हरवलेल्या प्रेमाचा गाव.

Submitted by मन मानस on 12 April, 2021 - 06:49

शब्द दाराजवळी येऊनि वाट विसरले काही ।
हरवलेल्या शब्दांचा तो गाव दूरच राही ।
गावामध्ये सगळे होते सोडूनि शब्द काही ।
त्या गावाची खासियत त्या गावाच्या लोकांमध्येच येई ।
सुख दुःख होते सोबती शेजारीच घर त्यांचे ।
मध्ये येऊनि वसली नियती दोघांवर हुकूम जिचे ।
जय पराजय एकामागे एक वसले होते ।
गर्वाचे घर आडवे येता घर पराजयाचे भासे मोठे ।
आपले सगळे सोबती आनंदाने नांदती ।
अहंकार शिरता मध्ये मी आणि ते आपल्यातून वेगळे होती ।
माया मोह यांचे घर गावात उठून दिसे ।
आपुलकी मात्र त्या घरासमोरी तळ ठोकून बसे ।
सगळे वस्ती करुनि होते अपूर्ण गाव तरीही ।
हरवले घर प्रेमाचे गावात प्रेमच नाही ।
असाही एक गाव मी रोज स्वप्नांमध्ये पाही ।
हरवलेल्या प्रेमाचे एक गाव दूरच राही ।

Group content visibility: 
Public - accessible to all site users