प्रीतीत गुंतले रे!!! - ३

Submitted by रमण३०१२ on 16 May, 2021 - 01:07

आधीचा भाग: https://www.maayboli.com/node/78941

ज्यांची राधानगरी मध्ये घरे होती त्या आपापल्या घरी राहत.
एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये मामा, मामी, त्यांची मुलगी उर्मिला.

होय उर्मिला, लग्नानंतर पाचव्या वर्षी नवरा-बायकोमध्ये बेबनाव झाल्यामुळे घटस्फोटिता म्हणून आई-वडिलांच्या कडे कायमची राहायला आली होती.

रामरावांची पत्नी जानकी आणि त्यांची दोन मुले अनिल आणि अंकिता.

जानकी, चार चौघी सारखीच गृहिणी होती. दिसायला निमगोरी! आणि ठसठशीत कुंकू उठून दिसे. तिच्या हाताला चव होती. एक, एक, पदार्थ ती अशी निगुतीने करायची की खाणारा नुसती बोटे चाटत राहील. पै पाहुणा, आला गेला, यांची ती आस्थेनं चौकशी करायची. राबायला बंगल्यावर काम करणारे कर्मचारी आहेतच.

रोजच्या जेवणात रामरावंच्या आवडीचा एक तरी पदार्थ असेच! जानकीला रामरावांच्या सगळ्या आवडी निवडी माहित झाल्या होत्या.

सुशीला म्हणजे स्वयंपाकीण बाई त्यांच्या हाताखाली दोन असिस्टंट बायका होत्या. एक निर्मला आणि दुसरी झुबेदा.
सुशीला जरा बडबडी होती. ती कधीही काहीही विषय काढून बोलत बसे. कामाच्या बाबतीत ती वाघीण होती. तिचे हात वेगात चालत असत. निर्मला आणि झुबेदा तिला घाबरून असतं. सुशीलानी सांगितलेली काम त्या दोघी बिनबोभाट करत असत. झुबेदा आऊट हाऊस मध्ये राहायची तर निर्मला घरी जायची.

रामरावांच्या बंगल्यावर बागेमध्ये काम करणारे एक सावंत म्हणून माळी होते. रामराव पेक्षा वयाने मोठे होते. ते कोल्हापूरच्या एका टोकाला राहत होते. आणि बसने राधानगरीला उतरून बंगल्यावर यायचे. त्यांच्याबरोबर कधीकधी त्यांची नातही, ' माधवी ' हट्ट करुन त्यांच्याबरोबर बंगल्यावर यायची. अंकिता अनिल हे साधारण तिच्याच वयाचे होते. त्यामुळे ती आली की तिघांचे खेळ चालू होत. कधी लपाछपी, कॅरम, कधी पत्ते तर कधी क्रिकेट. या तिघांची धमाल चालायची. खूप गट्टी होती तिघांची!

एक दिवस जानकी काकिनी संध्याकाळी खायला म्हणून आंबोळीचा बेत केला होता. पण आज सुशिलाबाई एकट्याच होत्या. झूबेदाला बर नव्हतं आणि निर्मला तिच्या नातेवाईकांकडे फंक्शनला गेली होती. त्यामुळे आंबोळी बनवायला सुशिलाबाईना उशीर झाला. घरातल्या सगळ्या आणि नोकर चाकरासहित खाणे बनवणे सोपे नव्हते. सावंत त्यांचं खाणे आटोपल्यावर घरी जायला निघाले पण माधवीचे खाणे अजुन संपले नव्हते. जानकीबाई त्यांना म्हणाल्या तुम्ही जा आम्ही सोडू तिचे खाणे झाल्यावर. सावंत पण बरं म्हणून निघून गेले.

अचानक बातमी आली की, गोकुळ चौकात दोन गटात मोठी मारामारी झाली आहे आणि एक दोन खलास झाले आहेत. काही जखमी आहेत. आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापुरात जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत.

जानकीबाईना पेच पडला की आता माधविला तिच्या घरी कसे सोडायचे?

माधविनेच त्यांना पेचातून सोडवले. ती म्हणाली काकी मी रहते आज इथेच तुम्ही नका काळजी करू. अनिल आणि अंकिताने देखील तिला ठेवून घ्यायचा हट्ट धरला. जानकीबाई नी त्याला होकार दिला.

मग काय या तिन्ही मुलांची मज्जाच! खूप खेळले, मस्ती केली.
इकडे सावंतांच्या घरी मधवीची काळजी करण्यासारखं काही नव्हतं पण तिच्या आईची उगाचच घालमेल चालली होती . माधवी तिथे राहील की नाही ? कारण आईला सोडून ती कधी राहिली नव्हती.
रात्री जेवणाच्या टेबलावर रामरावांच्या कुटुंबात माधवीची संगत होती.

क्रमशः ..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users