श्रध्दांजली वाहायला मन धजावत नाही......

Submitted by ASHOK BHEKE on 24 May, 2021 - 11:54
राजन सावंत

प्रिय राजन सावंत......

दोन महिन्यानी तु सेवानिवृत्त होणार होतास. काय स्वप्न रंगविलि होतीस तु.... ऐशआरामात जिवन जगणार म्हटला होतास ना तुझ्या लाडक्या पूजाला... मुलिंची लग्न करायची म्हणून घर देखिल आकर्षक आणि सुंदर रंगरंगोटी करून सजविले होते. खरंतर तु वकिल होणार होतास. पण तुझी सोबत लाभावी म्हणून त्या भगवंताने तुला आमच्या सोबतीला धाडले. काय खेळ मांडला नियतीने, समजत नाही. काल बरोबर होतो आणि आज तु सोबत नाही. काल एकत्र जेवलो, गप्पा मारल्या पण आज तु नाही. आज खरोखर तुला श्रध्दांजली वाहायला मन धजावत नाही. नेहमी चांगले लोक आणि चांगले विचार सोबत असतील,तर आयुष्यात कधी कोणी एकटे राहु शकत नाही. कितीजण होतो आपण, एकत्र जिवन व्यतित केले. गेल्या वर्षी *विनायक जोशी* असाच न सांगता गेला. तु देखिल त्याला इतक्या तत्परतेने भेटायला जाशील असे साधे मनात आले नाही. आज तुमच्यातला मी एकटाच सेवेत राहिलो आहे. आता या कोरोना महामारीने चांगली लोक नेण्याचा धडाका लावल्याने श्रध्दांजली वाहायला मन धजावत नाही. तुझ्या जाण्याने आमच्या डोळ्यातल्या अश्रूंना बांध घालता येत नाही. त्यामुळे आज भावपूर्ण श्रध्दांजली वाहायला मन धजावत नाही.माणसाचं जगणं सुंदर आणि सकारात्मक जर त्याच्या विचारांनी पेरलेले असेल तर तुझ्या सारखी मांणसं सतत आठवणीत राहतात, पण तुला आज भावपूर्ण श्रध्दांजली वाहायला मन धजावत नाही. ईश्वर तुझ्या आत्म्यास शांति देवो आणि या संकटातुन सावरण्याचे धैर्य त्यांच्या कुटुंबाला लाभो, हि ईश्वराकडे प्रार्थना करायला देखिल मन धजावत नाही. गलितगात्र झालो आहे रे.... काय सुचत नाही. कळेनासे झाले आहे. तुझ्या कुटुंबाला धीर देण्याइतपत शब्द देखिल मुखातुन फुटत नाहीत. मग साधी भावपूर्ण श्रध्दांजली वाहायला मन धजावेल कसे......!
सगळे म्हणतात कि, एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही आणि थांबत नाही. पण हे एक त्यांना कसे कळत नाही, लाख मित्र असले तरी तुझ्यासारखे लाखात एक मित्र गेल्याने किती हानी होते, याचे गणित ऊलगडणार नाही. तुझ्या आकस्मिक जाण्याने जी पोकळी निर्माण झाली, ती भरून काढता येणारी नाही म्हणून माफ कर मित्रा आज तुला भावपूर्ण श्रध्दांजली वाहायला मन धजावत नाही.

काळाचा महिमा काळच जाणे, जन्माला आला की, मृत्यु हा ठरलेला असतो. पण कोरोना राक्षसाने आकस्मिक थैमान घालावे. हसता खेळता संसार उघड्यावर टाकून निघून गेल्याने मनाला वेदना होत असताना मला भावपूर्ण श्रध्दांजली वाहायला मन धजावत नाही.भले सहवास सुटला असेल पण आठवणीचा सुगंध, क्षणोक्षणी आमच्या मनी तुझीच राहणार आहे आठवण, हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण प्रत्येक वळणावर दरवळत राहणार असली तरी आज माझी स्थिती अशी आहे की, मी तुझ्या त्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतता मिळावी म्हणून तुला भावपूर्ण श्रध्दांजली वाहायला मन धजावत नसले तरी देखिल आज जड अंतःकरणाने, तुला भावपूर्ण श्रध्दांजली वाहत आहे.

अशोक भेके

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भावपुर्ण श्रद्धांजली ..!!

जवळाची माणसे अचानक गेल्यावर काय होते ते अनुभवत आहे. त्यामुळे तुमच्या भावना काळजाला भिडल्या..

सकाळ चे सात : अठरा
मी खरतर दुसरी एक गोष्ट वाचायला आलो होतो!
पण मी तुमचे नाव पाहिले लेखाच्या बाजूचे.
आपण या नावाच्या कुणाचेही काहीही आधी वाचलेले नाहीये.
मी मायबोली वर आल्यापासून तुमचे लेखन वाचले नाहीये असे लक्षात आले.
आणि पहिलाच लेख म्हणून हा लेख यावा?!
ईश्वर राजन सावंत यांच्या घरच्यान्ना सावरायचे बळ देवो.
तुम्हाला देखिल लवकरात लवकर सावरायचे बळ देवो.
स्वत:च्या मुलीचे लग्न तोंडावर आलेले असताना असे होणे खरच दुर्दैवातीत दुर्दैवी आहे.
काल ब्रदर्स डे च्याच दिवशी तुम्हाला मित्राचा शोक व्हावा... खरच खूप दु:खद आहे हे.
आफ्टर the line ऑफ friendship, मित्र देखील भाऊ च असतो ना!!
हे बरे झाले की तुम्ही इथे लिहुन मोकळे तरी झालात त्यातल्या त्यात काही प्रमाणात तरी..
त्यांच्या घरचे कसे मोकळे होतील?!
एक प्रश्न की राजन सावंत यांचे वय ४५+ होतेच हे दिसते आहे!
पण मग लस घेतली गेली नव्हती का?? की मिळाली नव्हती?
_भावपुर्ण श्रद्धांजली_

काळजी घ्या.