चोकोलेट फ्लॅन केक

Submitted by Adm on 4 April, 2021 - 00:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

कॅरॅमल सॉस साठी:
१) १ कप साखर
२) ६ टेबलस्पून (साधारण ७५ ग्रॅम) अनसॉल्टेड बटर
३) १/२ कप थिक / हेवी क्रिम
४) १/२ टीस्पून मीठ

चॉकोलेट केकसाठी:
१) १५० ग्रॅम अनसॉल्टेड बटर
२) १९० ग्रॅम ब्राऊन शुगर
३) १ टेबलस्पून व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट
४) १ अंड
५) २०० ग्रॅम मैदा
६) १ टीस्पून बेकींग पावडर
७) १ टीस्पून बेकींग सोडा
८) ३० ग्रॅम कोको
९) ३ टेबलस्पून इंस्टंट कॉफी पावडर
१०) १ कप दूध
११) अर्धा टीस्पून मीठ.

फ्लॅन साठी:
१) ६०० मिली इव्हॅपोरेटेड मिल्क
२) १ कॅन कंडेन्स्ड मिल्क (स्विट)
३) ४ अंडी
४) १ टेबलस्पून व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट

क्रमवार पाककृती: 

सध्या एकंदरीत प्रचंड कंटाळा आला आहे आणि सगळीकडेच आकडे पुन्हा काळजी वाढवणारे आहेत. इथे पहिल्या लाटेपेक्षा बरीच जास्त प्रमाणात दुसरी लाट सुरू आहे आणि त्यामुळे पुन्हा सगळे नियम कडक झाले आहेत. भारतातही दुसरी लाट बघता बघता आलीच. सगळीकडे करोना सोडून दुसर्‍या कुठल्या बातम्या नाहीचेत. इथे मायबोलीवरही अनेकांनी कोव्हीड अनुभव लिहिलेत. गेले दोन दिवस सगळं ऐकून आणि वाचून खूप मानसिक थकायला झालं. इथे बसून काही करता येत नाही, भारतात जाता येत नाही. एकंदरीतच अत्यंत निराशाजनक काळ. तश्यातच ब्रिटीश बेकींग शो मधली विजेती नादिया हीचा नवा बेकींग शो नेटफ्लीक्सवर दिसला. तिची ही रेसिपी भारी वाटली. त्यामुळे काही जणं 'स्ट्र्रेस इटींग' करतात तसं 'स्ट्रेस बेकींग' (आणि त्यामुळे स्ट्रेस इटींग) केलं! इथल्या एक ज्येष्ठ मायबोलीकर 'अमा' ह्यांना कोव्हिडची लागण झाल्याचं त्यांच्या बाफावरून समजलं. मी ह्या केकची तयारी करत असताना तो बाफ वाचला. त्यामुळे ही रेसिपी डेडीकेटेड टू अमा! तुम्ही लवकर बर्‍या व्हा आणि केक करून खा. (शक्य असतं तर केक मीच तुम्हांला पाठवला असता. Happy )
चॉकोलेट केक आणि फ्लॅन हे दोन्ही आवडतातच. त्यामुळे ह्यांच हे काँबिनेशन पण इंटरेस्टींग वाटलं. मूळ रेसिपीत तयार कॅरामल सॉस वापरला होता पण मी तो ही घरी करून बघितला. नादिया तिच्या व्हिडीयोत म्हणाली की "This is not a cake. This is magic! " आणि ते अगदी खरं आहे.

कॅरॅमल सॉस:
१. एका जाड बुडाच्या भांड्यात साखर पसरून घ्या. भांडभर समान जाडीचा थर ठेवा म्हणजे सगळीकडे सारखी आच लागेल. मंद ते मध्यम आचेवर ठेवा.
२. हळूहळू साखर विरघळायला लागेल. साखर विरघळायला लागली की दर मिनिटानी हलवत रहा म्हणजे साखर करपणार नाही. इंटरनेटवर काही रेसिप्यांमध्ये ह्यात थोडं पाणीही घातलं होतं. पण मी पाणी घालत नाही. मागे एकदा त्याचा पाक होऊन पुन्हा साखरेचे क्रीस्टल तयार झाले होते आणि सगळं चिकट चिकट होऊन टाकून द्यावं लागलं होतं.
३. साखर पूर्ण विरघळून छान ब्राऊन रंग आला की गॅसवरून उतरवून त्यात बटर घाला.
४. बटर घातल्यावर एकदम भसाभसा बुडबुडे यायला लागतील. पण ते नॉर्मल आहे. भराभर ढवळून बटर आणि साखर नीट मिसळून घ्या.
५. हे झाल्यावर आता क्रीम आणि मीठ घालून पुन्हा नीट ढवळून घ्या. सगळं नीट मिसळलं गेलं की कॅरॅमल सॉस तयार! हा सॉस गार करून मग वापरायचा आहे. त्यामुळे तो आधी करून घ्यावा म्हणजे बाकीची तयारी होईपर्यंत तो गार होतो. उरलेला सॉस कोरड्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवावा. नंतर कश्यावरही वापरता येतो.

Camarel sauce.jpg

चॉकोलेट केकः
१. एका भांड्यात बटर आणि साखर एकत्र फेटून घ्या.
२. त्यात एक अंड आणि व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट घालून पुन्हा फेटा.
३. दुसर्‍या भांड्यात कोरडे घटक म्हणजे मैदा, बेकींग पावडर, बेकींग सोडा, कोको, इंस्टंट कॉफी पावडर आणि मीठ एकत्र करून ढवळा. कॉफी पावडरमुळे चॉकोलेटची चव खुलते (म्हणे).
४. दोन्ही मिश्रणं थोडी थोडी एकत्र करत, ढवळत रहा. सगळ्यात शेवटी दूध घालून केक बॅटर नीट ढवळून घ्या. हे मिश्रण फार सैल नसतं. नेहमीच्या केकच्या पिठापेक्षा मला घट्टच वाटलं.

फ्लॅनसाठीचे सगळे घटक मिक्सरमध्ये घालून नीट घुसळून घ्या. मूळ रेसिपीमध्ये ६०० मिली इव्हॅपोरेटेड मिल्क सांगितलं होतं. मी तेव्हडं घातलं पण कमी (~ ४०० मिलीचा एक कॅन असतो तेव्हडं) चाललं असतं असं मला नंतर वाटलं.

बेकींग:
१. Bundt cake pan ला बटर लावून, वरून पीठ भुरभूरून तयार करा.
२. पॅनमध्ये तळात गार झालेला कॅरॅमल सॉस घालून घ्या.
३. आता केकचे बॅटर चमच्याने घालून भांड्यात एका जाडीचा थर तयार करा. भांड थोडं आपटून लेवलींग नीट होतं.
*
Pan with batter.jpg
*
४. आता ह्याच्यावर फ्लॅनच मिश्रण घालायचं आहे. ते एकदम ओतलं तर बॅटरला भोक पडून केकचं बॅटर आणि फ्लॅनचं मिश्रण एकत्र होऊन जाईल. आपल्याला दोन वेगळे थर ठेवायचे आहेत. त्यासाठी फ्लॅनचं मिश्रण थेट बॅटरवर न ओतता एखादा चमचा उलटा धरून त्यावर ओता म्हणजे ते फवारल्यासारखं होईल. तसच तो चमचा फिरवत रहा.
५. आता पॅन एका मोठ्या पसरट भांड्यात ठेऊन त्यात उकळतं पाणी घालून ते सगळं १८० डिसेला प्रिहीट केलेल्या अवनमध्ये ठेवा. (थोडक्यात डबल बॉईलर करायचा आहे.) बेक व्हायला साधारण १ ते सव्वा तास लागतो.
*
Cake in assembly.jpg
*
६. टूथपिक कोरडी निघाल्यावर अवनमधून बाहेर काढा. तो साध्या चॉकोलेट केक सारखाच दिसेल.
७. खरी मजा पुढे आहे. आता पॅनवर प्लेट किंवा ट्रे ठेऊन एका दमात ते उपडं करा. केक अलगद सुटून येईल. आपण केकचं बॅटर खाली आणि फ्लॅनचं मिश्रण वर घातलं होतं पण बेक झाल्यावर ते बरोबर उलटं होतं. फ्लॅन खाली जाऊन सेट होतो आणि केक वर बेक होतो. ह्या मागची केमिस्ट्री (किंवा फिजिक्स!) सई सांगू शकेल कदाचित.
*
Ready cake top.jpg
*
Ready cake full top.jpg
*
Cut cake piece.jpg

वाढणी/प्रमाण: 
खाण्यावर अवलंबून आहे. पण ह्या प्रमाणात खूपच झाला! साधारण १० जणांच्या पार्टीला पुरेसा होईल. कारण बराच हेवी आहे.
अधिक टिपा: 

१. कॅरॅमल सॉस थोडा जास्त चालला असता. तो कमी पडल्यामुळे फ्लॅनवर त्याचे गठ्ठे गठ्ठे दिसत आहेत. आम्ही नंतर खाताना आणखी सॉस घालून घेतला.
२. मला फ्लॅनमध्ये जायफळ घालायचा फार मोह होत होता पण मग केकलाही त्याचाच स्वाद लागेल की असं वाटल्याने घातलं नाही. पण पुढच्या वेळी फ्लॅनमध्ये केशर घालणार आहे.
३. झाल्यावर लगेच खाण्यापेक्षा थंड करून जास्त चांगला लागला. फ्लॅनची चव अजून खुलली.
४. नादिया असंही म्हणाली की "if unicorns were to bake, they would bake this cake. Because its magic! " ते ही अगदी पटलं! Happy

माहितीचा स्रोत: 
ब्रिटीश बेकींग शो मधल्या नादियाचा नवा शो
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी.
Baking challenged असल्याने याच्या वाटेला नक्कीच जाणार नाही. Happy . कोणी करून खायला घातला तर आवडेल.

भारीच आहे
खरोखरच तुम्ही बेकिंग ला स्वतःचे मूळ काम याव्यतिरिक्त वेगळा बिझनेस बनवायलाही हरकत नाही.

Baking challenged असल्याने याच्या वाटेला नक्कीच जाणार नाही. Happy . कोणी करून खायला घातला तर आवडेल.>>> +१.
लव्हली!

अतिशय टेम्पटिंग केक. फार भन्नाट दिसतो आहे. पण गरिब भुकेली मुलगी लांब काचेतील केक पाहिल तसाच फक्त पहाते आणि विसरून जाते. बेकिंग मेरे बसकी बात नाही. Adm तुझ्याबद्दल प्रचंड आदर, कौतुक, हेवा सगळं एकाचवेळी वाटतं आहे. नुसता बेक करण्याचा उत्साह नाही तर तो यशस्वी सुद्धा झाला आहे. कृती दोनदोनदा वाचली. मला तरी अवघड वाटली.

मस्तच दिसतोय..
ती चॅाकलेटची टेस्ट फ्लॅनच्या ओरिजनल टेस्टला ओव्हरपावर नाही करत का? म्हणजे, गोडीची आवड नाही आणि त्यात गोड पदार्थातलं मला कमी कळतं मला म्हणून सहज विचारायचं होतं..
बाकी बेकिंग म्हणजे कमालीचे पेशन्स पाहिजेत .. जे माझ्यात नाहीत त्यामुळे बेकिंग करणाऱयांचा फार आदर करते..

अमेझिंग केक दिसतोय. फार खटपट आहे पण.

बाकी कोविद स्ट्रेसबद्दल लिहिलेलं फार रिलेट झालं. मीही परवा सगळी कामं बाजूला ठेवून चॉकलेट केक बेक करत बसले होते आणि तो मस्त झालाय!

धन्यवाद सगळ्यांना. Happy

खरोखरच तुम्ही बेकिंग ला स्वतःचे मूळ काम याव्यतिरिक्त वेगळा बिझनेस बनवायलाही हरकत नाही. >>> Happy

करायचा प्रचंड मोह होतोय >>> टाका करून !

मला तरी अवघड वाटली. >>>> खरतर कॅरॅमल सॉस बाहेरून आणला तर बाकीचं नेहमीचच आहे. फ्लॅन मिक्स तर अगदी दोन मिनिटांत होतं.

ती चॅाकलेटची टेस्ट फ्लॅनच्या ओरिजनल टेस्टला ओव्हरपावर नाही करत का? >>>> नाही. उलट दोन्ही चवी एकत्र छान लागतात. खाताना उभा तुकडा घ्यायचा. गोड फ्लॅन आणि चॉकोलेटी केक एकत्र मस्त लागतं.

बेकिंग मेरे बसकी बात नाही.
बाकी बेकिंग म्हणजे कमालीचे पेशन्स पाहिजेत >>>>> खरतर दिलेलं प्रमाण आणि स्टेप्स पाळल्या की होऊन जातं. फार काय डोकं लागत नाही Happy

Thank you so much >>>> बर्‍या व्हा पटकन.

भार्री दिसतोय केक!! ते फ्लान वरून खाली कसं जात असेल काही कळतच नाही!जादू च वाटतेय.
Baking challenged मीही आहे पण चक्क ही रेसिपी अवघड वाटत नाहीये Happy आता करून बघेन का आणि कधी हे माहित नाही !!

करुन पहायचा मोह होत होता पण एवढ्या मोठ्या प्रमाणात केले तर खायला कुणीच नाही अशी परीस्थिती. शेवटी मला कमी प्रमाणात करता येइल अशी दुसरी पाकृ जालावर शोधली. कॅरॅमल सॉस बाबतीत चिटिंग केले आणि फ्रीजात आइसक्रिम टॉपिंग म्हणून जे सॉल्टेड कॅरॅमल सॉस होते तेच वापरले. मी सहा रॅमिकिन्स वापरले. फ्लॅनचे बॅटर व्यवस्थित पुरले. केकचे बॅटर उरले ते ८ " वाल्या गोल पॅनमधे घालून एक १" जाडीचा केक केला. मी ही पाकृ वापरली . केकसाठी प्रमाण अर्धे केले आणि फ्लॅनसाठी १/३ .
chocoflan.jpg
चॉकोफ्लॅन करण्यात आमची दोघांची दुपार छान गेली. धन्यवाद.

केवळ अप्रतिम!
बेकिग आवडत पण आय डोन्ट हॅव बेकिन्ग हॅन्ड अ‍ॅट ऑल , फियास्कोच होतो त्यापेक्षा असु देत.

मी ही पाकृ वापरली >>>> अरे वा ! ह्यात त्यांनी फ्लॅनसाठी फक्त साधं दूध वापरलय. कंडेन्स्ड आणि एव्हॅपोरेड नाही घातलय. मी जेव्हा नुसता फ्लॅन करतो तेव्हा पण ही दोन्ही दुधं घालतोच. ते न घालता फ्लॅन पांचट वाटलं का तुम्हांला ?

चॉकोफ्लॅन करण्यात आमची दोघांची दुपार छान गेली. धन्यवाद. >>> Happy

हे फारच भारी दिसतंय प्रकरण!
बेकींग केलेलं नाही कधी पण विरंगुळा म्हणून Claire Saffitz चे व्हिडिओ पहात असते युट्यूबवर. त्यामुळे ही रेसिपी वाचणं पण स्ट्रेसबस्टर वाटलं!

पाकृ आवडली, बेकिंग पण खूप आवडतं. नुकताच केक क्लास केला होता, त्याचे प्रयोग चालू असतात, हा पण करून बघेन, साधं दूध वावरून पण जमतंय म्हणल्यावर आनंदच झाला म्हणजे हे मिळत नाही ,ते मिळत नाही होणार नाही. स्वाती, तुमचाही पदार्थ छान दिसतोय.

अंड खात नसल्याने खाणार नाही तर अर्थात करणार नाही पण जबरा पाककृती!

पराग,
मी देखील पहिल्यांदाच कंडेन्स्ड आणि इवॅपोरेटेड दुधं न वापरता फ्लॅन केली पण पाणचट नाही वाटली. होल मिल्क , दोन मोठी अंडी यामुळे पुरेसा दाटपणा होता आणि केक सोबत जमून आले. तरी पुढल्यावेळी होलमिल्क ऐवजी इवॅपोरेटेड दूध वापरुन बघणार आहे. अजून चिटिंग करायचे असेल तर केकसाठी डेविल्स फूड वगैरे बॉक्स मिक्स चालावे.
मित्र मंडळींसाठी ओरीजिनल रेसीपीने फ्लॅनकेक करायची संधी लवकरच मिळेल अशी आशा आहे.

__/\__

सगळ्यांना धन्यवाद ! Happy

गटगला कधी आलास तर घेऊन ये. >>>> मैत्रेयी करणार म्हणाली आहे बघ. तिला सांग आणायला Wink

होल मिल्क , दोन मोठी अंडी यामुळे पुरेसा दाटपणा होता >>>> ओह चांगलय मग. दूध आणि अंडी असतात घरात त्यामुळे हे आता कधीही करता येईल.