लॉकडाऊन पोस्ट

Submitted by झुलेलाल on 21 May, 2021 - 22:55

लॉकडाऊन पोस्ट- १

चिंतातुर जंतू!
प्रोफेसर बारटक्के धापा टाकत घरी परतले. त्यांच्या डोळ्यात कमालीची भीती दाटली होती. सोफ्यावर बसून बुटाच्या लेसच्या गाठी सोडवतानाही त्यांची बोटं थरथरतच होती. कसेबसे त्यांनी बुटातून पाय मोकळे केले, आणि दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंफून डोक्यामागे घेत ते सोफ्यावर रेलले. त्यांचे डोळे गच्च मिटलेले होते. काही क्षण ते तसेच बसून राहिले.
थोडंसं सावरल्यावर त्यांनी डोळे उघडले. आता छातीतली धडधड कमी झाली होती. जणू खूप वेळाची झोप झाल्यासारखे डोळे चोळत त्यांनी आसपास पाहिले. आपण आपल्या घरातच आहोत, याची खात्री झाल्यासारखी मान हलविली, आणि डोक्यामागची हाताची घडी सोडवून उजव्या हाताने सोफ्याच्या कडेवर भार देत त्यांनी आपला स्थूल देह कसाबसा उचलला. ते उठून उभे राहिले.
गेले कितीतरी महिने, संध्याकाळी गार्डनमधल्या जॉगिंग ट्रॅकवर घाम फुटेपर्यंत वेगाने चालण्याचा व्यायाम सुरू होता. पण वजन कमी झाल्याची कोणतीच खूण प्रोफसर बारटक्केना जाणवत नव्हती. त्या चिंतेने मानसिक ताण मात्र, दिवसागणिक वाढत होता.
नेहमीप्रमाणे आजही ते गार्डनमध्ये गेले, आणि ट्रॅकवर फेऱ्या सुरू झाल्या... इयरफोनवर गाणी ऐकत प्रोफसर बारटक्के आपल्याच नादात चालत होते. त्यांचे इकडेतिकडे अजिबात लक्ष नव्हते. काही फेऱ्या संपल्यावर एका वळणावर त्यांचा वेग मंदावला. त्यांचं लक्ष बाजूच्या बाकड्यावर गेलं...
तो तिथे बसलेलाच होता.
खरं म्हणजे, गार्डनमध्ये त्या वेळी माणसांची गर्दीच असायची. प्रत्येक चेहरा न्याहाळावा असं त्यांना कधीच वाटत नसे. पण समोर बसलेला तो माणूस दिसताच, प्रोफेसर बारटक्केंच्या मनात अचानक काहीतरी ढवळल्यासारखं झालं. ते त्याच्याकडे थोडंसं निरखूनच पाहू लागले होते.
अशी स्वमग्न माणसं प्रोफेसर बारटक्केंनी याआधीही कुठेकुठे पाहिली होती. ट्रेनमधून दररोज कॉलेजला जातायेताना, आसपास बसलेल्या प्रवाशांपैकी असे चेहरे नेमके निवडून त्यांचं स्वतःशीच चाललेलं बोलणं ऐकत प्रवास संपवायची त्यांची सवयच होती. म्हणूनच, कदाचित, गार्डनमध्ये बसलेल्या तशाच एका माणसाला बघून प्रोफेसर बारटक्के आज मात्र चालणं विसरले. ते तिथेच उभे राहून त्याच्याकडे एकटक पाहात राहिले. याआधीही अनेकदा तो तिथेच बसलेला असायचा. पहिल्यांदा तो तिथे दिसला, तेव्हापासूनच प्रोफेसर बारटक्केंना त्याचं एक वेगळंच कुतूहल वाटू लागलं होतं.
काही वेळानंतर त्याचं लक्षही प्रोफेसर बारटक्केंकडे गेलं.
त्याचे डोळे चमकले. प्रोफेसर बारटक्केंकडे रोखून पाहात तो ओळखीचं हसला, आणि प्रोफेसर बारटक्के बुचकळ्यात पडले. पण त्याला टाळून निघून जावं, असं मात्र त्यांना वाटलंच नाही...
पुढे काय झालं, ते प्रोफेसर बारटक्केना कळलंच नाही. त्या इसमाशी शेकहँड करताना काहीतरी हिरवंकाळं, लिबलिबित, शरीरभर सरसरून पसरलं, असं प्रोफेसर बारटक्केंना जाणवलं, आणि त्यांना दरदरून घाम फुटला... तरीही ते तिथून हलले नाहीत. मग त्या इसमाने प्रोफेसर बारटक्केंचा हात धरूनच त्यांना बाजूच्या रिकाम्या बाकड्याजवळ नेलं, आणि खुणेनंच त्यांना बसण्याची खूण करून तो स्वतःही बसला.
प्रोफेसर बारटक्के, भारावल्यासारखे त्याच्या डोळ्यात नजर गुंतवून त्याच्या शेजारी बसले...
इथवर सगळं आता प्रोफेसर बारटक्केंना आठवू लागलं होतं. ते घाबरले. त्यांनी आपल्या हाताचा पंजा चेहऱ्यावर खसाखसा फिरवला, आणि पुन्हा एकदा... तोच भास त्यांना झाला.
काहीतरी लिबलिबीत, हिरवंकाळं, अंगभर सरसरत पसरलं होतं.
कसेबसे सावरत प्रोफेसर बारटक्केंनी टेबलचा ड्रॉवर उघडला. डायरी काढली. दोन दिवसांत न लिहिलेले ते अनुभव लिहून ठेवायचं त्यांनी ठरवलं.
एक नवा, जीवघेणा, आणि अनपेक्षितपणे आलेला अनुभव प्रोफेसर बारटक्केंच्या डायरीत आकार घेत होता.
***
१-
...अलीकडे तो मला बर्यानचदा भेटतोय.
त्या दिवशीसुद्धा, मी त्याला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा तो कोण आहे, हे मला माहीत नव्हतं.
त्याची आणि माझी आधी साधी ओळखपण नव्हती.
नेहमीप्रमाणे त्या संध्याकाळी मी चक्कर मारायला बाहेर पडलो, तेव्हा एका कोपऱ्यातल्या सिंगल बाकड्यावर तो बसलेला होता. त्याच्याकडे मुद्दाम पाहायचं काही कारणही नव्हतं. तरी पण माझं लक्ष गेलंच.
चालण्याचा वेग थोडा मंदावला.
डोक्याावरचे केस बोटाभोवती गुंडाळत आणि दोन्ही डोळ्यांनी केसांची ती बोटाभोवतीची एकच बट बघण्याच्या प्रयत्नांत तो पुरता गढून गेला होता.
मला थोडसं हसू आलं... पुढची फेरी संपवून येईपर्यंत तो माझ्या डोळ्यासमोर होता.
दुसऱ्यांदा मी तिथं आलो, तेव्हा त्याचं उजव्या हाताचं आंगठ्याशेजारचं बोट नाकात होतं.
दोन्ही डोळे नाकाच्या शेंड्याकडे लावून तो नाकातलं बोट फिरवत होता.
पुढच्या फेरीच्या वेळी, तो दोन बोटांच्या चिमटीत काहीतरी गुंडाळत, लांब कुठेतरी पाहात होता.
...एकदम त्यानं हाताच्या चिमटीतलं ते जोरात आपटल्यासारखा हावभाव केला, आणि मान जोरजोरात हलवली. दोन्ही हातांनी डोकं गच्च धरून ते गदागदा हलवायला सुरुवात केली .
चारदोन पावलं चालल्यावर मी थांबलो, आणि त्यानं मान वळवून माझ्याकडं बघितलं.
त्याची नजर माझ्या डोळ्यात स्थिरावताच मी उगीचच त्याच्याकडे बघून हसलो.
त्या हसण्यात ओळख अजिबातच नव्हती... असलाच, तर थोडासा गंमतीचाच मूड होता...
त्याचे डोळे चमकतायत, असं मला उगीचच वाटलं, आणि माझे पसरलेले ओठ एकदम तिथंच थांबले. पण नजर एकदम बाजूला हटवणं शक्य नव्हतं. माझ्या नजरेतच त्यानं डोळे खुपसून ठेवले होते.
मी कावराबावरा झालो.कसनुसं हसत त्याच्याकडं बघितलं.
... आणि माझ्याकडे पाहात तो हसला.
पुन्हा त्यानं हात झटकला, दोन्ही हात एकमेकांवर आपटत तळवे घासले, आणि तो जागेवरून – त्या सिंगल बाकड्यावरून- उठला. माझ्याच दिशेनं त्यानं चालायला सुरुवात केली.
गार्डनमधली सारी गर्दी आपल्या लयीत आपापल्या ट्रॅकवरून पुढे सरकतच होती.
कुणाचच आमच्याकडे लक्ष नव्हतं.
एवढी माणसं आसपास असतानाही, त्या क्षणी, आपण अगदी एकटेएकटे आहोत, असं मला वाटलं.
ट्रॅकवरून वेगानं चालतानासुद्धा मला घाम आला नव्हता.
तो संथपणे चालत माझ्याकडे येत होता, आणि आपण घामाघूम होतोय, ते मला जाणवत होतं.
माझ्याजवळ येऊन तो थांबला, आणि त्यानं आपली नजर पुरती माझ्या डोळ्यात खुपसली.
मी पुरता हडबडलो होतो.
आता माझ्यावरची नजर न हटवता तो माझ्याच बाकड्यावर, माझ्या शेजारी बसला होता.
कुणीतरी रोखून धरल्यासारखा मी स्तब्ध झालो होतो. आसपास एवढी गर्दी असतानाही, ते एकटेएकटेपण मला अस्वस्थ करत होतं.
मी आता पुरता त्याच्या ताब्यात गेलो होतो.
डोक्या वरचे विस्कटलेले केस मानेच्या वाकड्यातिकड्या झटक्यामनं मागे करून तो पुन्हा सगळं तोंड उघडून विचित्र हसला, आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पुन्हा बदलले. पहिल्या फेरीत मला दिसला, तसाच तो पुन्हा दिसत होता.
त्याचा चेहेरा, मान, नजर, माझ्याकडे होती, पण तो आता माझ्या डोळ्यात पाहात नव्हता. ...तो कुठे पाहातोय तेच मला कळत नव्हतं. मी मात्र त्याच्याकडेच पाहात होतो.
एकदम आमची पुन्हा नजरानजर झाली, आणि काहीतरी विचित्र होतंय, असं मला वाटायला लागलं... मला भीतीनं घेरलं होतं.
तो उठला, आणि विचित्र हसत त्यानं हात पुढे केला...
माझा नाईलाज झाला होता.
मी चिंतू... घोगऱ्या आवाजात तो बोलला.
मी नाईलाजानं हात पुढे करून त्याच्याशी शेकहॅंड केला, आणि क्षणभरच, लिबलिबित, हिरवंकाळं, काहीतरी तळव्यातून झिरपत शरीरभर पसरल्यासारखं मला वाटलं.
त्या चिंतूनं माझ्या हातात त्याचा हात घट्ट गुंफून ठेवला होता...
पुन्हा एकदा आमची नजरानजर झाली. आता माझी नजर थंड झाली होती. मी हात तसाच ठेवून चिंतूच्या डोळ्यात पाहिलं...
आणि हात सोडवून चिंतू लांब झाला... माझ्याकडे पाहातच तो हळूहळू चालू लागला, आणि लांब जाऊन दिसेनासा झाला.
मी भयानक अस्वस्थ झालो होतो.
कोण असेल हा चिंतू?...
कशासाठी त्यानं माझ्याशी हात मिळवला असेल?...
तो माझ्याकडे बघून तो असा विचित्र हसत का होता?... काय करत असेल तो?...
तिथं अगोदर कधी दिसला होता का आपल्याला?...
त्याच्यासोबत आणखी कुणी होतं का त्यावेळी?...
काय करतो तो?...
आणखी कुणी ओळखत असेल का त्याला?...
चिंतू दिसेनासा झाला, तरी माझ्या मनात तो घर करून बसला होता...
***
त्या रात्री प्रोफेसर बारटक्केंना झोपच लागली नाही. तो चिंतूच डोक्या तून डोकावत होता...
सकाळी कधीतरी त्यांना जाग आली, तेव्हा त्यांचं डोकं भयंकर जडावलं होतं.
काही मिन्टं ते तसेच बेडवर बसून राहिले.
आधी कधीच असं झालं नव्हतं. प्रोफसर बारटक्केंनी गदागदा डोकं हलवलं, आणि पुन्हा त्यांना एकदम चिंतूची आठवण झाली...
त्याच्या स्वतःशीच डोकं हलवण्याच्या कृतीचं मागे त्यांना हसू आलं होतं. त्यामुळेच त्याची खिल्ली उडवत त्याच्याकडे बघून आपण हसलो होतो, हे त्यांना आठवलं.
आणि आता मात्र...
घाबरून त्यांनी दोन्ही हातांनी घट्ट डोकं धरलं, आणि ते विचार करू लागले...
नकळत त्यांची बोटं डोक्यांवरच्या केसांमध्ये खुपसली गेली होती. एक बट धरून ते बोटाभोवती फिरवत होतो. एक बोटही नाकात गेलं, नजर नाकाच्या शेंड्यावर स्थिरावली. संथपणे बोट नाकात फिरत होतं.
त्यांच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं... फक्त तो चिंतूच डोळ्यासमोर दिसत होता.
हवेतच हात हलवून त्यांनीही काहीतरी फेकल्यासारखं केलं, आणि ते लक्षात येताच ते सावरले.
आपला "चिंतू' होतोय, असं त्यांना वाटू लागलं होतं.
त्याच्याशी शेकहॅंड करताना शरीरातून सरसरलेलं ते हिरवंकाळं लिबलिबीत, पुन्हा एकदा आतल्याआत घुसळतंय, असं त्यांना वाटलं...
स्वतःशीच विचित्र हसत ते उठले.
बेसीनवर जाऊन ब्रश करून त्यांनी टेबलवरचा पेपर उघडला, आणि समोरचीच एक बातमी वाचून त्यांना धक्का बसला.
त्यांची विस्फारलेली नजर त्या बातमीवर खिळली होती, पण एक अक्षरही डोळ्यातून आरपार जात नव्हतं. प्रोफेसर बारटक्के विचारात गढले होते.
अस्वस्थ झाले होते. त्यांच्या मनात चिंतेचं काहूर माजलं होतं.
काय होणार पुढे?...

त्यांनी ती बातमी वाचून संपविली. पुन्हा दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंफून डोक्यामागे धरत त्यावर रेलून ते विचार करू लागले.
कुणा शास्त्रज्ञानं उभी हयात घालवून तयार केलेल्या एका `मायक्रोक्लोन'चा फॉर्म्युला गायब झाला होता.
हा मायक्रोक्लोन हवेत विरघळून एखाद्याच्या श्वासावाटे किंवा तोडावाटे शरीरात गेला, तर त्या मानवी शरीरातच त्याचा दुसरा जीव तयार होणार होता...
सगळ्या जगाला धोक्याचा इशारा देणारी ती बातमी, वर्तमानपत्राच्या डाव्या बाजूच्या पानावर, अगदी तळाला कुठल्यातरी कोपर्याात होती.
प्रोफेसर बारटक्केंना कापरं सुटलं.
कोणता मायक्रोक्लोन असेल तो?...
त्याचा माणसाच्या शरीरात प्रवेश करणारा हिस्सा जर माणसाच्या शरीरातच `घर' करणार असेल, तर असे किती जीव या मायक्रोक्लोनच्या हवेतल्या तरंगणार्याा मायक्रोकणांच्या जाळ्यात सापडले असतील?...
समजा, त्या कणांनी माणसाच्या शरीरात प्रवेश केल्यावर त्याचा नवा जीव माणसाच्या आत तयार झालाच, तर काय होईल?...
तो जीव काय करील?...
ज्या शरीरात तो तयार होईल, त्या शरीराचा ताबा घेण्याइतका तो शक्तिमान असेल?...
त्या मायक्रोक्लोनचे काय `गुण' असतील?
वेगवेगळ्या प्रश्नांनी घेरल्यामुळे प्रोफेसर बारटक्के आणखीनच चिंतातुर झाले. अशीच बातमी जगाच्या मीडियाजालावर कुठे सापडते का ते शोधण्यासाठी त्यांनी `नेट' लावला...
आणि सर्च इंजिनातून फिरताफिरता त्यांना एक `क्लू' सापडला...
आणि प्रोफेसर बारटक्केंनी त्यावर क्लिक केलं...
आपल्या घरी येणार्या वर्तमानपत्रात एका कोपर्या'त वाचलेल्या त्या भयंकर बातमीनं, जगभर हलकल्लोळ माजवला होता, हे प्रोफेसर बारटक्केंना एव्हाना उमगलं होतं.
हा मायक्रोक्लोन हवेतून एखाद्याच्या शरीरात घुसला, तर तो मानवी देहाचा ताबा घेतो, आणि मग,... .
तो माणूस त्याचा राहात नाही...
असं काहीतरी त्या बातमीत होतं!
मग, हा बदललेला माणूस कसा असतो?
प्रोफेसर बारटक्के आणखी उत्सुकतेनं पुढे वाचू लागले...
आणि त्या दिवशी, चिंतूशी शेकहँड केल्यानंतर शरीरभर पसरलेलं, ते, लिबलिबीत, हिरवंकाळं, पुन्हा आतल्या आत घुसळतंय, असं त्यांना वाटायला लागलं.
माऊसवरचा हात काढून प्रोफेसर बारटक्केंनी डोकं घट्ट पकडलं. दुसऱ्या हाताचं एक बोट नकळत नाकातही गेलं.
आणि काळजीचं, चिंतेचं सावट प्रोफेसर बारटक्केंच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटलं.
काय असेल हा मायक्रोक्लोनचा प्रकार?...
आपण कशाला याच्या खोलात शिरतोय?
तरीही, प्रोफेसर बारटक्केंचे डोळे कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरून झरझर सरकत होते.
हा मायक्रोक्लोन कुठल्यातरी एक सूक्ष्म विषाणूचा असल्याचं पटकन कुठेतरी दिसलं, आणि त्यांची नजर तिथं खिळली...
विषाणूचा मायक्रोक्लोन!
... या केवळ विचाराच्याच संसर्गानं त्यांचं मन पोखरायला लागतं.
आपल्याशी काडीचंही देणंघेणं नसलेल्या विचारांचे विषाणू डोक्यात पिंगा घालायला लागतात.
त्यांच्या मनात एकदम काहीतरी लक्कन चमकलं...
म्हणजे, हा `चिंतातुर जंतू.
प्रोफेसर बारटक्केंनी मराठीत त्याचं नामकरणही करून टाकलं, आणि `युरेक्का'च्या थाटात त्यांनी पुन्हा स्क्रीनकडे बघितलं... पुढच्या ओळी वेड्यावाकड्या होऊन डोळ्यासमोर नाचतायत, असं त्यांना वाटायला लागलं. डोक्यात तेच नाव पिंगा घालत होतं.
चिंतातुर जंतू...
प्रोफेसर बारटक्के हादरले. शरीरातलं ते हिरवंकाळं, लिबलिबीत जोरजोरात घुसळतंय, असं त्यांना वाटू लागलं.
चिंतातुर जंतू... चिंतू?...
एकदम चिंतूची आठवण झाली, आणि प्रोफेसर बारटक्के शहारले. त्यांनी घट्ट डोळे मिटून घेतले.
आता आपली यातून सुटका नाही...
प्रोफेसर बारटक्के भानावर आले, तेव्हा त्यांना खूप दमल्यासारखं वाटत होतं...
पण ते हिरवंकाळं, लिबलिबीत, घुसळायचं थांबलं होतं.
आपला पुन्हा चिंतू होऊन गेला होता, हे त्यांच्या लक्षात आलं, आणि त्यांनी खोलीचा दरवाजा कडेकोट बंद करून टाकला.
आता चिंतू मनातून निघून जाईपर्यंत खोलीबाहेर पडायचं नाही, असा निश्चय करून प्रोफेसर बारटक्केंनी कपाटातला तो जाडजूड ग्रंथ काढला, आणि ते सोफ्यावर आडवे पडून ते ग्रंथात गढून गेले.
जवळपास दोन आठवडे प्रोफेसर बारटक्केंनी स्वतःस खोलीत कोंडून घेतलं होते.
आता त्यांची तब्येत सुधारली आहे. मनातला चिंतू गायब झाला आहे. शरीरात घुसळणारं ते हिरवंकाळंदेखील नाहीसं झालं आहे.
तो चिंतूसंसर्ग, संपला आहे.
त्याच दिवशी संध्याकाळी प्रोफेसर बारटक्के पुन्हा बागेत गेले.
बर्या च दिवसांनंतर, चिंतूला शोधायला...
तो दिसलीच, तरी हात मिळवायचा नाही. लांबूनच नमस्कार करायचा!.. असं ठरवून!
बागेत कोपराकोपरा भटकले, पण त्यांना तो कुठेच दिसत नव्हता.
समाधानाने प्रोफेसर बारटक्के घरी परतले, आणि बूट काढून सोफ्यात रेलून बसले. नकळत त्यांचं उजव्या हाताचं बोट नाकाशी गेलं...
पण त्यांनी तो विचार झटकला, आणि हातपाय धुवून फ्रेश होत त्यांनी पुन्हा तो ग्रंथ वाचायला घेतला.

Group content visibility: 
Use group defaults