`हद कर दी आपने!`

Submitted by पराग र. लोणकर on 26 April, 2021 - 04:25

`हद कर दी आपने!` हा माझ्या आवडत्या चित्रपटांतील एक चित्रपट!

कदाचित माझं वरील वाक्य खूपच धाडसाचं असणार आहे. जरासं भीतभीतच मी ते लिहितोय. पण ज्या अर्थी माझ्या अतिशय आवडत्या चित्रपटांमध्ये संजीव कुमार-रेहाना सुलतानचा दस्तक (१९७०), अमिताभ-नूतनचा सौदागर (१९७३), संजीव कुमार-शर्मिला टागोरचा मौसम (१९७५), जितेंद्रचा परिचय (१९७२), राखी+रेखा आणि शशी कपूरचा बसेरा (१९८१) यांसारखे काही हिंदी चित्रपट, Valkyrie (२००८), A Few Good Men (१९९२), Fracture (२००७) यासारखे काही इंग्रजी चित्रपट आहेत, त्या अर्थी माझं डोकं तसं शाबूत असल्याची मला खात्री असल्यानं मी हे धाडसी विधान करत आहे. हे मी आत्ता उल्लेख केलेले सात-आठ चित्रपट कधीही एखाद्या वाहिनीवर लागलेले दिसले की ते मी पुन्हा पुन्हा संपूर्ण पाहू शकतो. (यापैकी दस्तक हा मात्र मला अजून फक्त एकदाच पहावयास मिळालेला आहे.) अर्थात दैनंदिन नोकरी-व्यवसायातील व्यस्ततेमुळे प्रत्येक वेळी आवडते चित्रपट संपूर्ण पाहणे हे कुणालाच शक्य नसतं.

असे हे अतिशय दर्जेदार चित्रपट आवडत असताना मला काही असेही चित्रपट आवडतात जे संपूर्णत: डोकं बाजूला ठेवून पाहिले तर आवडू शकतात (म्हणजे मला तरी आवडतात.) `हद कर दी आपने` हा असाच एक चित्रपट!

एखाद्या चित्रपटावर चार ओळी लिहिण्याची ही माझी पहिलीच वेळ, पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे कृपया चूक-भूल माफ असावी. (आणि त्यामुळेच वाचकाचा फार वेळ जाणार नाही इतकंच लिहिलंय.)

संजय नावाच्या मित्राच्या बायकोवर पाळत ठेवण्यासाठी राजू (गोविंदा) युरोप ट्रीपवर जातो आणि मग ज्या गमती जमती होतात त्या या चित्रपटात दाखवल्या आहेत. यातील बहुतेक गमती-जमती इतक्या वेडसर आहेत, इतक्या तर्कहीन आहेत, की त्यामुळेच हा चित्रपट आवडतो असे म्हणणे मला खूपच धाडसाचे वाटते. पण तरीही हे धाडस करायचा वेडेपणा मीही करतोय.

चित्रपटात कलाकारांची बऱ्यापैकी गर्दी आहे आणि गोविंदा आणि राणी मुखर्जी यांच्याबरोबरच बाकीचे बहुतेक सगळे कलाकार संपूर्ण चित्रपट दिसत राहतात. डोके अक्षरश: बाजूला ठेवून बघण्यासारखे चित्रपटात बरेच प्रसंग आहेत. गोविंदाचा मित्र त्याच्या घरी आल्यानंतर गोविंदाचे दाखवलेले कुटुंब, गोविंदा आणि राणी मुखर्जी यांचा विमानातील प्रसंग, गोविंदाने t.v.च्या आतमध्ये शिरून म्हटलेले गाणे असे काही प्रसंग (मला तरी) प्रचंड हसायला लावतात, आणि चांगलेच मनोरंजन करतात.

या चित्रपटातील काही गाणी अगदी बघण्यासारखी आहेत. ती बघण्यासारखी आहेत आणि किंबहुना कदाचित त्यामुळेच ऐकण्यासारखीही! आपल्यालाही ही गाणी फ्रेश करतात.

चित्रपटातील युरोपचे दर्शन अगदी सुखावणारे आहे. गोविंदाने वेळोवेळी स्वत:च्या हिमतीवर संपूर्ण चित्रपट मनोरंजक करण्याचे काम केले आहे. अनेकदा त्याला नायिके ऐवजी कादर खान या सशक्त अभिनेत्याची साथ मिळाली आहे. येथे राणी मुखर्जी या गुणी अभिनेत्रीने गोविंदाच्या बरोबरीने अतिशय सुंदर काम केले आहे. संपूर्ण चित्रपटातील या दोघांचा वावर आणि या दोघांना पाहणे सुखद अनुभव वाटतो.

एकूण मला हा चित्रपट आपले डोके बाजूला ठेवून धमाल मनोरंजन करणारा time pass चित्रपट वाटतो.

***

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

गोविंदा टिव्हीमधे शिरतो तो प्रसंगही टोटल टीपी आहेच, मात्र त्या प्रसंगाचे मूळ जनक माने आहेत >>> येस्स! आणि हे मान्यांनाच आठवणार लगेच, हो ना? Wink Proud

Pages