निर्णय

Submitted by pintee on 28 May, 2021 - 02:42

" आई, काय ग कशी वागतेस तू. तुला ना कधी कसं वागायचं ते समजतच नाही. शी, लाज आणतेस कधी कधी." श्वेताचे जळजळीत शब्द ऐकून सीमा अगदी अवाक झाली.
" अग काय झालं काय एवढं?"
" आणि वर मलाच विचारतेस? का केलास तू मुग्धाच्या आईला फोन?" आपले संतापातिरेकाने भरलेले डोळे दिसू नयेत म्हणून श्वेता पाय आपटत तिच्या खोलीत निघून गेली. सीमा हतबुद्ध होऊन तिच्याकडे पाहतच राहिली.
तशा श्वेताच्या दिवसभरात लहान मोठ्या कुरबुरी चालूच असायच्या पण आताची वेळ वेगळी आहे हे लक्षात आल्यावर सीमा तिच्या खोलीत गेली.
"श्वेता, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे, इकडे येऊन बस."
" पण मला नाही बोलायचं तुमच्याशी स्वयंपाकीण काकू" तिच्या स्वरात उपहास होता.
" का ग स्वयंपाकीण काकू माणूस नसतात ? " तिने खेळकरपणे विचारले.
"असतात ना, पण त्या विद्यार्थीप्रिय, आदर्श शिक्षिका नसतात." आपल्या टेबलवर बसून अभ्यास करतो असे दाखवणारा शौनक म्हणाला.

आता सीमाला नक्की प्रकार काय आहे ते समजले.
झालं असं होतं, मॅनेजमेंटशी वाद झाल्यावर विकासशी चर्चा करून तिने कॉलेज मधली आपली नोकरी सोडायची आणि स्वतःची अकादमी सुरू करायची असे ठरवले होते. पण दरम्यानच्या काळात करोनाचा उद्रेक झाला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या,व्यवसायाची वाताहत झाली, आर्थिक घडी पार कोलमडून गेली. विकासच्या व्यवसायाची देखील हीच गत होती. सुरुवातीला त्यांनी साठवलेल्या बचतीतून डोलारा सावरला पण हा गाडा लवकर सुरळीत होईल अशी चिन्हे नव्हती.साहजिकच अकादमी सुरू करण्याचे स्वप्न सीमाला काही काळ बाजूला ठेवावे लागले होते.

याकाळातच घरात काम करणाऱ्या बायकांना आत येण्याची परवानगी सोसायटीने नाकारली. आजारी आणि वयस्क व्यक्तीचे हाल होऊ लागले.बाहेरून काही आणता येत नव्हतं आणि घरी स्वयंपाक,घरकाम सगळे करणे शक्य होत नव्हते त्यात करोनाचा कहर.घरटी एखाद - दुसरा आजारी किंवा विलगीकरणात होताच. सगळीच परिस्थिती फार भयानक होती.
शेजारच्या राव आजींना करोनाचे निदान झाले आणि
परदेशात अडकलेल्या त्यांच्या मुलाने सीमाला त्यांच्याकडे लक्ष देण्याची विनंती केली. त्यांची गरज म्हणून सीमाने नाश्ता, जेवण देण्याची जबाबदारी आनंदाने स्वीकारली. तिने केलेले गरम सात्विक आणि रूचकर जेवण त्या आवडीने जेवत.
सोसायटीच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर त्यांनी सीमाच्या स्वयंपाकाचे भरभरून कौतुक केले आणि एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा अशी सीमाच्या डब्यांची संख्या वाढत गेली. मुळात कष्टाळू असलेल्या सीमाने आपल्या डॉकटर असलेल्या मैत्रिणीचा सल्ला घेतला आणि अभ्यास करून दररोजचा सकस,स्वादिष्ट आहार निश्चित केला. विकासच्या मदतीने तिने हे आव्हानही लीलया पेलले. श्वेताच्या मैत्रिणीच्या, मुग्धाच्या आईला करोनाची लागण झाल्याचं कळताच सीमाने आवर्जून तिला फोन केला आणि गरज असल्यास रोजचा डबा देण्याचीही तयारी दाखवली. त्यातूनच हा उद्रेक झाला होता.

दररोज नीटनेटकेपणाने स्टार्चच्या साड्या नेसून मीटिंग, सेमिनार, वर्कशॉप्स अशा विषयात रमणाऱ्या; technology चा सहजतेने वापर करणाऱ्या आपल्या आईला घरातल्या कपड्यात, सतत मिरची - फोडणीच्या वासात असलेल्या; भाजी, फळे इ. विषयावर चर्चा करणाऱ्या आईचे हे नवे रूप श्वेता आणि शौनकच्या पचनी पडत नव्हते. आता मात्र सीमाचा पारा चढला. दररोज खऱ्या - खोट्या कारणांच्या आड दडणाऱ्या आणि श्रमाला अजिबात महत्त्व न देणाऱ्या मुलांना वास्तवाची जाणीव करून देणे गरजेचे होते.

तिने सरळ एक्सेल शीट ओपन केली आणि मुलांना जवळ बोलावून म्हणाली " श्वेता, शौनक मला तुमचे म्हणणे कळले, आता मला सांगा शौनकचा इंजिनीरिंगचा खर्च, श्वेता पुढच्या वर्षी मेडिकलला जाणार आहे तिच्या फीज, दरमहाचे आपले महिन्याचे बजेट, फ्लॅटच्या कर्जाचे हप्ते, कार लोन हे आपले कमीतकमी होणारे खर्च आहेत तुमच्या बाबांचा व्यवसाय गेला वर्षभर जवळ जवळ बंद आहे. माझी नोकरी सुटली आहे मग आपण हे सगळे खर्च कसे सांभाळणार आहोत, आहे का तुमच्याकडे काही उपाय? या सगळ्या काळात आपण सगळे चांगले आहोत कोणाच्या तरी उपयोगी येऊ शकतो याचा आनंद मानायचा की कुरकूर करायची?"
" पण म्हणून स्वयंपाक?" शौनकचा आवाज आता खाली आला होता.
" का काय हरकत आहे, स्वार्था बरोबर परमार्थ देखील साधला जात असेल तर ? " नुकताच डबे पोचवून परत आलेल्या विकासने विचारले." आपण भाजीवाला सुरेश, फळवाला आनंद याला रोजगार देऊ शकलो. आईच्या मदतीला येणाऱ्या पोळ्या करणाऱ्या मावशी, वरकाम करणारी सुरेखा हिला पगार देऊ शकलो. अडचणीच्या काळात त्यांना, त्यांच्या कुटुंबाला मदत करू शकतो हे महत्त्वाचे नाही का?"
" इतकेच नाही महिना महिना घरी येऊ न शकणाऱ्या डॉकटर अनघाला डबा देऊ शकलो याचे समाधान मला खूप जास्त आहे. आपल्या लहान मुलांना ठेवून कामावर जाणारी पोलीस असलेली निशा तर मला म्हणाली होती, तुझा डबा असतो म्हणून मला घरची काळजी नसते."
" पण आई, तू तर अकादमी सुरू करणार होतीस ना ? " श्वेता सीमाच्या जवळ जाऊन म्हणाली.
" पण मी तो विषय काही सोडून दिला नाही.मी नोकरी सोडली असली तरी अध्यापन सोडले नाही. माझा श्वास आहे तो. म्हणूनच सोसायटीच्या वॉचमन काकाच्या मुलांसाठी मी आपला आधीचा लॅपटॉप दिला. त्यांना काही अडल तरी मी मदतीला असतेच की"
" मुलांनो, काळ खरंच खूप अवघड आला आहे आपण सगळेच खूप कठीण परिस्थितीत सापडलो आहोत. सगळी मूल्य बदलली आहेत त्यात दोनच मूल्य ठामपणे टिकून आहेत.श्रमप्रतिष्ठा आणि माणुसकी. अज्ञातवासात असताना महावीर असलेल्या भीमाने नाही का आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवून बल्लवाचे रूप स्वीकारले तसेच तुमच्या आईने काही काळापुरती आपल्या संसारासाठी ही भूमिका घेतली आहे. आपण तिच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे." विकासच्या या बोलण्यावर मुले विचार करत होती.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

विचार चांगलाच आहे, पण पोरं इतकी मोठी असतील तरी त्यांना इतके समजावून सांगायची गरज पडतेय म्हणजे आई बाबा पालक
म्हणून काही गोष्टी रुजवायला कमी पडत आहेत.
आणि उद्या त्यांच्या स्वप्नातल्या अमेरिकेत गेली तर परत टाइम वेटरची पण कामे केली असे रसभरीत वर्णन करतीलच.
जसे मुलांना स्वातंत्र्य आहे हवे करण्याचे, हवे ते शिकण्याचे तसे आई-बापाला नाही का?
या लेखात हे यायला हवे असे नाही पण यावर आई-बाबांनी पण विचार करायला हवा.

धन्यवाद हर्पेन, सुहृद
कथेचा हा विषय नाही पण हा मुद्दा अन्यत्रही आला आहे. आपल्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये श्रमाला फार महत्त्व नाही विशेषतः इंग्रजी शिक्षणानंतर कारकुनी आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर पांढरपेशा व्यवसायाला जास्त महत्व दिले जाते आजही शेती काम करणाऱ्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो.श्रमजीवी वर्गाला सामाजिक उतरंडीत सध्या सर्वात खालचे स्थान आहे.
जेव्हा अशी विदारक परिस्थिती येते तेव्हा आपले राहणीमान बदलायला मुलेच काय मोठेही तयार होत नाही ते संस्कारच आपल्यावर नसतात हा या कथेचा विषय आहे.

Pintee, कथेबद्दल माझे काहीच म्हणणे नाही. कथा म्हणून छानच आहे, पण त्या अनुषंगाने आलेले विचार मी लिहिले इतकेच.