का तिला ? सुप्रियाला एकदम कसंतरीच झालं , तत्क्षणी सुप्रियाने निर्णय घेतला की कितीही ताण येऊ दे अमोघ शी भांडायचं नाही, तसंही तो आपण होऊन भांडत नाही , त्याचं पिणं आणि त्याचा ऐतखाऊपणा सहन होत नसल्याने आपणच बोलतो त्याला आणि मग भांडण सुरू होतं . त्या दिवसापासून ती त्याला बोलेनाशी झाली .पण तिचा हा निश्चय फार काळ टिकला नाही , काही दिवसांनी पुन्हा भांडणं सुरू झाली .

पाचवी सहावी नंतर क्लासेस च्या वेळांमुळे चिनू आता आजी कडे न जाता सरळ घरी येत असे , घराची एक चावी तिच्याकडे होतीच , आता ती सातवीला गेली होती , अशीच एकदा सुप्रिया ऑफिसमधून लवकर घरी आली तर चिनू घरी आलेली दिसली , उदास चेहेऱ्याने खिडकीतून एकटक कुठेतरी बघत होती, पायातली चप्पल कशी बशी काढून ती घाईघाईने चिनू जवळ येऊन बसली , “चिनू अशी का बसलीयेस ? काय झालं ?”
चिनुने एकवार सुप्रियाकडे वळून पाहिलं आणि पुन्हा खिडकीतून बाहेर शून्यात बघत राहिली . तिचा तसा चेहेरा
पाहून सुप्रियाला कसंतरी झालं ,एरवी अमोघ चं जरी असलं काही चालू असलं तरी चिनू अशी शांत कधीच बसलेली तिने पहिली नव्हती ,लहानपणापासून खूप बडबडी आणि दंगेखोर होती ती .
“ चिनू अगं बोल ना पट्कन मला कामं आहेत गं पुढची ,अजून स्वयंपाक करायचाय , त्याच्या पुढे बाकीची कामं “
“ मग कर ना तुझी कामं तु , तुला काही बोललेय का मी ? , माझ्यासाठी तुझ्याकडे वेळ नसतो , माहिती आहे मला . “
“तुझ्यासाठी वेळ नसतो म्हणजे ? मग हे सगळं कोणासाठी चाललंय चिनू ? ऑफिस मध्ये दिवसभर ताबडून घरी आल्यावर चहा सुद्धा घेत नाही मी , तशीच कामाला लागते , रात्री पुन्हा शेजारच्या शामिकाच्या लीगल डॉक्युमेंट्सची काम करून देते , कोणासाठी करते हे सगळं मी ? जरा तरी जाणीव आहे का तुम्हा लोकांना त्याची ? तू ही काही लहान नाहीस आता , बघतीयेस ना घरात काय परिस्थिती आहे ? का बाप आणि लेक दोघेही सारखेच ? कितीही करा तुमच्यासाठी, किंमत नाहीच काडीची “ सुप्रिया तणतणत तिथून उठली . आणि स्वयंपाक घराकडे निघाली ,
“आई अगं मला का बोलतेस सारखी त्यांच्यावरून? मी काय केलंय तुला ? तुला त्रास होतो तर नको करूस ना माझ्यासाठी काही , माहितीये मला मी तुझं अनवाँटेड चाईल्ड आहे , पण मग आता मी काय करू ? कुठं जाऊ ? कोणालाच मी नको आहे “ चिनुचे डोळे पाण्याने डबडबले. तिचे हे शब्द स्वयंपाक घरात शिरणाऱ्या सुप्रियाच्या कानावर आदळले आणि ती त्याच पावली वळून चिनू कडे आली , “काय म्हणालीस ? अनवाँटेड चाईल्ड ?आता हा काय नवीन प्रकार ? तुला कोणी सांगितलं हे की तु माझं अनवाँटेड चाईल्ड आहेस म्हणून ? “
“माहितीये मला “ चिनू वेदनायुक्त स्वरात पण ठाम पणे बोलली .
आता मात्र सुप्रियाने तिच्यासमोर बसकण मारली , तिची हनुवटी आपल्याकडे वळवत सुप्रिया तिला म्हणाली “चिनू ए राजा ईकडे बघ माझ्याकडे “
चिनुने तिचा हात झटकला , यावर सुप्रियाने तिला आपल्या कुशीत ओढलं , “ माझ्या पिल्ला , आजी तुला लहानपणी गोष्टी सांगायची ना ,राक्षसाची ? त्याचा प्राण इवल्याशा पक्षात असतो , तसा माझा प्राण तुझ्यात आहे , तुझ्या डोक्यात असं भलतं का घुसलं ? मी मारते , ओरडते म्हणून ? पण मी तुला खाऊ आणते , तुझ्या आवडीच्या गोष्टी तुला घेऊन देते , अनवॉंटेड चाईल्ड ला असं कोणी करत नाही , आणि चाईल्ड कधीच अनावँटेड नसतं गं बबडे , निदान एखाद्या आईसाठी तर नक्कीच नसतं , तुला असं का वाटलं मन्या , ?’
यावर ती काहीच बोलली नाही , आपलं अभ्यासाचं साहित्य घेऊन बेडरूम मध्ये निघून गेली.
सुप्रिया तिच्या मागेमागे गेली , “ सांग ना गं , असं का वाटलं तुला ? मी ओरडते म्हणून ? “
“तू जा आई , तुझी कामं कर , मला माझा अभ्यास करू दे .”
सुप्रियाला कसं तरी झालं , रात्री बेडवर सुद्धा ती तळमळत राहिली ,आपल्या लेकराला आपण नकोसे आहोत हे फील करून देण्याईतपत आपण तिच्याशी वाईट वागलो का ?
असेच काही दिवस गेले पण चिनुचा ‘अन वॉन्टेड चाईल्ड ‘ हा शब्द तिचं मन कुरतडत राहिला . मग एके दिवशी मनाशी काही ठरवून हाफ डे घेऊन ती घरी आली , चिनू शाळेत गेली होती ,संध्याकाळी चिनू घरी यायच्या आधी तिने चिनूला आवडतो तसा केळ घालून मऊसर शिरा केला ,तिलाआवडतात ते मटार सामोसे तिने येतानाच आणले होते . चिनू नेहमीसारखी लॅच ने दार उघडायला गेली तर घर उघडंच होतं .
“आई तू कशी काय आज घरी ? “ तिच्या चेहेऱ्यावरचा आनंद लपत नव्हता .
“ तुझ्यासाठी हाफ डे घेतला गं, म्हटलं तुला सरप्राईज द्यावं “
“खोटं , दुसरं काहीतरी अर्जंट काम निघालं असेल ,माझ्यासाठी कशाला घेशील हाफ डे “ चिनू शूज काढून बाथरूम मध्ये हात पाय धुवायला जाता जाता म्हणाली .
“ बरं खोटं तर खोटं ,जा कपडे बदलून ये , मी तुझ्यासाठी मस्त केळ घालून शिरा केलाय “
“ , यम्मी ssssss .. “ चिनू आनंदाने चित्कारत बाथरूम मध्ये पळाली .थोड्याच वेळात कपडे बदलून फ्रेश होऊन ती स्वयंपाक घरात आली आणि डिश मध्ये शिऱ्याबरोबर मटार सामोसे बघून लहानपणी खुर्चीवर बसून पाय हलवत खायची तशी पाय हलवत मच मच आवाज करत खायला लागली , तसं सुप्रियाने ओळखलं की गाडी खुशीत आहे .
“चिनू मला एक सांगशील ?”
“हो ssssss “
“ तुला असं का वाटलं की तू माझं ‘अनवॉन्टेड चाईल्ड’ आहेस ? “
“ सोड ना ममा , तू अजूनही तेच डोक्यात धरून बसलीयेस . मी एक्सेप्ट केलय ते आता “
“ Accept केलंय म्हणजे ? “
“ म्हणजे मला आता त्याचं काही वाटत नाही “
“पण तुला असं का वाटतं मनू ? “
“ आई sss तु किती धरून बसलीयेस ही गोष्ट , ईरीटेट होतंय मला “
“ अगं चिनू ही गोष्ट गंभीर आहे , तुला जर असं वाटत असेल तर ते चांगलं नाही ना गं , तु माझ्यापासून लांब जाशील अशाने “
“लांब म्हणजे काय ?”
“ ते जाऊ दे , मला सांग मी रागारागाने बडबडते त्याच्यामुळे तुला असं वाटायला लागलं का ? “
“नुसतं वाटत असतं तर वेगळी गोष्ट होती आई , मला माहितीये , मला असं कळलं की मी तुला नको होते “
शिऱ्याचा चमचा चाटत चिनू म्हणाली
“ तेच विचारतेय मी तुला कसं कळलं ? “
“मला सांगितलं “
“कोणी ? “
“तू तिला काही बोलणार नाहीस ना ? “
“नाही बोलणार “
“प्रॉमिस ?”
“प्रॉमिस गं ,बोल पट्कन “ सुप्रियाचा जीव कासावीस झाला
“ मामी “
“मामी ? तिने ने तुला सांगितलं ? केव्हा ? “ सुप्रियाचे डोळे अविश्वासाने आणि आश्चर्याने विस्फारले
“ खूप आधी , मी जेव्हा शाळेतून परस्पर आजीकडे जायचे तेव्हा “
“ काय म्हणाली मामी तुला ? “
“ मामी म्हणाली की तुझी आई रोज तुला ईथे टाकून जाते कारण तु तिला आवडत नाहीस , तु तिचं अनवाँटेड चाईल्ड आहेस ,तु जन्माला आलीस म्हणून तिला तुला सांभाळण्यासाठी तिला नोकरी करावी लागते “
“बबड्या तुला या शब्दाचा अर्थ तरी कळायचा का गं तेव्हा ? “
“नव्हता कळत मामीनेच सांगितला “
“ आणि तुला ते खरं वाटलं ?
“ हो , कारण ती कुठे तिच्या मुलीला असं दुसरीकडे ठेवायची ?”
“ अगं मी तुला टाकून नव्हते जात बेटा , ती तुझी आजीच होती ना ? तुला ईकडची आजी असती तर तू घरीच राहिली असतीस “
“ ममा , चिल तू का एवढी मनावर घेतेस ? मला आता त्याचं काही वाटत नाही “
“काही वाटत नाही म्हणजे ? तुला हे मान्य आहे ? पाच वर्षाच्या मुलीला काय सांगावं आणि काय सांगू नये याची अक्कल नसलेल्या त्या मूर्ख बाईवर तुझा विश्वास आहे ,आणि जिने आपल्याला एव्हढ्या कष्टातून लहानाचं मोठं केलं त्या आपल्या आईवर नाही ?”
“ हे बघ हेच हेच , सारखी तु हे जे म्हणत असतेस ना ? मी कष्ट केले , मी वाढवलं त्याचाच राग येतो मला , सगळेच करतात आपल्या मुलांसाठी कष्ट , तू सारखं स्वतः:चच कौतुक करत बसतेस , मी जशी जशी मोठी होत गेले तुला आणि बाबांना कधी एकमेकांशी नीट बोलताना पाहिलं नाही , जेव्हा जेव्हा बोलता तेव्हा भांडता , त्यांनाही तु सारखं हेच ऐकवत असते , आणि त्यांच्याशी भांडण झालं की तु न चुकता माझा उद्धार करतेस आम्हाला असं वाटतं कुठून तुझ्या जीवावर खातोय , कशाला गिल्ट देतेस, तु ? असं सतत बोलतेस मग मला खरं वाटणारच ना ? बाबा तर आजपर्यत कधीच मला असं बोलले नाहीत किंवा ओरडले पण नाहीत .तु मात्र सतत बोलून दाखवतेस मग मामी म्हटली ते खरंच असेल ना ”
यावर सुप्रिया निरुत्तर झाली ,आपण आपल्याही नकळत आपलीच माणसं म्हणून , आपल्यावर येणारा ताण बोलून दाखवला तर त्यातून हे निष्पन्न व्हावं ? ईतके गाफील राहिलो आपण ? ईतकी वर्ष आपण झिजतो आहोत , आनंदाचे क्षण अगदी क्वचित वाट्याला आले आपल्या , कधी एखादा ड्रेस आवडला तर पहिला विचार चिनुचा करायचा , तिला छान कपडे घेतले पाहिजेत , कधी चप्पल घ्यावीशी वाटली तर पहिले चिनू चे शूज डोळ्यासमोर यायचे , अमोघ चे ही कपडे एवढाच काय त्याचा बनियान , त्याचा टूथ ब्रश हेही आपण आणल्याशिवाय त्याला मिळत नाही , हे या दोघांनाही दिसलं नाही कधी ? दिसलं तर फक्त आपलं बोलणं आणि घमेंड ?मग मिळवलं काय आपण ? संसाराचा डोलारा पेलण्यासाठी जे बळ आणलं होतं ते एकाएकी संपलं असं तिला वाटून गेलं. एखादी खूप मोठी लढाई जिवाची बाजी लावून खेळताना , जिकंत आलीये असं वाटत असताना जर एकदम असं कळलं की आपला पक्ष शत्रूला कधीच मिळला आहे आणि युद्धात आपल्या बाजूने आपणच एकटे लढत आहोत , तर जसं होईल तसं तिला झालं .
पराभूत होण्यापेक्षाही आलेलं हे एकाकी पण भयकंर होतं !...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचुन मनात कालवलं. Sad लहान मुले निरागस असतात पण त्यांचे भाव विश्व उध्वस्त करणारे परीणामांचा विचार करत नाहीत. ही कथा असली तरी एखादी स्त्री, जिच्या आयुष्यात खरच असे प्रसंग येतात, ती किती असहाय बनत असेल.

सुप्रियाची फरफट-चीडचीड, असहायता आणि चिनूचे अकाली संपून गेलेले बालपण पोहोचले. >>>> +९९९