आपल्या वाटणीला आलेलं भाग्याचं संचित नियती कशी क्रूरपणे हिरावून घेते... सुनील देशपांडे यांच्या आनंदी सहवासाचं भाग्य मला गेल्या काही वर्षांत लेखनाच्या निमित्ताने लाभलं. आज सुनीलजी आपल्यात नाहीत, ही दु:खद बातमी कळली. शरीरातल्या रक्ताची एक थंडगार शिरशिरी शिरापासून पायापर्यंत सरसरत सरकली, आणि मन सुन्न झालं...
तीन वर्षांपूर्वी सुनीलजींसोबत लवाद्याला लाभलेला दोनतीन दिवसांचा सहवास आठवला. त्यांनी उभं केलेलं काम, त्यांचा विद्यापीठ प्रकल्प, सुनीलजींची तपश्चर्या आणि निसर्गासोबतचं तादात्म्य, सारं काही सामान्यांच्या शक्तिपलीकडचं आहे.
या प्रतिभावान वेणुपुत्रास विनम्र श्रद्धांजली.
साप्ताहिक विवेकच्या एका विशेषांकासाठी लिहिलेला लेख काढला आणि पुन्हा वाचला.
मन अस्वस्थ झालं, की मी गीता किंवा गाथा वाचतो.
आज हा लेख वाचला...
वेणुपुत्राची गाथा...
आज तब्बल नऊ वर्षे उलटली आहेत. नोव्हेंबर २००८ मधील अतिरेकी हल्ल्यातून मुंबई नुकती स्थिरावत होती. काहीशी पूर्वपदावर आली, आणि प्रतिवर्षाप्रमाणे वांद्र्याच्या रेक्लमेशन मैदानावरचे महालक्ष्मी सरस प्रदर्शन देशाच्या कानाकोपऱ्यातील कारागीरांच्या कलावस्तूंनी फुलून गेले. कलासक्त मुंबईचा हा एक वार्षिक उत्सव... त्या वर्षी अतिरेकी हल्ल्यामुळे थोडासा पुढे गेला होता.
त्याच्या उद्घाटनाच्या आदल्या दिवशीची कारागीरांची धांदल न्याहाळण्यात आणखी एक वेगळीच मौज असते. ती न्याहाळण्यासाठी मी मुद्दाम उद्घाटनाआधीच्या संध्याकाळी मैदानावर पोहोचलो. गावोगावीचे कारागीर आपल्या स्थानिक संस्कृतीची रूपे पांघरून आपापले स्टॉल सजविण्यात मग्न होते. काही स्टॉल सज्ज झाले होते, आणि कारागीर निवांत झाले होते... असा एकएक स्टॉल न्याहाळत मी पुढेपुढे सरकत होतो, आणि अचानक थबकलो. कुठल्यातरी कोपऱ्यातून बासरीचे मोहक सूर कानाला भुरळ घालत होते. क्षणभरच कानोसा घेतला आणि माझी पावले त्या सुरांच्या दिशेने सरकू लागली... काही मिनिटांतच, मी अक्षरशः खेचला गेल्यासारखा त्या स्टॉलसमोर उभा राहिलो होतो, आणि वेगवेगळ्या आकारांच्या, कलात्मकतेने सजलेल्या असंख्य बासऱ्यांकडे मुग्धपणे पाहात राहिलो. तेथूनच उमटणारे सूर कानात घुमतच होते. वेगवेगळ्या बासऱ्या उचलून तो स्टॉलवाला त्यातून सुरांच्या लगडी उलगडत होता... रात्र वाढत होती, आणि बासरीच्या सुरांची जादू जणू त्या अंधारावर आपला अंमल चढवत होती. एक अनोखी धुंदी आसपासच्या वातावरणावर आपोआपच चढली होती...
त्या सुरांमध्ये कान गुंतवून मी आसपास न्याहाळू लागलो... समोरच्याच एका स्टॉलवर प्लास्टिकच्या खुर्चीत एकजण निवांतपणे, डोळे मिटून बसला होता. त्या सुरेल सुरांच्या जादूने त्यालाही लपेटले होते. कानात सुरांची ती मैफल साठवतच मी त्या धुंदावलेल्या माणसाला न्याहाळू लागलो. त्याने सजविलेल्या स्टॉलवर माझी नजर फिरू लागली, आणि एका विलक्षण योगायोगाच्या साक्षात्काराने मी क्षणमात्र अवाकही झालो...
त्या स्टॉलवरदेखील बांबूच्या असंख्य कलात्मक वस्तू सुबकतेने मांडलेल्या होत्या बांबूशी नातं जोडणारे हे दोन स्टॉल शेजारीशेजारी असल्याच्या योगायोगाचं मला उगीचच कमालीचं कौतुक वाटू लागलं, आणि मी हळूच त्या स्टॉमधून आत शिरलो. शेजारच्या रिकाम्या खुर्चीत बसून शांतपणे बाजूच्या स्टॉमधून उधळले जाणारे बासरीचे सूर कानात वेचू लागलो...
असा कितीतरी वेळ गेला, आणि बासरीचे सूर थांबले. मी भानावर आलो. समोरच्या खुर्चीत डोळे मिटून बसलेला तोदेखील भानावर आला, आणि त्याने डोळे उघडले. याआधी कधीच न भेटलेला माझ्यासारखा अनोळखी माणूस समोर आगंतुकासारखा बसलेला पाहूनही त्याने माझ्याकडे पाहून हलकेसे स्मित केले, आणि आपण एकमेकांना ओळखत नाही ही जाणीवच मनातून पुसली गेली. मीही त्याच्याकडे पाहून अगोदर ओळखीचं हसलो, आणि हात पुढे करून माझी ओळख करून दिली... तोवर त्याच्या स्टॉलचा फलक पाहून मला त्याची ओळख झाली होतीच.
संपूर्ण बांबू केंद्र... आसपास सगळीकडे बांबूपासून बनविलेल्या वस्तूंचा शिस्तबद्ध पसारा आणि मधोमध, त्याच्याशी विसंगत वाटणाऱ्या दोन प्लास्टिकच्या खुर्च्यांवर बसलेले आम्ही दोघे... पुढच्याच क्षणाला त्याने माझ्या हातात एक छापील पत्रक दिलं, आणि ते वाचतावाचता मला एक बाब जाणवली. मेळघाटातील या संस्थेविषयी मी अगोदर ऐकून होतो. सुनील आणि निरुपमा देशपांडे हे जोडपं मेळघाटातील आदिवासींना स्वयंपूर्ण करण्यासाठी झटतंय, त्यांच्या रोजगाराचा मार्ग म्हणून बांबूपासून वस्तूनिर्मितीचे प्रशिक्षण देणारं केंद्र तेथे चालवतंय, हेही मी ऐकलं होतं. कारण त्याच वर्षी, काही महिने अगोदर, सुनील देशपांडेंचा मुंबईत एका दिवाळी उत्सवात एका संस्थेने सत्कार केला होता. मेळघाटातील आदिवासींच्या आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या कामाचा सत्कार!...
आपल्यासमोर बसलेली ती व्यक्ती म्हणजे सुनील देशपांडेच आहेत, याची खात्री झाली, आणि संपूर्ण बांबू केंद्राविषयी जमवून वाचलेली सारी माहिती माझ्या मनात जागी झाली...
प्रदर्शन सुरू व्हायला एक दिवस बाकी होता, आणि सुनील देशपांडे काहीसे निवांत दिसत होते. मग ही संधी वाया घालवायची नाही, असे ठरवून मी त्यांच्याशी गप्पा मारू लागलो. म्हणजे, मी फक्त सुरुवात केली, आणि सुनील देशपांडे बोलत गेले... मेळघाटातील संपूर्ण बांबू केंद्र हा केवळ देशपांडेंच्या पोटापाण्याचा उद्योग नाही, तर कुपोषण, दारिद्र्य, आणि अनेक सामाजिक समस्यांनी ग्रासलेल्या आदिवासींच्या आयुष्याला दिशा देणारी चळवळ आहे, त्यांच्या उत्कर्षाचा मार्ग आहे, हे जाणवत गेलं. मेळघाटाच्या जंगलात विपुल प्रमाणात आढळणाऱ्या बांबूपासून असंख्य वस्तू बनविल्या जातात. याच केंद्राने गुजरातेतील भूकंपानंतर भुज येथे बांधून दिलेली शेकडो बांबूची घरे आजही मजबूतपणे उभी आहेत, हेही आठवलं.
त्या दिवशीच्या गप्पांमधून सुनील देशपांडेंनी केंद्राविषयी भरभरून माहिती दिली, आणि माझी उत्सुकता वाढतच गेली. केवळ कानाने ऐकून ती शमणार नव्हती. मेळघाटातील ही विकासाची प्रयोगशाळा प्रत्यक्ष पाहिलीच पाहिजे अशी कमालीची आस मला लागली, आणि त्याच दिवशी मी त्यांच्याकडे ती बोलूनही दाखविली. सुनील देशपांडेंनी लगेचच होकार दिला, आणि सरस प्रदर्शनाचा समारोप होताच त्यांच्यासोबतच मेळघाटातील त्यांच्या गावी, लवादा येथे जायचं असं ठरवूनच मी त्यांचा निरोप घेतला.
तीनच दिवसांनंतर एका पहाटे मी त्यांच्याबरोबर लवादा येथे पोहोचलो होतो...धारणीपासून दहापंधरा किलोमीटरवर लवादा हे टुमदार गाव आहे. मुख्य रस्त्याच्या एका बाजूला आदिवासींची घरं दिसतात. त्या पहाटे बसमधून उतरून केंद्राच्या दिशेने जाताना आदिवासी संस्कृतीचे ते जिवंत रूप न्याहाळतच सुनीलजींसोबत चालत होतो. नुकतं उजाडत होतं, आणि गावाला जाग येत होती. रस्त्याच्या दुतर्फा आदिवासींची नेटकी घरं... पाण्याच्या टाकीशेजारच्या नळाच्या खांबावर काही बायका पाणी भरत होत्या. बाजूलाच एक स्वच्छ सारवलेलं समाजमंदिर दिसत होतं. शेजारच्या देवळात तेवणारी समईची मंद ज्योत बाहेरूनही नजरेपर्यंत पोहोचत होती...
काही पावलं चालून पुढे गेल्यावर आदिवासींच्या त्या गावातील सुनील देशपांडेंच्या घरासमोर आम्ही पोहोचलो. बांबूचे घर, प्रवेशद्वारालाच बांबूची कमान, आणि त्यावरची ती सार्थ अक्षरे..., वेणू प्रयाग!
घरात प्रवेश करताच मी ज्या अपेक्षेनं आसपास नजर फिरवली, तेच दृश्य सर्वत्र दिसत होतं. बांबूचे घर, बांबूचे दार, बांबूची जमीन हिरवी गार... बाजूच्याच एका उंचवट्यावरल्या एका टुमदार इमारतीत, दोनचार तरुण बांबू तासून काढत होते. गुळगुळीत केलेल्या बांबूंचा ढीग बाजूलाच पडला होता.
संपूर्ण बांबू केंद्राचा उद्यमशील दिवस कधीचाच सुरू झाला होता... मी इमारतीची पाटी वाचली. वेणु प्रयागच्या आवारातलं ते उद्योग भवन होते. त्याच्या शेजारच्या इमारतीवर, सांस्कृतिक भवन अशी पाटी होती. खासदार बाळ आपटेंच्या विकास निधीतून उभ्या राहिलेल्या या इमारतीचं उद्घाटन तेव्हाचे लोकसभाध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते झालं होतं. तशी पाटी त्या इमारतीबाहेरच दिसत होती...
बाजूलाच केंद्राच्याच गेस्ट हाऊसमध्ये माझी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रात्रभराच्या प्रवासाने आंबलेलं शरीर ताजंतवानं करून मी बाहेर आलो, आणि सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीच्या गच्चीवर जाऊन आसपास नजर फिरवली. लांबवरच्या डोंगरावरचं बांबूचं जंगल स्पष्ट दिसत होतं. आपलं भविष्य या केंद्राकडून उजळणार या आशेनं जणू ते संपूर्ण बांबू केंद्राकडेच नजर लावून ताटकळलंय असं मला वाटून गेलं... तशीच एक नजर मी चहुबाजूंना फिरवली. संपूर्ण लवादा गाव एका नजरेत डोळ्यात साठवून घेतलं, आणि खाली उतरून केंद्राच्या कार्यालयात गेलो.
सुनील देशपांडे केव्हाच येऊन बसले होते... केंद्राचं कामकाज तर सकाळीच सुरू झालं होतं, आता कार्यालयाचं कामकाजही सुरू झालं होतं.
मी बाजूच्याच एका बांबूच्या खुर्चीत ऐसपैस विसावलो, आणि केंद्रात काम करणाऱ्या एका तरुणाशी गप्पा मारू लागलो.
मेळघाटातले सारे आदिवासी पाडे या तरुणानं पालथे घातले आहेत... आदिवासींच्या जगण्याशी थेट नातं असलेला हा तरुण सुनीलजींच्या सहवासामुळे जाणता झालाय, हे मला त्याच्या बोलण्यावरूनच जाणवू लागलं, आणि क्षणभर त्याला थांबवून मी माझी नोंद वही काढली.
तो बोलत होता, आणि मी त्याचे शब्द जसेच्या तसे वहीत उतरवत चाललो होतो.
मेळघाटातील या प्रयोगशाळेच्या यशाची गाथा माझ्या नोंद वहीत साकारत होती.
सातपुड्याच्या पर्वतराजीने वेढलेल्या या घाट प्रदेशातील कोरकू या आदिवासी समाजात, गायीम्हशींचे पालन, कोंबड्या-शेळ्या आणि शेती हा परंपरागत व्यवसाय. पण गेल्या काही वर्षांत ही व्यवस्था संथपणे बदलत गेली. सरकारी योजनांची पोस्टर्स गावातल्या भिंतीभिंतींवर लागली, आणि सरकार सारे काही आपल्याला देते असा समज बळावत गेला. घराघरात पैशाची स्वप्नं पडू लागली, पण प्रत्यक्ष विकास मात्र उंबरठ्यातून आत आलाच नाही. सरकारी यंत्रणांनी या योजनांची गाजरेच फक्त कागदोपत्री आणून सोडली होती. नाही म्हणायला, दोन रुपये किलोने मिळणारे धान्य घराघरात येऊ लागलं, आणि त्याचा परिणाम उलटाच झाला. आदिवासींचे आपल्या परंपरागत शेतीवरचे लक्ष उडाले. परंपरागत पिकं संपली, सोयाबीनच्या लागवडीने जमिनीचा कस उतरला, आणि आदिवासींच्या विकासाऐवजी दुष्टचक्र सुरू झालं...
सरकारी योजनांमुळे हा उपेक्षित समाज अधिकच समस्याग्रस्त होत गेला.
**** ***** *****
तब्बल दहा वर्षांपूर्वीच्या नोंदवहीतील त्या नोंदी मी परवा पुन्हा उघडल्या. समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या आदिवासींच्या विकासासाठी सुरू झालेल्या संपूर्ण बांबू केंद्राला दहा वर्षांनंतर पुन्हा भेट द्यायची असं ठरलं, म्हणून पुन्हा सुनीलजींशी संपर्क साधला. दिवस ठरला, आणि अशाच एका सकाळी, पुन्हा मी लवादा गाठले...
आठवणीतलं ते गाव आता ओळखीचंही वाटत होतं. बसमधून उतरून त्याच जुन्या रस्त्यावरून चालत मी वेणू प्रयागच्या त्या कमानीशी पोहोचलो. सगळ्यांच्याच स्वागतासाठी सजलेली ती बांबूची कमान माझ्याही स्वागतासाठी सज्जच होती. आत पाय ठेवण्याआधीच आतून सुनीलजींचे स्वागताचे शब्द कानावर पडले... बांबूच्याच एका ऐसपैस खुर्चीवर बसून मी पुन्हा एकदा सभोवार पाहिलं. बांबूचे घर, बांबूचे दार, बांबूची जमीन हिरवीगार... मला पुन्हा त्या ओळी आठवल्या.
बाहेर, केंद्राच्या उद्योग भवनात बांबू तासण्याचे काम सुरू झाले होते. कार्यालयदेखील उघडले होते. संपूर्ण बांबू केंद्र कामाला लागले होते.
थोड्या अवांतर गप्पा मारून मी सुनीलजींसोबत कार्यालयात आलो. तोवर एका कार्यकर्त्याने, बाहेर कुणीतरी आल्याचा निरोप दिला. तो रविवारचा दिवस होता. आज केंद्रात काही पाहुणे, हितचिंतक येणार आहेत, असं सुनीलजींनी सहज सांगितलं, आणि माझं मन थोडं धास्तावलं. या गर्दीत आपल्याला किती वेळ मिळणार, या शंकेनं!
पण मी काहीच बोललो नव्हतो. तरीही सुनीलजींनी ती शंका ओळखली असावी.
काही अडचण नाही. आपण आपली वेळ बरोबर जमवून घेऊ... सुनीलजी म्हणाले, आणि माझा जीव भांड्यात पडला.
तोवर आम्ही बाहेरच्या मांडवात आलो होतो. तेथे दहाबारा खुर्च्या अगोदरच मांडल्या होत्या. एका खुर्चीत मी बसलो, समोरच सुनीलजी बसले. ते काही सांगू लागणार एवढ्यात चारपाच पाहुणे आलेच... मग त्यांच्याशीच गप्पा सुरू झाल्या, आणि मी कान उघडे ठेवून बसलो...
गेल्या दहा वर्षांत संपूर्ण बांबू केंद्राचा पसारा प्रचंड वाढला होता, हे त्यांच्या गप्पांवरून मला जाणवत गेलं.
मग मी हळूच माझी नोंद वही पुन्हा उघडली आणि टिपणं घेऊ लागलो...
बांबूच्या घरांची जवळपास शंभर डिझाईन्स केंद्राने डेव्हलप केली आहेत. बांबूची तब्बल सतराशे घरे वेगवेगळ्या ठिकाणी बांधून झाली आहेत...
अर्ध्यापाऊण तासांच्या चर्चेनंतर ती माणसं गेली, आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या.
संपूर्ण बांबू केंद्रात धंद्यासाठी काम केलं जात नाही. अजेंड्यासाठी काम केलं जातं. मूव्हमेंटचा भाग म्हणूनच कामं हाती घेतली जातात. डिझाईनसुद्धा मूव्हमेंटचा भाग असेल तरच ते तयार केलं जातं. त्यामुळे कार्यक्रम अगोदर निश्चित केला जातो, आणि त्यानुसार राबविला जातो...
बोलताबोलता सुनीलजींनी आणखी एक नव्या उपक्रमाची माहिती दिली.
आम्ही घुंगरू बाजार करतो. गोंड लोकांची दिवाळी हा मोठा सण... या दिवशी गावातील गोधनाचं संवर्धन करणाऱ्यांचा सन्मान केला जातो. ज्या ठिकाणी समाजाच्या आहाराची व्यवस्था आणि सन्मानाची सुरक्षा करण्याच्या मानसिकतेचे लोक राहतात, त्या ठिकाणाला गाव म्हणतात. अशी गावाची व्याख्या गुरुजींनी केली होती. गोंड लोकांमध्ये ही मानसिकता आणि ही व्यवस्था अस्तित्वात आहे. दिवाळीच्या दिवशी त्यांच्या घरी अन्नधान्य पोहोचविले जाते. या लोकांच्या सन्मानाचा हा सण असतो. पशुधन चारणाऱ्याच्या घरी वर्षाचे धान्य पोहोचवून गाव त्यांचा सन्मान करते. हे झाल्यावर तो ज्या बाजारात घुंगराच्या तालावर नाचतो, खुशी व्यक्त करतो, तो बाजार म्हणजे घुंगरू बाजार... दिवाळीनंतरच्या पहिल्या बुधवारी, या भागातील तेराडौदा गावांत हा घुंगरू बाजार भरतो. या उत्सवात समाजातील विवाह सोहळेदेखील निश्चित होतात. विवाह ठरविण्याची त्यांची एक प्रथा असते. एखाद्या तरुणाने एखाद्या मुलीस पान खाऊ घातले, तिने ते स्वीकारले, म्हणजे तो विवाह निश्चित होतो... ही प्रथा अलीकडच्या काळात विस्कटत गेली. बाजारात प्लास्टिकचा माल विकायला येऊ लागला, छछोरगिरी वाढत चालली, धक्के मारण्याचे प्रकार सुरू झाले. गर्दी वाढली आणि नाचायला जागाच उरल्या नाहीत... मग हा बाजार संपूर्ण बांबू केंद्राच्या ग्राम ग्यान पीठामध्ये करायचे ठरवले. दिवाळीनंतरचा शनिवार-रविवार. यामुळे ही प्रथा जिवंत झाली... तिथे कारागीरांच्या वस्तूंची प्रदर्शने सुरू केली. शेतकऱ्यांचा माल विकण्यास सुरुवात केली. ज्यांना ज्या वस्तूची गरज असते, त्यांनी तेथे यावे, खरेदी करावी अशी व्यवस्था सुरू झाली... आता आम्ही आमचा माल विकण्यासाठी मुंबईला सरस प्रदर्शनात जात नाही. ज्यांना गरज असते, तेच येथे येऊन खरेदी करतात, स्थानिक जमातींचा आत्मसन्मान असा जपला जातोय...
सुनीलजींच्या तोंडून केंद्राच्या उपक्रमांची मालिकाच समोर उभी राहू लागली, आणि मी कान उघडे ठेवून नोदी घेऊ लागलो. सिपना नावाची नदी आहे. तिची यात्रा दोन वर्षे केली. या नदीच्या किनाऱ्यावर सहा संपदा आहेत. जलसंपदा, वनसंपदा, भूसंपदा, जनसंपदा, पशुसंपदा आदी संपदांचे अध्ययन सुरू केले. दर दिवशी एका संपदेची पूजा करायची, आरती करायची... दर वर्षी २६ डिसेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत सहा दिवस ही यात्रा चालते. आदिवासींचा आत्मसन्मान जागा ठेवण्याच्या या प्रयत्नात संपूर्ण बांबू केंद्राचा पुढाकार असतो. याच दरम्यान गावप्रमुखांच्या उपस्थितीत ग्रामसभाही आयोजित केल्या जातात, अडीअडचणींवर चर्चा होते, आणि सारा गाव मिळून त्यावर मात करण्यासाठी एकवटतो...
आदिवासी संस्कृतीचे एक आगळे दर्शन घडविणारी, आदिवासी संस्कृतीविषयीच्या गैरसमजुती दूर करणारी आणि आदिवासी जीवनशैली ही खरी सुसंस्कृत जीवनशैली आहे, हे सुशिक्षित, शहरी समाजास पटवून देणारी ही सिपना शोधयात्रा म्हणजे अलीकडे मेळघाटाविषयीच्या उत्सुकता शमविण्याचे साधन झाले आहे. सिपना शोध शिबिराच्या या सहा दिवसांत शहरांतील अनेक तरुणही सहभागी होऊ लागले आहेत. आदिवासी म्हणजे अशिक्षितपणा, कुपोषण, कुप्रथा, असंस्कृत जीवनशैली अशा शहरी गैरसमजांना मूठमाती देण्याचे काम गेल्या सहा वर्षांपासून सिपना यातेच्या माध्यमातून सुरू आहे...
आणि आदिवासीला जीवनभान, आत्मसन्मानाचे भान येऊ लागले आहे.
सुनीलजींकडून कानावर पडणारी माहिती टिपून घेत असतानाच अचानक त्यांनी मला खूण केली. कमानीबाहेर एक कार्यकर्ता मोटारसायकल घेऊन थांबला होता. मी उठलो आणि त्याच्या मागे जाऊन बसलो. पंधरावीर मिनिटांतच आम्ही बोरी नावाच्या एका गावाशी पोहोचलो होतो. तिथून आत वळलो, समोरच एक मोठी पाटी होती.... ग्राम ग्यानपीठ!...
सुनीलजींच्या बोलण्यातून वारंवार उल्लेख होत असलेल्या त्याच जागी आपण आता येऊन पोहोचलो आहोत, याची मला खात्री पटली. जवळपास आठ एकराचा विस्तीर्ण परिसर असलेले हे पारंपरिक शिक्षणाचे हे संकुल संपूर्ण बांबू केंद्राने सुरू केले आहे. लोकसत्ता दैनिकाच्या सर्व कार्येषु सर्वदा उपक्रमातून संपूर्ण बांबू केंद्राची माहिती वाचकांपर्यंत पोहोचली, आणि समाजातील सद्भावनांची साथ आर्थिक साह्याच्या रूपाने या केंद्रास मिळाली. त्यातून उभ्या राहिलेल्या निधीतून हे ग्राम ग्यानपीठ उभे राहात आहे. प्रत्येक पारंपरिक कलाकौशल्याचे पारंपरिक रीतीनेच प्रशिक्षण देणाऱ्या या संकुलात कुठेही सिमेंटचा वापर नाही. मातीच्या विटांचे बांधकाम असलेले हे संकुल आणखी काही दिवसांतच सुसज्ज होईल आणि आदिवासी कला-संस्कृतीची जोपासना करणारे, परंपरांचा वारसा जपणारे व पुढे नेणारे प्रगत केंद्र म्हणून कार्यरत होईल...
... आमच्यापाठोपाठ दुसऱ्या एका कार्यकर्त्यासोबत तोवर सुनीलजीदेखील संकुलात पोहोचले होते. संकुलाचा फेरफटका मारता मारता त्यांनी तेथील उपक्रमांची माहिती दिली. झपाट्याने आयात होणारी बाह्य संस्कृती आणि त्याच्या प्रभावाने पछाडलेली माणसे आसपास वाढत आहेत. या अतिक्रमणात आपलं आपलेपण हरवून जाऊ नये, या ध्यासाने चारपाच वर्षांपूर्वी सुनीलजी आणि त्यांच्यासोबत केंद्राच्या कामात संपूर्ण झोकून देणारी त्यांची पत्नी निरुपमा यांना ग्राम ग्यानपीठाची कल्पना सुचली आणि ती साकारण्याचा ध्यास या दाम्पत्याने घेतला. भारतीय संस्कृतीतील भोजन, भाषण, भजन, भूषण, भवन आणि भाषा अशा सर्वांचं जतन या ग्यानपीठात केलं जावं, प्राचनी परंपरेचं दर्शन इथे घडावं, अशी सुनीलजी आणि निरुपमा यांची आस आहे. तरीही, हे केवळ पर्यटनस्थळ असणार नाही. किंवा प्राचीन परंपरावस्तूंचे संग्रहालयदेखील असणार नाही. कारागीरांच्या जीवनाशी संबंधित प्रत्येक वस्तू, शब्द, ध्वनी, दृश्य स्वरूपात इथे अनुभवता यावा अशी या ग्यानपीठाची रचना राहणार आहे... कारागीरांचं शास्त्र काय आहे, बांबू, लोखंड, चामडे, दगडमाती अशा गोष्टींवर संस्कार करून काय घडविले जाते, याचे शिक्षणच नव्हे, तर लिखित स्वरूपातील डॉक्युमेंटेशनही येथे केले जाणार आहे... प्रत्येक कारागिरीचे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण करून ठेवण्यात येणार आहे. गुरुकुल पद्धतीवर आधारित कारागीर शाळा येथे साकारणार आहे. प्रत्येक कलेचं एक गुरुकुल येथे असेल आणि त्याची काळजी घेण्यासाठी गुरु आणि गुरुपत्नी यांचे निवासस्थानही येते उभारले जाईल...
केंद्राचा कानाकोपरा फिरून दाखवताना, सुनीलजींच्या डोळ्यातलं हे स्वप्न मी हळूच अनुभवून घेतलं...
केवळ बांबूंपासून कलात्मक वस्तूंचे प्रशिक्षण केंद्र चालविणे आणि आदिवासींना स्वयंरोजगाराचे साधन देऊन कुटुंबे आर्थिक सक्षम बनविणे एवढेच संपूर्ण बांबू केंद्राचे उद्दिष्ट नाही. सुनीलजींशी बोलताना ते लक्षात येते. कारागीराला प्रतिष्ठा मिळावी, त्याचे कलागुण जगासमोर यावेत यासाठी केंद्र प्रयत्नशील असते. विदर्भात, मेळघाटात सेवाभावी कार्यकर्त्यांचे अक्षरशः मोहोळ उभे आहे. या कामातून आदिवासींचे आत्मभान जागे होत आहे. कारण, आदिवासींना सक्षम करण्यासाठी कोणत्या कामाची, कोणत्या उपायाची नेमकी गरज आहे हे या मंडळींनी ओळखले हे. सुनीलजींच्या बोलण्यातून ते जाणवते.
ग्राम ग्यान केंद्राच्या आठ एकरात फळझाडांची लागवड केलीय. एक तलाव बांधण्याचे काम सुरू झाले आहे. दोन किलोमीटरवरून वाहात येणारे पाणी या तलावात साठविले जाईल. शिवाय एक बोअर विहीरही आहे. मुळात इथला आदिवासी समाज भीक मागत नाही, चोरी करत नाही, खोटं बोलत नाही. म्हणूनच, मेळघाट म्हणजे फक्त कुपोषण नव्हे, तर तेथील सकारात्मक बाबींकडेही पाहिलं पाहिजे, असे सुनीलजी म्हणतात.
बोलता बोलता सुनीलजींचा स्वर बदलला. नजरही लांबवर कुठेतरी खिळली... आणि ते भूतकाळात गेले. संपूर्ण बांबू केंद्राचं काम सुरू केलं, तेव्हा फक्त रोजगार देणे एवढाच विचार होता. पण जसजसे हे दाम्पत्य येथील आदिवासी समाजाशी एकरूप होऊ लागले, तसतशी तेथील गरजांची व्याप्ती लक्षात येऊ लागली. आपण ज्या चष्म्यातून पाहातोय, तो हा समाज नाहीये, हे लक्षात येऊ लागले. कुणी या समाजाला कुपोषित म्हणतं, चोर म्हणतं, अंधश्रद्धाळू म्हणतं, अनपढ म्हणतं... पण या समाजाचा अभ्यास करताना असं लक्षात यायला लागलं, की ही सगळी शब्दरचनाच चुकीची आहे. या समाजाकडे समस्या म्हणून न पाहता, सामर्थ्य म्हणून पाहिले पाहिजे. मग असं लक्षात यायला लागलं, की समस्या हा शब्दच योग्य नाही. समस्या या शब्दाऐवजी आवश्यकता या दृष्टीने पाहायला हवे. कुपोषणाची समस्या नव्हे, तर कुपोषणमुक्तीची आवश्यकता.... पोषणाची समस्या, आहाराची समस्या, शिक्षणाची समस्या अशा नकारात्मक दृष्टीने न पाहता, पोषण, आहार, शिक्षण आदींची आवश्यकता अशा सकारात्मकतेने विचार केला पाहिजे, असे ठरविले. कारण सकारात्मकतेने पाहिले, की विचार सकारात्मक होतात. चिंतन सकारात्मक होते... नियोजन आणि अंमलबजावणीही सकारात्मक होते, मग परिणामही सकारात्मक होतात. समस्यामुक्तीच्या प्रयत्नांमुळे माणसाची परावलंबित्व वाढते. सरकारवर अवलंबून राहण्याची सवय लागते. समस्या दुसऱ्याने सोडवावी अशी मानसिकता वाढते. इथे समस्या सोडविण्याची क्षमता अंगी यावी यासाठी प्रयत्नांची गरज आहे. ती आम्ही जाणून घेतली. ही क्षमता निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न आहे... मग कार्यकर्त्यांच्या सूचना सुरू झाल्या. लोकांना समस्या विचारायची नाही. ती विचारली की अंडरपँटपासून सगळ्या मागण्या सुरू होतात... ज्या उणीवा आहेत, त्या मिळविणे हा हक्कच आहे असे वाटू लागते. हे टाळायला हवे. समस्यामुक्ती ही आपली गरज आहे, हे त्या माणसाने ओळखले पाहिजे. हे लक्षात आल्यावर त्याच्यातील ताकद ओळखण्याचा अभ्यास सुरू झाला. आणि लक्षात आलं, की याच्याकडे अफाट ताकद आहे, फक्त तो बुजरा आहे. इथे यांच्यासाठी काम करण्याची नव्हे, तर यांच्यासोबत काम करण्याची गरज आहे... आणि जर आपण त्यांच्यासोबत राहिलो, तर जे नातं तयार होईल त्यातूनच काम उभं राहिल हे लक्षात आलं...
इथला माणूस नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे भवई पूजेच्या दिवशी जुन्या अग्निवर अन्न तयार करत नाही. तो नवा अग्नि तयार करतो. आदल्या रात्री नाचणं सुरू करतो. रात्रभर नाचत राहातो, आणि सूर्योदयाच्या वेळी लाकडावर लाकूड घासून नवा अग्नि प्रज्वलित करतो. हा अग्नि घराघरात पोहोचविला जातो, आणि आदिवासी समाज नवे वर्ष साजरे करतो. कोट्यवधींची दारू पिणारा, पैसे उधळणारा समाज एकीकडे, आणि अशी सामाजिकता, कुटंबभावना जोपासणारा हा समाज एकीकडे... यांना आपण अशिक्षित, अडाणी कसं म्हणायचं, हे जाणवायला लागलं, आणि आपोआपच या समाजाशी नातं जुळत गेलं... पेरणीच्या बीयांची पूजा या दिवशी केली जाते. आणि ज्या दिवशी शेताचा पहिला तास टाकायचा, त्या दिवशी या बीया शेतात टाकतात. ही आदिवासींची जबरदस्त वैज्ञानिक परंपरा आहे. यांच्या घरातील चुलीच्या धुरामुळे, घरात जपून ठेवलेल्या पूजेच्या बांबूवर प्रक्रिया होते. तो परिपक्व होतो. मग सहाआठ महिन्यांनी त्याची तुतारी बनवली जाते, आणि आदिवासी पाड्यात त्याचे सूर घुमू लागतात. हे सारं परंपरेनं चालत आलंय. सुनील आणि निरुपमा देशपांडेंनी या आदिवासी परंपरांमागचं आदिवासींना माहीत नसलेलं विज्ञान शोधण्याचा ध्यास घेतला. अभ्यास सुरू केला, आणि त्यातून या समाजाशी असलेलं नातं अधिक घट्ट होत गेलं...
सुनीलजींच्या बोलण्यातून मला ते जाणवत होतं.
ही आदिवासींची खरी जीवनशैली, सामाजिकता आहे. क्वचित त्यांच्यात तंटेही होतात. पण गावपंचायतीचा निर्णय अंतिम असतो. त्यापलीकडे कुणी जात नाहीत. ही त्यांची सामाजिकता असते. निर्णय झाला, की गूळ वाटून सर्वांचे तोंड गोड केले जाते. मग झगड्याचं नामोनिशाणही राहात नाही. हे मूल्य ज्या समाजात आहे, त्याला अशिक्षित कसं म्हणायचं?... याला जीवनशिक्षण म्हटलं पाहिजे.
सुनील आणि निरुपमा देशपांडे दोघंही या जीवनशैलीशी एकरूप झाले आहेत...
समाजसेवा आणि सामाजिक काम या भिन्न कल्पना आहेत. सामाजिक काम करणारे हजारो असतात, पण समाजसेवा ही समर्पणभावातूनच साध्य होते, हे त्यांच्या एकरूपतेवरून मला जाणवत होतं.
संपूर्ण बांबू केंद्राचं काम सुरू झालं, त्याला आता दोन दशकांहून अधिक काळ लोटलाय. त्याआधीची कितीतरी वर्ष स्थैर्याच्या शोधात गेली होती. पण त्या वेळीही जिथेजिथे ते गेले, तिथेतिथे त्यांनी काहीतरी रचनात्मक काम उभे केले होते.
तो काळ फक्त सुनील देशपांडेंचा होता. लवाद्याची कहाणी सुरू झाली, तेव्हा त्यांच्यासोबत आणखी एका भक्कम हाताची साथ होती. त्यांची पत्नी, डॉ. निरुपमा देशपांडे हीदेखील मेळघाटाच्या जीवनशैलीशी एकरूप होण्यासाठी प्रयत्न करत राहिली, आणि तिने आदिवासी समाजाचं मन जिंकलं. मुंबईतील चांगल्या पगाराची, हुद्द्याची नोकरी सोडून नागपुरात आलेल्या, सामाजिक काम नव्हे, तर समाजसेवा करण्याच्या तळमळीतून रचनात्मक कामाच्या ओढीने मेळघाटात आलेल्या निरुपमा यांनी भविष्यातील अनेक चांगल्या संधींवर हसत हसत पाणी सोडले, आणि सुनील देशपांडेंच्या खांद्याला खांदा लावून त्याही लवाद्यात दाखल झाल्या...
लवाद्यात उभे राहिलेले संपूर्ण बांबू केंद्र, शेजारचे ग्राम ग्यानपीठ आणि सामाजिक भान असलेली कार्यकर्त्यांची फळी हा देशपांडे दाम्पत्याच्या समर्पणवृत्तीचा अध्याय आहे. या दाम्पत्याचा हात लागला की जगण्याचं सोनं होतं, हे इथल्या आदिवासींनीही ओळखलं आहे. कारण आदिवासींशी नातं जोडण्याच्या ध्यासानेच हे जोडपं लवाद्यात स्थिरावलं आहे.
संपूर्ण बांबू केंद्र हे एक ध्येय आहे. एक ध्यास आहे...
श्रद्धांजली!
श्रद्धांजली!
लेख इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद!
सुनील देशपांडे यांना
सुनील देशपांडे यांना श्रद्धांजली. एक चांगला माणूस गेला
त्यांच्या कार्याबद्दल काही नवीन माहीती कळली. धन्यवाद ह्या लेखाबद्दल.
श्रद्धांजली!
श्रद्धांजली!
श्रद्धांजली!
श्रद्धांजली!
श्रध्दांजली!
श्रध्दांजली!