असं नको.. तसं लिही.. !

Submitted by पाचपाटील on 1 May, 2021 - 09:38

नाही.. ही सगळी वाक्यं म्हणजे खाणीतनं आत्ताच फोडून
काढलेल्या दगडांसारखी टोकदार, खुनशी आहेत..
समजा ह्यातलं एकेक वाक्य हातात घेऊन भिरकावून दिलं तर उगाच डोकं-बिकं फुटायचं कुणाचंतरी.. आणि तुझ्या मागं लचांड लागायचं.. त्यातून तू एक नंबरचा पेद्रट मनुष्य
असल्यामुळे तुला लचांड वगैरे नकोच असणार !
आणि मनुष्य म्हटल्यावर इकडं तिकडं चमकून बघू नकोस..
'मनुष्य' म्हणजे माणूस..! होमो सेपियन सेपियन..!

असो.. आता एक काम कर... ह्याची धार थोडी मऊ कर... एकेका वाक्यावर हात फिरवून बघ... भिऊ नकोस.. तूच
लिहिलंयस ते..आपलाच हात आपल्याला लागत नाही...
एकेका शब्दाकडे नीट बघ... पॉलिश कर.. माणसाळव त्यांना.. सभ्य सुसंस्कृत कर ... !

आता उदाहरणार्थ 'मी त्यांना झ्याटावरनं कोलतो' हे वाक्य घे... ह्याच्यामध्ये जो विवक्षित शब्द आहे, त्याच्यामुळे अंगावर पाल पडल्यासारखं होतं.. थोडं सॉफ्ट कर.. लिही.. 'मी त्यांना जुमानत नाही'.. हे छान आहे, अर्थही बदलत नाही,
आणि शिवाय भावनाही व्यवस्थित पोचतात..!

च्यायला ss.. शब्दांतला सगळा जाळ निघून गेल्यावर काय झ्याट्याच्या भावना पोचणार..!

छि: छि: छि: फारच ग्राम्य आहेस बुवा तू... पुन्हा पुन्हा तोच विवक्षित शब्द वापरतोयस.. खाजगीत बोलताना कसंही
बोललं तर चालतं, पण लिहिताना एकेक वाक्य
सावडून घेतलेलं बरं असतं... असो.. थोडंसं संपादन केलं की होऊन जाईल.. !

अच्छा ..? पण काय होऊन जाईल? आणि काय व्हायला
पाहिजे? किंवा काय होऊ?

बराच काही हो..!

उदाहरणार्थ..

हा तुझ्या जातीचा उल्लेख काढून टाक.. आधुनिक हो..!
हा तुझ्या धर्माचा उल्लेख काढून टाक.. सेक्युलर हो..!
सुरे तलवारी घेऊन भोकसत फिर .. कट्टर हो.!
गांधींसारख्या गोड म्हाताऱ्याला गोळ्या घाल.. राष्ट्रभक्त हो.!

अग्रलेख लिहून रोज सगळ्या दुनियेला उपदेश दे.. बुद्धिजीवी हो..!
पोट जाळण्यासाठी सिग्नलवर लिंबू-मिरच्या विकणाऱ्यांकडे बघून नाक मुरड.. पुरोगामी हो..!
मातृभाषा वगैरे काही नसतं, असं मान... ग्लोबल हो..!

अजून सांगायचं झालं तर..

बापाला येड्यात काढ, शेतीवाडी सगळी फुंकून टाक.. शहरी हो..!
पोरींना सुरुवातीला इंप्रेस करण्यापुरताच... लिबरल हो..!
चान्स मिळेल तेव्हा मजा मार... पुरूष हो..!

ह्या सगळ्या भोगांचा कंटाळा आला की संन्यासी हो..
विपश्यनेसाठी वगैरे जा दहा दिवस...
कायमचा नकोस जाऊ.. दुनियेत अजून भरपूर मज्जा बाकी आहे.. परत ये..

मेडीटेशन वगैरे करतोस ना?
मग मेडीटेशनमध्ये अडथळा आणणाऱ्या डासांना शिव्या दे..

शिवाय कधीतरी चार पेग घेऊन, बधिर हो.. !
मन:शांतीवर सभा हेपल...!
शरीर मन आत्मा ब्रह्म कांदा बटाटा वगैरे..

तीन हातांची जेजुरी रे
त्यात आत्मा मल्हारी रे

जेजुरी? कुठली जेजुरी? सासवडच्या पुढची?

नाय रे येड्या ... ही वेगळी जेजुरी आहे..!
कवीनं इथं 'शरीराला' जेजुरीची आणि 'आत्म्याला' मल्हारीची उपमा दिलीय..!
प्रत्येकाच्या आतला मल्हारी सेमच असला, तरी आपापली जेजुरी सांभाळण्याची भानगड ज्याच्या त्याच्यावरच
टाकण्यात आलेली आहे..!

म्हणून आपण फक्त आपापली जेजुरी जगवायची..
दुनियेला आग लागली तरी फरक पडू द्यायचा नाही..
लक्षच द्यायचं नाही तिकडं... कान डोळे घट्ट बंद करून
घ्यायचे...! आपलं आपलं सरळ लाईनीत जगत रहायचं..!
मग जेजुरी सुरक्षित राहते..
आत्मा वगैरे काय.. येत जात राहतो..!!
त्याचा काई विषय नाही..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याला एक सभ्य शब्द आहे. शष्प !!>>
माहिती होता.. पण सगळ्या सभ्य शब्दांप्रमाणेच, ह्या शब्दातही जोर नाही.. 'रग' नाही.. ! Happy

बाकी लेख लई भारी!>>
धन्यवाद Happy

एकदम सडेतोड लेखन आवडलं.
>>>ह्या सगळ्या भोगांचा कंटाळा आला की संन्यासी हो..
विपश्यनेसाठी वगैरे जा दहा दिवस...
कायमचा नकोस जाऊ.. दुनियेत अजून भरपूर मज्जा बाकी आहे.. परत ये..>>>
आणि हे
>>>
प्रत्येकाच्या आतला मल्हारी सेमच असला, तरी आपापली जेजुरी सांभाळण्याची भानगड ज्याच्या त्याच्यावरच
टाकण्यात आलेली आहे..!>>>
हसू आलं पण अगदी पटलं ! जबरी निरिक्षण !!

धन्यवाद हीरा
प्रतिसादाबद्दल धन्यवाद पारंबीचा आत्मा
Happy