
निखळ आनंदास-गोविंदासही
कोणे एकेकाळी.....
अभिनेता गोविंदा मला कधीही क्लासी वाटायचा नाही. एवढंच काय ज्यांना तो आवडतो तेही क्लासी नाहीत हेही मी ठरवले होते. स्वतंत्रविचारसरणीमुळे सगळ्यांचा क्लास मीच ठरवायचे. बेसिकली मीच एकटी क्लासी यावर माझा अढळ विश्वास होता. अजूनही जुन्या अस्मिताचा रेसेड्यू माझ्यात आहे व तो अधूनमधून फणा काढतोच.
गोविंदाचे डोळे हे चंचल नेत्र होते, असे लोक मला आजही विश्वासू वाटत नाहीत ,जणू काही मला गोविंदासोबत इस्टेटीचे व्यवहारच करायचे होते. माझ्या भावाला गोविंदा आवडायचा. तो व्यापार खेळताना जेव्हां वडिलोपार्जित धन रूपये दोन हजार पाचशे पन्नास जिंकायचा तेव्हा त्याला हर्षवायू व्हायचा. इथे मी बँकेशेजारी मांडी ठोकून बँकेतला अर्धा माल हडप करायचे त्याला कळायचं सुद्धा नाही.
शिवाय तो इतका भोळा होता की त्याला फसवणं फार सोपं होतं , आळशी असल्याने मला अवघड कामापेक्षा सोपे काम आवडते म्हणून मी त्याला जन्मभर फसवलेलं आहे. नीतिपाठ दिले नसते तर मी कुठल्या कुठे गेले असते आणि आज नेटफ्लिक्सने माझा माहितीपट लावला असता. असो. (बायदवे, हे 'असो' किती सत्तरीतले वाटते नं ,असो !)
या दोन हजार पाचशे पन्नासात होणाऱ्या हर्षवायूमुळे तो अल्पसंतुष्ट आहे , गोविंदा न आवडला तर नवलच हा विचार मी मनात करायचे. माझ्या सगळ्याच भावांना गोविंदा फार आवडायचा , त्यामुळे मला आमच्या घरी व आजोळी सुटका नसायची, त्यांनी माझा मेंदू धुवायचा पुष्कळ प्रयत्न केला पण मी नर्मदेतल्या गोट्यासारखी अभेद्य राहिले. मी एखाद्या माणसाबद्दल एकदा मत बनवले की नंतर माझे मत बदलले असले तरी मी ते कबूल करायचे नाही. त्याने मला कमीपणा येईल असे वाटायचे ,कमीपणापेक्षा खोटारडेपणा अहं पोषणासाठी पूरक व बुद्धीसाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळे मी वाका-वाका करेल पण मोडणार नाही या तत्वावर जगायचे !!
आजोळी गेल्यावर मात्र त्याला सोबत म्हणून चार भावंडं मिळायची ,सगळी मुलं. बहिणी खूप लहान किंवा खूप मोठ्या होत्या. मगं मला एकटीने खिंड लढवावी लागायची. सारखं गोविंदाची गाणी आणि सिनेमे ,आनंदाने एकमेकांना ओरडून ओरडून हाका मारून त्या वाड्यात असतील तर या वाड्यात रंगीत टिव्हीवर बघू अशा गोविंद-योजना व्हायचा.
क्वचितच लाइट असायची, म्हणजे असल्यावर आवर्जून सांगावे अशी परिस्थिती. आमच्या घरी परतल्यावर रात्री जेवताना ताटातलं अन्न दिसायचं ह्याचंच काही दिवस अप्रुप वाटायचं. पण मिणमिणत्या चिमणीच्या प्रकाशात केलेल्या अंगतीपंगतीच्या आनंदामुळे प्रेमळ सोबतीची किंमत कुठल्याही भौतिक गोष्टींपेक्षा जास्त असते हे आता कळतयं !!
भर उन्हात बाहेर खेळायला जाता आले नाही की दुपारी घरी टिव्ही बघणे व्हायचेच. पत्ते, व्यापार लपाछपी यात तास दीड तासातल्या क्वॉलिटी टाइम मधली क्वॉलिटी संपून भांडणे सुरू व्हायचेच. तुझा पत्ता जळाला , तू पैसे चोरले , बुडवले , चार पडले होते तरी जेल नको म्हणून खोटंच सहा म्हटले , तू मला धप्पा जोरात देऊन स्कोअर सेटल केलास, माझ्यावरंच का राज्यं सारखं अशा ना ना तर्हा असायच्या. असे राडे सुरू झाले की मामा टिव्ही बघण्याचा आग्रह करायचा. बाकी बायाबापड्या ज्यानं टिव्हीचा शोध लावलायं त्याचं भलं चिंतायच्या. कुणीतरी 'काय माय कडंकडं करतात लेकरं आम्ही नव्हतो अशे' हे सुविचार रिपीट करायचे. सगळ्याच मुलांना ऐकावे लागणारे त्रिकालाबाधित सत्य...!!
तर लाइट असणे म्हणजे या छोट्या खेड्यात कपिलाषष्ठीचा योग , त्यात टीव्हीवर गोविंदाचा सिनेमा लागणे म्हणजे आधीच 'मर्कटा त्यात मद्य प्याला' गत व्हायची. कोणीच खेळायला नसल्याने मी पहायचे अगदीच आनंदाने पहायचे पण पाहिल्यासारखं करतेयं असं दाखवायचे.
'राजाबाबु' सारखा आचरट सिनेमा किती वेळा पाहिलायं गणतीच नाही. तोच कशाला सगळेच नंबर वन माळेतले सिनेमे अनेक वेळा बघत हसून धमाल केलेली आहे. तो सुट्ट्यांचा एकत्र वेळ बरेचदा अशा हलक्याफुलक्या सिनेमांमुळे व त्या मुग्ध /बावळट सहवासाने मजेदार गेलायं. आताही पुन्हा पहाते तेव्हा मनाने त्या आश्वस्त काळात जाऊन येते. उगाच !!
कधीतरी 'उगाच' वाटणाऱ्या गोष्टीही कराव्यात, मन रमतं. बरेचदा त्या गोष्टीपेक्षा ती गोष्ट कुणासोबत केली हेच महत्त्वाचे ठरते , म्हणजे ते फक्त निमित्तं असते. प्रत्येकाला असं निमित्तं हवं असतं , ज्यात पुन्हा लहान व्हावं, पुन्हा वेडं व्हावं.
गोविंदा मला आवडतो का याचे उत्तर अजूनही मला माहिती नाही , आणि मला जाणूनही घ्यायचे नाही. जाणून घ्यायला वापरावी लागणारी बुद्धीही खर्चायची नाही , निर्मळ आनंद घ्यायचा. खरंतर हा लेख त्या गोविंदाबद्दल ही नाही फक्त निर्भेळ आनंदाचा कुठलाही क्षण 'गोविंद' होऊ शकतो. कधीतरी मोठमोठ्या तात्विक गोष्टींचा कंटाळा येतो, कशाचा ताळमेळ कशाला रहात नाही, आपण माणूस आहोत की घाण्याला लावलेला बैल वाटत रहाते. तेव्हा असे एकदोन क्षणही मनाला रम्य अशा आश्वस्त काळाची सहल करून आणतात.
कधी उठताबसता पायाला कळ लागली किंवा चालताचालता ठेच लागली की आई 'गोविंद, गोविंद' म्हणायची तेव्हा मी तिला नेहमी गोविंदाच का कधीतरी 'शाहरूख खान-शाहरूख खान किंवा अक्षयकुमार-अक्षयकुमार' म्हण की
म्हणायचे, तसं ती 'परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला' नजरेने बघायची व "पाप लागेल गं मला" म्हणायची. पापपुण्य वगैरे आहे की नाही माहिती नाही पण हा लक्ष विचलित करण्याचा एक उत्तम मार्ग आहे हे आता कळतयं. शेवटी कधीतरी एक उगाच वाटणारा निर्भेळ आनंदाचा क्षण सुद्धा माणसाला असंच तवानं करून जातो. तो कसा शोधावा हे आपण आपलेच ठरवावे.
Because, sometimes greatest moments in life are the simplest..!! आहे त्या वेडेपणाला/बालपणाला सांभाळून घेऊ ,आणि पुरवून पुरवून वापरू , मुग्ध आहे पण अमर्याद नाहीये ते !!
--
अटी त.टी. हे लेखन विनोदी आहे का हलकेफुलके ललित ते कळत नाहीये. विनोदी म्हणजे अर्चना पुरण सिंह आणि हलकेफुलके म्हणजे मंद हसणारे नारदमुनी , किंवा दोन्हीच्या मधले... तुम्हीच ठरवा. 
आभार
©अस्मिता
चित्र टाकायला आवडतं (वेमा योग्य नसल्यास कळवणे) आंतरजालाहून साभार #कूलअँडस्मार्ट.कॉम.
खूप सुंदर लेख आणि मस्त
खूप सुंदर लेख आणि मस्त प्रतिसाद !!
आज गोविंदामय केलं अगदी
गोविंदाचा हटके मूवी
गोविंदाचा हटके मूवी
"प्यार दिवाना होता है"
https://www.youtube.com/watch?v=qHYliM8WOtg
Govinda | Rani Mukherjee | Om Puri
झकास.
झकास.
गोविंदाचे सिनेमे मूड इंप्रोव्ह करायला बघतो. कूली नं १, राजाबाबू, हीरो नं १, ऑंखें, साजन चले ससुराल, दुल्हे राजा … कोणताही, कुठूनही
जेव्हढा निर्बुद्ध तेव्हढा जास्त आवडतो.
असेच इला अरुणची गाणीही आवडतात आणि I the Subhash The Ghai चे पिक्चर.
…greatest moments in life are the simplest - त्रिकालाबाधित सत्य ! And they are precious yet free
काल एक रोचक माहिती वाचायला
काल एक रोचक माहिती वाचायला मिळाली. गोविंदाचे एक गाणे मोहम्मद रफी यांनी गायिले आहे यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे घडले आहे. त्याचे असे झाले १९८० च्या आधी संगीतकार बाप्पी लाहिरी यांनी एक गाणे रफींकडून गाऊन रेकॉर्ड करून घेतले: "फूल का शवाब क्या हुस्न महताब क्या"
https://www.youtube.com/watch?v=tnh7_86R5Bg
पण ते गाणे पुन्हा ऐकताना एक छोटीसी चूक त्यांच्या लक्षात आली. शेवटच्या कडव्यात रफिंनी "आपका जवाब क्या" ऐवजी चुकून "आपका जवाब का" असे गायिले होते. त्या काळात डीजीटल रेकॉर्डिंग होत नसल्याने ती चूक टेक्निकली दुरुस्त करणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी रफींना ते गाणे पुन्हा रेकॉर्डिंग करण्याची विनंती केली. आणि रफींनी ते मान्यही केले होते. पण गाण्याचे पुन्हा रेकॉर्डिंग होण्याआधीच दुर्दैवाने रफिंचे दु:खद निधन झाले.
नंतर नऊ दहा वर्षांनी बाप्पी लाहिरी यांच्याकडे "फर्ज कि जंग" या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाचे काम आले. यात नायक गोविंदा होता. तेंव्हा बाप्पी लाहिरिंना हे गाणे आठवले. त्यांनी विचार केला "एका छोट्याशा चुकीसाठी रफिंचे एक पूर्ण रेकॉर्डिंग वाया का घालवायचे? तशीही ती चूक फार कुणाच्या लक्षातही येणार नाही" त्यामुळे रफिंचे ते रेकॉर्डींग केलेले गाणे अखेर गोविंदाच्या नशिबी आले!
मस्त लिहीले आहे! आवडले. हे
मस्त लिहीले आहे! आवडले. हे लेख तेव्हा कसा हुकला ते आठवत नाही. कदाचित नावावरून हे गोविंदाच्या पिक्चर्सबद्दल आहे हे लक्षात आले नसेल. पण मला वाचल्याचे आठवत नाही.
मी मित्रांबरोबर "राजा बाबू" बघितला तेव्हा हे काय बघायला आलोय अशा विचारात गेलो होतो. पण त्यातला आचरट विनोद, "नंदू, सबका बंदू", "समझता नही है यार!" वगैरेवर मनसोक्त हसलो हे ही लक्षात आहे. आपण हसतोय आणि तुफान एन्जॉय करतोय पण हे आपल्याला आवडले आहे हे स्वतःलाच कबूल करायची इच्छा नसते असे काहीतरी होत होते. डिनायल.
पण मग नंतर कुली नं १, साजन चले ससुराल वगैरे पाहिले आणि तोपर्यंत मी "कन्वर्ट" झालेलो होतो. हीरो नं १ सुद्धा ठीक होता. पण नंतर आलेले इतर काही पिक्चर्स इतके जमले नव्हते. कारण एकदा हे अॅण्टिक्स पब्लिकला आवडतात हे दिग्दर्शकांच्या लक्षात आले, की त्यातली ओरिजिनलॅटी निघून जाते व कृत्रिमरीत्या काहीतरी करायचा प्रयत्न केला जातो. ती नस पकडणे जमले नाही तर पिक्चर फसतो. त्यामुळे पुढचे ते पिक्चर्स इतके आवडले नव्हते पण इव्हन त्यातही काही सीन्स धमाल असत. तो एक सतीश कौशिक आणि एक गाढव एका इमारतीत पहिल्या मजल्यावर स्वॅप होतात तेव्हा हसून लोळल्याचेही लक्षात आहे. नंतर बडे मियाँ छोटे मियाँ मधला गोविंदा पुन्हा मस्त होता.
बाकी लेखही धमाल आहेच
या असल्या वाक्यांनी मजा आली.
बेसिकली मीच एकटी क्लासी यावर माझा अढळ विश्वास होता >>>
आळशी असल्याने मला अवघड कामापेक्षा सोपे काम आवडते >>>
त्यांनी माझा मेंदू धुवायचा पुष्कळ प्रयत्न केला पण मी नर्मदेतल्या गोट्यासारखी अभेद्य राहिले >>>
इथे मी बँकेशेजारी मांडी ठोकून बँकेतला अर्धा माल हडप करायचे त्याला कळायचं सुद्धा नाही. >>>
कधीतरी मोठमोठ्या तात्विक
कधीतरी मोठमोठ्या तात्विक गोष्टींचा कंटाळा येतो, कशाचा ताळमेळ कशाला रहात नाही, आपण माणूस आहोत की घाण्याला लावलेला बैल वाटत रहाते. तेव्हा असे एकदोन क्षणही मनाला रम्य अशा आश्वस्त काळाची सहल करून आणतात.>>>> अगदी मनातलं लिहतेस. तुझे लेख वाचून ही आम्हा वाचकांना निर्भेळ आनंद मिळतो बघ.
जुना लेख असून मिसला होता. हिरा तुमचा प्रतिसाद (पान १) पण गोड आहे अगदी.
भागमभागमध्ये अक्षय कुमार सोबत होता, पण अक्षयकुमारने तो आपल्याला भारी पडणार हे समजल्याने त्याचा गेम केला त्या चित्रपटात>>> ईन फॅक्ट, भागम भाग मधे अक्की ला & पार्ट्नर मधे सल्लू ला गोविंदा ने खरंच खाल्लंय. तो निरागस विनोद करवून हसवत राहतो. त्याला चांगली साथ देणारे म्हणजे संजय दत्त & चंकी पांडे. जास्त ओव्हरपावर नाही करायचे.
गोविंदासोबत "माझा कट्टा"
गोविंदासोबत "माझा कट्टा" वरच्या मराठीतून गप्पा. या धाग्यावर नोंद व्हायला हवीच:
https://youtu.be/9ooQWx0LmA0
हे खूप खूप भारी आहे. केवळ तो इतके मस्त मराठी बोलतोय म्हणून नव्हे तर इतरही अनेक कारणांसाठी ऐकण्या पाहण्यासारखा इंटरव्ह्यू.
वा! छान लेख ! गोविंदाबाबतचा
वा! छान लेख ! गोविंदाबाबतचा माझाही प्रवास सेम. अर्थात त्याचा नाच अधिक आवडतो. त्याचे विनोदाचे काय किंवा नाचाबद्दल काय, जबरदस्त टायमिंग आहे.
प्रतिसादही तेवढेच सुंदर आहेत. जी गाणी पाहिली नाहीत ती पहाण्यात येतील.
लेख व प्रतिसाद सर्वच मस्त
प्रांजळ निवेदनशैलीमुळे लेख आवडला; प्रतिसादही मस्तच आहेत.
हिंदी मी सिनेमे कमीच पाहतो पण तरीही गोविंदा माझ्या आवडत्या कलाकारांच्या यादीत आहे. गोविंदाचे पदलालित्य, मुद्राभिनय हे unique आहे.
त्याचे ओय राजू प्यार ना करीयो हे राणी मुखर्जीसोबतचे गाणे मी अगणित वेळा ऐकले-पहिले आहे.
सगळ्या नवीन अभिप्रायांसाठी
सगळ्या नवीन अभिप्रायांसाठी आभार.
मुलाखतीच्या लिंकसाठी धन्यवाद अतुल, तो दिलखुलासच बोलतो.
गोविंदाबाबतचा माझाही प्रवास सेम. >>>
लेखाचे सार.
आपण हसतोय आणि तुफान एन्जॉय करतोय पण हे आपल्याला आवडले आहे हे स्वतःलाच कबूल करायची इच्छा नसते असे काहीतरी होत होते. डिनायल. >>>>
मला तो सतिश कौशिक आणि गाढवाचा सीन आठवत नाहीये. मी पण कुली नंबर वन आणि साजन चले ससुराल नंतर कन्व्हर्ट- शाळेला सुट्ट्या लागलेल्या असताना शेजारच्या ताईसोबत जाऊन बघितले होते. त्या आधीचे स्वर्ग, किंवा संयुक्त कुटुंब रडारड बोअर होते. पण काम मात्र तो तेथेही मन लावूनच करायचा. वर्क एथिक्स दिसतात.
भागम भाग मधे अक्की ला & पार्ट्नर मधे सल्लू ला गोविंदा ने खरंच खाल्लंय. >>>>
गोविंदाचे पदलालित्य, मुद्राभिनय हे unique आहे. >>> अगदी. पार्टनरमधे सलमान असूनही मजा गोविंदा स्क्रीनवर आल्यावरच यायची. एनर्जीच धमाल आहे. कैंदी पों गाणं पाहूनही लक्षात येईल.
आधी वाचलं होतं की नाही आठवत
आधी वाचलं होतं की नाही आठवत नाहीये. पण फार फार मजा आली वाचून. सहजसुंदर झालाय लेख.
हत्या गेल्या आठवड्यात बघायचा
हत्या गेल्या आठवड्यात बघायचा होता पण राहुन गेला. काल पाहिला. गोविंदाचा कंटाळा येत नाही. खरेतर सुमार चित्रपट आहे. हत्येचा टोटल प्लॅन व नंतर मुलाला पकडण्याचा प्लॅन हास्यास्पद आहे. पण गोविंदा असली जान ओततो की चित्रपट खिळवुन ठेवतो.
लेख छान आहे याबद्दल वादच नाही. गोविंदा आवडतो म्हणणे म्हणजे आपला स्तर खाली आणणे
जबरदस्त अॅक्टर होता. आणि काय डान्सिण्ग स्किल होते त्याचे.
डांसिंग स्किल म्हटले की सचिन आठवतो. तोही खुप चांगला डांसर होता पण बघा मी किती छान नाचतोय हे त्याच्या चेहर्यावर दिसायचे . गोविण्दा नाचताना स्वतःही खुप एंजॉय करतो. तो त्याच्या विश्वात असतो तेव्हा, मी किती छान नाचतोय हा आविर्भाव अजिबात नसतो.
थॅंक्यू साधना आणि रमड.
थॅंक्यू साधना आणि रमड.
हा लेख वर आल्याने मलाही लक्षात आले की मी खूप महिन्यांत गोविंदाचा एकही चित्रपट पाहिला नाहीये. या विकान्ताला एखादा थोडा का होईना शोधून बघेन.
माझ्या आजोळी एकत्र कुटुंब असल्याने मला नऊ भाऊ आहेत. सुट्ट्यात एकावेळी कमीतकमी पाच असायचे. आम्ही सगळे समवयीन. ते पाच व मी एकटी. ते गोविंदा आणि मी शाहरुख खान. मी सगळे पिक्चर त्यांच्यासोबत पाहिले. ते गोविंदाचे जबरदस्त फॅन. आम्ही एकत्र फार धमाल केली आहे. ग्रूपमधे एकटीच मुलगी असल्याने ते थोडं नमतंही घ्यायचे, त्याचा पुरेपूर गैरफायदा घेतला आहे.
अगदी पंजाही लढवायचो. त्यांना वाटायचे नाजूक मुलगी आहे एका मिनिटात हरवू. तर एकदोघांना मीच हरवले, बाकींना 'कांटे की टक्कर' दिली. सगळी गंमत एकत्रच करायचो. दरवेळी पिक्चर बघून झाल्यावर "आता तरी गोविंदा आवडतो का?" असं कोणी आलटूनपालटून विचारलं तरी मी कधीही कबूल केलं नाही. शाहरुखचं तुणतुणं चालू ठेवलं, कधीकधी अक्षय कुमार किंवा अजून कोणी पण चुकूनही गोविंदा नाही. हा लेख एकप्रकारे कबुलीजबाब आहे. 
आजोळचा प्रचंड प्रभाव आहे माझ्या व्यक्तिमत्त्वावर. येथेही बरेचदा बोलण्याच्या ओघात येत असते. मी सुट्टीत आले नाही की त्यांनाही करमायचे नाही. आता तर मी खूप काळापासून परदेशात आहे, तरीही फोनवर "तू अमेरिकेत गेल्यापासून तशी मजाच आली नाही बघ नंतर कधी उन्हाळ्यात" म्हणतात. ह्या दोन्ही आठवणींची मनात सांगड बसली आहे, त्यामुळे ते एकमेकांत गुंफून लिहिलं गेलं.
>>>>>हा लेख एकप्रकारे
>>>>>हा लेख एकप्रकारे कबुलीजबाब आहे. Happy

Pages