इथे थांबला काळ गड्यांनो
इथे थांबला काळ ।।धृ।।
पानिपतातली कत्तल बघुनी
मान घातली खाली तयाने
अमानुषतेचे दर्शन घडले
प्रथमच ढळले अश्रू तयाचे ।। धृ।।
युद्ध भयंकर सुर असुरांचे
तांडव दिसले सदाशिवाचे
कितीकांची पोटे फुटली
अन् कितीकांची बोटे तुटली ।।
कितीक किंकाळ्या मारीत मेले
कितीक अंगावर धावून गेले
आपुला परका भेद कळेना
तोपचीला मग काही दिसेना।। धृ।।
तोफांची तर बत्ती विझली
मराठ्यांचा विरोध ढळला
दिसे न वाली तेव्हा कोणी
देऊ लागले झुंज कडवी
काही फुकटची मेले
काही जण मारुनी मेले
बुणग्यांची तर फरफट झाली
मिठी मारुनी रडू लागले ।।धृ।।
गोल मोडला गोल मोडला
सैन्याचा तो गोल मोडला
"अरे, नका घाबरु जीत झाली
पळू नका तुम्ही पळू नका
गोल तेवढा मोडू नका "
पायपोस तो निघोनी गेला
गटागटाने लढणे सजले
एकजुटीचा निकर थांबला
दैवाने मग खेळ खेळला
हुजरातीचा घोडा घेरुनी
घास अखेरीस गिळला गिळला
भाऊ पडले भाऊ पडले
जमेल तितुके पळोनि गेले
दोनच वीर दोनच तोफा
ठासून भरल्या अनामिकांनी
बत्ती देता मेले कितीतरी
जीव सोडला आनंदानी
युद्ध यज्ञ तो निमू लागला
भगवा मान मुरडुनी पडला
विसर न पडो या युद्धाचा
कधीही आपुल्या या देशाला
अरुण कोर्डे