धग

Submitted by भावनेश पोहाण on 9 April, 2021 - 01:00

"जीव अडकणं" म्हणजे नेमकं काय असत, हे तिने जिवंत असताना आणि आता नसताना सुद्धा अनुभवलं आहे. त्यामागचं कारण सुद्धा तितकंच सुंदर होतं. आयुष्यात काही मोक्याचे आणि धोक्याचे क्षण येतात. ते जर वेळीच सावरता आले तर ठीक, नाहीतर मग माणुस एकतर बरबाद तरी होतो, किंवा मग प्रेमात तरी पडतो. मी प्रेमात पडले होते, त्याच्या. प्रेमाचे ते कितीतरी रंग, तो कैफ, ती धुंदी यांत अगदी आकंठ बुडून गेले होते. इतकं घट्ट नातं असूनसुद्धा, त्याची शिवण कधी उसवत गेली, ते कळालंच नाही. आणि जेव्हा ते जाणवायला लागलं, तेव्हा ते अर्ध्याहून अधिक फाटून गेलं होतं. मग त्याला तात्पुरते टाके मारून चालवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. ते अगदी आतून पोखरून गेलं होतं. कधीही ढासळून त्यात फक्त आता, हा आधीच गुदमरत चाललेला जीव सापडेल आणि संपून जाईल, या भीतीनेच, ती त्या सकाळी उठलीच नाही. तो जेव्हा खोलीत आला होता, तेव्हा तिच्या उघड्या डोळ्यांतून निघून गेलेला प्राण आणि बंद मुठीत असलेली झोपेच्या गोळ्यांची रिकामी बॉटल, इतकंच त्याला दिसलं होतं.

मला कारण हवं होतं. आता त्याच खोलीत त्याच्यासोबत एका नवीन व्यक्तीचा वावर होता. ज्या ज्या गोष्टींवर माझा हक्क होता, त्या सर्व गोष्टींवर आता एक नवीन नाव कोरलं गेलं होतं. पण माझं खोडलेलं नाव, मला अजूनही तसंच ठसठशीत दिसतं होतं. जाणवत होतं. कधीतरी तो माझं त्यानेच स्वतःहून खोडलेलं अस्तित्व कुरवाळेल, जवळ करेल या भोळ्या भाबड्या आशेने मी थांबले होते. मला कारण हवं होतं.

रात्रीचे दोन वाजले होते. बिल्डिंगच्या खाली होळी पेटत होती. मगाशी तिच्या अवती भवती जमा झालेल्या गर्दीपैकी आता तिथे कुणीच नव्हतं. तिचं ते जळणं फक्त दोनचं जण पाहत होते. एक चंद्र आणि दुसरी मी. तितक्यात मला कसलातरी आवाज आला. मी खिडकीतून आत डोकावून पाहिले, तर अंधार होता. फक्त स्टडी टेबल वरचा लॅम्प तितका चालू होता. त्याच्या त्या मिणमिणत्या प्रकाशात, टेबलावर डोकं ठेवून तो झोपला होता. मी त्याच्या जवळ गेले. त्याच्या त्या निरागस चेहऱ्याकडे पाहून, माझ्या काळजात चर्रर्र झालं. त्याच्या मिटलेल्या डोळ्यांच्या कडा अजूनही ओलसर होत्या. तितक्यात तिला त्याच्या डोक्याखाली एक कागद निपचित पडलेला दिसला. तिने तो उचलून दिव्याच्या उजेडात धरला. इतके दिवस ज्या गोष्टीसाठी, मी या खिडकीपाशी तडफडत होते, ते त्याने या कागदावर उतरवले होते. त्याच्या प्रत्येक स्वल्पविरामाला मला त्याच्या हाताची थरथर जाणवत होती. जे मला हवं होतं, ते मिळालं होतं. मी तो कागद पुन्हा टेबलावर ठेवून दिला. त्याच्याशेजारी बसले. आणि मनसोक्त रडले.

त्याचा दुसऱ्यांदा निरोप घेत असताना, माझे पाय यावेळी मात्र जरा अडखळले. त्याला शेवटचं डोळे भरून पाहण्याकरता मी जवळ गेले, तसा एखाद्या भयानक स्वप्नातून जागं व्हावं, तसा तो खाडकन उठला. मी त्याला दिसणार नाही, हे मला माहीत असूनसुद्धा मी दचकले. त्याने इकडे तिकडे पहिले, तो कागद उचलला आणि घराबाहेर पडला. अजून उजाडायला थोडा अवकाश होता. होळीच्या ठिकाणी आता निखारे उरले होते. तो तिथे जाऊन बसला. मी त्याच्या समोर जाऊन बसले. त्या निखाऱ्यांची धग त्याला जाणवत होती. पण त्याच्या आत काहीतरी जळत होतं, बाहेर येऊ पाहत होतं. जे मला जाणवतं होतं. त्याने खिशातुन तो कागद बाहेर काढला. एकदा वर आकाशाकडे पहिले आणि मग त्या निखाऱ्यांवर ठेवून दिला. त्या कागदावरची शाई हळूहळू काळवंडू लागली. आणि काही क्षणातच त्या शब्दांनी पेट घेतला. आता मात्र त्याची धग मलाही जाणवू लागली होती. जेव्हा त्या शब्दांनी धुराचे रूप घेतले, तेव्हा मात्र मी हि त्यात सामील होऊन शांत झाले. कायमचीच.

~ भावनेश पोहाण
IMG_20210330_101626.jpg

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे कथा!
उलगडून न सांगता बरचं काही सांगून गेली