शाप

Submitted by पाचपाटील on 23 May, 2021 - 10:51

नेटफ्लिक्स,ॲमेझॉन,सोशल मीडिया
अन-इन्स्टॉल कर सगळं
गच्च भरून गेलंय डोकं
अजून किती कोंबशील
वाचूही नकोस
काही अर्थ नसतो त्यात
पुस्तकांचाही वैताग येण्याचे दिवस
आणि व्हिस्कीचाही कंटाळा येण्याच्या रात्री
सगळे स्वतःपासून पळण्याचे धंदे
बंद करून घे चहुबाजूंनी कडेकोट
मग स्वतःला कवटाळ
व्हायचं ते होईल बेंचो
कायकू डरताय ?
साधी हुरहूर तर आहे
तिला काय डरायचं ?
आणि डरण्याचं वय आहे का हे?
रोज संध्याकाळी ग्रेसची प्रॅक्टिस कर,
भय इथले संपत नाही वगैरे..

मग पाठोपाठ आत्मकरुणेचा महापूर
मोठमोठ्ठे लोंढे येतायत दुथडी..
झेपणार नाही तुला.. पळ..
शेपूट घाल नेहमीसारखा
गटांगळ्या खा
ओरड.. बचाव बचाव..
शेवटी कण्ह..
कण्हणं महत्वाचं..
ते जमलं की बाकी काही अवघड नाही

कोऱ्या पानांकडं दुपारभर बघत बसून शब्दांचा पाऊस
पडणार असतो का?
त्यापेक्षा झाडाच्या सळसळत्या पानांना जास्त माहिती असतं,
त्यांना विचार.
तुझ्या आत उरलंय का तसं काही सळसळणारं ?
जिवंत जीवघेणं संज्ञाप्रवाही वगैरे काही?

मग काही लिहूबिहू नकोस
आणि लिहिलंस तर मला पाठवू नकोस
पाठवलंस तर वाट पाहू नकोस
वाट पाहलीस तर तसं सांगू नकोस
स्वतःचेच त्रास पुरे झालेत
त्यात हे आणखी नको

साचलायस तू..
फुटशील एखाद्या दिवशी
किंवा सुकून जाशील

थांब तुला शापच देतो
तुझी नौका फुटो
वल्ही तुटो
तटबंदी ढासळो
उतरो हे मुखवटे
वाहो तुझ्यात काही
आणि तुझ्यातूनही काही वाहो
उसळो थुईथुई कारंजे पेशीपेशींतून
लाभो निष्कंप मन अखेरीस
लख्ख होवो जाणिवा
आणि त्यांच्या उजेडात मरणवाट दिसो..

(हे ललितबिलित नाही
आणि कविताबिविताही नाही..
काय आहे कुणास ठाऊक..
)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ललित/ स्फुट आवडलं.
थांब तुला >>>पासूनचे मस्तच !
Everything seems fake sometimes,
असे विचार येणेही शाप की वरदान काय माहिती ??!!

हे ललितबिलित नाही
आणि कविताबिविताही नाही..
काय आहे कुणास ठाऊक. >>>>>> जे काही आहे ते भारी आहे. अंतर्मुख व्हायला लावणारं
(स्वगत - झोपण्यापूर्वी का वाचलं? आता उगी मेंदुत किरकिर किडा Sad )

_/\_