
३-४ बटाटे - उकडुन सालं काढून.
पाऊण कप पोहे.
अर्धा कप कणीक
३ -४ लसणीच्या पाकळ्या
तेल
पाणी
मीठ
अर्धा चमचा चिली फ्लेक्स/ १ हिरवी मिरची बारीक चिरुन
कोथिंबीर
रायत्यासाठी
१ मध्यम कांदा
१ गाजर किसुन
अर्धा चमचा जिरे
२ हिरव्या मिरच्या
कढिपत्ता
कोथिंबीर
पुदिन्याची पानं
परवा युक्ती सुचवा बाफवर वावेने ह्या रेसिपीचा व्हिडिओ शेअर केलेला. त्याने बटाट्याचे पराठे केले ते खूपच मऊ -लुसलशीत झाले. नेहेमीच्या बटाट्याच्या पराठ्यांपेक्षा जरा निराळे आणि करायला एकदम सोपे वाटले. त्याच बरोबर केलेला रायता पण वेगळ्या चवीचा होता. व्हिडिओ वेळेवर सापडत नाही म्हणून पाकृ लिहुन ठेवतोय.
१. तीन मोठे बटाटे उकडुन सालं काढून ठेवा.
२. साधारण पाऊण कप पोहे मिक्सर मध्ये बारीक करुन घ्या. पोहे जाड/ पातळ कुठलेही चालतील, बारीक पीठच करायचं आहे. हे पीठ मोजुन घ्या, कारण या पिठाच्या प्रमाणात पाणी घालायचं आहे.
३. कढईत दोन - तीन टी स्पून तेल गरम करायला ठेवा. तेल जरा तापलं की त्यात किसलेला लसूण घाला. लसुण किंचित जास्तच छान लागतो, कारण त्याचाच फ्लेवर आहे मुख्य.
४. लसूण किंचित गुलाबी झाला की पोह्याच्या पिठाच्या दुप्पट पाणी घाला, एक चमचा मीठ घाला.
५. त्यात अर्धा चमचा लाल चिली फ्लेक्स असतील तर ते नसतील तर बारिक चिरुन हिरवी मिरची घाला. मुलं पण खातील म्हणून मी काहीच तिखट घातले न्हवते. बरोबरचा रायता जरा आम्हाला झणझणीत केलेला.
६. पाण्याला चांगली उकळी फुटली की गॅस बारीक करुन पोह्याचं पीठ हळूहळू घालत ते ढवळत रहा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.
७. पोहे पाणी शोषुन घेतील. हलवताना साधारण गोळा बनला की गॅस बंद करा आणि ते गार होऊ द्या.
हे 'पोहे' असेच खायला पण मस्त वाटले.
८. हा लगदा साधारण हाताने कालवता येतील इतपत गार झाला की मळून घ्या.
९. उकडलेला बटाटा आधी मॅशरने कुस्करा आणि त्यात हे पोहे घालुन एकजीव मिश्रण करा.
१०. यात मावेल तेवढी कणिक, चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. थोडं तेल लावुन पोळ्यांना करतो तशी कणिक भिजवा. नेहेमी बटाट्याच्या पराठ्याला बटाट्याच्या सारणाइतकाच (जरा जास्तच) कणकेचा गोळा लागतो. इथे कणिक फक्त बाईंडिंगला वापरलेली आहे, त्यामुळे अगदी एखाद मोठा डाव बरीच होते. मला साधारण पाऊण कप लागली असेल. #लेसग्लूटनपराठे
११. आता गोळे करुन पराठे लाटा, आणि दोन्ही कडून तेल सोडून भाजा. मऊ लुसलुशीत पराठे तयार.
रायत्या साठी.
१. अगदी चमचा भर तेल गरम करुन त्यात जिरं (आवडत असेल तर मोहोरी) तडतडुन घ्या. तेल अगदी कमी घाला, फक्त जिरं फुलण्याइतकंच.
२. त्यात मनसोक्त मिरचीचे तुकडे, कढिपत्ता घाला आणि परता.
३. एक मध्यम कांदा बारिक चिरुन घाला. थोडा परतला की एक मोठं गाजर किसुन घाला.
४. कांदा आणि गाजर फार शिजवायचं नाहीये. क्रंच राहिला पाहिजे.
५. एखाद मिनिटाने गॅस बंद करा आणि हे जिन्नस बाऊल मध्ये काढून घ्या.
६. वरुन चिरलेली कोथिंबीर, पुदिना घाला.
६. यात रायत्याची कन्सिस्टंसी येईल इतकं दही घाला. व्हिडिओमधल्या काकूंच्या टीप नुसार मीठ एकदम आयत्यावेळी घाला, नाही तर रायता आंबट होतो. आमच्या घरच्यांच्या मतानुसार पाणी सुटतं. थोडक्यात मीठ सर्व करताना घाला.
रायत्या बरोबर किंवा नेहेमीच्या केचप, सॉल्टेड बटर बरोबर छान लागले पराठे.
१. बटाटे मायकोवेव्ह मध्ये उकडले की पाणी काढून गार होऊ द्या, म्हणजे बटाट्यात पाण्याचा अंश फार रहाणार नाही.
२. दही आमचं थोडं कमी झालं रायत्यात. आणखी थोडं चाललं असतं.
३. पराठ्यात पोहे आहेत हे अजिबात जाणवत नाही, नुसते बटाट्याचे पराठेच वाटतात. काकूंच्या सांगण्यानुसार कच्चे पोहे मिळून येत नाहीत. ते शिजले की मऊ होतात आणि पराठेही मऊ होतात.
आजचा नवा शब्द: कद्दुकस करणे = किसणे. व्हिडिओ मधल्या काकू कद्दुकस इतकं भारी म्हणतात की फार मजा आली ऐकताना.
मी आजच केला हा पराठा आणि
मी आजच केला हा पराठा आणि रायता. छान मऊ झाले आणि रायताही मस्त लागला चवीला.
छान आहे रेसिपी, नाष्ट्याच्या
छान आहे रेसिपी, नाष्ट्याच्या मेनूत भर पडली.
छान. त्या काकींच्या सगळ्या
छान. त्या काकींच्या सगळ्या रेसीपीज चांगल्या आहेत. त्यांच्या पद्धतीने फ्लॉवरचा पराठा (उपम्यासारखे करून मग त्याचा पराठा) पण उत्तम लागतो.
छान रेसिपी.
छान रेसिपी.
रायत करून बघितलं . छान लागलं
रायत करून बघितलं . छान लागलं पोळीशी खायला. पोहे संपलेत ते आणायला हवेत ७ ते ११ मध्ये जाऊन . मग पराठे करता येतील

आज केले. फारच मस्त झाले.
आज केले. फारच मस्त झाले. अगदीच मऊ असल्याने जरा तारांबळ उडाली लाटताना. म्हणून लहान लहानच केले. पुढच्या वेळी कणीक जरा जास्त घालेन. आपण तांदळाच्या पिठाच्या उकडीच्या भाकऱ्या करतो तसं मऊ टेक्श्चर आहे.

रायतंही अगदी चविष्ट आहे.
पराठे करून पाहीले
पराठे करून पाहीले
मस्तं झालेत , चव आणि टेक्श्चर दोन्ही छान आहे
आज करुन पाहिले, छान मौ झाले
आज करुन पाहिले, छान मौ झाले पण लाटताना जरा नाजुक साजुक असल्याने साभाळुन लाटावे लागले... पोह्याची उकड छान लागते खायला.

रायता करायचा राहिला त्यामूळे छुन्दा घेतला.
मस्तच दिसताएत सगळ्यांचेच
मस्तच दिसताएत सगळ्यांचेच पराठे.
करून बघावेत का एकदा.
आज करुन पाहिले. मस्त च झालेत.
आज करुन पाहिले. मस्त च झालेत...एकदम नाजुक...मऊ....अलवार वगैरे वगैरे...
लाटायला जरा अवघड आहे...
२-३ जणांसाठी करायला ठीक...जास्त लोकांसाठी केले तर खुप वेळ आणि कष्ट लगतील...पोटभर होत नाही असं लिहिलय ते एकदम पटलं...
रायता प्रकरण सगळ्यात बेस्ट...आता नेहेमी होणार हा रायता......थंडीत मिळणारी गोड गाजरे सोडुन, एरवी वर्षभर मिळणार्या गाजरांना तशी फार काही खास चव नसते....अशा गाजरांचं हे रायतं मस्तच लागेल...
कणीक जरा जास्त घातली तर
कणीक जरा जास्त घातली तर लाटायला सोपे जातील आणि पोटभरीचेही होतील असं वाटतंय.
रायतं खरंच भारीच आहे!
मलाही करायचे आहेत. विकांताला
मलाही करायचे आहेत. विकांताला बघते.
मला stuffed पराठे जास्त आवडतात. मिश्रणात कणिक टाकायच्या ऐवजी गोळे कणकेत भरून बघेन.
अम्रुतसरी छोल्यांनंतर सगळ्यात जास्त tried and tasted recipe झालीयं
मी नाचणी पीठ वापरून पूर्ण
मी नाचणी पीठ वापरून पूर्ण gluten-free करायचा प्रयत्न केलाय. पण लाटायला अशक्य झाले. त्यामुळे थोडं भाकरीसारखं थापत मोडके तोडके केले. पुन्हा शक्यतो करणार नाही कारण मला ग्लूटेन शिवायच करायचे होते. पण ही रेसिपी खूप इंटरेस्टिंग आहे. त्याबद्द्ल त्या काकू आणि अमित दोघांना धन्यवाद

Pages