पुस्तक योग - १

Submitted by पाचपाटील on 18 April, 2021 - 14:25

पुस्तक योग -१

१. पुस्तकं हाताशी असलेली बरं असतं..

कधी एखादा लांबलचक मोकळा स्पॅन मिळाला तर तो
अंगावर येऊ नये म्हणून..
किंवा येता जाता चाळायला म्हणून..
किंवा कामाच्या ठिकाणी फावल्या वेळात एकमेकांची
उणीदुणी काढून, ऐकून डोकं खराब करून घेण्यापेक्षा तेच
पुस्तकात घातलेलं बरं, म्हणून..
किंवा कधी कधी बिनझोपेच्या जालीम रात्री येतात, मग
त्यांच्यावर खात्रीशीर उतारा म्हणून पडल्या पडल्या जरावेळ वाचू म्हणत म्हणत 'अजून थोडा वेळ,अजून थोडा वेळ,
आता हे शेवटचंच पान
', अशी लाडीगोडी करत करत अर्धी-पाऊण रात्र सरेपर्यंत विनातक्रार सोबतीला थांबतात पुस्तकं, म्हणूनही..!!

२. पुस्तकांची निवड करायची म्हटली तर..

पेपरमध्ये किंवा नेटवर पुस्तकांचे जे रिव्ह्यू वाचलेले असतात, त्यातलं एखादं पुस्तक इंटरेस्टिंग वाटलं की त्याचा स्क्रीनशॉट ठेवलेला असतो मोबाईलमध्ये...

किंवा एखाद्या पंटरने चार पेग डाऊन झाल्यावर
'हे अमुकअमुक वाचून बघ जरा.. बाकी सगळा शेणसडा है ह्याच्यापुढं..!' असा एक भुंगा सोडून दिलेला असतो डोक्यात..

किंवा एखाद्या आवडलेल्या पुस्तकात अजून काही पुस्तकांचे एवढ्या भरजरी शब्दांमध्ये गोडवे गायलेले असतात की
त्यामुळे पेंडींग लिस्टमध्ये भर पडत जाते..

किंवा कधी कधी असाही काळ येतो की तिथून पुढे एका
विशिष्ट लेखकावरच झपाटल्यासारखा फोकस केंद्रीत
झालेला असतो, तर मग त्याच्या वाचायच्या राहिलेल्या
पुस्तकांची शोधाशोध...

तर हे असं सगळं डोक्यात असतं..मग दुकानांमध्ये किंवा लायब्रऱ्यांमध्ये जाणं झालं की ही वरची पुस्तकं जरा
प्राधान्यानं शोधली जातात..
तसा मी पुस्तकांसाठी बराचसा लायब्रऱ्यांवर अवलंबून असलो तरी, काही पुस्तकांची धुंदी एवढी घनदाट असते की मी ती ताबडतोब विकतच घ्यायची असं ठरवून ते
अमलातही आणतो.

पुस्तक खरेदीसाठी अक्षरधारा बुक गॅलरी, औंधमधलं क्रॉसवर्ड किंवा डेक्कनच्या इंटरनॅशनल बुक स्टोअरमध्ये
राऊंड होतात, महिन्याभरातून...
(आणि शिवाय एखाद्या सुस्त संध्याकाळी झेड ब्रीजवर हवा खाऊन झाल्यावर चालत चालत समजा लकडीपुलावर गेलो, तर तिथं प्रभाकर शेठ, जुनी पुस्तकं मांडून बसलेले असतात नेहमीप्रमाणे.. तिथंही चवड्यावर बसून थोडीफार उलथापालथ केली की कधी कधी लॉटरी लागून जाते..!
बाजीराव रोडवरच्या फूटपाथवरही हेच घडू शकतं..!)

दुकानांमध्ये साधारण पद्धत अशी की सगळ्या
सेक्शन्समधून हळूहळू रेंगाळत रेंगाळत,
मध्येच एखाद्या शेल्फपुढं थांबून मान तिरकी करून,
गुढघ्यावर हात ठेवून मधल्या कप्प्यातली पुस्तकांची रांग.. नंतर कंबरेतून वाकत वाकत अजून खालची रांग..
आणि शेवटी चवड्यावर बसून तळकप्प्यातली रांग, अशा पद्धतीनं सगळी नावं वाचून.. एखाद्या लेखकाचं नवीन काही दिसलं किंवा पुस्तकाचं टायटल एकदम हटके वाटलं की ते हातात घेऊन, त्याच्या ब्लर्बमधला मजकूर पूर्ण वाचून बघतो..
तो कंटेंट आवडला की मग सुरूवातीला लेखकानं
अर्पणपत्रिकेसारखं काही म्हटलं असेल ते.. आणि मग नंतर असंच अधल्यामधल्या कुठल्याही एक-दोन पानांवर नजर टाकून काही गुंतवणारं दिसतंय का ते पाहतो..
ह्या सगळ्या चाळणीतून आवडलं की मग ते हातात घेऊन
पुढच्या शेल्फकडे.. तिथंही शरीराला ह्याच वेगवेगळ्या
पोजेसमधून जावं लागतं..
असं करत करत मग शेवटी दीड-दोन तासांनी सगळा गठ्ठा घेऊन बिलींग काऊंटरवर..!

पण लेखक जर जिव्हाळ्याचा असेल तर त्याची पुस्तकं जिथं कुठं दिसतील त्यावर झडप घालतो... तिथं चाळणी वगैरे काही प्रकार नाही..!

शिवाय माझ्या दृष्टीने जे लेखक आउटडेटेड झालेले आहेत, किंवा त्यापुढे जाऊन एक कबूलीजबाब द्यायचा झाला तर जे लेखक मूळातच रद्दी होते, पण ते माझ्या फार उशीरा लक्षात आलं, त्यांच्या पुस्तकांवर चुकून जरी नजर पडली, तरी मी थोड्यावेळापुरता का होईना, पण पश्चात्तापाच्या आगीत
होरपळून वगैरे निघतो आणि मग घाईघाईने स्वतःला कोसत
तिथून नजर काढून घेतो.. !

(तीन पिढ्यांपासून ज्या अनेक पुस्तकांचा उगाचच उदोउदो चालत आलेला आहे, आणि खरंतर ती पुस्तकं एकाच पिढीत खलास होऊन गेली असती,
तर आमची त्यांच्यापासून आपोआपच सुटका झाली असती, असा विचार एका बाजूला...
आणि त्यामुळे त्या लेखक/लेखिकांना कायमचं टाटाबायबाय करून टाकायला पाहिजे, हे लोकांना कधी कळणार, असा विचार करत असतानाच...
ते लेखक/पुस्तकं अजूनही सर्व दुकानांत, स्टॉल्सवर, लायब्रऱ्यांमध्ये दर्शनी भागात लावून ठेवलेले दिसत
असल्यामुळे, त्या पुस्तकांचा वाचकवर्ग अजूनही मोठ्या
संख्येनं अस्तित्वात आहे, आणि त्या पुस्तकांबद्दल समजा आपण काही खवट शेरेबाजी केली आणि त्यामुळे
वाचकवर्गाच्या भावना वगैरे दुखावल्यामुळे,
ते समजा मिळेल त्या व्हर्चुअल प्लॅटफॉर्मवर आपल्यावर चाल करून आले, तर त्या प्रसंगाला कसं तोंड द्यायचं याचं काहीच नियोजन माझ्याकडे नसल्यामुळे,... काहीच न वाचण्यापेक्षा ती पुस्तकं वाचलेलं चांगलंच आहे, असाही एक तडजोडीचा विचार दुसऱ्या बाजूला...
आणि शिवाय शेकडा पन्नास लोकांचे जगण्याचेच प्रश्न एवढे पिळून काढणारे आहेत की मग हे वाचण्याचे वगैरे 'रिकामे धंदे' त्यांना कोठून सुचणार, असा एक थोडासा कम्युनिस्ट
दृष्टीकोन डोक्यात तिसऱ्या बाजूला चाललेला असल्यामुळे.. त्या पुस्तकांची/लेखकांची यादी करण्यासाठी शिवशिवणाऱ्या हातास तूर्त आवर घातलेला बरा, अशा
चौथ्याच विचारावर गाडी थांबते.)

३. आणि ह्याच्याबद्दल अजून पुढं सांगायचं झालं तर..

धार्मिक रूढी परंपरांना वाहून घेतलेली पुस्तकं..
तसेच 'हे पुस्तक वाचून तुमचं जीवन आमूलाग्र बदलेल' वगैरे सरळ सरळ गल्लाभरू पुस्तकं...
तसेच आरोग्यविषयक आणि पाककृतींवर ताईंचा सल्ला वगैरे टाईपची पुस्तकं..

शिवाय असाध्य रोगांना कुणी कशी फाईट दिली वगैरे..
तसेच सामाजिक चळवळखोर पुस्तकं..

प्रशासनातून रिटायर झाल्यावरच ज्यांना कंठ फुटतो आणि सगळ्या भ्रष्ट वातावरणात मीच तेवढा 'भांगेत उगवलेल्या तुळशी'सारखा होतो, असे दावे करत करत, उसासे टाकत टाकत, मधूनच फोडलेल्या हंबरड्यांनी भरगच्च अशी
प्रशासकीय अधिकाऱ्यांची आत्मचरित्रं...

एखाद्या जातीला-धर्माला ठरवून टार्गेट करणारी किंवा ठरवून उदोउदो करणारी पुस्तकं..
तसेच महाभारतातील एखादं पात्र घेऊन त्यावर फुलं
उधळायला लिहिलेली पुस्तकं..
शिवाय जगभरच्या अन्यायग्रस्त लोकांच्या कहाण्यांना कच्च्या मालासारखं वापरून लिहिलेली पुस्तकं..

शिवाय एखाद्या हळव्या कवयित्रीने 'कोवळ्या मनाचे धुमारे' किंवा 'आयुष्याचं चांदणं' वगैरे टायटल देऊन नवरा, दीर,
जाऊबाई, सासूबाई, नणंदा, भावजया, आई-बाबा अशा
सगळ्या गोतावळ्याला अर्पणपत्रिकेत स्थान देऊन, छापून
घेतलेले कवितासंग्रह...

माझ्या देशभक्तीला कळकळीची आवाहनं करणारी पुस्तकं..
तसेच इंग्रजीतून मराठीत दरवर्षी टनावारी ओतल्या जाणाऱ्या आणि वाचणाऱ्याचा टाईमपास व्हावा, या एकाच उद्देशानं
छापलेल्या, आणि ज्या वाचून हाती काहीच लागत नाही, अशा 'अनुवादित' सस्पेन्स कादंबऱ्या...

आणि शिवाय आर्थिक गुंतवणूकीचे सल्ले देणारी पुस्तकं,
तसेच थुलथुलीत, गुबगुबीत कार्पोरेट गुरूंनी ठोकलेल्या
चमकदार भाषणबाजीची पुस्तकं..

ह्या प्रकारच्या पुस्तकांमध्ये मला काहीही इंटरेस्ट वाटत नाही... आणि त्यामुळेच त्यांच्याकडे सरळसरळ दुर्लक्ष
करायला मला अजिबात वाईट वाटत नाही..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुकानांमधे पुस्तके शोधताना माझे अनुभव आठवले! छान लिहीले आहे.

आजकाल अक्षरधारामधे सगळी पुस्तके घेउन काउण्टरवर गेल्यावर तेथे इम्पल्स बाय मधे अजून एक दोन वाढतात Happy

ह्या प्रकारच्या पुस्तकांमध्ये मला काहीही इंटरेस्ट वाटत नाही...  >>> मलाही !

कोवळ्या मनाचे धुमारे' किंवा 'आयुष्याचं चांदणं'  >>>
आताच 'आठवणींचा मोरपिसारा' पाहिलं होतं... Proud
हे वरचं नावडतं सगळं फेबुवर लघुरूपात वारंवार दिसतं.
ज्या वाचून हाती काहीच लागत नाही >> मला वाटायचं मलाच होतं असं , आशय कमी वर्णन जास्त !
छान लिहिले आहे.

लेख आवडला
मथळ्यात १ वाचून आनंद झालेला आहे

पूर्ण लेखाशी पूर्ण सहमत!
नवरा, दीर,
जाऊबाई, सासूबाई, नणंदा, भावजया, आई-बाबा अशा
सगळ्या गोतावळ्याच्या गुलुगुलू गोष्टी .
भयंकर कंटाळा आला आहे. पण त्यातून सुटका नाही .

आजकाल पुस्तक वाचण फार होत नाही. वाचायला बसलो कि भरकटायला होत.नेटवर भरकटणेच जास्त होत.

लेख आवडला . माझी अक्षरधारा आणि आचार्य अत्रे सभागृहात भरणाऱ्या पुस्तकप्रदर्शनातील खरेदी आठवली .

नवरा, दीर,
जाऊबाई, सासूबाई, नणंदा, भावजया, आई-बाबा अशा
सगळ्या गोतावळ्याच्या गुलुगुलू गोष्टी .
भयंकर कंटाळा आला आहे. पण त्यातून सुटका नाही >> :D.

Kindle is d best..
Esp. Lockdown ani quarantine madhe far upayogi padale..

फारएण्ड,
अक्षरधारामधे सगळी पुस्तके घेउन काउण्टरवर गेल्यावर तेथे इम्पल्स बाय मधे अजून एक दोन वाढतात >> +११

'आठवणींचा मोरपिसारा' >> Proud

@ हर्पेन, प्रभुदेसाई, विवेक.. प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

@ जिज्ञासा << साहित्य परिषदेच्या तळमजल्यावर पण छान पुस्तकं मिळतात. >> +१

@ वावे, ऋतुराज, हीरा.. आभारी आहे

@ अश्विनी११<<अत्रे सभागृहातली प्रदर्शनं >> +११
सीओईपी होस्टेलच्या पुढे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सच्या बिल्डींगमध्येही असतात अधूनमधून पुस्तकं प्रदर्शनं..

प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद Happy

पाचपाटील
अहो सर , इतक्यात आभार प्रदर्शन करून समारंभ संपवू नका. अजून अनेक वक्ते बोलायला येतील . थांबा. शिवाय दुसरा भाग येणार आहे ना?
शिवाय त्या ऐतिहासिक कादंबर्‍याबद्दला ही लिहा . "राजे तलवारीच्या मुठीवर हात ठेऊन गर्कन वळाले ...:"आम्हाला आपल्याकडुन ही अपेक्षा नव्हती .""

पुस्तक योग आवडलाय

तसेच इंग्रजीतून मराठीत दरवर्षी टनावारी ओतल्या जाणाऱ्या आणि वाचणाऱ्याचा टाईमपास व्हावा, या एकाच उद्देशानं
छापलेल्या, आणि ज्या वाचून हाती काहीच लागत नाही, अशा 'अनुवादित' सस्पेन्स कादंबऱ्या... >> मी अनेक वर्ष या कॅटेगरी मध्ये घालवली आहेत, मराठी इंग्रजी दोन्ही कडे Lol

अत्रे हॉल मध्ये हल्ली नाही होत प्रदर्शनं बहुतेक Sad माझं सगळ्यात आवडत ठिकाण होतं ते
अक्षरधारा, मेहता पब्लिशिंग हाऊस , अप्पा बळवंत मधलं रसिक इथे जाण होतं

प्रभुदेसाई,
शिवाय दुसरा भाग येणार आहे ना? >>> हो..!
शिवाय त्या ऐतिहासिक कादंबर्‍यांबद्दल ही लिहा >>
नंदा खरेंनी ह्या सगळ्या ऐतिहासिक कादंबरीकारांची फार खेचलीय 'अंताजीची बखर' मध्ये.. Happy
गर्रकन्.. .. सर्रकन्.. खर्रकन्.. खुदकन्.. आणि ते सारीपाटाचे डाव वगैरे.. शिवाय 'इकडची स्वारी आली वाटतं'... Proud

ए_श्रद्धा,
अत्रे हॉल मध्ये हल्ली नाही होत प्रदर्शनं बहुतेक>>
हो.. वर्षभरापासून बंदच आहे ते सगळं..

अप्पा बळवंत मधलं रसिक इथे जाण होतं>> +१
एक छोटेखानी लायब्ररी पण आहे रसिकची, तिथेच दुकानाच्या वरच्या मजल्यावर..

तसेच महाभारतातील एखादं पात्र घेऊन त्यावर फुलं
उधळायला लिहिलेली पुस्तकं.. >>

मृत्युंजय गाजल्यापासून अशी खूप पुस्तके आली आहेत. कुंती, द्रौपदी, दुर्योधन, गांधारी, भीष्म, अंबा, अर्जुन, कृष्ण, अश्वथामा या सगळ्यांवर स्वतंत्र पुस्तके वाचली आहेत. इतकेच नाही तर लहानपणी 'दुर्लक्षित पांडव' का अशाच काहीशा नावाचे नकुल-सहदेवांवर पुस्तक का लेखमाला वाचल्याचे स्मरते. एकूण पुस्तकांचा सूर त्या व्यक्तिरेखेचा गौरव करणे आणि तिच्यावर कसा अन्याय झाला आहे हे दाखवणे हाच आहे Happy

ऐतिहासिक किंवा महाभारतातल्या पात्रांवर बेतलेल्या कादंबऱ्यांकडे इतिहासाची किंवा एकूणच वाचनाची आवड लागण्याच्या दिशेची एक पायरी म्हणून बघायला (आणि त्यासाठी त्यांना योग्य ते श्रेय द्यायला) हरकत नसावी.

मी सुरुवातीला वाचलेली या प्रकारातली पुस्तकं म्हणजे स्वामी, श्रीमान योगी, मृत्युंजय, छावा, भेदिले सूर्यमंडळा, मंत्रावेगळा, झुंज, ययाति इत्यादी.

ययाति सोडल्यास बाकी कादंबऱ्या तेव्हा खूप आवडल्या होत्या. ययाति खूप आवडली नव्हती.
आता वाचायला घेतल्या तर या सगळ्या कादंबऱ्या तितक्याच आवडतील असं नाही. किंवा आवडतीलही. श्रीमान योगी आणि मृत्युंजय नक्कीच आवडतील असं वाटतं. शिकस्त मी अगदी अलीकडे वाचली. तीही खूपच आवडली.
शिवाजी महाराजांवरचं आणि महाभारतावरचं नरहर कुरुंदकरांचं अभ्यासपूर्ण लेखनही मी गेल्या सहासात वर्षांत वाचलं. कुरुंदकरांचं लेखन वाचल्यावर विचारशक्ती स्वच्छ होते असं मला वाटतं Happy इरावती कर्वे आणि दुर्गा भागवतांची महाभारतावरची पुस्तकंही वाचली. भैरप्पांची 'पर्व' कादंबरी वाचल्यावर महाभारतातल्या पात्रांकडे माणूस म्हणून बघण्याचा दृष्टिकोनच कायमस्वरूपी बदलला असं म्हणायला हरकत नाही.

पण तरी स्वामी, श्रीमान योगी, मृत्युंजय इत्यादी कादंबऱ्या आपल्या जागी आणि कुरुंदकर, इरावती कर्वे आणि दुर्गा भागवत आपल्या जागी. दोन्ही महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं.

आमच्या गुरूंनी म्हटले आहेच की जैसी जिसकी सोच !
पाचपाटील
माफ करा माझे मराठी वाचन अगदी मर्यादित आहे , पण आता मी 'अंताजीची बखर' जरूर वाचेन.
मध्ये लहान मुलाची पुस्तके वाचायची हुक्की आली म्हणून अमेझान वरून त्या सुप्रसिद्ध लेखकाची एक दोन पुस्तके मागवली. ती वाचून सहाजिक एनिड ब्लायटन च्या पुस्तकांची आठवण झाली. सिक्रेट सेवन, फाईव फाईंड आऊटर्स , फेमस फाईव ची आठवण झाली. तसेच थ्री इन्वेस्टीगेटर्स ही पुस्तके. मराठी मुले ह्या सगळ्याना मुकणार म्हणून वाईट वाटले.
भाषांतर करायचीच तर ह्या पुस्तकांची भाषांतरे कराना प्लीज .

पण तरी स्वामी, श्रीमान योगी, मृत्युंजय इत्यादी कादंबऱ्या आपल्या जागी आणि कुरुंदकर, इरावती कर्वे आणि दुर्गा भागवत आपल्या जागी.>>> +११

मृत्युन्जय लहानपणी वाचली होती अतिशय आवडली होती. आताही आवडते. पण शिवाजी सावंतांनी त्याच धाटणीमधे युगंधर लिहिली ती अतिशय कंटाळवाणी वाटली.
रणजित देसाईंची स्वामी, श्रीमान योगी आवडतात पण राधेय नाही आवडली, थोडी तुटक वाटली.
ययाती आधी आवडली होती पण आता अजिबात वाचवत नाही. सोनेरी केस काय, आठवण म्हणून केसाची बट देणे काय, कुठली तरी ब्रिटिश परीकथा वाचतो आहोत असे वाटते Happy ययातीचा खूप राग येतो, अजिबात सहानुभूती वाटत नाही. देवयानीच कित्ती बिच्चारी असे वाटत राहाते. शेवटी तिचे हृदयपरिवर्तन आणि सवतीच्या गळात गळा घालणे एकदमच विचित्र वाटते Sad

Kindle is d best..
Esp. Lockdown ani quarantine madhe far upayogi padale.. >>> +१

वावे,
इरावती कर्वे आणि दुर्गा भागवतांची महाभारतावरची पुस्तकंही वाचली >> ते थोरच आहे..
आनंद विनायक जातेगावकरांचं 'व्यासांचा वारसा'ही चांगलंय..

शिवाजी महाराजांवरचं आणि महाभारतावरचं नरहर कुरुंदकरांचं अभ्यासपूर्ण लेखनही मी गेल्या सहासात वर्षांत वाचलं. >> +११११
कुरुंदकर म्हणजे काय विषयच नाही..!! _/\_
सुदैवानं त्यांची ऐकतच रहावी अशी, नितांत सुंदर व्याख्यानंही यू ट्यूबवर उपलब्ध आहेत..

उदाहरणादाखल ही तीन महाराजांवरची:
https://youtu.be/nfZMTsytTxg
https://youtu.be/UisSnM6LI6Q
https://youtu.be/UisSnM6LI6Q

आणि हे कृष्णावरचं;
https://youtu.be/6oxyKyEVUXk

भैरप्पांची इतर पुस्तकं आता वाचवत नाहीत..
'पर्व' मात्र अपवाद..! Happy

प्रभुदेसाई
आता मी 'अंताजीची बखर' जरूर वाचेन. >>
जरूर वाचा.. अफाट काम आहे ते.. _/\_ Happy

कुरुंदकर म्हणजे काय विषयच नाही..!! _/\_
लिंकांसाठी धन्यवाद पाचपाटील.
हे व्याख्यानं माझ्याच शाळेत झालेले , माझ्या अगदी घराजवळ झालेले आहे. ते बघून मन फुलपाखरू झाले आहे. त्यांचं आमच्या घरी येणंजाणं होतं. माझ्या आत्याच्या कुटुंबाचे ते फार जवळचे होते. त्यांच्या वाचनालया समोर मी रोज खेळायला जायचे. त्यांना जवळून पाहिलेले खूप जणं पाहिलेत. त्यांच्यामुळे आम्हाला सांस्कृतिक वारसा लाभला. मुलींची वेगळी शाळा निघाली. त्यांच्यामुळे माझ्या जीवनावर सरळसरळ परिणाम झाला आहे.
खरंच ते थोर होते. लिहावं तर असं नाही तर लिहूच नये , वाचावं तर असं नाही तर वाचूच नये ... मी अतिरेकी होते आहे ! Happy
चीकू सहमत.

हो, ती व्याख्यानं बहुतेक ऐकली आहेत. पहिलं तरी नक्कीच ऐकलंय. तरी परत ऐकायला आवडतील Happy
पुलंनी नरहर कुरुंदकरांना वाहिलेली आदरांजलीही आवर्जून ऐकण्यासारखी आहे!
https://youtu.be/K_ez29vrWxo

शिवाय एखाद्या हळव्या कवयित्रीने 'कोवळ्या मनाचे धुमारे' किंवा 'आयुष्याचं चांदणं' वगैरे टायटल देऊन..>>
असे एक हळव्या मनाचे कवी ओळखीचे आहेत. पदरमोड करुन कवितासंग्रह छापुन घेणे, भलामोठा पुस्तक प्रकाशन समारंभ आयोजित करणे ही कामे ते सेवानिवृत्तीनंतरही मोठ्या उत्साहाने करतात. तुमचा लेख वाचुन त्यांची आठवण झाली. Happy

Pages