ऑनलाईन कादंब-या : लांबच लांब लांबच लांब लांबच लांब भागम भाग

Submitted by ------ on 26 April, 2021 - 07:31
Guide to online stories

प्रस्तावना :
गोंधळलात का शीर्षक वाचून ?
त्याचा अर्थ आहे ऑनलाईन कथा कादंब-यांचे अनेक भागात येणारे धागे.
ते मार्केटिंग डिपार्टमेंट आहे वायएसआर फिल्मस सारखं. आता चित्रपट रिलीज करतोय म्हणजे लेखाच्या विषयाकडे वळू.

चर्चाप्रस्ताव
मायबोली आणि तत्सम मराठी संकेतस्थळांवर आपले साहीत्य प्रसवणा-यांची संख्या कमी नाही. जुन्यांची जागा घ्यायला नवे तितक्याच ताकदीने येतात. मायबोली हे सर्वात जुने संस्थळ आहे आणि बाकीच्यांनी मायबोलीने प्रचलीत केलेली मराठी संस्थळांची शैली उचललेली आहे.

पण गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानामुळे वाचकांच्या सवयी सातत्याने बदलत आहेत. वाचक असो वा श्रोता त्याच्यावर एव्हढा जबरदस्त कंटेण्ट आदळतोय कि तो गोंधळून गेलेला आहे. अशा परिस्थितीत मायबोली किंवा तत्सम संस्थळांवरचे लेखक हे जुन्याच जमान्यात रमलेले आहेत. तसे काही वाचक देखील आहेत. ऑनलाईन वाचक एकाच वेळी अनेक कामे करत असतो. अलिकडे युट्यूब / नेटफ्लिक्स /प्राईम / हॉटस्टार च्या जमान्यात तर त्याला रमायला अनेक स्थळं आहेत. मग त्याच्याकडे वाचनासाठी वेळ किती असणार ? अशा वाचकाला तुम्ही वाचनासाठी कसे विवश करू शकाल ?

आपण आज जर युट्यूबवर जाऊन पाहिलेत तर नियमित व्हिडीओज प्रसारीत करणा-या ज्या युट्यूब वाहीन्या आहेत त्यात व्हिडीओच्या सुरूवातीला पाच दहा सेकंदात व्हिडीओचं सार टाकलेलं पहायला मिळतं. कारण त्यांना माहीत आहे की जर वाचकाला पहिल्या मिनिटात व्हिडीओत रस वाटला नाही तर तो पुढे जाणार आहे. त्यामुळे त्याची उत्सुकता ताणण्यासाठी अशा पद्धतीचे सार सुरूवातीला दिले जाते. नंतर आपल्या लयीत चालणारा व्हिडीओ दिला जातो.

ऑनलाईन ब्लॉगिंगमधेही बदल होत आहेत. नेमकं लिहीण्याकडे अलिकडच्या लेखकांचा ओढा आहे. फाफटपसारा टाळून ते लिहीतात. अपवाद ज्यांचे नाव झाले आहे असे लेखक आहेत. त्यांचे बस्तान बसलेले आहे. नव्याने लिहू पाहणा-यांनी पाल्हाळ लावू पाहीले की वाचक तिथे थांबत नाही.

सुदैवाने मराठी वाचकाचा संयम वाखाणण्यासारखा आहे.
मात्र लिहीणारे उदंड झाले आहेत.

अशा वेळी टिकून रहायचे तर वाचकाला त्यात रस वाटला पाहीजे. लिखाण नेमके असायला हवे. जर लांबण लागणार असेल तर सुरूवातीला वाचकाला जखडून ठेवण्याची ताकद असायला हवी. पण नंतरही दर्जा सांभाळला गेला पाहीजे.
हे जर करायचे असेल तर एकामागोमाग एक भाग लिहीत सुटलेल्यांनी काही पथ्ये पाळायला हवीत.

- खरंच मराठी टीव्ही सिरीयल्स प्रमाणे पाणी घालून भाग वाढवायचेत का ? या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे. दहाच्या आत भाग असलेली कादंबरी . दीर्घ कथा माझ्या मते ऑनलाईन वाचनासाठी उत्तम. तीन / चार भागात आटोपता येत असेल तर अतीउत्तम.

काही लेखक एका मागोमाग एक अशा ऑनलाईन कादंब-या सुरू करतात. त्यातली एकही पूर्ण करत नाहीत. तर काही अनेक प्रोफाईल्सद्वारा लिहीत सुटलेले असतात. त्यांना लिहीण्याची व्यसन लागलेले समजून येते. अशांच्या प्रोफाईल्स सुद्धा समजून येतात. अशा सर्व प्रोफाईल्सचे मिळून एक अज्ञात बेट तयार होते. इतर होतकरू लेखक या प्रत्येकाला प्रतिसाद देतात. पण या बेटावरून एकाचाच प्रतिसाद येतो. कारण एकाने वाचले, सर्वांनी वाचले असा प्रकार आहे.

या प्रोफाईल्सच्या शैलीत फारसा फरक नसतो. हे एकमेकांना वाहव्वा असे प्रतिसाद देत राहतात ते मनोरंजक असते. ते एकमेकांचे चाहते देखील असतात. ज्याला जे करायचे ते करू द्यावे. त्यांची काही विवशता असेल यामागे. मात्र एकाच शैलीत असे न संपणारे भाग घेऊन कादंब-या येत राहिल्या तर भविष्यात जेन्युईन नवोदीत लेखकांकडे सुद्धा दुर्लक्ष होत राहील.

काही लेखक तर एखादी कल्पना क्लिक झाली कि लिहीत सुटल्याचे जाणवते. त्यांच्या कडे आगापिछा काही नसतो कादंबरीचा. भाग कुठे संपवायचा , दुसरा कुठून सुरू करायचा याचा ताळमेळ नसतो काही. नुसती गाडी सुटलेली असते आणि ड्रायव्हरलाच रस्ता माहीत नसल्यावर प्रवाशांची जी अवस्था होते ती वाचकांची होते.

"कहना क्या चाहते हो भई ?" हा प्रश्न येत राहतो.
४५ वा भाग हे वाचूनच दचकायला होतं. लोकही एकदाचं संपूदेत. अंतिम भाग अशी पाटी लागली की वाचू म्हणून थांबतात. पण यांचं मारूतीचं शेपूट काही थांबत नाही आणि अंतिम भागही येत नाही.

या लेखकांनी विचार करावा , यांनी तरी अशा प्रकारे प्रकाशित झालेल्या प्रसिद्ध कादंब-या वाचल्या असत्या का ?
मुरली खैरनार दोन वर्षे कादंबरी लिहीत होते.
त्यासाठी ते नाशिकजवळच्या डोंगरांमधे वर्षभर फिरत राहीले. त्याचे नकाशे हाताने बनवले. टिपणं काढली. इतिहासातल्या नोंदी टिपल्या. मुंबईतले रस्ते पुन्हा नव्याने पालथे घातले.

कारण त्यांना संपूर्ण कादंबरी घडताना दिसत होती. तिच्यासाठीची स्थळं ते निश्चित करत होते. शिवाजी सावंत हे हरियानात कुरूक्षेत्र आणि आजूबाजूला दहा महीने फिरून आले. कर्णाचे कुंड त्या आधी कुणाला माहीत होते. नद्यांचे नकाशे आणले. स्थानिकांशी बोलले. त्या वेळच्या रणांगणाचा नकाशा तयार केला. मग हस्तिनापूरच्या शोधात गेले. इतकी माहिती घेऊन मृत्युंजयची सिद्धता केली.

अशी मेहनत घ्यायची तयारी आहे का ऑनलाईन लेखकांची ?
गुगलच्या जमान्यात मुरली खैरनार डोंगर का फिरले याचे उत्तर शोध वाचताना मिळते.

नवीन लेखकांकडे शैली आहे. पण घाटाचे लिखाण नाही अनेकांकडे. अचूकतेचा ध्यास नाही.
निव्वल शैलीवर कथा मारून नेऊ असा विचार सुशिंच्या लिखाणावर पोसलेली पिढी करते. अलिकडच्या मराठी मालिकांनी तर पाणी घालून नवे आदर्श निर्माण केले आहेत.

पण वाचताना मनुष्य आपले संपूर्ण लक्ष त्या अगम्य लिपीत गुंगवून कल्पनाचित्रे बनवण्यात गुंगलेला असतो. लेखका इतकाच गुंगलेला वाचक हे केव्हां दिसते ?
दुर्लक्षित प्रकार म्हणून बाजूला पडलेले मतकरी, धारप यांच्या कथात सुद्धा वाचक कथेशी तादात्म्य पावत असतो. धारपांची एखादी कथा ऑनलाईन अनेक भागात लिहीली तरी ती गोळीबंद वाटते. मोठी घोटीव कादंबरी सुद्धा फारतर दहा ते तेरा भागात पोस्ट करता येऊ शकेल.

मग ५० भागांच्या कादंब-या का येतात ?
यातल्या किती भागांची खरोखर आवश्यकता असते ? सुरूवातीचा स्पार्क नाहीसा झाल्यावर फक्त पाट्या टाकण्याचे काम तर नाही ना होत ? आणि मग शेवटाशी गोंधळल्यावर समारोप करण्या ऐवजी तो बाजूला ठेवून नवीन कादंबरी चालू केली जाते.

या चर्चा प्रस्तावावर साधक बाधक चर्चा व्हावी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला विषय घेतला आहे चर्चेला. पण चांगले लिखाण कोणते हे कोण ठरवणार कारण एकाला जे आवडले ते दुसऱ्याला आवडेलच असे नाही.

वीरूजी, तुम्ही म्हणता ते बरोबर.
पण इथे चांगले लिखाण ठरवणे असा अर्थ निघाला असेल तर मला पुन्हा लेख दुरूस्त करून घ्यावा लागेल. चर्चेचा प्रस्ताव आहे, आजच्या काळात इतक्या लांबच लांब लांबलेल्या अंतहीन कादंब-या.

किती विचार करता ?
इतका विचार करू नये.
जो काम चल रहा चंगा,
उसमे ना कर पंगा

पाआ
विषय उत्तम निवडला आहे .
आधी साधाच गोंधळ होता पण कोरोना मुळे एकूण साहित्य विश्वाची परिस्थिती भयंकर आहे . या विषया वर योग्य "विचार मंथन" व्हायला पाहिजे . जेणेकरून जे लिहीत आहेत , ज्यांना भविष्यात लिहायचं आहे त्या साऱ्यांना योग्य दिशा मिळेल अशी आशा .

या प्रोफाईल्सच्या शैलीत फारसा फरक नसतो. हे एकमेकांना वाहव्वा असे प्रतिसाद देत राहतात ते मनोरंजक असते. ते एकमेकांचे चाहते देखील असतात.
>>>>>>>>
हे कोणा डु आयडीसाठी आहे का? तसे असेल तर सांगा. ताकाला जाऊन तांब्या लपवू नका Happy

बाकी ऑनलाईन साईटवर लिहिणार्‍यांची तुलना दिग्गज कादंबरीकारांशी करून त्यांना कमी लेखण्यात काय हशील आहे? ज्याला जे आवडेल ते लिहू द्या. ज्याला जे वाचायचेय ते वेचेल आणि वाचेल.

त्या लांबड लावलेल्या मराठी मालिका आवडीने बघणार्‍या बरेच बायका भूतलावर अस्तित्वात आहेत .
कोणाला दोन शे रुपयांच्या पिझ्झापेक्षा दहा रुपयांचा वडापव आवडत असेल तर त्यांच्या आवडीला नावे ठेवणारे आपण कोण?

कोणाला लिहायला आनंद मिळतोय, कोणाला वाचायला आनंद मिळतोय, तर आपण त्यांच्या खांद्यावर मराठी साहित्याचा दर्जा टिकवायची जबाबदारी टाकून त्यांचा आनंद लुबाडण्यात काय अर्थ आहे ?

कदाचित आपला हेतू हा नसावा... पण यातून असा एक अर्थ निघतोय जो चुकीचा आहे असे जाणवल्याने मी हे लिहिले. चूक भूल खावी प्यावी Happy

प्रत्येक गोष्टीत कोथळा काढायला घेतला तर नवोदित लेखक जन्मा आधीच मरतील किंवा मतिमंद लेखक जन्माला येतील. लिहिलं तर चावतंय आणि नाही लिहिलं तर मारतंय. असा प्रकार होईल साहेब.
कुणी छंद म्हणून लिहीत जात. कुणी मनातलं बोलून जात.
कुणाचं स्वप्न असत, कुणाचं व्यवसाय बनत.
वाचकाने आवडीचं वाचत जावं, लिहिणार्याने वाचकांचा कल पाहून लिहावं ...एवढंच ....

मी काही साहीत्यिक नाही. इथे टीपी करता करता मराठी चांगले व्हावे इतकाच माफक उद्देश होता. या आधी शाळेत मराठी विषय असताना मायबोली मदतीला आली होती. नीलम गेम, असंबद्ध गप्पा असे खेळ खेळता अचानक एक अनुभव शेअर करावासा वाटला आणि ती लांबड संपता संपेना. पण अनुभव असल्याने पुढे काय आहे हे नक्की ठाऊक होते. इतकंच की शेवट ऐन वेळी बदलला. अनुभव कम कल्पना असे असल्याने अवघड गेले नाही. पण पूर्णपणे काल्पनिक कथा रचणे माझ्यासारखीला थोडे जडच जाऊ शकते.

हा पहिलाच प्रयत्न असल्याने आलेले बरेचसे प्रतिसाद हे प्रोत्साहनपर आले आहेत याची कल्पना आहे. त्यामुळे पुढे काही सुचलेच तर त्यात चुका टाळता आल्या तर पाहणार आहे. लिहील्याशिवाय आपली शैली सापडणार नाही. मला मोकळेढाकळे लिहायला आवडेल. तसेच लिहीणार. जर कुणाला नाही आवडले तर नाईलाज आहे. पण मला जे आवडते त्याच पद्धतीने लिहीत राहणार. सूचना आल्या तर खूप आवडतील. अगदी नकारात्मक सुद्धा चालतील. त्यांचा विचार करायला आवडेल. सूचना करणारा आपला बहुमूल्य वेळ आपल्या लिखाणात सुधारणा व्हावी या हेतून करत असतो.

सर्वांचे आभार.
धाग्याचा विषय लक्षात घेऊन प्रतिसाद द्यावेत ही विनंती.

मायबोली पेक्षा प्रतिलिपीसारख्या ॲप वर अशा लेखकांचा सुळसुळाट झाला आहे.. त्यात भर म्हणून का काय हे लेखक ५०-६० भागांची कादंबरी लिहून वर त्याचे पहीले-दुसरे पर्व पण लिहीत सुटतात.. अशा १०० तुन ८-९ कथांचा प्लॉट हा पुर्व नियोजित असतो.

>मात्र लिहीणारे उदंड झाले आहेत.
या विधानांशी असहमत आहे. पूर्वीही लिहिणारे उदंडच होते . पण त्यांना प्रकाशकांच्या चाळणीतून जावे लागे. त्यामुळे अशा हजारो लेखकांचे लेखन वाचकांपर्यत न पोहोचल्यामुळे तुम्हाला आताच लिहिणारे उदंड झाले असे वाटत असावे, जुन्या काळातल्या प्रकाशकांशी, त्यांच्याकडे येणार्‍या लेखनाबद्दल खाजगीत बोलून पहा. तेंव्हाही परिस्थिती वेगळी नव्हतीच

>नवीन लेखकांकडे शैली आहे. पण घाटाचे लिखाण नाही अनेकांकडे. अचूकतेचा ध्यास नाही.
याही विधानांशी असहमत आहे. कारण पुन्हा तेच. प्रकाशकांच्या किंवा संपादकांच्या चाळणीतून थोडेच लेखन वाचकांपर्यंत पोहोचत असेल. इतकेच काय अनेक प्रथितयश लेखकांनी पाट्या टाकल्यासारखे लेखन मधूनच केले आहे , हे तुम्हाला स्वतःच पडताळून पाहता येईल किंवा त्यांच्या प्रकाशकांच्या आठवणीतून वाचायला मिळेल.

मी तेंव्हा किंवा आता, यात काय बरोबर काय चूक, हे लिहित नाहीये. फक्त "पूर्वी बहुप्रसवा लेखक नव्हते " याला उत्तर देतो आहे. फरक इतका नक्की आहे की ती चाळणी आता फार थोड्या प्रमाणात शिल्लक आहे.

मन्या, तुम्हाला विषय समजला. छान प्रतिसाद. अभिनंदन !

अजयजी तुमचा प्रतिसाद पाहून छान वाटले. अजून बरेच जण दिसत नाहीत. तुमचे म्हणणे पटण्यासारखे आहे. लेखक उदंड झाले हे तेव्हांही होते. पण तुम्हीच म्हटल्याप्रमाणे त्यांना मीडीया नव्हता. प्रकाशकांकडून असे लिखाण नाकारले जात असे. तेव्हां प्रूफरीडर नावाची एक चाळणी होती. आताही आहे. या व्यवसायात चांगल्या लेखकांनाही नाकारले गेले आहे.

पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे ती ही कि, आपली कथा किंवा कादंबरी पूर्ण होण्याआधी प्रकाशित करण्याची इच्छा मुद्रीत माध्यमात धरता येत नाही. हौशे, नवशे गवशेंनाही नाही आणि प्रथितयश लेखकांनाही नाही. ऑनलाईन लिखाणामधे अनेक भागांची मालिका करणा-यांबाबतच मी स्पेसिफिकली बोलत आहे.

ज्यांनी आपली कथा पूर्ण केली आहे, त्यांच्या कथेबाबत शैली आणि घाटाचे मुद्दे चर्चेला तरी येऊ शकतात. पण एखादी कल्पना चमकली म्हणून लिखाण सुरू केले, काही भाग झाल्यानंतर पुढचे काही सुचेना म्हणून मग कसे बसे भाग पूर्ण करत नेले अशा प्रकारच्या मालिका ऑनलाईन मुळे अस्तित्वात आल्या आहेत. या पैकी काही जण वेगवान शैलीमुळे खिळवून ठेवू शकतात, मात्र मुळातच कथाबीज सकस नसल्याने त्यात जीव नसतो.

इथेच किती तरी दमदार लेखक पण होऊन गेले नाहीत का ? उदाहरण म्हणून कौतुक शिरोडकर यांची झुला ही कथा. गोटीबंद कथा आहे.

ज्यांनी आपली कथा पूर्ण केली आहे, त्यांच्या कथेबाबत शैली आणि घाटाचे मुद्दे चर्चेला तरी येऊ शकतात. पण एखादी कल्पना चमकली म्हणून लिखाण सुरू केले, काही भाग झाल्यानंतर पुढचे काही सुचेना म्हणून मग कसे बसे भाग पूर्ण करत नेले अशा प्रकारच्या मालिका ऑनलाईन मुळे अस्तित्वात आल्या आहेत. या पैकी काही जण वेगवान शैलीमुळे खिळवून ठेवू शकतात, मात्र मुळातच कथाबीज सकस नसल्याने त्यात जीव नसतो.

>>>>>>
माफ करा पण अशा कथांत जीव कुठे शोधायला जाताय.. Lol Lol
सुरवातीला जेव्हा ऑनलाईन कथा कादंबऱ्या वाचायला सुरुवात केली तेव्हा ह्या बिनबुडाच्या कथा लक्षात येत नसत.. आताही सुरवातीचे ४-५ भाग नजरेखालून गेले कि समजते.
कि ह्या लांबड कथेला अंत हा नाहीच मुळी..
याबाबत जर लेखकांशी जर उघड उघड चर्चा करायला गेले असता मात्र माझ्या कथेचा प्लॉट हा ठरलेला आहे.
असं अ(न)पेक्षित उत्तर मिळतं.. Uhoh