!! मला अजून जगायचे आहे!!

Submitted by चंद्रमा on 17 May, 2021 - 20:53

.... घराबाहेर लोकांची गर्दी जमली होती. सायरन चा आवाज करत घराजवळ ॲम्बुलन्स थांबली. पोलिसांची जीप पण बाहेर उभी होती ॲम्बुलन्स मधले कर्मचारी स्ट्रेचर घेऊन आत मध्ये शिरले. खिडकीजवळ एक पारवा फडफड करीत होता. ‌‌‌‌ पीएसआय एका इसमास जवळ चर्चा करीत उभे होते. वातावरणामध्ये एक दर्प सुटला होता. आतमध्ये एक पंचविशीतला एक तरुण देह निपचित, निशब्द पडला होता. जवळच विषाची बाटली पडली होती. आणि त्याच्या हातात एक चुरगाळलेला कागद होता. इन्स्पेक्टर ने तो कागद उघडला त्या कागदावर लाल शाईने लिहिलेले होते. 'मला अजून जगायचे आहे!' इन्स्पेक्टरने डोक्यावरची टोपी काढली अन् एक सुस्कारा सोडला आणि हळूच पुटपुटला 'अजून एक प्रेमवीर शहीद झाला.'

..........तर ही कहाणी आहे अनिरूद्धची आणि त्याच्या प्रेमाची! अनिरुद्ध बालपणीचा अनाथ झाला. आई बाबांचा मृत्यू साथीच्या रोगाने झाला. अनिरुद्ध काकांकडे राहायला आला.आपली परिस्थिती लक्षात घेऊन त्याने मोठी स्वप्ने कधी जवळ बाळगलीच नाही. तरी पण आपल्या हुशारीने त्यांने कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. तिथे त्याची ओळख अवनी सोबत झाली. दोघेही एकाच वर्गात होते.अवनी सावळ्या वर्णाची, लांब सडक केस, मध्यम बांधा, गालावर पडणारी खळी आणि त्या खळी मध्ये एक काळा तीळ त्यामुळे ती हसताना खूप गोड दिसायची. अनिरुद्ध अवनीच्या हसऱ्या स्वभावामुळे तिच्या प्रेमात पडला. पण कॉलेजमध्ये असताना त्याने तिला कधी बोलून दाखवले नाही. अवनी ला पण कळाले होते की अनिरुद्ध आपल्यावर जीवापाड प्रेम करतो ते!

..अवनीला आई नव्हती तिचा सांभाळ बालपणापासून बाबांनीच केला. तिच्या पाठी तिला दोन बहिणी होत्या. बाबा गिरणी मध्ये कामाला होते. स्वभावाने फार कडक अन् शिस्तप्रिय! हसू कधी त्यांच्या चेहर्‍यावर नसायचे कदाचित तिन्ही मुलींच्या जबाबदारीने त्यांचे खांदे झुकलेले होते.सगळ्यात जास्त प्रेम ते अवनीवर करायचे कारण ती दोन्ही बहिणींचा सांभाळ करून कॉलेज करत होती. कॉलेजच्या सुट्ट्यांमध्ये ती पार्ट टाइम जॉब पण करायची.

हळूहळू कॉलेजची तीन वर्ष संपायला आली कॉलेजच्या शेवटच्या दिवशी अनिरुद्धने आपले प्रेम अवनी जवळ व्यक्त केले‌. अवनी म्हणाली "हे बघ अनि मी समजू शकते तुझ्या माझ्याबद्दलच्या भावना पण मी यावर काय उत्तर देऊ ते मला कळतच नाही. माझ्या खांद्यावर माझ्या दोन बहिणींची जबाबदारी आहे आणि आपण आपल्या करिअरचा विचार करायला हवा."एवढे बोलून अवनी निघून गेली अनिरुद्ध ला त्या दिवशी थोडे वाईट वाटले पण त्यालाही परिस्थितीची जाणीव होती अनिरूद्धला आर्ट डायरेक्शन मध्ये इंटरेस्ट होता त्याच्या मित्राचा स्टुडिओ पण होता तर तो तिथे छोट्या-मोठ्या शॉर्टफिल्म बनवायला लागला.पण अवनीची आठवण त्याला स्वस्थ बसू देईना तिला अधून मधून तो भेटायचा ती पण त्याला नकार द्यायची नाही. ती यायची त्याला भेटायला!
तो प्रत्येक वेळी तिला विचारायचा की तू काय ठरवलं आपल्या दोघांबद्दल! त्यावर ती निरुत्तर असायची दोघांचा वेळ एकमेकांकडे बघण्यातच जायचा.

.....अवनीला पूर्णपणे जाणीव होती. बाबा या प्रेमाला कधीच मान्यता नाही देणार याचे मुख्य कारण म्हणजे दोघांची जात वेगळी होती आणि समाजामध्ये तिच्या बाबांना खूप मान होता आणि कुटुंबामध्ये सुद्धा! बाबांचा खूप विश्वास होता तिच्यावर ते नेहमी बोलून दाखवायचे "माझी अवनी माझ्या शब्दाबाहेरची नाही हो; ती कधीच चुकीचं वागणार नाही. ती माझा अभिमान आहे."बाबांच्या अशा बोलण्यामुळे अवनीचा उर दाटून यायचा! मग अवनीने एक निर्णय घेतला अनिरुद्धला विसरण्याचा! ती त्याच्या भेटीला नकार द्यायला लागली. हळूहळू त्याला टाळायला लागली. त्याच्या मेसेजचा पण रिप्लाय देत नसे.

....अनिरुद्ध तिच्या अशा वागण्यामुळे संतापून जायचा. त्याचे कामावर पण लक्ष लागत नसे. अवनी चा विरह त्याला सहन होईना एक दोनदा त्याने तिला तिच्या घराजवळ जाऊन भेटण्याचा पण प्रयत्न केला पण तिने त्याच्याकडे बघितले सुद्धा नाही.अवनीला विसरणे अनिरूद्धला मान्य नव्हते तिच्या शिवाय जगणे ही कल्पनाच त्याला सहन होईना. एकदा का शेवटचे अवनीला विचारायचे म्हणुन त्याने तिला भेटायला बोलावले
समुद्र किनारी! ही त्यांची नेहमीची जागा होती. कॉलेजच्या तीन वर्षांमध्ये ते कित्येकदा इथे आले होते. अवनीने सुद्धा शेवटची भेट म्हणून भेटीला होकार दिला.संध्याकाळची वेळ होती. सुर्य अस्ताला निघाला होता. त्याची तांबूस छटा आकाशी पसरली होती. मंद वारा वाहात होता. पाखरांचे थवे परत घरट्यांकडे निघाले होते. नीरव शांतता पसरली होती. अनिरुद्ध काकुळतीने अवनी ची वाट बघत होता आणि ती त्याला येताना दिसली. निळ्या ड्रेस मध्ये ती अधिकच खुलून दिसत होती तिचे लांब केस भुरभुर उडत होते वाऱ्याबरोबर! जवळ आल्यावर तिने त्याला बघून मंद स्मित केले. तिच्या गालावरची खळी अधिकच खुलून आली. अनिरुद्ध तिच्याकडे बघतच राहला.अवनी चा हात त्याने हातात घेतला आणि तिला पुन्हा एकदा श्वास रोखून विचारले 'तू माझी होशील का'? त्याचे हात थरथरत होते एक कंप त्याच्या शरीराला सुटला होता. डोळ्यांमध्ये आसवे जमायला लागली होती. हृदय धडधड करत होते.अवनीने त्याच्या हातावर हात ठेवला आणि त्याला म्हणाली "अनि प्लीज मला विसर! आपले एक होणे शक्य नाही. मी आंतरजातीय विवाह नाही करू शकणार! माझ्या बाबांचा विश्वास मी नाही तोडू शकणार!"
तिच्या या उद्गारांनी अनिरुद्धच्या हृदयाचे तुकडे-तुकडे झाले. त्याच्या डोळ्यातून टपोरे थेंब पडायला लागले. सगळं काही त्याला भकास वाटायला लागलं. बराच वेळ तो तिचा हात हातात घेऊन गप्प होता. दोघेही निरुत्तर होते. शेवटची भेट म्हणून त्याने तिला एक घट्ट मिठी मारली.आता आकाशामध्ये चंद्र प्रकाशमान झाला होता.शुभ्र चांदणे लुकलुकायला लागले होते. वारा बेभान होऊन वाहत होता. सागराच्या फेसाळ लाटा आक्रंदन करत होत्या जणू काही त्या लाटा किनार्‍यावर येण्याचा प्रयत्न करीत होत्या पण त्या लाटांना कदाचीत आपली हकीकत माहीत असावी त्या किनार्‍याला स्पर्श तर करू शकत होत्या पण शेवटी त्यांना त्या अथांग सागरातच विलीन व्हायचे होते.

...अनिरुद्ध काकांच्या फार्महाऊसवर एकटाच राहत असे. त्याने आता शॉर्टफिल्म पण बनवणे बंद केले. अवनी च्या विरहाने तो आता दारू पण प्यायला लागला होता. जवळच गावाबाहेर एक बार होता तिथे तासनतास बसून राहायचा पॅग वर पॅग रीचवीत! गम भरे गीत गायचा! अनिरुद्धकडे बघणारे कोणीच नव्हते. त्याला सांभाळायला, त्याला आधार द्यायला जवळ आपुलकीचं कोणीच नव्हतं. त्याची प्रकृती आता ढासळायला लागली होती. हे जीवन त्याला आता नश्वर वाटत होतं! एकदाचा का आयुष्याचा सोक्षमोक्ष लावायचा असा निर्णय त्याने घेतला.

...आणि बाजारातून त्याने एक विषाची बाटली आणली. त्याच्या शेतातल्या घराजवळ कोणीच राहत नसे. तो तिथे एकटाच असायचा. त्याच्या मेंदूने आता काम करणे बंद केले होते. रात्रीची वेळ होती. कुत्र्यांचे भुंकणे सुरू होते. रातकिड्यांचा किरकिर असा आवाज येत होता. वाऱ्याचा वेग मंदावला होता. आता सगळे काही शांत झाले होते. त्याने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला 'अवनीशिवाय मला नाही जगता येणार' असे म्हणून त्याने विषाची बाटली उघडली आणि तोंडाला लावली. एका घोटात सर्व हलाहल त्याने खल्लास केले. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी यायला लागली. हृदयाची स्पंदने हळूहळू मंदावली आणि त्याला अवनी सोबत घालवलेले क्षण आठवायला लागले. तिची प्रथम भेट, तिच्या गालावर पडणारी खळी, तिचे हसू तिचा सेलिब्रेट केलेला पहिला वाढदिवस, शेवटची भेट
सागर किनारी!

.....पण अचानक त्याचे विचार चक्र गतिमान व्हायला लागले आणि अनेक प्रश्न त्याला पडले 'प्रेमच हे माझे जीवन होते का? या प्रेमाशिवायही मी बरेच काही करू शकलो असतो. एक चांगला आर्ट डायरेक्ट बनू शकलो असतो. जीवनात सुख दुसऱ्यांना नात्यांमधूनही मिळवता आले असते. गोरगरिबांसाठी जगलो असतो. एखाद्याला मदत करता आली असती. कुणाचे सांत्वन करता आले असते. कुणाला हसवता आले असते. पुन्हा आयुष्याची सुरुवात करता आली असती. नव्या उमेदीने जगता आले असते. अशा अनेक विचारांची मालिका त्याच्या समोर आ वासून उभी राहिली. "अरे देवा हे काय घडले माझ्या हातून मी का संपवले माझे जीवन!"पण विषाने आपले काम केले होते त्याच्या हातात थरथरायला लागले होते आणि तो ओरडला त्याच्या कंठातून शब्द बाहेर पडले "मला अजून जगायचे आहे" "मला अजून जगायचे आहे"! टेबलावर ठेवलेल्या एका कागदावर त्याने लाल पेनाने लिहिले,
"मला अजून जगायचे आहे"!
पण आता काहीही उपयोग नव्हता विष संपूर्ण शरीरात पसरले आणि तो धाडकन खाली कोसळला त्याचे डोळे मिटले, आणि हा प्रेमवीर गतप्राण झाला होता.

"श्वासांची गती जरी थांबली
तरी मृत्यूला स्वप्न पडले भयाण!
जीवनाची ओढ आहे मला
पुन्हा जगण्याची आहे तहान!!"

कृपया वाचकांनी अनिरुद्धच्या निर्णयविषयी आपले मत व्यक्त करावे ही नम्र विनंती!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो ओरडला त्याच्या कंठातून शब्द बाहेर पडले "मला अजून जगायचे आहे" "मला अजून जगायचे आहे"!>>>>>>
हे अस असेल तर बाप रे

मला यातली कल्पना पटली.
आत्महत्या करताना शेवटच्या क्षणी आपल्या निर्णयाबद्दल पश्चात्ताप होण्याच्या घटना बऱ्याच असतील.फक्त आपल्याला कळायला मार्ग नसतो.

मला पण यातली कल्पना पटली.

असं म्हणतात ही आत्महत्या ही त्या क्षणाला आलेल्या अतीव नैराश्यामुळे लोकं करतात. पण एकदा का वेदना सुरू झाल्या की बरेचसे जण स्वतःला वाचवायचा प्रयत्न करतात. विष पिऊन, गळफास घेऊन किंवा नस कापून घेणारे ह्या प्रकारात मोडतात. (मरणासाठी स्वतःच्या शरीराला आग लावणे हा पर्याय कोणी निवडत असेल ह्यावर विश्वास बसणे कठीण वाटते).

प्रिय मायबोलीकर आपल्या प्रतिसादाबद्दल खूप-खूप धन्यवाद!
खरतर आत्यमहत्या करण्यासाठी पाठी खूप बळ लागतं.
कुणी नैराश्येच्या भावनेतून करतं तर कुणी जे हवं ते आयुष्यात मिळालं नाही म्हणून!पण हा धाडसी निर्णय जेव्हा आयुष्य संपवून टाकतो तेव्हाच त्याची प्रचिती त्या व्यक्तीला मरणाच्या काही क्षणांपूर्वी येते.i mean it's a type halusanation

ज्वलंत विषय तळमळीने मांडलायं तुम्ही कथेत ..
त्याबद्दल तुमचं कौतुक... !!

मला वाटतं, अनिरुद्धने प्रेमाचा आणि नात्याचा व्यापकतेने विचार न केल्याने त्याच्यावर ही परिस्थिती ओढवली असणार .. त्याने फक्त प्रियकर आणि प्रेयसी ह्या नात्याचा आणि प्रेमाचाचं विचार केला असावा.

प्रेमात किंवा इतर कुठल्याही गोष्टीत यश न मिळाल्यामुळे जी वैफल्यग्रस्ता येते , त्यामागे मेंदूमध्ये द्रवणारी काही संप्रेरकं कारणीभूत असू शकतील ; म्हणून असे आत्महत्या करण्यासारखे टोकाचे विचार डोक्यात थैमान घालत असावेत..

अनिरुद्धच्या बाबतीत जे झालं ते वाईट झालं .. घडून गेलेल्या घटनेवर पश्चातापा करण्याशिवाय हाती काही उरत नाही.

आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल खूप-खूप धन्यवाद!
रूपाली मॅम!आपण दिलेल्या सुचनांचा मी वापर करीत आहे!घाई करायची नाही,कथानक आधी डोक्यात शिजू द्यायचं आणि नंतर ते कागदावर रेखाटायचं!it's a key!
Thank u!

रूपाली मॅम!आपण दिलेल्या सुचनांचा मी वापर करीत आहे!घाई करायची नाही,कथानक आधी डोक्यात शिजू द्यायचं >> माझी खरंच एवढी पात्रता नाही की, मी कुणाला लेखनाबद्दल सूचना करावी.. तरी तुमचे धन्यवाद मी नम्रपणे स्वीकारते. हे साधं सूत्र आहे लेखनाचं.. तुम्हांला ते पटलं हेच समाधान.. त्याचा नक्कीच फायदा होईल तुम्हांला.. पुढील लेखनास खूप शुभेच्छा तुम्हांला...!

आणि एक, तेवढं मॅम वगैरे नका म्हणू ... नुसतं रुपाली म्हटलं तरी चालेल मला...!