ऊन हळदीचे आले.....

Submitted by सरनौबत on 14 May, 2021 - 13:40
bahawaa

ऊन हळदीचे आले.....

मे महिन्यातली दुपार. कामानिमित्त डेक्कनला जायचं होतं. ऊन नुसते मी (खरंतर आम्ही!) म्हणत होते. कमी गर्दी म्हणून कर्वे रोड ऐवजी प्रभात रोडने निघालो. उन्हाने जीव हैराण झाला होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. थंडगार नीरा प्यावी असा विचार आला... आणि अचानक तो दिसला!!! सगळे विसरून मी पहातच राहिलो. उन्हाच्या तडाख्याचा विसर पडला. दुपारचा तीव्र सूर्यप्रकाश पिवळ्या फुलातून खाली पडेपर्यंत कोवळा होऊन जात होता. झाडाखालची जमीन तर पिवळी धमक झाली होती. वाहवा! हाच तो राजवृक्ष बहावा. फुलांनी गच्च बहरून आलेला बहावा पाहून मन अगदी मोहरून गेलं. आग ओकणारा सूर्य डोक्यावर आणि पायाखाली चटके बसवणारी जमीन या कशाचं भान राहिलं नाही.

bahawa

पिवळ्या फुलांची अनेक सुंदर झाडे आहेत. परंतु बहावा सर्वात जास्त भाव खाऊन जातो. ह्याचे कारण जमिनीकडे झुकलेले फुलांचे घोस. झाडावर अशा प्रकारे लटकलेले असतात, की जणू पिवळ्या रंगाचे झुंबर झाडाला लटकावे तसे ते दिसतात.

या झाडाचा फुलण्याचा सोहळा उन्हाळ्याची चाहूल लागताच सुरु होतो. हिरवी पाने जाऊन नवी कोवळी पालवी येत असते, त्यातच पांढरी-पिवळी आणि हिरवट झाक असलेली टपोरी गोल गोल फुलं घोसात यायला लागतात. रखरखीत भुरकट-मातकट आणि हिरवट जंगलात हे सामान्य दिसणारं झाड असामान्य सुंदर होऊन जातं. वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकेबरोबर बहाव्याच्या फ़ुलांचे जमिनीकडे झेपावणारे घोस हलत असतात.

वसंतात फुलावा- मनाचा बहावा ,
त्याचा बहर -कोणी डोळे भरून पहावा !

bahawa2

आप्पा बळवंत चौकातून मंडईकडे जाताना कायम भयानक गर्दी आणि गोंगाट असतो. अशा गजबजाटात तिथल्या दगडूशेठ गणपतीचे लांबून जरी दर्शन झाले तरी सगळे विसरायला होते. ती मोहक मूर्ती आणि तिचे झळाळणारे सोनेरी वैभव! अगदी असेच 'श्रीमंत' मला बहाव्याकडे बघताना वाटते. आजूबाजूला अगदी बकाल वस्ती असली तरी हा दिमाखात जणू सिल्कचा पिवळा झब्बा घालून उभा असतो.

एरवी मान खाली घालून शेतातील चिखलात नांगर ओढणारा बैल गरीब बिचारा वाटतो. पोळ्याच्या दिवशी खसखसून आंघोळ घालून, शिंगे रंगवल्यावर, गळ्यात हार, डोक्याला बाशिंग आणि अंगावर नक्षीकाम केलेली झूल लेवून उभा राहतो तेव्हा कसा राजबिंडा दिसतो. बहाव्याचे अगदी तसेच आहे. इतर वेळी या झाडाचे अस्तित्व जाणवतही नाही. मध्यम चणीच्या या वृक्षाच्या फांद्या कशाही वाढलेल्या असतात. हिवाळा सरताना याची सर्व पाने पडतात. जसा चैत्र सुरु होतो तसे हा आपले सौंदर्य हळूहळू दाखवू लागतो. सुवर्ण-कांती लेवून पिवळ्या सुंदर फुलांनी साजशृंगार करून नटलेला बहावा वृक्ष पाहून पावले जागच्या जागीच थबकतात. पाच पाकळ्यांच्या फुलांचे घोस आणि घोसाच्या शेवटी टपोऱ्या कळ्या... इतक्या सुंदर फुलांना दृष्ट लागू नये म्हणून अनेकदा भुंगे पिंगा घालत असतात.

bahawa

महाराष्ट्रात दसऱ्याला झेंडूच्या फुलांना जे स्थान तेच केरळ मध्ये 'विशू' च्या सणाला बहाव्याच्या फुलांना. या फुलांना सोन्याचे म्हणजेच वैभवाचे प्रतीक मानतात. नववर्षाची सुरुवात श्रीकृष्णाला बहाव्याची फुले अर्पण करण्याची कल्पनाच कित्ती सुंदर आहे ना! काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र हा सुंदर वृक्ष दिसतो. एरवी रुक्ष वाटणाऱ्या मुंबईत एक अख्खाच्या अख्खा रोड या झाडाच्या नावाने आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी भरपूर बहाव्याची झाडं रस्त्यावर कमान टाकून उभी आहेत - 'लॅबर्नम रोड'. भारतातील सर्व प्रमुख शहरात महात्मा गांधी रोड असतोच. त्याचप्रमाणे प्रत्येक शहरातील एखाद्या रस्त्यावर दुतर्फा बहाव्याची झाडे लावली पाहिजेत. वाऱ्याची झुळुक ह्या रस्त्याने जाताना आल्यावर खाली पडणाऱ्या त्या सुवणमुद्रांचा सडा अंगावर घेताना आपणही जणू राजा असल्याचा भास व्हावा.

बहावा म्हणलं कि मला बहर + पहावा = बहावा असं वाटतं. इंग्रजीत ह्या झाडाला गोल्डन शॉवर म्हणतात. हिंदीत काही नावे फार गोड आहेत. पळसाला पलाश आणि बहाव्याला अमलताश! वसंतात फुलणारा पिवळा बहावा आणि लाल पळस म्हणजे जणू चैत्राचे हळदी-कुंकूच!.

पीली तितलियों का घर है अमलताश
या सोने का शहर है अमलताश

मे महिन्याच्या गर्मीत पिवळ्या धमक फुलांची झुंबरं लेऊन हा वृक्ष असा डोलत असतो कि ऊन्हानेही गुडघे टेकावेत. वसंत ऋतूतील निळे आकाश आणि पिवळा बहावा सुंदर कॉन्ट्रास्ट रंगसंगती साधून जातो. झाड कसंही वाढो फुल मात्र जमिनीकडे तोंड करून असतं. बहावाच्या झाडाखाली उभे राहून वर तोंड करून त्याच्या फुलांकडे बघा…..आपण त्यांना आणि ती आपल्याला बघत असतात. हिल स्टेशनला गेल्यावर आपण आवर्जून सनराईज / सनसेट पॉईंट्सवर सूर्य बघायला जातो. एकदा मे महिन्याच्या सकाळी बहाव्याखाली बसून कोवळे ऊन बघा. लताच्या आवाजात पाडगावकरांचे "पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले" शब्द ऐकू येतील... ऊन हळदीचे आले... वाहवा!

जेजुरीला भंडारा उधळल्यामुळे जमीन पिवळी होऊन जाते, तशीच सोनसळी 'पिवळाई' बहाव्याच्या झाडाखाली दिसते. तेजस्वी असूनही सौम्यशीतल रंग आहे हा. वर्षातील तीन महिने उन्हाळा सुसह्य करण्यासाठी निसर्गदेवतेने निर्मिलेला हा खंडोबा; पावसाळा सुरु होताच फुले विसर्जन करून पुढच्या वसंत ऋतूपर्यंत समाधी घेतो. वामन हरी पेठ्यांचे दागिने खरेदी न करता देखील "सोनेरी क्षणांचे सोबती" व्हायचे असल्यास एकदा बहरलेला बहावा जरूर पहावा.

Bahawa1

~ सरनौबत

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

काय सुरेख लिहिलंत सरनौबत!
शरदिनी डहाणूकरांचं अतिशय माहितीपूर्ण आणि वाचनीय पुस्तक आठवलं.
अमेरिकेत सुद्धा बघितलाय मी बहावा. दिसला कि पाय पुढे निघत नाहीत.

सुंदर लिहिले आहे. आवडले.
त्याचप्रमाणे प्रत्येक शहरातील एखाद्या रस्त्यावर दुतर्फा बहाव्याची झाडे लावली पाहिजेत. >>> +१११

सुंदरच लेख. प्रभातरोड च्या प्रेमात तुम्ही ही पडलात तर. एके काळी मला गल्ली गल्लीतील वेळो वेळी फुलणारी फुले व पाने माहीत होती. ते ही फक्त रोड वर व आणि बंगल्यांच्या दारातून दिस णारी. आमच्या इथे पण दोन बहावे आहेत. एक ऑफिसला जाताना दिसतो व एक घरी परत येताना.

धन्यवाद प्रज्ञा, धनवंती, वावे, पाचपाटील, सोनाली, स्वाती, ऋतुराज, जाई, जिज्ञासा.

@अमा- पहिल्यापासूनच प्रभात रोडचे आकर्षण आहे. तिकडे स्वतःच ३ फ्लॅट असावा अशी जुनी इच्छा आहे

वसंतात फुलणारा पिवळा बहावा आणि लाल पळस म्हणजे जणू चैत्राचे हळदी-कुंकूच!.>>

आहा! काय सुंदर लिहलंत..
बहाव्याला पाहिलं की उन्हाचे चटके बसणार्‍या मनाचं अल्लद फुलपाखरू कधी होतं कळत नाही..

सुंदर वर्णन, मोहक उपमा, छान लेख..

नळस्टॉपकडून मेहेंदळे गॅरेजकडे जायच्या रस्त्यावर दुभाजकामधे हारीने लावली आहेत ही झाडे. त्या रस्त्याला बहावा पथ म्हणता येईल.
लिखाण आवडले; फोटो पेक्षाही काढलेले चित्र जास्त आवडले!

बहाव्याचे फुलांनी लगडलेलं झाड कोणाचीही नजर खेचूनच घेतं...

आमच्या घराभोवती छोटीशी बाग आहे. साताठ वर्षांपूर्वी पत्नीने दोन..तीन कुंड्यामधे बहाव्याच्या बिया खोचल्या होत्या... साताठ फूट वाढली सगळी रोपे, पण फुलं मात्र धरत नव्हती. यावर्षी मात्र एका रोपाने फुले धरली... अगदी देखणं झुंबरच..

अतिशय सुंदर लेख...

सगळ्या प्रतिसादांशी सहमत. मस्त लिहीलयत, फोटो चित्र सगळंच छान. माझंही अतिशय आवडतं झाड आहे. गोरेगावात स्टेशनवरच केवढा बहरलेला बहावा आहे. त्याखालून जायला खुप आवडायचं. आता लॉकडाऊन मुळे स्टेशनवर जाणं बंदच आहे.