लंगडा (गूढकथा)

Submitted by करभकर्ण on 14 May, 2021 - 23:36

लंगडा (गूढकथा )

त्याने पुन्हा एकदा आवाज दिल्यावर मात्र, माझा नाईलाज झाला. मी जागेवर थांबलो. तो दुडक्या चालीत माझ्याकडे येत होता. तो डाव्या पायाने लंगडा असावा. आपला डावा हात गुढग्याच्या थोडा वर टेकवून, तो माझ्या दिशेने येऊ लागला. मला नवल वाटले. कोण पाठीमागून आवाज देतोय, म्हणून मी वैतागलो होतो. पण आता ही त्याची लंगडी स्थिती पाहून, मला उगीच थोडासा खेद वाटून गेला. याच्याशी नारमाईने वागायला हवे, असे उगीचच वाटून गेले. आमच्यातले ते वीस पंचवीस मीटरचे अंतर कापायलही, त्याला बराच वेळ लागला. तो माझ्याजवळ आला. माझ्याकडे बघून त्याच्या चेहऱ्यावर काहीसे समाधान उमटून गेले. कदाचित त्याला सोबत भेटल्याचा आनंद वाटत असावा.
"कुठे निघालात?"
पुढे चालत त्याने मला विचारले.
मी काहीसा घुटमळलो. काय उत्तर द्यावे हेच कळेना.
"निश्चित असे ठिकाण नाही, पण वाट फुटेल तिकडे निघालोय."
मी उद्विग्न होत उत्तर दिले.
खरेतर, माझ्या अशा तिरसट उत्तराने, त्याने चमकुन माझ्याकडे बघायला हवे होते. पण तो एकदम शांत होता. माझ्या उत्तराचा त्याच्यावर काहीच परिणाम जाणवला नव्हता.
 "होत माणसाला कधी कधी अस. निश्चित असा मार्ग दिसत नाही. मग आपल्याच विचारात माणूस निघतो कुठेतरी. पण अशाच निरर्थक पयपीटीतून कधी कधी चांगले ठिकाण माणसाला सापडते. त्या माणसाचे कल्याण होते."
तो आपल्या दूडक्या चालीत चालत मला म्हणाला. त्याच्या त्या गूढ बोलण्याने मी मात्र काहीसा गोंधळून गेलो. एकतर मी आधीच प्रचंड त्रासात होतो. दुःख, निराशा, घालमेल या अशा भावनांनी मी हतबल झालो होतो. सगळा मनोव्यापार गुंतागुंतीचा झाला होता. रोज तेच काम, तेच जगणे, तेच ते सगळे, या सगळ्या त्याच त्या व्यावहारांनी मी प्रचंड वैतागलो होतो. त्याच निराशेच्या भरात, मी शहरापासून दूर, या अशा अपरिचित ठिकाणी पोहोचलो होतो. मला एकांत हवा होता. शांतता हवी होती. वर एवढे रणरणते ऊन असतानाही, मी त्याची पर्वा केली नाही. आणि एवढे कमी होते म्हणून की काय, आता हा लंगडा भेटला होता. त्यात पुन्हा तो तसे चमत्कारिक बोलत होता. मला तर आता वैताग येत होता. जी शांतता मला हवी होती, ती आता मिळणे अशक्य वाटत होते.

पायांखालचा रस्ता धुळीचा होता. दुपारची वेळ नेमकी सरली होती. वातावरणात तापमान अजूनही जाणवत होते.  आम्ही दोघे आपापल्या विचारात पुढे चालत होतो. तो अतिशय संथ चालत होता. मग माझाही नाईलाज होत होता. मलाही त्याच्याच चालीत चालावे लागत होते. खरेतर, मी पुढे कुठे जात आहे? हे मला अजिबात माहीत नव्हते. पण आता त्याच्याबरोबर पुढे चालत मीही निघालो होतो. त्याचेही कुठेतरी ठिकाण असेल. आपणही तिथेच थांबू. मनातील निराशा तरी त्याने कमी होईल. असा विचार करत, मी मूकपणे त्याच्याबरोबर चालू लागलो.
    आम्ही बरेच अंतर पुढे चालत आलो. एवढ्या वेळात आमचे फार कमी संभाषण झाले होते. ती शांतता मला खायला उठू लागली. पण मी आपणहून काहीही बोलायचे नाही, असे ठरवले होते. कारण तो लंगडा मोठे चमत्कारिक बोलत असे. उगाच मग मनात हुरहुर वाटत राहते. दोघेही थोडेसे दमलो होतो. उन्हाचे चटके चांगलेच बसले होते. आता दोघांनाही एखाद्या झाडाखाली विश्रांती करावी लागणार होती. मला तर आता एक पाऊलही चालणे अशक्य झाले होते. मी त्याच्याकडे नजर टाकली. तो आपल्याच संथ चालीत चालत होता. तो दमला आहे, थकला आहे असे अजिबात वाटत नव्हते. कदाचित स्वतःच्या ठिकाणावर पोहोचायची, त्याला घाई झाली असावी. शेवटी प्रत्येकाला आपला निवारा हवाहवासा वाटत असतो. तिथे पोहोचण्याची प्रत्येकाला घाई असते. मग हा लंगडा तरी त्याला कसा अपवाद असेल? वरच्या उन्हाचा काही परिणाम त्याच्यावर झाला आहे, असे त्याच्याकडे पाहून वाटलेच नसते. चेहरा जरासा घामाने डबडबला होता. बस तेवढेच! पण त्या घामापलीकडेही त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच सुख जाणवत होते. त्या चेहर्‍यावर समाधानाची झालर प्रतिबिंबित होत होती. मी थोडासा जाग्यावर घुटमळलो. ते त्याने पाहिले असावे. तोही जाग्यावर थांबला.
 "दमलात का?"
तो जरासा हसून म्हणाला.
त्याने माझ्या मनातील भाव अचूक टिपले होते.
"हो! जरा कुठेतरी विश्रांतीसाठी थांबूयात?"
मी मोठा सुस्कारा टाकत म्हणालो.

त्याने आजूबाजूला एक नजर टाकली. रस्त्याच्या डाव्या हाताला, एक आंब्याचे मोठे झाड होते. त्याने त्या झाडाकडे इशारा केला. मी तिकडे पाहिले. झाड पाहून बरे वाटले. मी भराभर पावले टाकत, त्या झाडाकडे निघालो. कधी एकदा त्या झाडाच्या सावलीत जातो, असे झाले होते. माझ्या पाठोपाठ तोही झाडाकडे येऊ लागला. उन्हातून एकदम त्या घनगर्द सावलीत गेल्याने, एक सुखावणारी शीतलता शरीरभर उमटून गेली. एक चांगला मोठा दगड बघून मी त्यावर बसलो. तोही तिथे आला. माझ्यापासून थोडे अंतर राखून त्यानेही आपले बस्तान मांडले.
        आता मनाला बरे वाटू लागले. घाम निथळला होता. थोडीशी निराशाही कमी झाली होती. मी त्याच्याकडे नजर टाकली. तो वर झाडाकडे काहीतरी बघत होता. त्याच्या बोलण्याप्रमाणे त्याचे ते बघणेही काहीसे चमत्कारीकच वाटले. तो एकसारखा वर बघत होता. कदाचित वर काहीतरी असावे. माझी उत्सुकता चाळली गेली. मी थोडासा पुढे सरकलो. तो झाडाच्या ज्या फांदीकडे बघत होता, त्या फांदीकडे मी लक्ष दिले. काही पांढर्‍या रंगाचे पक्षी, त्या फांदीवर बसलेले होते. त्यांचा तो गडद पांढरा रंग उन्हात चमकत होता. तो त्यांच्या अंगाचा पांढरा चमकता रंग, कमालीचा आकर्षक वाटत होता. मला नवल वाटले. या आगोदर मी असे पक्षी, कधीच पाहिले नव्हते. मीही टक लाऊन त्या पक्षांकडे बघू लागलो. तिथे बरेच पक्षी होते. कदाचित त्यांचा सगळा थवाच, तेथे विश्रांतीसाठी आला असावा. मी पुन्हा त्याच्याकडे नजर वळवली. तो अजूनही त्या पक्ष्यांच्या थव्याकडेच बघत होता. त्याच्या डोळ्यात चमक होती. एक अधाशीपण होते. डोळ्यांतून मोहाचे भाव ओसंडत होते. बहुतेक त्याला ते पक्षी आवडले असावेत.
   
"कसे आहेत पक्षी? त्यांचा तो पांढरा रंग बघा, कसा चमचम करतोय. त्यांची ती हालचाल बघा. त्यांचा तो आवाज ऐका. सगळे कसे मनाला प्रसन्न करणारे वाटत आहे."
तो नवलाईने मला ते सांगत होता. खरेतर त्याने सांगितलेले सगळे खरे होते. पक्षी सुंदर दिसत होते. दुर्मिळ जात असावी ती. मी प्रथमच पाहत होतो.
 "अनेक पक्षी आहेत. सगळा थवाच झाडावर असावा?"
त्याने माझ्याकडे बघत मला प्रश्न केला. 
  " हो, थवाचं दिसतोय सगळा".
मी त्याच्याकडे बघत उत्तरलो.
" किती पक्षी असतील, मोजता येतील का?"
माझ्याकडे काहीसा हसत पाहत तो म्हणाला. तो बहुतेक चेष्टेच्या सुरात हसला असावा. कदाचित मला तिथे असणारे, ते पक्षी मोजता येणार नाहीत, असे त्याला वाटले असावे. मला जरासा राग आला. हा कोण लंगडा! माझ्याकडे बघून असा कुचेष्टेने हसतोय. मला मूर्ख समजत आहे का हा? याला चांगलेच उत्तर देतो आता,असे मनाशी म्हणत, मी जरासा सावध झालो. वर टक लाऊन बघू लागलो. अगदी एक एक पक्षी मोजू लागलो. खरेतर त्यांच्या त्या चमचमत्या पांढऱ्या रंगामुळे, ते सहज नजरेस पडत होते. त्यामुळे त्यांची मोजदाद करायला मला जास्त कष्ट पडत नव्हते. मी पुन्हा पुन्हा ते मोजू लागलो. कारण मला चूक करायची नव्हती. तो लंगडा ज्या तऱ्हेने माझ्याकडे बघून कुचेष्टेने हसला होता, त्याला ते पक्षी अचूक सांगून उत्तर द्यायचे होते. मी एकतीस पक्षी मोजले. आणि जरा मोठा आवाज करून त्याला सांगितले,
"वर झाडावर एकतीस पक्षी आहेत."
त्याने एकवार माझ्याकडे नजर टाकली. खात्री करून घेण्यासाठी फांदीवर टाकली. कदाचित तोही ते पक्षी मोजत असावा. थोड्या वेळाने त्याने फांदीवरची नजर खाली घेतली. त्याचा चेहरा काहीसा पडला होता. मला आनंद झाला. म्हणजे माझा आकडा अचूक होता तर.
"आकडा बरोबर आहे ना?"
मीही तसेच कूचेष्टेने हसत त्याला विचारले. त्याने मूकपणे होकारार्थी मान हलवली. मला उगाच आनंद वाटून गेला. त्या पक्षी मोजण्यापेक्षा, त्याचा खजील चेहरा पाहूनच मला जास्त आनंद झाला होता.
                      आता ऊन उतरले होते. त्यामुळे चालताना त्रास जाणवत नव्हता. मी जरा खुशीतच होतो. पण तो अजूनही पडलेल्या चेहऱ्यानेच चालत होता. मला आता मोकळे वाटत होते. त्याच्यासोबत मी संथ गतीने चालत होतो. आता कसली फिकीर जाणवत नव्हती. रस्ता संपेल तिथे जाऊ. याच्या सोबतच जाऊ. जिथे हा थांबेल तिथे आपणही थांबू, स्वतःच्या मनाशी मी असे  ठरवून टाकले. आता उगाचच मनाला आनंद वाटत होता. मरगळ निघून गेली होती. खरेतर ते पक्षी मोजण्यात काही मोठे अप्रूप नव्हते. ते काही कठीण काम  नव्हते. पण ज्या तऱ्हेने त्या लांगड्याची मनस्थिती, मी अचूक पक्षी मोजल्यामुळे झाली होती, त्याचाच मला जास्त आनंद झाला होता.

खालचा रस्ता अजूनही संपला नव्हता. आम्ही पुढेच चालत होतो. कदाचित संथ चालत असल्यामुळे रस्ता उरकत नसावा. आता डोंगराचा भाग लागला होता. अवतीभोवती डोंगरांची एक सलग रांग दिसत होती. काही डोंगरांचे सुळके वर निघालेले होते. काही काळया कुळकुळीत टेकड्या नजरेस पडत होत्या. सगळा प्रदेश भकास जाणवत होता. हिरवेपण काहीसे कमी होते. लंगडा त्या काळया टेकडीकडे बघत चालत होता. हा नेहमी असेच काहीतरी विचित्रपने वागत असतो. त्यामुळे मी आता त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. तो पुढे चालता चालता तसाच डावीकडे वळाला. तिथे एक लहानशी टेकडी होती. तिचा एक काळा खडक थोडासा बाहेर आला होता. चांगला पुरुषभर उंचीचा तो खडक, त्याच्या डोक्याला लागत होता. आणि त्या खडकाकडे बघत तो उभा होता. तो अजुन थोडासा पुढे झाला. त्या खडकावरची धूळ त्याने हाताने साफ केली. त्या काळया खडकावर काहीतरी कोरलेले होते. मला लांबून ते नेमके काय आहे, हे समजले नाही. केवळ काहीतरी कोरीव काम त्यावर असावे, एवढेच जाणवत होते.
            
   मला थोडे आश्चर्य वाटले. मीही पुढे झालो. त्याच्या शेजारी थांबून, त्या कोरीव कामाकडे बघू लागलो. ते कोरीव काम काहीसे जुने वाटत होते. त्यावर भल्या मोठ्या आकारात कोरीव काम होते. काही चित्रविचित्र आकृत्या, चिन्हे, चित्रे, अक्षरे, अंके स्वैरपणे कोरलेले होते. त्यांना निश्चित अशी रचना नसावी. प्रथमतः तरी असेच जाणवत होते. मी ती रचना समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. ती अक्षरे जुळवू लागलो. पण काहीच अर्थबोध होत नव्हता. काहीच जुळत नव्हते. माझ्या चेहऱ्यावरचे गुंतागुंतीचे भाव पाहून, त्या लंगड्याला पुन्हा चेव आला असावा. माझ्याकडे बघून तो पुन्हा एकदा कुत्सितपणे हसला.
  "काही कळतेय का? काही अर्थ लागतोय का? का सगळेच डोक्यावरून जातेय?"
तो टिंगलेच्या आवाजात मला म्हणाला.
त्याने पुन्हा माझी हेटाळणी सुरू केली होती. तो सारखाच अशा प्रसंगातून माझी कुचेष्टा करत होता. त्याला तशीच सवय असावी. दुसऱ्याला कमी लेखण्याची. काहीतरी विचारून फजिती करण्याची. पण या अशा क्षुद्र लंगड्याच्या शब्दांनी मी निराश थोडीच होणार होतो. त्याच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास मी समर्थ होतो. मला पुन्हा एकदा आता, त्याला हरावावे लागणार होते. मी थोडासा अजुन पुढे झालो. टक लाऊन त्या कोरीव कामाकडे बघू लागलो. सगळ्यात सुरुवातीला त्यावर एक मानवी आकृती कोरलेली होती. काहीशी ओबडधोबड दिसत होती. त्या आकृतीने हात जोडलेले आहेत, एवढेच कळत होते. कदाचित कशासमोर तरी त्याने हात जोडलेले असावेत. त्यापुढे एक गोल चक्र होते. त्याला काहीसा सूर्यासारखा आकार होता. त्यापुढे एकचा आकडा कोरला होता. आणि त्यापुढे एक अक्षर कोरलेले होते. वर, खाली, आजूबाजूला सगळी गुंतागुंतीची अक्षरे, अंक, चित्रे कोरलेली होती. सगळी रचना क्लिष्ट जाणवत होती. काही कळायला मार्ग नव्हता. पण एक गोष्ट आता माझ्या लक्षात आली होती. प्रत्येक तीन चार आकृत्यानंतर एक एक अक्षर आलेले होते. कदाचित तेच अक्षरे महत्वाची असतील. बाकीचा भाग गौण असेल. मी आता त्या अक्षरांवर लक्ष केंद्रित केले. एक एक अक्षर जुळवित गेलो. हळूहळू अर्थ निघत होता. अक्षरांचा अर्थबोध होत होता. मी झटकन खाली वाकलो. बाजूची एक मोठी काडी उचलली. खाली जमिनीवर त्या अक्षरांचा क्रम मांडत गेलो. माझा विचार योग्य होता. अक्षरे सोडता बाकीच्या सर्व आकृत्या गौण होत्या. त्या केवळ फसवण्यासाठी होत्या. अक्षरांचा क्रम लवकर ओळखता येऊ नये, म्हणून त्यांची मुद्दामहून रचना केलेली होती. अक्षरांची मांडणी मी पूर्ण केली होती. त्या अक्षरांचा एक अर्थबोध मंत्र तयार झाला होता. एकच मंत्र तीन वेळा कोरलेला होता. मी आनंदी चेहऱ्याने पाठीमागे पाहिले. लंगडा बाजूलाच उभा होता. मी त्याच्याकडे पाहिले, आणि मोठ्या आवाजात त्याला म्हणालो,
"ऐक! नीट लक्ष देऊन ऐक!"
मी खाली जमिनीवर लिहिलेल्या त्या अक्षरांकडे बघत त्याला उद्देशून म्हणालो,
           
             "हो! हो! मी कबुल करतो,
                  मी तुझा पाईक आहे.
             हो!हो! मी कबुल करतो,
                  मी तुझा पाईक आहे.
             हो! हो! मी कबुल करतो,
                  मी तुझा पाईक आहे."

एकच मंत्र मी मोठ्या आवाजात तीन वेळा त्याला वाचून दाखवला. त्याचा चेहरा पुन्हा एकदा पडला होता. मी पुन्हा एकदा विजयी मुद्रेने, त्याच्या त्या पडलेल्या चेहऱ्याकडे बघत होतो. त्याच्या चेहऱ्यावरूनच मला माझे उत्तर कसे बिनचूक आहे, हे कळत होते. आम्ही दोघेही खडकापासून बाजूला आलो. माझ्या चेहऱ्यावर अजूनही हसू होते. त्याने काहीतरी बोलण्याची मी वाट बघत होतो. पण तो शांत होता. त्याने एकदा त्या खडककडे नजर टाकली. मग माझ्याकडे नजर वळवली. आणि खाली मानेने तो लंगडत लंगडत पुढे निघाला होता. मीही हळू हळू त्याच्या मागे निघालो. प्रसंग छोटे होते पण, त्याचा आनंद मात्र मला खूप जाणवत होता. उगाच काहीतरी मिळवल्याचे समाधान मनाला वाटत होते.
                दिवस मावळतीकडे सरकत होता. आमची पायपीट मात्र अजूनही सुरूच होती. खरेतर मला आता कुठेतरी थांबावे, शेवटचे ठिकाण यावे असे वाटत होते. पण तो लंगडा मात्र कुठे थांबेल, असे वाटत नव्हते. त्याचे नेमके ठिकाण केव्हा येते? याचाही काही पत्ता नव्हता. तो त्याच्या त्या मंद चालीत, नुसता अंतर पार करत होता. मला एकदा वाटले, त्याला विचारावे, अजुन किती वेळ चालायचे आहे? तुझे शेवटचे ठिकाण तरी कुठे आहे? कधी पोहोचू आपण तेथे? आता पुढे चालवत नाही. पण त्याला असे प्रश्न विचारणे म्हणजे, आपणहून मनस्ताप स्वतःवर  ओढवून घेणे ठरले असते.
एक तर त्याने या अशा  प्रश्नांचे, सरळ सरळ उत्तर दिलेच नसते. उगाच पुन्हा काहीतरी वेगळ्याच संदर्भात तो बोलला असता. नाहीतर मला मोठ्या फुशारकीने म्हणाला असता,

 "लगेच थकता राव तुम्ही. एवढे धडधाकट आहात, धष्टपुष्ट आहात आणि काही अंतर चालवत नाही. माझ्याकडे बघा, एका पायाने लंगडा आहे. संथ गतीने चालतोय. पण चेहऱ्यावर थकल्याचे भाव तरी आहेत का?"

  त्याचे असे तुच्छतेने बोलणे ऐकण्यापेक्षा, त्याला काहीही न बोललेले बरे. एकतर तो आधीच माझ्यावर चिडलेला असेल. कारण उघड आहे. दोनवेळा त्याने मला जे जे सांगितले, मी त्याचे अचूक उत्तर दिले आहे. त्यामुळे साहजिकच त्याचा आत्मा दुखी झाला असणार. तो त्या दोन्ही वेळा कमालीचा अंतर्मुख झाला होता.
        आम्ही बराच वेळ चालत होतो. खरेतर आता काहीतरी ठिकाण यायला हवे होते. दिवस मावळतीच्या नजीक पोहोचला होता. उन्हे कधीच उतरले होते. आम्ही डोंगराचा भागही पार केला होता. शहरी गजबजाटापासून आम्ही खूप पुढे आलो होतो. इकडे आता कमालीची शांतता जाणवायला लागली. सगळीकडे नुसता मोकळा प्रदेश पसरलेला दिसत होता. मानवी वस्तीचा कुठलाच भाग अजुन टप्प्यात दिसत नव्हता. मानवी खाणाखुणा अवतीभोवती कुठे उमटलेल्या दिसेनात. एखादे गाव नजरेच्या टप्प्यात असेल, याचीही काही खात्री वाटेना.
मला आता राहवेना. माझी मनातील घालमेल वाढू लागली. सुरुवातीची मनातील निराशा संपली होती. त्याची जागा आता उत्सुकता, भीती, आतुरता, चिडचिड या भावनांनी घेतली होती. आता कुठेतरी थांबायला हवे. निदान काहीतरी त्याची सोय करायला हवी. आता काहीतरी हालचाल करावीच लागेल. किती वेळ, काळ नुसती अशीच पायपीट करायची. त्याला काहीतरी मर्यादा असायला हवी ना?
 
"ओ महाशय, आपण कुठे जात आहोत? तुझे एखादे ठिकाण असेल ना? एखादे गाव असेल ना? कितीवेळ अशी पायपीट करायची? मला आता पुढे चालवत नाही."

मी जरा नाराजीच्या सुरातच त्याला म्हणालो.
मला माहित होते, तो आता काहीतरी उलट बोलणार. तिरकस उत्तर देणार. पण तो आता शांत होता. त्याने काहीच उत्तर दिले नाही. तो आपल्याच चालीत चालत होता. आता त्याचा चेहरा निर्विकार होता. कुठलेच भाव चेहऱ्यावर दिसेनात. तो कमालीचा अंतर्मुख वाटत होता. हा नेहमी असाच असतो का? कधीच अपेक्षित, सरळ उत्तर देणार नाही. कदाचित काहीतरी विचार करत असेल, किंवा मग शेवटचे ठिकाण जवळ आलेले असणार. मीही काही बोललो नाही. जे घडेल ते बघायचे. ठिकाण आल्यावर तोच सांगेल. त्याचेही एखादे गाव असेलच. घरही असेल. येईल तेव्हा कळेलच. मी आता गपगुमान त्याच्या मागून चालू लागलो.
             काहीतरी आवाज कानावर आला. कदाचित वाहत्या पाण्याचा असेल. म्हणजे जवळच ओढा किंवा नदी असायला हवी. मला बरे वाटले. आता तो पाण्याचा आवाज स्पष्ट येत होता. आणि अखेर तो ओढा दिसलाच. एक छोटासा ओढा मार्गात होता. अगदी पंधरा वीस फुटांचा असेल. साधारणतः घोटभर पाणी ओढ्यातून वाहत होते. पाणी अतिशय नितळ दिसत होते. खरे तर ते पाणी पाहून, घसा कोरडा पडल्याची जाणीव तीव्रतेने झाली. वाटत होते खाली वाकून घटाघटा मनसोक्त, मन भरेपर्यंत पाणी प्यावे. पण तो विचार मी, मनातून लगेच काढून टाकला. न जाणो कसे पाणी असेल? कदाचित चांगलेही नसावे. अशा अपरिचित ओढा- नाल्याचे पाणी पिणे, मला तरी जमले नसते. लंगडा आणि मी दोघेही ओढ्याच्या अलीकडच्या काठावर थांबलो होतो. पाणी शांतपणे वाहत होते.
     तो लंगडत लंगडत पाठीमागे आला. रस्त्यावरचे मोठे मोठे दगड उचलून, तो ओढ्याच्या कडेला आणून टाकू लागला. झाले! त्याचे विचित्र वागणे पुन्हा सुरू झाले!! मला तर नवल वाटले. हा माणूस वेडा आहे का? नेहमी असाच विक्षिप्त वागतो हा. मी त्याच्या त्या कृतीकडे नावलाईने पाहत होतो. तो बराच वेळ दगड जमविण्याचा उद्योग करत होता. त्याने बरेच तसे मोठे मोठे दगड जमवले होते.
थकला भागला चेहरा करत, तो आता थोडावेळ तसाच थांबला. पुन्हा त्याचा तो उद्योग सुरू झाला. पण जरा वेगळा. त्याने तो एक एक दगड उचलून, ओढ्याच्या पाण्यात टाकायला सुरुवात केली. तो अशा तऱ्हेने दगड टाकत होता की, एक एक पाऊल त्या दगडावर व्यवस्थित ठेवता येईल. आणि ओढा पार करता येईल. मला हसू आले. त्याचे दगड टाकून झाले होते. आता त्याने हळू हळू एक एक पाऊल, त्या दगडावर टाकायला सुरुवात केली. एक दगड, दोन दगड, तिसरा, चौथा आणि बारावा असे करत करत त्याने तो ओढा त्या दगडांच्या साहाय्याने आरामशीर पार केला.
               मला त्याचे आधी हसू आले. पण त्याच्या त्या हुशारीचे कौतुकही वाटले. त्याची कल्पना चांगलीच यशस्वी झाली होती. तो पलीकडच्या कडेला पोहोचला होता. आणि आता माझ्याकडे बघून, पुन्हा त्याच कुचेष्टेने  हसत होता. तो पुन्हा त्याच्या औकातीवर आला होता. मी अलीकडच्या कडेला अजूनही संभ्रमित अवस्थेत थांबलो होतो. मला त्याच्या याही कृतीचा काहीच अर्थबोध होत नव्हता. प्रश्नार्थक चेहऱ्याने मी त्याकडे बघत होतो. त्याच्या सगळ्या कृती सामान्य व्यवहारापेक्षा  निराळ्याच असतात.

"कसा ओढा पार केला? पायाला थेंब सुद्धा लागला का? मोठ्या अक्कलहुषारीने  काम केले. एक पाय लंगडा आहे, पण तरीही, ओढा मोठ्या शिताफीने पार केलाय. असे तुम्हाला तरी जमेल का? तुम्ही तर चांगले धडधाकट आहात? फक्त मी वापरलेल्या दगडांचा वापर करायचा नाही. बघुयात जमतंय का तुम्हाला? "
माझ्याकडे आव्हानाच्या नजरेने बघत तो म्हणाला. त्याने पुन्हा एकदा एक नवीन कृती सांगितली होती. खरेतर प्रत्येक वेळी तो पराभूत होत होता. पण तरीही काहीतरी कृती करायला सांगतच होता. कदाचित मला एकदा पराभूत करण्याचा, त्याने चंगच बांधला असेल. पण मी असा एवढ्या सहजासहजी पराभूत थोडीच होणार होतो? तो जे सांगेल, ते मी पूर्ण करणार होतो. त्याच्या या अशा कृतींना मी बधणार नव्हतो.
          , पायाला थेंबही न लागता पार करणार होतो. अगदी त्याने केला तसाच. आजूबाजूला आता फायद्याची वस्तू मिळते का? ते मी बघू लागलो. पण काही उपयोगाचे सापडेना. तो अजूनही तसाच उभा राहून, माझ्या हालचालींकडे बघून हसू लागला. त्याला तेवढेच जमत होते. पण मी एकदा त्याला पराभूत केले की, त्याचा चेहरा असा पडणार होता की, विचारायची सोय नाही. मी आताही त्याचा चेहरा तसाच पाडणार होतो. फक्त एखादी उपयोगाची वस्तू सापडायला हवी. मी थोडासा बाजूला चालत गेलो. तिथे मला तो ओंडका दिसला. चांगला लांब आणि रुंद. पंधरा- सोळा फुटांचा असेल. चांगला वाळलेला होता. हा ओंडका कामात आला असता. मी त्याला थोडासा जोर लावला. ओंडका चांगलाच जड जाणवला. मी अजुन जोर लावला. तो जागेवरून हलला. मी तसाच ओढत त्याला ओढ्याजवळ आणू लागलो. ओढत ओढत तो बराच जवळ आणला. थोडे पुढे ओढत त्या ओंडक्याचे एक टोक ओढ्याच्या कडेला आणले. चांगला जोर लावत त्याचे दुसरे टोक वर उचलले. आता ओंडका माझ्या शरीराला समांतर सरळ सरळ उभा केला. आणि धाडदिशी ओढ्याच्या दुसऱ्या काठाकडे सोडून दिला. ओंडका आता या काठापासून त्या काठापर्यंत, ओढ्यात आडवा पडला होता. त्याच्या खालून पाणी वाहत होते. तो माझ्या कृतीकडे आशाळभूत नजरेने बघत होता. मी हळूहळू त्या ओंडक्यावर पाय टाकून, ओढा पार करू लागलो. अतिशय संथ चालत मी ते पंधरा सोळा फुटांचे अंतर कमी करू लागलो. तो श्वास रोखत माझ्याकडे बघू लागला. त्याचा चेहरा आता बदलू लागला. हो! तो बदलणारच होता. त्याचा चेहरा पुन्हा एकदा पडणार होता. आणि मी ते शेवटचे पाऊल टाकले. एक मोठी उडी मारत, मी ओढ्यापलीकडच्या कडेला पोहोचलो. अगदी पायाला पाण्याचा एकही थेंब न लावता. अगदी विजयी मुद्रेने!
मी उत्सुकतेने पाठीमागे वळलो. मला त्याचा तो उतरलेला चेहरा पहायचा होता. मी त्याच्या चेहऱ्याकडे नजर टाकली. त्याचा चेहरा समाधानाने ओतप्रेत भरलेला होता. तृप्तीचे भाव शरीरभर उमटलेले होते. काहीतरी मिळवल्याचे भाव त्याच्या हालचालीतून जाणवू लागले. तो आनंदाने माझ्याकडे बघत आहे, असे मला भासू लागले. माझा अंदाज फोल ठरला होता का? मी हरलो होतो का? मी स्वतःच्या पायांकडे नजर टाकली. पण पाय तर कोरडे होते. त्याने सांगितलेली कृती, मी अगदी निर्दोष केली होती. मग तरीही हा असा का हसतोय?
  "महाशय तुम्ही पुन्हा एकदा जिंकलात. तुमचे कल्याण झाले."
फक्त एवढे बोलून तो काही अंतर पुढे गेला. एक मोठी झाडांची जाळी पार करून तो पुढे सरकता झाला. मीही काहीही न बोलता त्याच्या पाठीमागे गेलो.
     अचानक काहीतरी आवाज कानावर आला. एक मिश्र आवाज. काहीतरी जोरजोरात पुटपुटल्याचा, मंदिराच्या घंटानादाचा, गोंधळाचा, गडबडीचा. म्हणजे पुढे मानवी वस्ती होती. या सगळ्या खुणा त्याच्याच प्रतीक होत्या. लंगडा आता वेगाने पुढे जात होता. त्याच्यात अचानक कुठलेतरी बळ आले असावे. त्याचा मंद वेग जाऊन तो, लंगडत लंगडत जोराने पुढे जाऊ लागला. मीही जोरात पावले टाकत पुढे आलो.
पुढचा नजारा काहीसा आश्चर्याचा होता. एका वेगळ्याच समुदायाचा होता. समोर काही अंतरावर एक अनिश्चित आकाराचे मंदिर दिसत होते. अगदी मध्यम आकाराचे. त्याची रचनाच चमत्कारिक होती. मातीच्या त्या मंदिरावर ठिकठिकाणी काळे कावळे बसलेले होते. ते सारखे इकडून तिकडे उड्या मारत होते. मंदिरात एक मूर्ती दिसत होती. एवढ्या लांबूनही त्या मूर्तीचे आकारमान नजरेस पडत होते. कुठलीतरी देवी होती ती. गाढवावर स्वार झालेली. म्हणजे ती अलक्ष्मी देवीची मूर्ती होती. वाईट शक्तींची देवी. त्या मंदिरात तिचीच मूर्ती होती. मंदिराच्या अवतीभोवती अनेक माणसे दिसत होती. फक्त लंगोट घातलेली. काळया रंगाचे लंगोट. बाकी सगळे अंग उघडेबंब. सगळी माणसे लंगडी होती. अगदी डाव्या पायाने. सगळ्यांची चाल दुडकी होती. डावा हात डाव्या पायावर ठेऊन जो तो चालत होता. कोणी त्या मंदिरातील देवीची पूजा करत होते, कोणी मंदिराच्या बाहेरची ती पितळी घंटा वाजवत होते. कोणी त्या मंदिराभोवती आपल्या दुडक्या चालीत फेऱ्या मारत होते. कोणी मोकळ्या परिसरात देवीच्या नावाचा मोठ्याने जप करत, वेडेवाकडे नाचत होते. जो तो आपापल्या कामात मग्न होता. त्यांची काळी गोरी शरीरे, लंगडा पाय, त्यांची कुजबुज, त्यांच्या त्या चित्रविचित्र हालचाली, सगळ्या काही विचारापलीकडच्या होत्या. त्यांच्यातील कोणाचेच लक्ष आमच्याकडे नव्हते. जणू आम्ही त्यांच्यापासून अलिप्त आहोत. आता मंदिरातील तो घंटानाद मोठ्याने वाजत होता. मंदिराच्या आतील एक काळा लंगडा मोठमोठ्याने काहीतरी मंत्र पुटपुटत होता. फेऱ्या मारणारे लंगडे आता वेगाने फेर्‍या मारत होते. काही लंगडे एका पायावर जोर देऊन, विक्षिप्तपणे नाचू लागले. काही लंगडे मोठमोठ्याने बोंबलून त्या नचण्याला आलाप देऊ लागले.
             आता ते सगळे वातावरण त्यांच्या त्या कृत्यांनी भारून गेले होते. घंटेचा, मंत्राचा, बोंबलण्याचा आवाज वातावरणात घुमू लागला. एकच आकांत अवतीभोवती दाटून आला होता. मला कशा कशाचा अर्थबोध होत नव्हता. माझ्या विचार कक्षा तोकड्या पडत होत्या. या जाणीवांचा अर्थ, माझ्या पातळीबाहेरचा होता. हे काय घडत आहे, हे काही कळत नव्हते. मी लंगड्याकडे नजर टाकली. आणि पुन्हा एक चमत्कारिक जाणीव शरीराच्या आत घुसत गेली. लंगडा आता उघडाबंब होता. त्याच्या अंगावर केवळ काळया रंगाची लंगोट होती. त्याच्या तोंडातून काहीतरी हालचाली होत होत्या. तो काहीतरी पुटपुटत होता. तो तसाच वेगाने मंदिराकडे निघाला. त्याने लोळत त्या मंदिरापुढे अंग टाकले. मी चक्रावलो होतो. मी तसाच थोडा पुढे होत त्या लंगड्याजवळ गेलो. त्याने माझ्याकडे नजर टाकली. आता त्याचा चेहरा ओळखीचा वाटत नव्हता. त्यात ओळखीचा भाव असा उरलाच नव्हता.
  " हे काय आहे? हा सगळा प्रकार तरी काय आहे? "
मी थरथरत्या ओठांनी त्याला विचारले.
तो आता नाचत होता. डुलत होता. एका पायाने माझ्या भोवती फेऱ्या मारत होता. तो जोरजोरात हसत होता. अगदी गूढ हसत होता.

" महाशय, हेच ते शेवटचे ठिकाण. जेथे तुम्ही येणार होतात. उगाच तुम्ही असे भरकटत आले नाहीत. तुम्हाला घाई झाली होती ना, शेवटच्या ठिकाणापर्यंत येण्याची. आता तुम्ही येथे आला आहात. तुम्ही आता देवीचे भक्त आहात. हे असे भक्त. आनंदी भक्त."
तो माझ्याभोवती तसाच नाचत नाचत बोलत होता.

"पण मी कसा भक्त होईल देवीचा?"
मी काहीशा संभ्रमातच बोलून गेलो.

"महाशय तुम्ही देवीचे भक्त बनले आहेत. अगदी स्वखुशीने. भक्ताच्या कसोट्या तुम्ही अगदी यथोचित पार केल्या आहेत. जो त्या आंब्याच्या झाडावरचे पक्षी अचूक मोजेल, तो खडकावरचा मंत्र तीन वेळा मोठ्याने म्हणेल, आणि हा समोरचा ओढा पायाला पाणी न लागता पार करेल, तो माझ्या देवीचा आपोआप भक्त बनतो."
तो नाचत नाचत म्हणून गेला.

कोणीतरी डोक्यावर तीव्र आम्लाची धार ओतत आहे, त्याची प्रचंड वेदना सर्व शरीरभर पसरत चालली आहेत, तसे त्याचे ते शब्द माझ्या शरीरभर पसरत गेले. ते मेंदुभोवती चिकटत गेले. काहीतरी मोठ्या प्रचंड उलथापालथी घडत आहेत, असे वाटू लागले.
 मी अजूनही शुद्धीवर होतो. मला घटनांचे ज्ञान होते. हे जे घडले आहे ते चांगले नाही. हा सगळा माहोलच चांगला नाही. हा लंगडा चांगला नाही, हे अवतीभोवतीचे वातावरण चांगले नाही. आपण येथे थांबलो, तर ठार वेडे होऊ, किंवा काहीतरी विपरीत येथे घडून जाईल. त्या आगोदर येथून निसटलेले बरे. येथे थांबणे आता घातकी आहे.
              
मी आता पाठीमागे वळू लागलो. वेगाने पळण्याचा विचार करू लागलो. पण ती जाणीव सरसर करत मेंदूपर्यंत गेली. माझ्या डाव्या पायातली संवेदना लोप पावली होती. तो पाय माझ्या अंगाचा अवयव आहे, ही ओळखच मेंदू विसरला असावा. डावा पायाचा भाग मोकळा मोकळा जाणवू लागला. मी पाऊल पुढे टाकले. आणि माझा डावा हात आपोआप डाव्या पायाच्या गुडघ्यावर आला.

मी दुडक्या चालीत विरोधी दिशेला जाऊ लागलो. मंदिराच्या दिशेने! तो सगळ्या लंगड्या लोकांचा समुदाय आता माझ्याकडेच बघत होता. त्यांच्या नव्या भक्ताकडे. आणि प्रत्येकाच्या तोंडत तो मंत्र येत होता. आता मला तो मंत्र सहजपणे ऐकू येऊ लागला.
         
           " हो! हो! मी कबुल करतो
              मी तुझा पाईक आहे." 
          
           " हो! हो! मी कबुल करतो
              मी तुझा पाईक आहे." 

          " हो! हो! मी कबुल करतो
              मी तुझा पाईक आहे." 

        

  (समाप्त)
      
  - वैभव नामदेव देशमुख
        

       

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Great.
नीट पुन्हा वाचून पूर्ण प्रतिसाद देईन. भूतांना वेठीस न धरता कथा लिहिता. म्हणून मला आवडतात.

फार जबरदस्त कथा आहे ही.
जी ए कुलकर्णी यांची कागद ही कथा थोडी अशी आहे.(म्हणजे तुमची त्यावरून प्रेरित आहे असे नाही.एकंदर शैली तशी आहे.)
यातून खूप काही काही समजता येते.सध्या स्पॉयलर्स नकोत म्हणून मनातच.

प्रभुदेसाई, mi_anu,
thank you very much.
मी जी.ए कुलकर्णी यांच्या कथा कधी वाचल्या नाहीत.
फक्त ऐकून आहे. पुढे वाचेल.
मी मतकरी आणि धारप यांच्या कथा खूप वाचल्या आहेत.
जेव्हा सुरुवातीला कथा लिहीत होतो, तेव्हा भूत, त्याचे ते ओंगळवाणे वर्णन हेच जास्त मांडत होतो.
मग काहीनी सल्ला दिला की, भुताला गृहीत धरा, त्याची मांडणी अप्रत्यक्ष करा.
मग त्यांनंतर आशा कथा लिहीत जातोय.
तुमच्या अभिप्रायने सुद्धा अनेक गोष्टी समजून येतात. हवे ते बदल करत आहे. तुमचे प्रेम असेच राहूद्या.

तुम्ही खूप चांगले लिहिता.
अश्या 5-6 एका लांबीच्या कथा एकत्र करून, शुद्धलेखन चुका सुधारून आणि थोडे पॅरा टाकून किंडल इ बुक नक्की बनवा.
त्यांच्या साईटवर कुठेतरी यांच्या पूर्ण स्टेप आहेत.

वैभव
भूत आपल्या मनातच असतात. बाहेर येण्यासाठी धडपडत असतात. ती धडपड समजली कि त्याची कथा होते.

भुतं मनात असतात आणि प्रत्यक्षात पण असतात. खरोखरच भूतांना बघायचं असेल तर रात्री दीड दोन वाजता स्मशानात जायला लागतं. तिथे जाऊन एक विधी करायला लागतो. तो विधी मी लवकरच लिहितो अमानवीय धाग्यावर.

आवडली कथा पण मला हे असलं कथाबीज फार आवडत नाही त्यामुळे फार एन्जॉय नाही करता आली (यात लेखकाचा काही दोष नाही)

मला कथेला सुरुवात झाल्यापासून बराच वेळ ही गोष्ट कृष्णाच्या पेंद्या ची असावी असं वाटत होतं.
म्हणजे कथानायकाला भेटण्यासाठी कृष्ण पेंद्याच्या रुपात आलाय वगैरे.

रिया,
इतर कथा वाचा त्या आवडतील.
त्यांचे कथानक वेगळे आहे.

छान
एक para repeat झालाय
एकदा पाहून घ्या आणि संपादित करा Happy

किल्ली,
हो करतो.

Thank you very much.

वैभव@देशमुख
नेक्स्ट कथा केव्हा येणार ?