स्वरानंदाची खाण - आंद्रे रियू

Submitted by jpradnya on 9 May, 2021 - 18:35

आपणा कानसेनांचा एक प्रॉब्लेम आहे. आपली स्वरांची भूक कधी भागत नाही आणि कान कधी पोटासारखे भरत नाहीत. स्वरांच्या नवनवीन चवी आस्वादाव्याश्या, आळवाव्याश्या वाटतात. कशाचा शोध घेतो माहीत नसताना सतत कसला तरी शोध सुरु असतो. आणि मग अवचित कुठल्या क्षणी अचानक आपण कुठेतरी वाट चुकतो आणि अलिबाबाची गुहा सापडते. आंतरजालावर निरुद्देश भटकत असताना नुकताच माझ्या हाती असाच एक स्वर्गसुखाचा ठेवा लागला. एक गाणं, दोन गाणी, अक्खी मैफिल, अनेक अक्ख्या मैफिली असं मी अधाशासारखं ऐकत गेले. वेळ पुरत नव्हता आणि मनही भरत नव्हतं. भानावर आले तेव्हा असं वाटलं कि आपणा भारतीयांना ह्या हिऱ्याची फार ओळख नाही म्हणून हा लेखनप्रपंच (माझं वाटणं चुकीचं हि असू शकेल आणि आपल्यामध्ये असंख्य पंखे ऑलरेडी असू शकतील - असं असेल तर उत्तमच). मोझार्ट, बीथोवन, बाख , झुबीन मेहता इथे निदान माझ्यासारख्या अर्धवटरावांची तरी पाश्चिमात्य संगीताची तोंडओळख थांबते. अशात ऑपेरा म्हणजे काय बरे भाऊ करताना आंद्रे रियू ह्या युरोपात सध्याच्या अत्यंत प्रथितयश आणि कलंदर ऑरकेस्ट्रेटर संगीत तज्ज्ञाची यूट्यूबवर गाठ पडली आणि love at first sight (?) झालं हो अगदी!

भारतीय शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम, लोक आणि पुढे जाऊन फ्यूजन अश्या अनेक प्रकारच्या संगीतांमध्ये एकूण ९ रसांपैकी ७ रसांचा आविष्कार मुख्यत्वे केला जातो. हास्य आणि विभत्स रसाला किमान भारतीय संगीताच्या बैठकीत स्थान (निदान मानांचं) नाही. आंद्रे यांच्या ऑरकेस्ट्राचं वेगळेपण जाणवलं ते त्यांच्या हास्य रसाच्या अभिनव संगीतमय आविष्कारातून. अत्यंत कसलेल्या मुरब्बी संगीतकाराचा अवाढव्य ताफा घेऊन हा माणूस जगभरात आनंद वाटत फिरतो. अमिताभचा वाटावा अश्या थाटात स्टेज आणि फ्रेम खाऊन टाकत पुढ्यातल्या हजारो चोखंदळ,आंतरराष्टीय बहुभाषिक रसिकवृंदाला तीन तास खिळवून ठेवणे ज्याला सोपे काम वाटेल त्याला परमेश्वराने माफ करावे! करुणा, शृंगार, वीर, भय, शांत, रौद्र, अद्भुत ह्या विविध रसांमधून हा माणूस आपल्याला अक्षरशः एखाद्या बोटीवरच्या प्रवाश्यांसारखा आंदोळतो. आपणही हिप्नॉटिझ झाल्यासारखे त्याच्या मागून एका दालनातून दुसऱ्या दालनात स्वतःच्या नकळत शिरतो. दोन दालनाच्या मधल्या लॉबी मध्ये संगीतातूनच निर्माण केलेले हास्याचे फवारे ठायी ठायी लागतात. आंद्रे यांची टीम बऱ्यापैकी मध्यमवयीन, श्रेष्ठ जाणकार दिग्गज संगीतज्ञांनी बनलेली असली तरी शाळकरी पोरांच्या उत्साहाने हि मंडळी मधले हे फार्सिकल तुकडे इतके धमाल रंगवतात की हे संगीतकार आहेत की नट असा प्रश्न पडतो. इथे त्यांना "This is not my job" ची बाधा झालेली नाहीये हे जाणवतं. ते सगळे त्या वेळी निव्वळ "परफॉर्मर्स" असतात! प्रत्येक वर्षी आंद्रे स्वतःच्या ऑरकेस्ट्रा च्या मंचावरून नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देतात. अमिरा विलिगहेगन ह्या चिमुरडीचं " ओ मियॉ बाबिनो कारो" हे गाणं ऐकताना शब्द कळण्याची गरजच उरत नाही. संगीतकाराच्या हृदयातील वेदना त्या प्रतिभाशाली छोटुकलीच्या निरागस पण तयार आवाजातून आपल्या हृदयापर्यंत इतक्या परिणामकारकरीत्या पोहोचते की घळाघळा अश्रूनचा अभिषेक सुरूच होतो. त्यांच्या मैफलीत देश, भाषा, वय, वंश, धर्म कुठेही आड येत नाहीत. तिथे फक्त एकंच साम्राज्य असतं ते म्हणजे संगीताचं आणि एकंच सम्राट असतो तो म्हणजे आंद्रे!

नुसतं युट्यूब वर बघून आणि ऐकून इतकं घायाळ व्हायला होत असेल तर प्रत्यक्ष त्यांच्या समोर ऐकण्याचा अनुभव काय असेल त्याची कल्पनाच केलेली बरी. अर्थात हे येरा गबाळ्याचे काम नोहे. नेदर्लंड्स मधील मास्टरीखत (maastricht ) हे आंद्रे यांचे माहेरघर. तिथल्या व्रिजताफ(Vrijthof) ह्या मुख्य चौकात बहुतेक दरवर्षी वट्ट यूरोज मोजून दर्दी संगीतप्रेमी आंद्रे यांच्या मैफलींना वर्णी लावतात. युरोपातील अतिशय उल्हासदायक उन्हाळी हवा, मदिरा आणि मंदिराक्षींच्या सहवासातली नाशिली संध्याकाळ, उंची पेहराव , भव्यदिव्य मंच, सर्व औपचारिकता सोडून असले तरी विभत्सतेकडे किंचितही न झुकणारा उच्च अभिरुची जपणारा रसिकवृंद, फुललेल्या देखण्या तारुण्याबरोबरच निज शैशवास जपणारे - केस पांढरे झाले तरी देठ हिरवा असणारे चिरतरुण आणि चिरतरुणी, शिस्तबद्ध, सुरक्षित, स्वछ व्यवस्था आणि समोर दिमाखाने एका मागून एक उभे राहणारे संगीताचे महाल. तालावर थिरकणारे पाय, चालीवर डोलणाऱ्या माना आणि एकसुरात गुणगुणल्या जाणाऱ्या अजरामर ओळी. ओळख पाळख नसताना एकमेकांच्या हातात हात गुंफून सुरु झालेले - वासनेला दूर ठेवलेले - पण सौंदर्याचा आब राखणारे डौलदार वॉल्त्झ. निदान त्या काही घटकांसाठी तरी पृथ्वीवर स्वर्गच अवतारलाय की काय वाटावं असं अद्भुत वातावरण.

काय विचार करताय मग? सुरु करा एक एफ डी "योहान स्ट्राउस ऑरकेस्ट्राच्या नावाखाली (माझी आपली मध्यमवर्गीय झेप एफडी च्या पलीकडे जात नाही) आणि घ्या एकदा हा आनंद. ती एफ डी मॅच्युअर होईपर्यंत युट्यूब वर तरी नक्की एका आणि सांगा तुम्हाला आवडतोय का ते!

https://www.youtube.com/watch?v=821saLEZLu0

-प्रज्ञा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

फार फार वर्षापूर्वी आंद्रे रिऊच्या ‘द सेकंड वॉल्ट्झ’ आणि भारतियांना चिरपरीचीत ‘द ब्लू डॅन्युब’ची एम्.पी.३ मिळाली होती. किती पारायणं झाली तिची आठवत नाही. ती कधीतरी हरवली आणि तोही विस्मृतीत गेला. तुमच्या लेखाने आठवणींना उजाळा मिळाला. केनी जी, यान्नी आणि आता आंद्रे रिऊ. बहूतेक म्युचुअल फंडातच पैसे गुंतवावे लागतील आता.... Happy

खूप छान लिहिले आहे.
मी आणि माझी मुलगी नेहमी ऐकतो आणि बघतो यांचे व्हिडीओ.
खरोखरच मॅजेस्टिक आणि श्रोत्यांवर जादू करणारा परफॉर्मन्स असतो.
या फॅन लिस्टमध्ये आहोत आम्ही
Dancing around the world ही एक cd ही आहे घरी जी अगदी नेहेमी ऐकली जाते.