जियो पारसी

Submitted by स्वेन on 28 May, 2021 - 10:42

गेल्या वर्षी आणि या वर्षी कोविड -१९ च्या उद्रेकादरम्यान एक नाव टीव्ही, वर्तमानपत्रे आणि  इतर माध्यमामध्ये सातत्याने घेतले जात होते,  आणि तेही भारताच्या अगदीच नगण्य अल्पसंख्याक समुदायातील असलेल्या व्यक्तीचे. ते म्हणजे पारसी समाजातील अदार पूनावाला यांचे.

सीएए आणि एनआरसी याला विरोध आणि  निषेध व्यक्त करण्याच्या  नावाखाली दोन वर्षांपूर्वी भारतात जो   हिंसाचार झाला  आणि तोडफोड झाली , त्या मध्ये  पारसी समुदायातील एखाद्याने दगडफेक केली, वाहन पेटवले, समाजविघातक घटक म्हणून वावरला,  सार्वजनिक  मालमत्तेचा नाश केला, किंवा  ' लेके रहेंगे आझादी ' अशा गर्जना केल्या असे मुळीच आढळले नाही, अगदी नगण्य  अल्पसंख्यांक असून देखील. २०१४ च्या जनगणनेनुसार भारतात पारशीं समुदायाची  संख्या साधारण 69000 एवढी होती. या अशा समाज विघातक गोष्टीत ते दिसत नाहीत  कारण ते मूलत: शांतता प्रेमी,  अहिंसक लोक आहेत. या समुदायातील  सर्व स्तरात बुद्धिमान  आणि दयाळू व्यक्ती दिसून  येतात आणि या  अशा छोट्या समुदायाने भारतीय अर्थव्यवस्थेला आणि उद्योगाला इतके मोठे योगदान दिले आहे की अशा नागरिकांना हिंदू नागरिक म्हणून ओळखण्यात खरोखर  अभिमान वाटतो.

१९७१च्या युद्धात पाकिस्तानला नामोहरम करून नव्वद हजार सैनिकांना बंदिस्त करणाऱ्या आणि आपल्या पारंपारिक शत्रू राष्ट्राला चारी मुंड्या चीत करून बांगलादेश या नवीन राष्ट्राच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय सैनिकांची कमान जनरल एस् एम् एफ जे माणेकशॉ यांच्याकडे कडे होती. युद्ध जिंकल्या नंतर त्यांनां संरक्षण दलातील फिल्ड मार्शल या सर्वोच्च खिताबाने नावजण्यात आले. गुजरात मधील नवसारी या छोट्याशा गावात  जन्मलेल्या, जमशेटजी टाटा आणि त्यांचे कुटुंब  कजार सत्ताधाऱ्यांच्या छळामुळे इराण सोडून  आले आणि भारतात स्थायिक झाले. त्यानंतर जमशेटजी टाटा यांनी टाटा या अग्रणी उद्योग समूहाची स्थापना केली. आज टाटा हा भारताचा सर्वात मोठा उद्योग  समूह आहे.  नेहरू त्यांना नेहमी " वन-मॅन प्लॅनिंग कमिशन "  असे  म्हणत. भारतात अण्वस्त्र कार्यक्रम सुरू करणाऱ्या होमी भाभा यांच्या योगदानाला कसे विसरता येईल? १९६५च्या भारत-पाक युद्धात पूना हॉर्स रेजिमेंटचे नेतृत्व करणारे कर्नल ए.बी. तारापोर यांनी सियालकोट सेक्टरमध्ये शत्रूवर जबरदस्त चाल करत, स्वतःच्या रणगाडयावर गोळ्या बरसत असताना देखील पाकिस्तानचे तब्बल ६५ रणगाडे नष्ट करण्याचे शौर्य गाजवले. परम विशिष्ट सेवा मेडल मिळवणारे एअर स्टाफ प्रमुख फली होमी मेजर यांनी ६५७७ फ्लायिंग अवर्सचा अनुभव घेत सियाचीन या जगातील सर्वात उंच क्षेत्रात युद्धातील अनेक धोकादायक मोहिमेचे नेतृत्व केले. व्हाईस ॲडमीरल रुस्तम गांधी हे असे एकमेव नौदल अधिकारी आहेत ज्यांनी भारताने आतापर्यंत युद्ध केलेल्या सर्व नौदल युद्धामध्ये लढाऊ जहाजांचे नेतृत्व केले आहे.   प्रख्यात बॅरिस्टर आणि कर कायद्याचे सखोल ज्ञान असलेल्या नानी पालखीवाला यांना वक्ता दश सहस्त्रेशू मानले जात असे. सरोश होमी कपाडिया यांनी भारताचे अढतिसावे सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले. सोली सोराबजी हे भारताचे अटर्नी जनरल होते, तसेच मानवाधिकारांचे प्रबळ प्रवर्तक होते. अर्देशिर गोदरेज, एक असे उद्योगपती होतें, ज्यांच्या नावाचे गोदरेज कपाट घराघरात असायचे. विख्यात हृदयरोगतज्ज्ञ आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त करणारे केकी बायरामजी ग्रँट यांनी पुण्यातील राष्ट्रीय मान्यताप्राप्त रूबी हॉल क्लिनिकची स्थापना केली. बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमधील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनी थर्मॅक्सची धुरा अनु आगा आणि त्यांची कन्या मेहर पदमजी समर्थपणे पेलत आहेत. सायरस पूनावाला यांचे सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया पोलिओचे डोस भारतातील सर्व समाजातील मुलांना उपलब्ध करून देते. पहिला बोलपट आलम आरा चे निर्देशक अर्देशीर इराणी पासून आताचे अभिनेते डेझी इराणी, अरुणा इराणी आणि बोमन इराणी यांनी भारतीय सिनेसृष्टीत आपल्या कलेचे योगदान दिले आहे.  भारतीय क्रिकेटमध्ये पॉली उमरीगर यांचा विक्रम सुनील गावस्कर येई पर्यंत अखंडित होता. नरी कॉन्ट्रॅक्टर,फरोख इंजिनिअर आणि डायना एडुल्जी हे देखील भारतीय क्रिकेटमधील चमकते तारे. फारोख इंजिनिअर नंतर सत्तावीस वर्षांनी अर्झान नागवसवाला या नावाच्या खेळाडूची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. या सर्व व्यक्तिमत्त्वातील सामान्य घटक म्हणजे हे सर्व, भारतातील सर्वात अल्पसंख्यांक असणाऱ्या पारशी या समुदायातील व्यक्ती आहेत.

 

 पारसी म्हणजे (पहिल्या मोठ्या स्थलांतरानंतर भारतात स्थायिक झालेले झोरोस्ट्रियन लोक ) दान व परोपकारासाठी  समानार्थ शब्द बनला आहे. झोरोस्ट्रियन धर्माची  पवित्र गाथा यास्ना  हिंदू धर्माप्रमाणेच  सहिष्णुता, प्रेम आणि सार्वभौम बंधुता याचा उपदेश करते. ही धार्मिकता म्हणजे चांगले शब्द, चांगले विचार आणि चांगली कर्मे करायचे असे  सांगून अंतःकरणाच्या शुध्दीकरणाशिवाय काहीही नसते  असे सांगते.

 

भारतीय घटनेनुसार अल्पसंख्यांक दर्जाचा दावा पारशी समुदायाने  कधीही केला नाही. ही त्यांच्या आत्मनिर्भरतेवरती  असलेला  विश्वास दाखवते. खरं तर, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा या छोट्या समुदायाचे नेते भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे गेले, आणि  अशी मागणी केली की त्यांची केवळ १,००,००० (एक लाख)   एवढीच अल्प  लोकसंख्या असूनही त्यांना अल्पसंख्याक दर्जा दिला  जाऊ नये. आता तर ही संख्या घटून ६९०००( एकोणसत्तर हजार) पेक्षा कमी झाली आहे. अशा प्रकारे लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवण्याची त्यांची मानसिकता वाखाणण्याजोगीच आहे.

झरतुष्ट्र  (किंवा झोरोस्टर, म्हणजे शहाणा माणूस) किंवा लाफिंग प्रॉफेट  म्हणून ओळखले जाणारे हे संत   इ.स.पू.६५०  च्या सुमारास इराणमध्ये राहत होते. पाणी, अग्नी, वायू, पृथ्वी आणि सूर्य या पाच मूलभूत तत्त्वांद्वारे आपण ईश्वराचे  अस्तित्व  पाहू शकतो आणि याची प्रचिती घेण्याकरिता मानवी मनासारखे  अपूर्व माध्यम दुसरे नाही असे  सांगतानाच त्यांनी इतर धर्मियांच्या सहनशीलतेचा  आणि सत्याचा  बौद्धिक शोध घेण्याला प्रोत्साहन दिले.

अग्निपूजा करणारे त्याचे अनुयायी झोरोस्टेरियन म्हणून ओळखले जातात.  इस्लामिक हल्लेखोरांच्या हातून  छळ आणि जबरदस्तीने केले जाणारे धर्मांतर यातून सुटका करून घेण्यासाठी  ब त्यांना इराण मधून  पळ काढावा लागला. पहिल्या स्थलांतरित समुदायातील लोक गुजरातमध्ये आले आणि ते पारसी म्हणून ओळखले जाऊ लागले.  काही शतकानंतर जो दुसरा स्थलांतरितांचा मोठा जत्था  आला त्यांना इराणी म्हणून ओळख मिळाली. भारतात येताना ते आपली  पवित्र अग्नि घेऊन आले आणि  भारताला आपलेसे  केले.   पारसी मंदिरांमध्ये  पाणी, अग्नी, वायू, पृथ्वी आणि सूर्य असे पाच घटक असतात. सूर्याकडे  तोंड करून प्रार्थना म्हणायची त्यांची पद्धत आहे. सौराष्ट्र येथील दीव बंदरावर उतरल्यानंतर जादव राणा या तिथल्या राजाकडे ते जेंव्हा आश्रय मागायला गेले तेंव्हा  त्यांना राजाने काही  अटी घातल्या.  (i) त्यांचा संपूर्णपणे भारत (किंवा हिंदुस्थान) वर निष्ठा असेल. (ii) ते त्यांचा धर्म  पसरवणार नाहीत किंवा लोकांचे धर्मांतर  करणार नाहीत. (iii) नवजोत सोहळा ( पारशी मुलांचे मौंजीबंधन)  आणि मृत्यूच्या वेळी होणारी विधी  वगळता ते सर्व हिंदू विधी स्वीकारतील.

 

या धर्मात उच्च स्तरावरील अध्यात्म   आहे ज्यांचा खरा अर्थ समजणे कठीण आहे.  इराण  मध्ये  इस्लामच्या बरोबरीने  तो   अस्तित्वात राहणे  शक्य   नव्हते, कारण  या  दोन्ही धर्माच्या   विचारसरणीत मूलभूत  फरक  आहे. पारशांचा   अग्नि-उपासक म्हणून गैरसमज करून  घेतला    जातो परंतु वस्तुस्थिती अशी आहे की त्यांची,  अग्नी, पाणी, पृथ्वी, वायू आणि सूर्य या पाच मूलभूत तत्त्वाद्वारेच  देवाचे प्रतिनिधित्व केले जाते  अशी  धारणा  आहे . . म्हणून झोरोस्टेरिनिझम ही एक सतत   चालू असणारी    प्रार्थना आहे जी एका  स्वरूपात   जन्मापासूनच   सुरू होते  आणि मृत्यूच्या शेवटी दुसर्‍या स्वरूपात संपते . ईश्वराशी  सतत  एक   संवाद  चालू राहावा   जो  मनुष्याच्या  दयाळू   कृतीच्या आधारे   अनुभवला जाऊ शकतो असे ते मानतात.

  

हा जगातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक आहे, परंतु त्यांचे बरेचसे ग्रंथ इस्लामच्या  हल्ल्यात  नाश  पावले.   जे टिकले ते " चिश्ती"  (तत्वज्ञान) आणि "दीन" (अनुष्ठान) मध्ये विभागले गेलेले आहे . गाथा या  ग्रंथात    तत्वज्ञान   तर  दीन   या  मध्ये  जे  श्लोक  आहेत   त्यांना  वंदीदाद असे  नाव  आहे. या  मध्ये   "मनाची आणि शरीराची शुद्धता" मिळविण्याच्या आकांक्षाविषयी लिहिलेलं  असून   चांगले विचार, चांगले शब्द आणि चांगली कर्मे (हुमाता, कुक्त आणि हुवरास्था) याद्वारे व्यक्ती  ही शुद्धता कशी मिळवू शकते  हे स्पष्ट केलेले  आहे.

थोर विद्वान - संत दस्तूर  मेहरजी राणा आणि संत  दस्तूर  नरियोसांग धवल यांनी  आध्यात्मिक शहाणपण आणि त्याद्वारे ईश्वराचा  आशीर्वाद कसा प्राप्त करायचा याचे पाठ घालून दिलेले आहेत. त्या  नंतर दस्तूर सोरबजी कुकादारू यांनी  अंधश्रद्धेतून  मनुष्याच्या मुक्तीचा उपदेश केला आणि वैयक्तिक उदाहरणाद्वारे माणसाला समाजात इतरांना  प्रश्न विचारण्यापूर्वी स्वतःला प्रश्न विचारण्यास सांगून मानवी चेतनेची   पातळी कशी वाढवावी याचा उपदेश केला. त्यांनी सहिष्णुता, मानवजाती बद्दल आदर, आणि  मानवाची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे याचे समर्थन केले.

 

शतकानुशतके कमी  लोकसंख्य  आणि  समुदायाबाहेर  रोटी  बेटी  व्यवहार  नसल्याने  त्यांच्या  जनुकात  असा  फेरबदल  झाला  आहे  कि  पारशी व्यक्ती  काही  वेळेला  अगदी  टोकाच्या भूमिका  घेतात (रतन टाटा विरुद्ध  सायरस मिस्त्री). परंतु याच वेळी  त्यांचे सामाजिक-सांस्कृतिक वैशिष्ट्य म्हणजे  अलौकिक बुद्धिमत्तेसह येणारा  विलक्षण दयाळूपणा आणि सर्व समावेशक अशी मानसिकता. पण त्याच वेळी यांचे धर्मगुरू, ज्यांना दस्तूर असे म्हणतात, ते अंतर्मुख होऊन  अति-पुराणमतवादी झाल्याचे आढळते. प्राचीन काळातला कर्म कांडात मानणारा  झोरोस्ट्रिअन धर्मच गौरवशाली  आहे असा विश्वास ठेवून  वस्तुस्थितीची वास्तविकता स्वीकारण्यास ते मागे पडतात. उदाहरण द्यायचे झाल्यास रुमी  आणि खोरशेद भावनगरी यांचे द्यावे लागेल ज्यांनी अध्यात्माचा ध्यास घेऊन  आत्म्याचे एक वेगळे जग (astral universe) अस्तित्वात आहे असे मानतात. या अशा  जगात मार्गदर्शक आणि आणि गुरु आहेत जे  ट्विलाईट झोन (Twilight  zone ) मध्ये राहतात आणि पृथ्वीवरील व्यक्तीशी संपर्क ठेवतात.  (संदर्भ: The Laws of the Spirit World – Jaico Publication).

 

धर्मातील तत्वज्ञान बाजूला ठेवून कर्म कांडात मानणारे दस्तूर  याना आता कळले आहे कि काही विधी अगदी  पुरातन आहेत आणि  त्यांची वैधता आता संपली आहे. फक्त आपल्याच समुदायात  लग्न करणे वगैरे  अशा कायद्यामुळे आपण डायनासोरप्रमाणे इतिहासात जमा होऊ आणि आपला  समृद्ध सांस्कृतिक वारसा गमावू हे त्यांना उमजले आहे आणि  म्हणून आता ते बदलत आहेत. टॉवर ऑफ सायलेन्स मध्ये गिधाडांना खाण्यासाठी मृतदेह ठेवणे, समुदायाबाहेर विवाहाला परवानगी नसणे अशा रूढींचा हळू हळू त्याग करण्यात येत आहे. 

 

पारश्यांची  संख्या वाढविण्यासाठी भारत सरकारने २०१३मध्ये “जियो  पारसी” अशी  योजना सुरू केली. ऑक्टोबर २०१९  पर्यंत या योजनेंतर्गत जन्मलेल्या मुलांची संख्या २१४ आहे. २०१३ पासून २०१९ पर्यंत केवळ दोनशे   मुले जन्माला आली. या समाजातील जन्म दराच्या तुलनेत मृत्य दर जास्त आहे. कमी  होत  जाणारी   पारशी लोकसंख्या चिंताजनक आहे. येत्या  काही  दशकात   ते  नामशेष  होतील. ज्या समुदायाने  भारताला आर्थिकदृष्ट्या आणि औद्योगिकदृष्ट्या सुदृढ बनविण्यासाठी खूप योगदान दिले आहे, त्यांना इतिहासजमा  होण्यापासून  वाचवले  पाहिजे . भारतीय  अर्थव्यवस्थेतून  केवळ  टाटा आणि शापूरजी पालनजी   उद्योग  समूह  वजा  केले  तर भारताची आर्थिक स्थिती पाकिस्तानच्या वाटेवर जाईल. मोदी सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९  केलेला   आहे. त्याचा  फायदा  घेऊन शेजारील देशांत म्हणजेच अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये  जे  पारशी  बांधव  आहेत  त्यांनी  इथे येऊन भारताचे नागरिक बनावे आणि स्वतःच्या   समुदायाला  नष्ट  होण्यापासून  वाचवावे. या अशा पार्श्वभूमीवर  आदर पुनावाला  कोविशील्ड लसीचे उत्पादन करून नागरिकांचे प्राण वाचवत असताना  त्यांना मारण्याच्या धमक्या मिळाल्या जे सर्वार्थाने  निंदनीय आहे.

 

Group content visibility: 
Use group defaults

माहिती म्हणुन छान आहे, पण शाळेचा निबंध वाचल्यासारखा वाटला.
काही स्टेटमेंट्स पटली नाहीत. त्याबद्दल वेळ मिळाल्यावर लिहीन.