दिवेलागणी

Submitted by shrishrikant on 20 May, 2009 - 01:53

मी तुटून लिहीतो कविता
हे दु:ख पचविण्यासाठी
सांगाती माझ्या आल्या
संचितास पडल्या गाठी

एवढ्या लांबूनी तारा
अंधार उजळतो वक्षी
मेंदीच्या तळहातावर
भयदग्ध फुलांची नक्षी

भय इथे इथे भरलेले
हळूवार फुलांच्या साली
सोलूनी कुणी घेतांना
हंबरून संध्या आली

मज दिवेलागणी म्हणजे
तुटलेली वृद्ध सतार
कोलाहल शमता-शमता
नजरेस पूर येणार

गुलमोहर: 

अभिनंदन मित्रा, या वेळची सर्वोत्कृष्ट कविता म्हणुन निवड झाल्याबद्दल. Happy

***********************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

मज दिवेलागणी म्हणजे
तुटलेली वृद्ध सतार >>

श्रीकांत - कविता फार आवडली.... Happy

सुरेख कविता!

कविता निवड समितीला मनःपूर्वक धन्यवाद अशी सुंदर कविता निवडून आमच्यापर्यंत पोचवलीत.

अभिनंदन श्रीकांत. छान कविता
--------------
नंदिनी
--------------

श्रीकांत अभिनंदन !
_______________________________
"शापादपि शरादपि"

खुप छान!!
**********************************
लोग कहते थे की ओ मेरे जनाजे पे रोये नही !
मुझे तो खुशी इस बात की,की हमने उन्हे आख्रीर तक रुलाया नही|
गणेश कुलकर्णी (समीप) ९७६४७७३२५७, पुणे-२७
**********************************

अप्रतिम कविता!
तुमचे अभिनंदन.. अशाच कविता करत राहा..

श्रीकांत,
तुमचे मनापासून अभिनंदन! Happy

मस्त कविता , आवडली Happy

-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....

अभिनंदन Happy
************
एक आस मज एक विसावा, एकवार तरी राम दिसावा, एक वार तरी राम दिसावा |

खूप आवडली.

क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/

मी तुटून लिहितो .... दिवेलागणी ..ह्या ओळी आवडल्या.
मेंदीचा तळहात, भयदग्ध फुले, नक्षी-पक्षी... जमवलेल्या ओळी आहेत.

अभिनंदन मित्रा, या वेळची सर्वोत्कृष्ट कविता म्हणुन निवड झाल्याबद्दल. Happy

कालपासून २-३ वेळा तरी वाचली. आवडली नक्कीच. आणि अभिनंदन.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

अजिबात जमवलेल्या नाही वाटत आहेत ! तो काय मसाला आहे जमवायला?
************
एक आस मज एक विसावा, एकवार तरी राम दिसावा, एक वार तरी राम दिसावा |

मेंदीचा तळहात, भयदग्ध फुले, नक्षी-पक्षी... जमवलेल्या ओळी आहेत>>> म्हणजे काय हो साने भाऊ??
--------------
नंदिनी
--------------

जमवलेल्या मलाही नाही वाटल्या.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

मज दिवेलागणी म्हणजे
तुटलेली वृद्ध सतार

......... व्वा! अभिनंदन मनापासुन Happy
साने भाऊ, सहज आलेल्या कोणत्या ओळी आहेत तुमच्या दृष्टीने, तुमची एखादि सहज कविता उदाहरण म्हणुन सांगाल का प्लीज?

श्रिकांत यांनी कवितेच रसग्रहण कराव... अशी त्यांना विनंती आहे.

निर्मात्याकडुनच निर्मीती समजवुन घेण्याची मौज आगळी असते. Happy

पल्ली व नंदिनी सानेभाऊ, सानेभाऊ कशाला? कृपया प्रगल्भपणे मुद्द्यांचा समाचार मुद्याने घ्या ना प्लीज.

पल्ली मला पहिल्या दोन ओळी सहज वाटल्या. माझी एखादी कविता उदाहरण म्हणून देण्याची तुमची विनम्र मागणी म्हणजे 'आमटीत मीठ जास्त झाले आहे' असे एखाद्या सदस्याने आमटी करणाऱ्याला सांगितल्यावर, त्याला खानावळीतल्या जास्त मीठ लागणाऱ्या काही सदस्यांनी, 'मग तू करून दाखव ना आमटी प्लीज' असे म्हणण्यासारखे झाले.

साने,
तुमच्या 'जमवलेल्या ओळी!' या प्रतिक्रियेत काय प्रगल्भता होती ते कळेल का?

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

सुरेख..... ग्रेसच्या सन्ध्याकाळ्च्या कवीतान्ची आठवण झाली.

<< जमवलेल्या ओळी आहेत>>

जर कवितेचे सौंदर्य वाढवण्यासाठी शब्द जमवून लिहीले असतील तर ते जमवले म्हणून बिघडले कुठे?
मला नाही वाटत की लेखक, कवी जे पहिल्याक्षणी मनात येईल ते लगेच कागदावर उतरवतात. थोडा तरी विचार करत असतीलच.

अपवाद दोन टोकाचे. एक गदिमा. ते म्हणे बरेचदा बसल्या बैठकीला एकटाकी कविता लिहून काढत. अत्यंत सुंदर गाणी. त्यांना कधीहि गलिच्छ, ओंगळ भाषा वापरावी लागली नाही. वात्सल्य, प्रेम, क्रोध, मत्सर, भेसूरता या सर्वांचे वर्णन त्यांनी केले. कधी हिंदी, इंग्रजी शब्दांचा चा वृथा उपयोग केला नाही. त्यांना काय या भाषा येतच नव्हत्या? ते कधी त्या भाषा बोललेच नाहीत? पण मराठीत लिहायचे म्हंटल्यावर मराठी शब्द.

दुसरे श्री. ना. पेंडसे किंवा तत्सम (वास्तवतावादी!) लेखक. त्यांनी केलेले वृद्धत्वाचे 'भेसूर चित्रण' मायबोलीवरच इतरत्र आहे. ते पुनः लिहायच्या लायक नाही असे मला वाटते. माझ्या मते त्यांनी ते शब्द 'जमवून' किंवा 'आधारित घेऊन' वापरले असतील.

सगळेच तसे असतील असे मला वाटत नाही.

जर प्राची ला गच्ची यमक जुळवले तर जमवलेल्या ओळी होतील माझ्या मते. 'हळवा' शब्दाचा अर्थ मला कळत नाही, पण तो कुठल्याहि संदर्भात वापरलेला दिसतो. तसे जर मी काही लिहीले तर ते मुद्दाम जमवून, त्या शब्दाची कुचेष्टा करण्यासाठी लिहीतो.

Happy Light 1

या वेळची सर्वोत्कृष्ट कविता म्हणुन निवड झाल्यामुळे आणि रसग्रहणाची मुद्दाम मागणी असल्यामुळे रसग्रहण क्रमप्राप्तच आहे.
माबोवर सर्वोत्कृष्ट कवितेची निवड होते हे मला माहित नव्हते. ही निवड कोण करतं हे देखील मला अजुनही ठावूक नाही. खरेतर गेले १५ -२० दिवस मी इतर कामात गर्क असल्यामुळे माबोला भेट देवू शकलो नाही. आणि आता आल्यावर हा सुखद धक्का!
प्रत्येक न कळलेल्या कवितेची पर्श्वभूमी कळाली ना की त्या कवितेचा अर्थ अगदी सुगम होवून जातो. पण फक्त अर्थासाठीच कविता असते काय? मला तर अर्थाच्या थोड्या पलिकडे, अनुभूतीच्या पातळीवरील कविता जाम अवडतात. आणि कधि-कधी अनुभूतीही तश्याच असतात. अर्थात बांधता येतच नाहीत. तेव्हा थोडी अर्थापल्याड जाणारी कविता जन्मते. पण ही "दिवेलागणी" तशीच आहे असे नाही. ती लखलखीत वास्तवावर अधारित आहे. पण हे वास्तव माझे व्यक्तिगत, नाही, खाजगी असल्यामुळे वाचकांना कविता कळाली-न कळालीच्या मधे वाटू शकते आणि तेच मला अभिप्रेत आहे. तशाने त्या कवितेतील गोडी कायम राहते, नाही?

"अतीव दु:ख, आतडी पिळवटून टाकणारे, कातडी सोलून काढणारे.... आणि यातून बाहेर पडावे तर हिंस्त्र, भेसूर भयसर्प फणा काढून उभा..."
हे इतके योगायोग माझ्याच वाट्याला का? ह्या पचवू न शकणार्‍या दु:खाला कविताच वाट करून देईल ना?...
"मी तुटून लिहीतो कविता
हे दु:ख पचविण्यासाठी
सांगाती माझ्या आल्या
संचितास पडल्या गाठी"

नेहमीकरता ताटातूट होवूनही अजूनही कविला तिच्या आठवणीने काळोखात एखादा कवडसा मिळाल्याचा भास होतो...
"एवढ्या लांबूनी तारा
अंधार उजळतो वक्षी"

तिचेही आयुष्य दुसर्‍याच कुणाशी तरी बांधले गेलेले. तिच्याही मनात भयसर्प कोंडाळी मारून बसलेला असेल. वधूच्या वेषातही...
"मेंदीच्या तळहातावर
भयदग्ध फुलांची नक्षी"

भय आणि असहायता ही तर कविलाही वेढून बसलेली आहे. आणि त्यातून मनाची होणारी होरपळ आणि वेदना अशी उतरली आहे...
"भय इथे इथे भरलेले"
नाजूक फुलांच्या साली सोलून काढण्याच्या (लिहितांना थरकाप उडतो) उपमेपेक्षा कोणती उपमा वापरावी?
एरवी सुमधूर वाटणारी संध्याही अगदी हंबरडा फोडून रडते आहे...
"हळूवार फुलांच्या साली
सोलूनी कुणी घेतांना
हंबरून संध्या आली"

शेवटच्या कडव्याचे रसग्रहण आणि अर्थ सांगणे आवश्यक आहे काय?

--- श्रीकांत

पहिल्या वाचनात ''फुलांच्या साली ''हा शब्दप्रयोग मलापण खट़कला .
वास्तवाची धग वर्णन करण्यासाठी मग ठीक आहे अस वाटल.
''हंबरून संध्या आली '' या ओळींचा कळस पेलण्यासाठी त्वचा सोलल्याची वेदना.
वेदनेचा नाजूकपणा जाणवण्यासाठी फुल .त्यांची त्वचा ,साली .दुसरा पर्यायच नसावा .
कविता छानच .

माझी गाडीही ही कविता समजुन घेताना कित्येकदा वाचुनही गडबडली होती. पण दिवेलागण आणि त्यावेळचा एका दु:खी कष्टी माणसाचा उद्वेग आहे असे वाटले होते.शेवटचे कडवे हे भाव स्पष्ट करतेय.

कधी कधी दुर्बोध असलेली रूपकेही का एवढी भावतात ते कळालेलं नाही अजुनपर्यंत! पण जीवनाची अनेक गणितेही ही अशीच असतात दुर्बोध. अर्थ लावावा तितकी वेगळे अर्थ अणि प्रश्न घेवून पुढे येणारी.त्या विधात्याचे इप्सित त्यामुळेच असेच दुर्बोध वाटुन रहाते.....आणि मग शेवटी स्वतःच्या क्षुद्र बुध्दीची हार पत्करून मनुष्य हात जोडतो !
ही कविता मला तसाच काही अनुभव देवून गेली होती.

तरीही श्रीकांतजी तुम्ही उलगडून सांगीतल्याबद्दल खूप आभारी आहे ! धन्यवाद !

गुडवन श्रीकांत... छानच.!!! पुन्हा एकदा अभिनंदन ..!!! Happy

धन्यवाद श्रीकांत! आणि पुन्हा एकदा अभिनंदन.

Pages