गारूड

Submitted by आर्त on 21 April, 2021 - 03:29

गारूड

कोणी स्तुती उधळली, कोणी चिडून गेले,
बदनाम नाव सारे, अंती करून गेले.

सुखदुःख वाटण्याला आतुर हरेक होता,
का एकटेपणा मग, माथी लिहून गेले?

गगनात एकटी मी आले कलून विरले,
बाकी हसत मुखाने तारे बनून गेले.

ओळख जुनीच अपुली, मजला पटून गेली,
माझ्यात का तुलाही काही दिसून गेले?

हसणे खट्याळ होते, मथितार्थ काय होता?
कळण्या उशीर झाला, क्षण ते सरून गेले.

बघते तुलाच दुरुनी, वाटे समीप यावे,
बंधन परंपरेचे, मज थांबवून गेले.

नभ आसवात न्हाले, ते ही भिजून ओले,
गडगडत विरहगीते, ते ऐकवून गेले.

किमयाच या युगाची, माणूस जग सुधारे,
ईश्वर नसून इतके, ईश्वर बनून गेले.

गारूड काळ घाली, बेधुंद मीच झाले,
नेईल वाट तेथे, डोळे मिटून गेले.

- आर्त
१२.०४.२०२१

...
आनंदकंद
गागा लगाल गागा x २

*ही गझल दुरुस्त आणि तंदुरुस्त करण्यात प्रगल्भ कुलकर्णीची फार मदत झाली. त्याचे मनापासून आभार*

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान आहे..
फक्त हसणे खट्याळ होते मतितार्थ काय होता असं करा..

आपण हसणे साठी होतो हे क्रियापद वापरले आहे तिथे होते करा आणि मतितार्थ ह्या शब्दाचे मथितार्थ हे रूप मी तरी अजून कुठे पाहिले नाही.. मतितार्थ हे रूप खूप वेळा वाचनात आले आहे.

@किमयागार: अरेरे. तो 'होते' चा typo झाला. (typo ला मराठी मध्ये काय म्हणता येईल माहित नाही). लक्षात नाही आलं. दाखवून दिल्या बद्दल आभारी. बदल केलेला आहे. आणि एक गंमत म्हणजे, मतितार्थ हे पूर्णतः चुकीचं आहे. खरा शब्द मथितार्थ असा आहे आणि मतितार्थ हा अपभ्रंश आहे.

@साद: धन्यवाद.