जुन्या पिढीतली अभिनेत्री- विम्मी आणि तिची शोकांतिका

Submitted by मार्गी on 23 April, 2021 - 10:44

आज विमलेश अर्थात् विम्मी ह्या अभिनेत्रीचं नाव फारसं कोणाला आठवणार नाही. पण तिच्यावर चित्रित झालेली काही गाणी अजूनही प्रसिद्ध आहेत. सुनील दत्त आणि राजकुमारसोबतच्या "हमराज़" ह्या चित्रपटामधील तिच्यावर चित्रित झालेली ही गाणी आजही ऐकली- बघितली जातात आणि ह्या गाण्यांमध्ये एक हसरा चेहरा आपल्याला दिसतो.

हे नीले गगन के तले धरती का प्यार पले
ऐसे ही जग में आती हैं सुबहें ऐसे ही शाम ढले

तुम अगर साथ देने का वादा करो
मैं यूँही मस्त नग़मे लुटाता रहूं

आणि

किसी पत्थर की मूरत से मुहब्बत का इरादा है
परस्तिश की तमन्ना है, इबादत का इरादा है

पण तिच्या आयुष्यामध्ये ह्या गाण्यातली शेवटची ओळच खरी ठरली- वो क्या जाने की अपना किस क़यामत का इरादा है! अतिशय शोकांतिक तिचं आयुष्य ठरलं. पडद्यावरची एक प्रसिद्ध अभिनेत्री असूनही तिच्या आयुष्याचा शेवट अतिशय दुर्दैवी झाला. तिचं आयुष्य व तिच्या आयुष्याचा "हमराज़" जाणून घेण्याचा हा छोटा प्रयत्न.

१९४३ मध्ये पंजाबमध्ये एका शीख कुटुंबात तिचा जन्म झाला. पुढे शिवराज अग्रवाल नावाच्या एका उद्योगपतीसोबत तिने लग्न केलं आणि १९६१ मध्ये १८ व्या वर्षीच तिला मुलगा झाला. ह्या मुलाची कहाणीही अतिशय वेगळी आणि तीसुद्धा वेगळ्या प्रकारची शोकांतिका ठरली. शिवराज अग्रवालांच्या पार्ट्या कलकत्त्यामध्ये होत असताना एका पार्टीमध्ये विमलेशची भेट संगीतकार रवींसोबत झाली आणि त्यांनी शिवराज अग्रवाल आणि विमलेशला मुंबईला बोलावलं आणि बी आर चोप्रांसोबत तिची ओळख करून दिली. आणि बी आर चोप्रांच्या बॅनरचा चित्रपट तिला मिळाला! १९६७ साली आलेला "हमराज़" हा तो चित्रपट. ह्या चित्रपटामुळे ती सुप्रसिद्ध झाली आणि नायिका बनली! पदार्पणाच्या मॅचमधल्या शतकासारखी ही गोष्ट होती! परंतु काही‌ बॅटसमन पहिल्या मॅचमध्ये जितके रन्स करतात तितके कधीच पुढे करत नाहीत आणि त्यांना संधीही मिळत नाही. विम्मी म्हणून प्रसिद्ध झालेल्या विमलेशच्या बाबतीत तेच झालं.

चित्रपट क्षेत्रामध्ये जे अनेकांच्या बाबतीत होतं तेच तिच्याबाबतीत झालं. पती शिवराज अग्रवालांसोबत मतभेद आणि वाद आणि पुढे फ्लॉप चित्रपटांची मालिका. अशोक कुमारसोबत आबरू (१९६८) आणि शशी कपूरसोबत पतंगा (१९७१) हे तिचे चित्रपट असफल ठरले. चित्रपट क्षेत्राने तिला ग्लॅमर आणि प्रसिद्धी व उच्चभ्रू जीवनशैली तर मिळवून दिली, पण तिचा जम कधीच बसला नाही. गुड्डी (१९७१) चित्रपटामध्ये अनेक पाहुण्या कलाकारांमध्ये तीही पाहुणी कलाकार म्हणून आली, परंतु बॉलीवूडमध्येही ती पाहुणीच राहिली. १९६९ साली तिने नानक नाम जहाज़ हा पंजाबी चित्रपट केला, परंतु तिची स्वत:ची नौका मात्र अशांततेकडेच जात राहिली. गुरू नानकांचे विचार सांगणारा हा चित्रपट तिचं करीअर आणि तिचं व्यक्तिमत्वही वाचवू शकला नाही.

काही काळ मॅगझिन्समध्ये फोटो येत राहिल्यानंतर आणि अपयशी चित्रपटांची मालिका येऊन गेल्यानंतर ती जणू विस्मृतीतच गेली. आणि त्यानंतर तिच्यावर अगदी थोडासा प्रकाशझोत तिच्या मृत्युनंतरच आला. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी हृदयक्रिया बंद पडून तिचा मुंबईमध्ये मृत्यु झाला. आणि तिचा पार्थिव देह हातगाडीवरून स्मशानामध्ये नेण्यात आला. त्यावेळी तिच्यासोबत तिचे कोणीही जवळचे नव्हते! संसारामधील दु:ख, संपत्तीच्या मागे धावणा-या पतीसोबत आलेलं अपयश, उच्चभ्रू जीवनशैलीचा मोह आणि चित्रपटांमध्ये अपयश ह्यामुळे ती खचली होती. तिने कलकत्त्यामध्ये तिची टेक्स्टाईल कंपनीसुद्धा काढून बघितली, परंतु तीसुद्धा चालली नाही. बाहेरच्या जगामधलं ग्लॅमर आणि आतमधून एकाकीपण ह्यामुळे ती व्यसनाधीन झाली. ड्रग्जच्या आहारी गेली आणि जेव्हा ड्रग्ज विकत घेण्याएवढे पैसे उरले नाहीत तेव्हा तिने वेश्यावृत्तीचा मार्ग स्वीकारला. त्यातून आलेल्या शारीरिक व मानसिक ताणामधून शेवटी मृत्युनेच तिची सुटका केली. इतकी मोठी ही शोकांतिका. गीता दत्त, गुरू दत्त, मीना कुमारी, मधुबाला व इतर अनेकांप्रमाणे. "जिन्हे हम भुलाना चाहे" हे गाणं जिच्यावर चित्रित झालं ती विस्मरणात गेली! "थोडा रूक जाएगी तो तेरा क्या जाएगा" असं गाणं आलं होतं, पण ती थोडीही थांबू शकली नाही! मुहब्बत का इरादा है, परस्तिश की तमन्ना है, इबादत का इरादा है ह्या गाण्यामधली शेवटची ओळच खरी ठरली!

आयुष्यात पैसा, प्रतिष्ठा आणि समाधान मिळाल्यानंतरही एका क्षणी ते सगळं व्यर्थ ठरतं आणि दु:ख कायम राहतं हे तिला शिकता आलं नाही. गुरू नानकांच्या चित्रपटाचा भाग बनूनही तिला दु:खातून बाहेर काढणारं जहाज शोधता आलं नाही. दु:ख किंवा अपयश ह्या व्यतिरिक्त तिसराही मार्ग असू शकतो हे तिला लक्षात आलं नाही. पण तिची शोकांतिका इथे थांबत नाही. तिच्या मुलाची जीवनकहाणीही काहीशी तशीच आहे- आश्वासक सुरुवात, यश आणि पुढे "कयामत का इरादा है!"

विम्मीच्या मुलाची- रजनीश अग्रवालची गोष्ट अगदी तिच्यासारखीच आहे. रजनीश अग्रवालने सांगितल्यानुसार त्याचा जन्म १९६१ चा व तो दार्जीलिंगमध्ये शिकला आणि वाढला. प्राथमिक शाळेपासून तो बोर्डींग स्कूलमध्ये वाढला. तिथेच पुढे कॉलेजमध्ये शिकत असताना अगदी कोवळ्या वयातच त्याला त्याच्या आईच्या मृत्युची बातमी कळाली व तिला शेवटचं भेटताही आलं नाही. वडीलांची सोबत मिळत नव्हती. आणि वडिलांकडून आईवर होणारा अन्याय व त्यांची वागणूक ह्यामुळे तो संबंध आधीच दुरावला होता. तरुण वयातल्या रजनीशला घोडेस्वारी, मैदानी खेळ अशा गोष्टींमध्ये रुची होती. आणि आईच्या मृत्युमुळे जीवनाबद्दल असंख्य प्रश्न मनात होते. त्याबरोबर श्रीमंत कुटुंबातला मुलगा असं त्याचं आयुष्य सुरू असतानाच त्याच्या कानांवर एक साद आली. त्याला स्वप्नांमध्ये अनेकदा एक माणूस दिसायला लागला. तो माणूस त्याला एक प्रकारे साद देत होता, बोलावत होता. त्या माणसाच्या बोलावण्यात एक आत्मीयता होती. अनेक स्वप्न जेव्हा असे पडले तेव्हा रजनीश अस्वस्थ झाला. लांब काळी- पांढरी दाढी असलेला हा माणूस कोण हे काही त्याला कळत नव्हतं. कदाचित चित्रकला आवडत असल्यामुळे ते रवींद्रनाथ टागोर असावेत, असा त्याचा समज झाला. ही घटना साधारण १९७९- १९८० ची आहे. रजनीश अग्रवालचं वय होतं १९. एका वेळेस एका नातेवाईकांकडे गेलेला असताना त्याला तिथे एक मॅगझीन मिळालं व त्यामध्ये त्याच दाढीवाल्या माणसाचा फोटो होता! ते मॅगझीन होतं संन्यास टाईम्स व तो चेहरा होता श्री रजनीशांचा!

तेव्हा रजनीश अग्रवालला श्री रजनीशांची माहिती मिळाली व त्याने त्यांच्यापर्यंत येण्याचे प्रयत्न सुरू केले. कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केलं. वडीलांसोबत पटत नसल्यामुळे त्यांनी त्याला कोणतीही मदत करणं बंद केलं. तरीही जिद्द करून, मेहनत आणि अनेक खटपटी करून त्याने मार्ग शोधला. काही नातेवाईकांची मदत, वडिलांचं व आईचं नाव वापरून शेवटी तो १९८१ मध्ये पुण्यामधल्या रजनीश आश्रमामध्ये पोहचला! पण त्याच्या थोडं आधीच श्री रजनीश अमेरिकेला जाण्यासाठी निघाले होते. रजनीश अग्रवाल काही काळ आश्रमात राहिला. त्याचं रजनीश हेच असलेलं नाव, चालण्याची- बोलण्याची शैली ह्यामुळे आश्रमातले काही संन्यासी त्याच्याकडे आकर्षित झाले तर अनेक जण संशयाने बघत होते. श्री रजनीशांना भेटण्यासाठी अमेरिकेमध्ये रजनीशपुरमला जाण्याचा त्याने निर्णय घेतला आणि त्यासाठी मेहनत सुरू केली. त्यासाठी त्याला अनेक वर्षं मिळेल ते काम करावं लागलं. वडिलांनी सर्व हक्कांमधून त्याला बाहेर काढलेलं होतं. काही‌ वर्षं लंडनला जॉब करून त्याला अखेरीस रजनीशपुरमला जाऊन राहण्याइतके पैसे मिळाले व सर्व व्यवस्था झाली. पण जेव्हा १९८५ मध्ये तो रजनीशपुरमला गेला तेव्हा श्री रजनीश तिथूनही निघाले होते. तिथला आश्रम बंद पाडण्यात आला होता. त्यानंतर काही वर्षं श्री रजनीश अनेक देशांच्या दौ-यावर होते. परंतु जे सत्य आहे ते सांगण्याची प्रामाणिकता आणि सगळ्या देशांवर असलेलं चर्च व अमेरिकेचं वर्चस्व ह्यामुळे कोणत्याच देशाने त्यांना आपलेसं केलं नाही. आणि उरुग्वेसारखे जे देश त्यांना आपलेसं करू इच्छित होते, तिथे अमेरिकेने अशा देशांना आर्थिक प्रकारे ब्लॅकमेल केलं व त्या देशांमध्येही श्री रजनीशांना थांबता आलं नाही.

शेवटी श्री‌ रजनीश १९८६ च्या सुमारास भारतात आले आणि काही काळ मनालीला व मुंबईला राहून परत पुणे आश्रमामध्ये आले. त्या सुमारास त्यांच्या संन्यासांमध्ये आश्रम व्यवस्थेवरून अनेक गट- तट पडले होते. रजनीश अग्रवाल ह्या सुमारास श्री रजनीशांच्या आश्रमात आला. त्याने श्री रजनीशांकडून संन्यास दीक्षा घेतली आणि स्वामी रजनीश हे त्याचं नाव झालं. त्याची ध्यान साधना प्रगत अवस्थेकडे जात होती. परंतु त्याचं नाव, त्याचं चालणं- बोलणं व व्यक्तीमत्व ह्यामुळे इतर अनेक संन्यासी नाराज झाले व त्यांनी त्याला आश्रमामध्ये येण्यास मनाई केली. १९९० मध्ये श्री रजनीश अर्थात् आताचे ओशो ह्यांचं निर्वाण झाल्यानंतर पुढे स्वामी रजनीशने अनेक वर्षं एकांत साधना केली. आणि २००७ पासून स्वत: ध्यानाचे शिबिर घेणं सुरू केलं. त्याचा रशियासह अनेक देशांमध्ये दौरे केले व ध्यानाचे शिबिर घेतले. गोव्यामध्ये मोठं सेंटर सुरू करण्याचा त्याचा प्रयत्न होता. अनेक वर्षं प्रयत्न करून सरकारी मदतीमुळे तो सफल ठरला नाही व २०१२ मध्ये स्वामी रजनीश मेक्सिकोमध्ये गेले व तिथे आता त्याचं ध्यान केंद्र सुरू आहे...

ही फक्त एक बाजू झाली. स्वत: स्वामी रजनीश- रजनीश अग्रवालच्या पुस्तकामध्ये दिलेली ही माहिती आहे. विम्मीची पार्श्वभूमी व पुढचा प्रवास त्याने स्वत: सांगितला आहे. पण ओशो आश्रमाच्या नोंदींमध्ये त्याने सांगितलेल्या काही गोष्टींना दुजोरा मिळत नाही. आणि स्वामी रजनीशने दिलेल्या नंतरच्या गोष्टींसंदर्भात अनेक वेगळ्या बाबी समोर येतात. गोवा किंवा मेक्सिकोमधील त्याचं काम हे वादग्रस्त आहे. आज ओझेन स्वामी रजनीश म्हणून तो ओळखला जातो, मेक्सिकोमध्ये त्याचं काम सुरू आहे. परंतु इथेही विम्मीसारखी शोकांतिका झालेली दिसते. भ्रष्टाचार, शोषण, फसवणूक अशा अनेक आरोपांची मालिका समोर आलेली दिसते. आणि मग त्याने त्याच्या पुस्तकात दिलेली सगळी माहिती आणि सर्व प्रवास हाही एक फसवण्याचा प्रकार तर नाही असा प्रश्न पडतो. कारण वेगवेगळ्या लोकांनी त्याच्या सेंटरबद्दल अनेक तक्रारी केलेल्या आहेत. ओशोंच्या बाकी संन्यासी ग्रूप्सशी त्याचा जास्त संबंध नाही असं दिसतं.

अशा बाबतीत सत्य हे शेवटी समोर सिद्ध करता येत नाही. विम्मीने नेमक्या कोणत्या परिस्थितीमध्ये जीवनातले शेवटचे दिवस घालवले, तिच्यासोबत काय घडत होतं, हे कधीच पूर्णत: समोर येऊ शकत नाही. त्याप्रमाणेच स्वामी रजनीशचं पूर्ण सत्य समोर येऊ शकत नाही. वस्तुत: जर ते खरोखर ओशोंचे संन्यासी असते तर पतंग ज्याप्रमाणे दिव्यावर झेपावतो किंवा छोटे नाले, झरे, जल प्रवाह हे नदीमध्ये- आणि मग सागरात विलीन होऊन जातात, तसे ते विलीन होऊन गेले असते. आणि मग आज ते एखाद्या बेटासारखे जे वेगळे दिसतात तसे कदाचित दिसले नसते. नदीने महासागरामध्ये उडी घेतल्यानंतर नदी वाचूच कशी शकेल? असे अनेक प्रश्न उरतात.

आणि हेच काहीसं ओशोंच्या संन्यासींच्या विविध गट- तटांबद्दल आहे. शेवटी जेव्हा एखादा वृक्ष महाकाय होतो, तेव्हा त्याच्या अनेक शाखा- उपशाखा तर बनतातच. एका वृक्षापासून अनेक बगीचे होऊ शकतात. त्या बगीचांना नवीन फुलंही येतात. एका बाजूला हे अपरिहार्य आहे. परंतु त्याबरोबर हेही खरं की जी नदी समुद्राला खरोखर मिळेल, ती नदी नदी म्हणून उरू शकणार नाही. ती समुद्रापासून वेगळी करता येणार नाही. आज ओशोंच्या संदर्भात जे वेगवेगळे गट- तट दिसतात किंवा वेगवेगळे केंद्र दिसतात, ते वस्तुत: प्रशांत महासागरामधल्या असंख्य बेटांसारखे आहेत. प्रशांत महासागर एकच आहे, बेटं असंख्य आहेत.

सत्य काहीही असेल, ह्या बाजूने असेल किंवा त्या बाजूने असेल, पण एक गोष्ट नेहमीच खरी आहे. ओशोंचे संन्यासी खरे कोण आहेत, ओशोंच्या संन्यासांनी काय केलं होतं किंवा ओशोंबद्दल कोण काय म्हणतं हे थोडं बाजूला ठेवून वस्तुत: ओशो काय म्हणतात हे जेव्हा आपण बघतो तेव्हा एक एक गोष्ट उलगडत जाते. वेगवेगळे सामाजिक विषय, समाजातल्या परंपरा आणि अध्यात्म साधना पद्धती, वेगवेगळे पंथ- संप्रदाय ह्याबद्दल ओशो जे बोलतात ते इतकं स्पष्ट आणि तेजस्वी असतं की मग अशा किरकोळ गोष्टींकडे लक्षही जात नाही. एकाने ओशोंना विचारलं की, ईश्वर आहे का नाही आहे? त्यावर त्यांनी सांगितलं की, ते आपण नंतर बघू. आधी तू तुझे डोळे कसे आहेत बघ. तुझे डोळे उघडे आहेत का बंद आहेत ते बघ. डोळ्यांना काय काय दिसतंय ते बघ. आणि जर तुझे डोळे उघडे असतील तर तुला सूर्यप्रकाश आहे का नाही, असा प्रश्नच पडणार नाही. तेव्हा सत्य हे सत्य असतं. बेटं ही बेटंच असतात आणि महासागर महासागर असतो.

ओशोंनी जी मांडणी केलेली आहे, ती अतिशय जोरदार आहे; युनिक आहे. फक्त वेगवेगळे धर्मपंथ आणि साधना मार्गच नाही; तर त्यांनी प्रचलित समाज; प्रोजेक्टेड ट्रूथ; देश-काळ ह्याविषयी जे काही भाष्य केलं आहे; ते अतिशय विलक्षण आहे. एका प्रवचनात ते म्हणतात की एक राजा होता. त्याचा मुलगा तरुण असताना एका वेळेस त्यांचं भांडण झालं आणि तो राजवाडा सोडून निघून गेला. तरुण राजकुमार घराबाहेर पडला. राजाने अनेक वेळा त्याचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. अनेक वर्षं गेली. खूप काळानंतर राजाच्या प्रधानाने एका भिका-याला राजवाड्यात येताना बघितलं. कफल्लक असलेला एक कंगाल भिकारी भीक मागण्यासाठी आशेने उभा होता. निरखून बघितल्यावर प्रधानाला कळालं की, अरे, हा तर तोच राजकुमार आहे! त्याने लगेच राजाला जाऊन सांगितलं. आपण राजकुमार होतो आणि इथलेच होतो, ह्याची त्याला काहीही शुद्ध नव्हती.

राजा अवाक् झाला. काय करावं त्याला सुचलं नाही. म्हणून त्याने प्रधानालाचं विचारलं. प्रधान म्हणाला की, त्याला लगेच खरं ते सांगितलं तर त्याचा विश्वासच बसणार नाही. तो पळून जाईल. म्हणून त्याला हळु हळु सांगूया. त्यानुसार पहिले प्रधानाचा एक सेवक त्या भिका-याला बोलवायला गेला. सेवकाला बघून तो पळूनच जाणार, तेवढ्यात सेवकाने त्याला सांगितलं की, राजा तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला इथे काम दिलं जाणार आहे. जरा घाबरतच तो भिकारी तिथे थांबला. मग आधी त्याला चांगले कपडे दिले; आंघोळ घालण्यात आली. मग त्याला जुजबी काम देण्यात आलं. काही काळाने त्याला थोडं मोठं काम दिलं गेलं. नंतर पुढे त्याला आणखी वरच्या दर्जाचं काम दिलं आणि शेवटी तो तिथे रुळल्यावर राजाने सांगितलं की, तो भिकारी नसून राजकुमार आहे; राज्याचा वारस आहे. आणि आता मात्र त्याला ते लगेच पटल, समजलं.

ओशो म्हणतात की, अगदी तीच परिस्थिती आपली सगळ्यांची आहे. आपण आहोत तर ईश्वरमय; आपण ईश्वराचे अंश आहोत, पण स्वत:ला कफल्लक मानतो. जर लक्षात आलं तर एका क्षणात उमगू शकतो. पण आपला स्वत:वरच विश्वास नाही; स्वत:वरच श्रद्धा नाही. मी आणि ईश्वराचा अंश? शक्यच नाही, कारण मी तर. . . ओशो म्हणतात म्हणून मी तुम्हांला ध्यानाच्या विधी देतो, साधना देतो. त्यातून हळु हळु तुमचा विश्वास वाढतो; स्वत:वर तुमची श्रद्धा उत्पन्न होते. मग तुमच्यामध्ये ही वस्तुस्थिती बघण्याची समज येते; हिंमत येते. पण मला विचाराल तर तुम्ही आत्ताही भगवानस्वरूपच आहात, दुसरे होऊही शकत नाही.

माझे इतर लेख इथे उपलब्ध आहेत: www.niranjan-vichar.blogspot.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

विम्मी विषयी पूर्वी वाचले होते. भयंकर अखेर आहे तिची. लेख वाचेन.
मूड मूड के ना देख... वाल्या नादिराची पण अशीच करुण कहाणी आहे.

लेख छान
आठवणी दुःखद ,

कॉलेज मध्ये असताना हमराज सिनेमा पहिला . मॉर्निंग शो . आत शिरलो तेव्हा बराच सिनेमा गेला होता . त्यामुळे संदर्भ नीट कळेना . त्यामुळे तिच्या भूमीकेचा अंदाज न आल्याने तेव्हा वाटलं की ही जी कोणी हिरोईन आहे ती सुंदर आहे पण अभिनय - बोंब . मनात कुठेतरी नाराजीच !
पण तुमचा लेख वाचला अन खूप सहानुभूती दाटून आली. एक बारीकशी पण दुःखद कळ !

मीना कुमारीचं शेवटचे दिवस वाईट होते . असेच असं नाही पण धक्कादायक .

विम्मी शूटिंग च्या दरम्यान खूप त्रास द्यायची असे वाचले आहे. "हमराज़" करताना तिने चोप्रांना नाकी नऊ आणले होते व त्यामुळेच चोप्रांनी तिला पुन्हा ऑफर दिली नाही असे उल्लेख काही लेखांत आहेत. त्यामुळे इतरही निर्माते नन्तर तिच्यापासून दूरच राहिले. तिचे करियर संपले. पण म्हणून काय? ज्या प्रकारचे आयुष्य अखेर तिच्या वाट्याला आले व तिचा अंत झाला ते कधीच न्याय्य होऊ शकत नाही.

वैवाहिक जीवनातून बाहेर आल्यानंतर तिची परवड सुरु झाली. जॉली नावाच्या एका छोट्या निर्मात्याशी ती संपर्कात आली. हा तोतया निर्माता होता असेही उल्लेख आहेत. एकेकाळी ऑल इंडिया रेडिओ वर गायिका म्हणून कार्यरत असलेली आणि बी.आर.चोप्रा यांनी जिला सुरवातीला "अत्यन्त हुशार व गुणी अभिनेत्री" असे संबोधले होते त्या विम्मीची अखेरची जॉली सोबतची वर्षे केवळ भ या ण होती.

घरच्यांच्या मनाविरुद्ध लग्न केल्यामुळे घरच्यांनी आधीच तिच्याशी संबंध तोडले होते. वैवाहिक जीवनातून बाहेर आल्यानंतर तर ती कुणाचीच राहिली नाही. भीषण अवस्थेत झालेल्या तिच्या मृत्युंनतर सुद्धा तिची परवड संपली नाही. कलकत्त्याच्या आनंद बझार पत्रिका या प्रसिद्ध नियतकालिकात तिच्यावर जो श्रद्धांजलीपर लेख प्रसिद्ध केला गेला त्यात सुद्धा तिच्यावर टीकाच केली गेली.
---
(हा लेख शीर्षकाच्या संदर्भात थोडा भरकटला आहे असे वाटते. विम्मी वरून लेखाला सुरवात झाली खरी. पण तिच्यापेक्षा तिचा मुलगा व ओशों बाबतचे तपशीलच लेखात अधिक आहेत असे जाणवले)

विम्मीचे हमराज, आबरू, पतंगा, वचन हे चित्रपट पाहिले होते. प्रत्येकात ती अतिशय भावशून्य चेहर्‍याने वावरली आहे. 'किसी पथ्थर की मूरत से' हे गाणं तिला डोळ्यापुढे ठेवूनच लिहिलं आहे असं वाटायचं. याच गाण्याच्या शूटिंगच्या वेळचा एक किस्सा आहे. त्यात ती गाणे ऐकता ऐकता डोळे मिटून घेते असा एक शॉट आहे. विम्मीला डोळे सावकाश बंद करणं काही केल्या जमेना. ती पापण्या पटकन बंद करायची किंवा डोळे मिचमिचे करायची. टेक मागून टेक झाले. चोप्रा प्रचंड वैतागले. त्यांनी मग विम्मीला डोळे बंद करून सावकाश उघडायला सांगितले आणि तो शॉट रिव्हर्स केला Happy एकूण चेहरा देखणा असला तरी अभिनय शून्य आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांच्या पुढच्या कोणत्याच चित्रपटात विम्मी दिसली नाही.

आबरू मधे तिचा हीरो दीपक कुमार नावाचा एक नवीन अभिनेता होता. त्यामुळे विम्मीने खूप आकाडतांडव केलं होतं. मला राजकुमार, सुनील दत्तच हीरो म्हणून हवेत हा तिचा आग्रह होता. पतंगा, वचन मधे तिच्या बरोबर शशी कपूर होता पण विम्मीचं काही खूप समाधान झालं नव्हतं. शशी कपूरनेही विम्मी सुंदर होती पण अभिनयात अगदीच ठोकळा होती. तिला जास्त इंटरेस्ट कपडे, दागिन्यांमधे होता, सीनमधे लक्ष देण्यापेक्षा आपण कसे दिसतो आहोत यावरच तिचा भर होता असे म्हटले आहे.

अर्थात तिचे अखेरचे दिवस अतिशय एकाकी, दु:खात गेले तशी वेळ कोणावरही येऊ नये Sad

माहितीपूर्ण प्रतिसाद Happy

>> 'किसी पथ्थर की मूरत से'... विम्मीला डोळे बंद करून सावकाश उघडायला सांगितले आणि तो शॉट रिव्हर्स केला

बहुतेक हाच तो शॉट असेल: https://youtu.be/c2SFDSrsIQ8?t=167

हो हाच तो Happy त्या संपूर्ण गाण्यात मक्खपणे उभी आहे, हे डोळ्यांचे उघडमिटणे सोडता तिला काहीच action नाहीये Happy
चोप्रांनी आधी तिच्यासाठी काही actions घातल्या होत्या पण त्या तिला जमेनात. चोप्रासाहेबांना सगळे समजावत होते की सुनील दत्तवरच फोकस ठेवा, पण त्यांना निदान तिचा डोळे बंद केल्याचा क्लोजअप हवा होता तो या प्रयत्नाने मिळाला.

तुम अगर साथ देनेका वादा करो गाण्यातही ती इतक्या सुतकी चेहर्‍याने वावरली आहे की बस्स! सुरेख निसर्ग आजूबाजूला आहे, सुनील दत्त सारखा देखणा हीरो मधुर स्वरात गीत गाऊन प्रेमाची आर्जवं करतो आहे आणि हिच्या चेहर्‍यावरची ढिम्म माशी हालत नाही Sad

वाचनाबद्दल व प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद!!! इतके माहितीपूर्ण प्रतिसाद! Happy

@ अतुल जी, हो, बरोबर आहे. कारण मुख्य गोष्ट ती आहे. त्यामुळेच विम्मीवर लिहावसं वाटलं. नाही तर नुसत्या विम्मीवर लिहिण्याइतकं काय असणार!

समीर गायकवाड - अजातशत्रू- ह्यांनी मायबोलीवर विमिवर एक मोठा लेख लिहिलाय. आत्ता फोनवरून लिंक देता येत नाहीये.

फार भयंकर कहाणि आहे. दारुच्या आहारी जाणे - शोचनिय आहे इतकी वेळ यावी की देहविक्रय करुन, दारुची भिक मागावी लागावी?

मला नेहमी नंदा आणि हिच्यात साम्य वाटायचे लहानपणी छायागीत मध्ये, गाणं लागयचे तेव्हा( नीले गगन के तले...). दोघीही , झोपाळलेल्या डोळ्यांच्या...

विमीची, अभिनयात पुर्ण बोंब होती हे तेव्हा ( लहानपणी) कळले नाही पण मग कॉलेजमध्ये असताना, दुपारी घरी विडिओ कॅसेट आणून पाहिला मूवी कारण, काकीला सुनिल दत्त आवडायचा. मी १० मिनिटात झोपले, काकी सुद्धा. मग कॅसेटवाल्याशी उगाच वाद घातला, कॅसेट खराब होती... वगैरे. कारण मूवी पुर्ण पाहिलाच नाही. पण तो काही एकला नाही पण किस्सा लक्षात राहिला.

स्वतःच्या, अपेक्षा किती वाढवायच्या किंवा आपली कुवत ओळखून कुठे धाव, कशी धाव घ्यावी कळले नाही कि वाईट शेवट ठरलेलाच असतो. आपल्यातली कमी ओळखून स्वीकार करायला जमत नसेल त्यात, रोखायला सुद्धा कोणीच नाही.( इति आजी)

मी, उलट कुठल्याशा लेखातच वाचलेले की, नवरा खुप वर्चस्व गाजवायचा, मूवी हाच निवडायचा. एकले नाही की मारायचा. त्यात , हिची खर्चिक वृत्ती. मग भांडणं वगैरे वेगळे होणे... सर्व अगदी काही वर्षातच धुळीला मिळाले....

आताच्या, आघाडिच्या नट्या बर्‍याच हुशार आहेत. मस्त मनी /करीअर प्लॅनिंग करतात. नेने काकू, अ‍ॅश वगैरे सुद्धा हुशार...

विमी चा मुलगा रजनीश जो की ओझेन रजनीश म्हणुन आता ओळखला जातो त्याची तर अजुनच विचित्र कहाणी वाचनात आली. त्याचे पुस्तक - tears of mystic rose, वाचले, वेडसरच वाटतो हा मनुष्य. फ्री पी डी एफ - https://ozenrajneesh.com/o/wp-content/uploads/Tears_of_The_Mystic_Rose_e...
हा फ्रॉड बाबा बुवा आहे असे वाटते. सं - https://www.vice.com/en/article/kz4ze9/how-a-fake-guru-set-up-a-wild-wil...
ओशो मेल्यानंतर त्यांचा आत्मा आपल्यात प्रवेशला असे सांगतो तो.
_______
२८८ पैकी १२६ पाने वाचंण्यात उगीच वेळ घालवला असे माझे मत शेवटी बनले.