मेरे साजन है उस पार...

Submitted by बाख on 14 May, 2021 - 00:26

बंगाली भाषेतले लेखक ' ताराशंकर बंदोपाध्याय ' यांची कादंबरी 'आरोग्य निकेतन ' मधील नायक जिबोन मोशाय नाडी वैद्य आहे. तो रुग्णांची नाडी पाहून आजार सांगत असतो. त्याला नाडीमध्ये मृत्यूचा आवाज ऐकू येतो. आपल्या स्वत:च्या मृत्यूच्या आवाजाबद्दल बोलतांना तो म्हणतो, " मृत्यूने पायात पैंजणं घातली आहेत, सध्या ती शेताच्या
बांधावरुन हळू-हळू चालत येत आहे, हळू-हळू पैंजणांचा
आवाज मोठा होत चालला आहे..... आता अचानक पैं जणांचा आवाज कमी झालाय, ती (मृत्यु) माझ्या उशाजवळ येऊन थांबली तर नाही...? मृत्यु निशब्द आहे, कदाचित ती मला आपल्या मिठीत सामावून घेणार आहे असं वाटतंय...."

मृत्यूचे क्षण इतके सुंदर? प्राण जात असताना शरीराचं नेमकं काय होत असतं?

निदा फाजली यांच्या शब्दात....'यहां हर शै मुसाफिर है, सफर में जिंदगानी है।'

शरीरातून जीव निघून जातो त्या क्षणानंतर मृतदेहाला अग्नी मिळेपर्यंत त्या निर्जीव शरीराचं काय होत असतं?

साहिर लुधियानवी म्हणतात..' संसार की हर शय का इतना ही फ़साना है, इक धुंध से आना है इक धुंध में जाना है।'

मृत्यूचा शोक करावा की देहाला मुक्ती मिळाली म्हणून आनंद मानावा?

शैलेंद्र यांनी एक गैर फिल्मी गाणं लिहिलंय.... 'चलते चलते थक गया मैं और सांस भी ढलने लगी, तब राह खुद मुझे अपनी बाहों में लेकर चलने लगी।'

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः। न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ हे खरं असेल तर मग मृत्यूचा शोक कशाला करायचा? मृत्यु म्हणजे पुनर्जन्म. मातेच्या गर्भाशयातून बाळ बाहेर, जगात येतं. गर्भाशय परत रिकामं होतं दुसऱ्या जीवाला जन्म द्यायला. बाळाचा जन्म होतो आणि नाळ कापली जाते. अगदी तसंच मानवी देहाला देखील एक अदृश्य नाळ जोडलेली असते, ज्याला चंदेरी नाळ असं नाव दिलंय. Silver Cord. मृत्यूचा क्षणी ही अदृश्य नाळ तुटते आणि जड देहापासून सूक्ष्म देह वेगळा होतो, पुनर्जन्म घेण्यासाठी. हा देह जड देहाच्या वरतीच घोटाळत असतो, परत आत शिरण्यासाठी परंतु नाळ तुटलेली असल्यामुळे त्याला शिरता येत नाही. आपला जो देह आपल्या डोळ्यांनी दिसतो तो जड देह. या व्यतिरिक्त अजून दोन देह आपल्या भोवती वावरत असतात. सूक्ष्म देह, subtle body, जो स्वप्नावस्थेत सजग असतो. हा सूक्ष्म देह अध्यात्मिक प्रगतीसाठी काम करत असतो. तिसरा देह म्हणजे ' कारण ' देह. हा तिसरा देह, casual body, सतत जागा असतो आणि हाच देह जों कधीही बदलत नाही. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः। त्या त्या जन्मी केलेल्या कर्मानुसार सूक्ष्म देह मात्र बदलत राहतो. मग मुक्ती कुणाला मिळते?

प्रत्येक देहा भोवती सात कोशाचे आवरण असते. प्राणमय कोश जो रक्तात, आणि हृदयाच्या पोकळीत असतो. हाच तो कोष जो ऑक्सिजन अभावी नाश पावतो.

अन्नमय कोष हा अन्नावर, पाण्यावर अवलंबून असतो आणि मांस, चरबी, हाडे, मज्जा ह्या स्वरूपात ओळखू येतो. आत्मज्ञान होण्यासाठी हा देह आवश्यक असतो.

वासना कोष म्हणजे, राग, लोभ, द्वेष, मद, मोह, मत्सर या षड् रिपुंचे आगार. नकारात्मक विचार, इतरांना तुच्छ मानण्याची प्रवृत्ती, एखाद्याचं नाव बघूनच, ऐकूनच नाक मुरडणाऱ्या, रक्त खवळून घेणाऱ्या व्यक्ती, नावडतीचं मीठ अळणी विचारसरणी, सुनेला त्रास देणारी सासू, मुलाच्या संसारात उगीच ढवळाढवळ करणारी आई, स्वतःच्या मुलीला सासूचं जास्त ऐकू नको, नवऱ्याला मुठीत ठेव, असे सांगणाऱ्या काही आया, नवऱ्याचं मानसीक खच्चिकरण करणाऱ्या बायका, लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीचा बलात्कार करणारे पुरुष, सुनेवर वाईट नजर ठेवणारा सासरा, सासू सासरे कधी खपतील याची वाट पाहणाऱ्या नवविवाहिता, मुलाच्या आईवडिलांना वेस्ट पेपर बास्केट समजणाऱ्या उपवर मुली, भला उसकी साड़ी मेरी साड़ी से सफ़ेद क्यों असा मत्सर बाळगणाऱ्या रमणी, दागदागिने, कपडालत्ता, सौंदर्यप्रसाधने याला जीव लावणाऱ्या महिला, मोलकरणीने साधा चमचा नेला तरी तो परत मिळवण्यासाठी आकाश पाताळ एक करणाऱ्या गृहिणी, कोरोना काळात रेमडेसिविर औषधाचा काळाबाजार करणारी व्यक्ती, आणि ते पेशंटला न देता मध्येच लंपास करणाऱ्या नर्सेस, आवश्यक नसलेल्या टेस्ट करायला लावणारे डॉक्टर्स, भ्रष्टाचारी लोकसेवक, हावरट इच्छा, भीती, भूक आणि इतर अनेक बऱ्यावाईट इच्छेची उत्पत्ती ह्या कोषात होते आणि ह्या कोषातली वासना जेवढी प्रबळ असते तेवढा वेळ लागतो काकस्पर्श व्हायला. हाच देह मृत शरीरा भोवती घोटाळत असतो. नव्वद टक्के माणसं याच कोषात वावरत असतात. पण इथे जेंव्हा, ' जिंदगी से बड़ी सजा ही नही, और जुर्म क्या है पता ही नही ' हे जाणवलं की त्याची वाटचाल मनोमय कोषाकडे सुरू होते.

मनोमय कोषात मानसीक आंदोलन, सारासार विचार करण्याची कुवत, विवेकबुद्धी, सकारात्मक विचार, संस्कार आणि वासना कोषाला योग्य दिशा देण्याचे आदेश याचा विचार केलेला असतो.हमने माना ये ज़माना दर्द की जागीर है, हर कदम पे आँसुओं की इक नई ज़ंजीर है, हे ज्याला कळतं तो प्रार्थना करतो - मन की किताब से तुम, मेरा नाम ही मिटा देना, गुन तो न था कोई भी, अवगुन मेरे भुला देना.... मिनीमॅ लिस्ट वे ऑफ लाईफचा अंगिकार केला की ज्ञानमय कोषा कडे वाटचाल सुरू होते.

ज्ञानमय कोष म्हणजे सूक्ष्म देहाला घातलेली साद आणि आत्मिक उन्नती कडे नेणारा मार्ग. कहते हैं ग्यानी, दुनिया है फानी, पानी पे लिखीं लिखाई, याचा प्रत्यय इथे येतो.

त्यानंतर विज्ञानमय कोष. सृजनशील आणि आशावादी बनून मृत्यू म्हणजे आनंदाचा सोहळा मानणाऱ्या विभूतींचा हा कोष उन्नत झालेला असतो कारण वासना कोषातून बाहेर पडण्याचा सतत प्रयत्न त्यांनी केलेला असतो.

त्यानंतर येतो तो आनंदमय कोष. वैश्विक सत्याची जाणिव, आणि प्रत्यक्ष परमात्म्याशी ( परमेश्वर नाही ) संवाद साधण्याची किमया हाच कोष करून देतो. मृत्यू हेच अंतिम सत्य आहे हे पटवून देण्याचे काम हा कोष करतो. इधर झूम के गाए जिंदगी, उधर है मौत खड़ी ह्याची जाणीव इथे होते. संत महात्म्यांच्या शरिराभोवती जे वलय किंवा aura दिसते ते सूक्ष्म देहाचे आणि सात कोषातील आनंदमय कोशाचे आवरण असते. देह हलका होऊन सगळीकडे केवळ आनंदमयी, चैतन्यमयी, सत्यमयी वातावरणच आहे असे वाटू लागते. मृत्यू समयी त्यांचा चेहरा अगदी शांत असतो, ना वेडावाकडा असतो, ना कपाळाला आठ्या असतात. कारण त्यांनी साद घातलेली असते - " ओ रे मांझी....sss....! मेरे साजन है उसपार... अबकी बार, ले चल पार...." त्यांचा साजन पलीकडच्या तीरावर उभा असतो. न्यायला येणारा नावाडी हसतमुख असतो. तिथे ना डोक्याला शिंगा असणारा यमदूत, ना रेडा. असतो एक दिव्य प्रकाश आणि वाट दाखवणारा वाटाड्या. मै बंदिनी पिया की, चिर संगिनी हूँ साजन की अशी आनंदाची स्थिती झालेली असते त्या व्यक्तीची. आणि अशा वेळी जेंव्हा मृत्यू येतो तेंव्हाच्या क्षणाबद्दल "गुलजार" लिहितात :

मौत, तू एक कविता है, मुझसे एक कविता का वादा है जो
मिलेगी मुझको, डूबती नब्जों में जब दर्द को नींद आने
लगे,जर्द सा चेहरा लिए जब चांद उफक तक पहुंचे, दिन अभी पानी में हो, रात किनारे के करीब, ना अंधेरा ना उजाला हो, ना अभी रात ना दिन, जिस्म जब खत्म हो और रूह को जब सांस आए, मुझसे एक कविता का वादा है, मिलेगी मुझको....

आपण मात्र विचार करत असतो - जिन्होंने सजाये यहाँ मेले
सुख-दुःख संग-संग झेले, वही चुनकर खामोशी
यूँ चले जाएँ अकेले कहाँ.....

आणि जेंव्हा कळतं कि, ' ज़िन्दगी तो बेवफ़ा है एक दिन ठुकराएगी, मौत महबूबा है अपने साथ लेकर जाएगी,' तेंव्हा मृत्यू म्हणजे आनंद सोहळा होतो कारण आपण विश्वात कुठेतरी असणार आहोत, आपण परत येणार आहोत ह्याची जाणीव होते. मग कशाला मृत्यूची फिकीर करायची? आचार्य रजनीश यांच्या शब्दात म्हणायचं असेल तर, death is a celebration. म्हणून मृत्यू पावलेल्या व्यक्तीबद्दल, आप्तांबद्दल शोक करायचा नाही, डोळ्यातून पाणी काढायचं नाही, त्यांना फोटो फ्रेममध्ये अडकवून भिंतीवर अधांतरी लटकत ठेवायचं नाही. अशामुळे त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही. उलट "तू कहीं आसपास है ऐ दोस्त " असाच विचार करावा. तेराव्या दिवसाचं सेलिब्रेशन पहिल्या दिवशीही करावं. मनातल्या मनात तर नक्कीच करावं. ते आजूबाजूलाच असतात. अडचणीत आपल्याला मार्ग दाखवतात. स्वप्नात येऊन मार्गदर्शन करतात. त्यांच्या श्राद्धाच्या दिवशी ताटलीत तूप आणि भात वाढून आपण बाहेर झाडाखाली ठेवतो ते आपले आप्त येऊन त्याचा आस्वाद घेतील याच श्रद्धेपोटी.

देहाभोवती असणाऱ्या सात वलयांचं समर्पक संतुलन जी व्यक्ती साधते त्याचं जीवन आणि मृत्यू सप्तस्वरांची सरगम होऊन जाते आणि सप्तरंगाच्या इंद्रधनुष्यात ती व्यक्ती " मैं बंदिनी पिया की, चिर संगिनी हूँ साजन की..." असं गुणगुणत शाश्वत विसावा घेते.

......

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिले आहे. आवडले. Happy
व्यतिरिक्त अजून दोन देह आपल्या भोवती वावरत असतात. >>> तीन बहुतेक.
जड, सूक्ष्म, कारण आणि महाकारण शरीर.( Super causal body or pure consciousness. )
ते causal body करणार का, बहुतेक ऑटोकरेक्टने casual केलयं.

खूप सुंदर, हृदयस्पर्शी लिहिले आहे.

मृत्यूचे सेलिब्रेशन करावे कारण ह्या देहाच्या मृत्यूमुळे नश्वर जगातून आपले भोग भोगून आत्मा पुढील प्रवासाला मोकळा होतो पण मृत्यू नेमका कधी यावा हे आपण आपलेच ठरवून टाकले आहे. नव्वदीपार केलेले कोणी गेले की आपण स्थितप्रज्ञ बनून वासांसी जीर्णानी... म्हणू शकतो पण कोणी तरुणपणात गेले तर ही स्थितप्रज्ञता आणणे शक्य होत नाही. असो.

लिखाण आवडले.