तुमची शाळा कॉलेजची फी किती होती ?

Submitted by BLACKCAT on 1 May, 2021 - 00:37

आज व्हॅटसपवर एक फोटो आला.

1943 सालची जेजे उर्फ ग्रँट मेडिकल कॉलेजची एम बी बी एस ची फीबाबतची रिसीट आहे. 135 रु फी होती. रुपये , आणे , पैसे असे असावे बहुतेक , तेंव्हाची पैसे लिहायची सिस्टीम कशी होती , माहीत नाही.

तुमचा पहिला पगार किती होता , असा एक धागा आहे. म्हणून हाही एक धागा काढला आहे , तुमची शाळा , कॉलेजची फी किती होती ?

SAVE_20210501_100123.jpeg

ह्या अनुषंगाने इतर शालेय वस्तू , कम्पास , पुस्तक सेट , वह्या , घरगुती किंवा कमर्शियल क्लासची फी , स्कुल बसचा खर्च , विद्यार्थी पास, सहलीचा खर्च इ इ इ देखील लिहिता येईल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

1980-90
शालेय फी 10 रु होती , पण इबीसी होती म्हणून 0

1994 ते 2000
MBBS
शासकीय : फी एका वर्षाला 6000 असायची , म्हणजे सहामाही 3000 व 3 टर्मची 9000 , पण त्यालाही इबीसी असल्याने परत मिळायची.

सध्याची फी सुमारे 1 लाख आहे , असे गुगलवर पाहिले

रोचक !
माझे सांगतो.

शालेय मासिक शुल्क = इयत्ता वजा १ ( म्हणजे ५वी ला ४ रु. असे...)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (MBBS) वर्षाची फी चारशे रुपये फक्त. वसतिगृहाचीही बरीच स्वस्त होती; नक्की आठवत नाही. त्यात एक गंमत होती.

वसतीगृह घेतले की आम्हाला मिळणार्या राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्तीची रक्कम दुप्पट होई. तशी ती झाल्यानंतर वसतिगृहाचे शुल्क वजा जाता आम्हाला चक्क नफा होई !

माझं पदवी पर्यंतचे शिक्षण रयत मधेच झालं. आई - वडील रयतमध्ये असल्याने "संस्थासेवक" या सवलतीमुळे कधीच फी भरावी लागली नाही. मास्टर्स डिग्रीसाठी मात्र ४० हजार फी भरावी लागली.

१९९६ - बारावीपर्यंत मुलींना फी माफ
१९९६-२००० - चार हजार रुपये वर्षाची फी अशी सोळा हजार रुपये..
सरकारी कॉलेजात असल्याने वसतिगृह आणि जेवणाची फी सुद्धा अतिशय मर्यादित होती - सरकारी कॉलेजचा अजून एक फायदा म्हणजे उत्तम लायब्ररी - प्रत्येक सहामाही ला लागणारी जवळपास सगळी पुस्तक लायब्ररीत फुकट मिळत असत

काय करणार पण लोकांच्या फीया जाणून घेऊन? तेव्हाच्या आणि आताच्या फीयांमधे काही कंपॅरीझन तरी आहे का. उलट हे आकडे बघून वाईटच वाटते कधी कधी.

माझी शाळेची फी ५-१० रुपये असावी. १९८३ एसेसी. कॉलेजची आठवत नाही. शेकड्यांतच असावी.

फिया जाणून घेऊन कळतं की आपल्याला सबसिडीचा , समाजवादी अर्थ- शासनव्यवस्थेचा लाभ मिळाला आहे. त्याच जोरावर आज आपण भांडवलशाहचे गुणगान गाऊ शकतो.

1990,91 COEP - रुपये 420 फक्त प्रत्येक सेमिस्टर ला, पुढची 2 वर्षे वाढलेली फी रुपये 2000 प्रत्येक सेमेस्टरला

१९९३ -> दहावी ला १० रूपये असावी महिन्याला.
१९९४-९५ -> ११-१२ ची आठवत नाही. क्लासेसना ८०० रूपये वर्षाला.
१९९५ - १९९९ -> इंजिनिअरिंग - वर्षाला ४०००.

आईबाबा भरायचे त्यामुळे कल्पना नाही. कमीच असावी, कारण परिस्थिती बेताचीच असून कधी स्कूल फीजची बोंब झाल्याचे आठवले नाही. तसेच आमची शाळाही विद्यार्थ्यांना लुटणारी नव्हती. गणवेशाचा खर्च नको म्हणून अर्धी चड्डीचा होता. ते सुद्धा गुडघ्याच्या चार बोटे वर कंपलसरी.

ईंजिनीअरींगची फी मात्र माहीत आहे आणि लक्षातही राहिली आहे. कारण डिप्लोमानंतर डिग्री करताना आईवडिलांनी विचारलेले. ईतके पैसे तुझ्या शिक्षणासाठी घालतोय, बुडवू नकोस, अभ्यास कर मन लाऊन.

२००४ साली वालचंद सांगलीला पहिल्या वर्षाला २५ हजार फी होती, पुढे ट्रान्सफर मिळून पुन्हा वीजेटीआयला आलो तेव्हा साधारण तितकीच होती.

अवांतर - २००४ साली बाहेर राहायचो, हॉस्टेलला नाही. तेव्हा बाहेरच्या मेसचे ८०० रुपये होते. चेंज म्हणून एक महिना हॉस्टेलची प्युअर मांसाहारी मेस लावलेली. महिना हजार झालेले. एक महिना एका गुज्जू हॉटेलला मेस लावलेली. नऊशे रुपयात छान क्वालिटी जेवण मिळायचे. पण गोडूसपणा झेपणारा नव्हता. म्हणून पंधरा दिवसात सोडली.

मला पाचवी, सहावी, सातवीची आठवतेय फक्त. अनुक्रमे पाच, सहा, सात रुपये होती. मी बारावीत असताना मुलींना बारावीपर्यंत फी माफ केली होती त्यामुळे बारावीत फी भरावी लागली नव्हती हे लक्षात आहे. बाकी आठवत नाही. कमीच असावी तशी.

मला पाचवी, सहावी, सातवीची आठवतेय फक्त. अनुक्रमे पाच, सहा, सात रुपये होती.
>>>>>
हा फंडा आमच्या शाळेत बहुधा मुलींसाठीच होता. मुलांना जरा जास्त होती.

आमच्याकडे मुलांना ईतकी कमी नसावी. कारण आठवीत असताना माझा रोजचा पाच रुपये पॉकेटमनी होता आणि वडापाव दोन रुपये होता.. आणि मला एक फीचा किस्सा आठवतोय.
एकदा मी फि वेळेवर भरली नव्हती. घरी सांगायचे विसरत होतो. बाईनी लास्ट डे म्हणून मला आठवण केली तरीही विसरलेलो. मग त्यांनी मला वर्गाच्या बाहेर उभे केले. तिथे मी उभा असताना आमच्या गेल्या वर्षीच्या क्लासटीचर बाई आल्या. त्या मला म्हणाल्या अजून सुधारला नाहीस का रे. मी बाईंना म्हटले, नाही बाई मस्ती करत नव्हतो. फी आणायला विसरलो म्हणून उभे केलेय. तसे त्या बाई मला तडक घेऊन आत गेल्या. आणि आमच्या बाईना म्हणाल्या की बाई असे करू नका, फीज नाही आणली तर उद्या आणेल. त्याच्या घरचा काही प्रॉब्लेम असेल. मुलांना या कारणासाठी बाहेर ऊभे करू नका Happy

चौथी सातवी स्कॉलरशिप महिन्याला २०-२५ रुपयेच मिळायची. ती सुद्धा वर्षाला शेवटी एकदम. लास्ट पेपर झाल्यावर पार्टी करायचे सोडून आधी तिथे रांग लावावी लागायची.

करायचे सोडून आधी तिथे रांग लावावी लागायची.>> आमच्या कडे टीचरच ते फी साठी वर्ग करून घ्यायच्या वाटतं आठवत नाही. बॅक इन द सेवंटीज. पण त्या काळातले अनुभव व ज्ञान बघता हे पैसे मूल्य काहीच नाही. अमूल्य आहेत ते दिवस. उदा: विमला बाईतला आमचा आठवीचा वर्ग नवीन तयार केला होता. अजून ही तो रोड वरून दिसतो. एल शेपची इमारत असेल तर एल च्या शेवटचा कोपर्‍यातला भला मोठा वर्ग. त्यात सर्व बाके नवीन आणली होती लाकडाचा फ्रेश वास व खिळे जोडणी वर नीट लावलेली फ्रेश लांबी. काही चोर मुले कर्कटकाने ती लांबी काढून टाकण्यात मग्न असत. बेस्ट म्हणजे साइडच्या खिडक्या टिळक टँकच्या बाजूला उघड्त. कायम स्विमिन्ग पूल वरील घडामोडी दिसत. क्वचित एखादी बिकिनीवाली फॉरेनर बाई. गोरा बाबा. हे फारच अप्रूप होते. वाइट अर्थाने नव्हे असे पन जगता येते हेच माहीत नव्हते ह्या अर्थाने. इतिहास भूगोलाच्या दळण तासांना स्विमिन्ग पूल बघत बसू. शिवाय इथे शाळेचे ऑडिओ व्हिजुअल इक्विपमेंट व पडदा होता. २८ नंबरची रूम!!!
दहावीत पण नॅशनल स्कॉलर शिप मिळा लेली पण त्याचे प्रशस्ति पत्रक व १००० रु मिळा ले ते बाबांना दिले.

मुलीच्या शाळेची फी ओके टाइप वर्शाला १७-२० हजार. ( हैद्राबादेस स्वस्ताई) रुइ या अक्रा वी बारावी मुलींना शिक्षण फ्री म्हणून ७२२ रु. प्रति वर्शी फक्त.

फ्लेम युनिवर्सिटी लैच महाग. पण ऑल राउन्ड गोल्ड मेडल मिळाले व एक उत्तम जीवनानुभव. त्यामुळे मीच ऋणी आहे इन द एंड.

त्या काळी कॅमल कम्पास 20 रु ला मिळायचे>> तुला माहीत आहे का त्यातही दोन प्रकार होते. कंपास व रंगपेटी सुद्धा पहिले त्याची कड अगदी पत्राच होता. त्यावर अने कदा हात कापायचे. ते सुरी सारखे शार्प असत. व कंपासचा शेप पण आयताकृती हार्ड असा होता. पुढे जेव्हा संशोधन व प्रोड्क्ट इम्प्रुव मेंट होउन एजेस गोल वळत्या केल्या व कडा पण वळत्या केल्या त्या मुळे कापायचे कमी झाले. ते ही एकदम इनोव्हेटिव्ह वाटायचे. आमच्या एका मैत्रीणीची मावशी सिंगपूर मध्ये होती तेव्हा तिच्याकडे एक प्लास्टिकचे पिंक भावलीचे कवहर असलेली व मॅग्नेटिक लॉक असलेली आत अनेक कप्पे असलेली कंपास होती. ती आपल्याला लाइफ मध्ये कधीच मिळणार नाही असे मला वाटायचे. रादर माहीतच होते.

नटराज व अप्सरा पेन्सिली, स्टील चे टोक यंत्र, मोराच्या आकाराची पण गळकी वॉटर बॅग, व ए बी सी असे लिहिलेले व फळांचे चित्र अस्लेले हिरवे व व्हाइट खोड रबर वासाचे ( हे महाग असे) अप्रुपाचे. ह्यांचे फोटो पि टरेस्ट वर आहेत.

शाळा आणि डिप्लोमा कॉलेजची आठवत नाहीये.
डिप्लोमा(GPP) एडमिशन वेळी 2000 भरलेले आठवताएत..नंतर स्टेशनरी, एक्झाम फि असं काही ना काही असायचं त्या रक्कमा आठवत नाहियेत.
इंजिनिअरिंग ची वार्षिक फि 42,000रू होती

१२ वी पर्यत मोफत शिक्षण होतं मुलगी असल्याने. पूढे पदवी घेतली तीही नाममात्र शुल्कात. घरची परिस्थिती तेव्हा खाऊन पिऊन सुखी इतकीच असल्याने वाढीव खर्च झाला की महिन्याच्या शेवटी आई बाबांवर ताण यायचा. या परिस्थितीत शिकले ते परवडले ते केवळ मुलींना फी माफ करायच्या सरकारी धोरणाने. नाहीतर कठीण झालं असत. शरद पवारांनी हे काम मोठं करून ठेवलंय